रविवार, १५ एप्रिल, २०१८

क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता शोधायलाच हवी!

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये एकूण ६६ पदकांची लयलूट करत, भारताने शानदार कामगिरी केली आहे. भारताने या स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्यपदके जिंकली. २०१४ ला ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ६४ पदकांची कमाई केली होती. यंदा त्यापेक्षा उत्तम कामगिरी भारताने केली आहे. भारताने दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सर्वाधिक १०१ पदके जिंकली होती. त्यानंतर मँचेस्टरमध्ये ६९ आणि आता ६६ पदकांची कमाई केली आहे. परंतु, याच्यावरच आपण समाधान मानता कामा नये. कारण, ही पदकांची कमाई फारशी समाधानकारक नाही. तिस-या क्रमांकावरून दुस-या आणि पहिल्या क्रमांकावर येण्याचा आमचा प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी शासकीय पातळीवर नियोजन व्हायला हवे. १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात कितीतरी गुणवत्ता असलेले खेळाडू तयार होऊ शकतात. त्या खेळाडूंच्या गुणवत्तेचा शोध घेऊन ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी मिशन ऑलिम्पिक, मिशन राष्ट्रकुल, मिशन एशियन गेम अशा मोहिमा राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी टार्गेट ठेवून इतकी पदके मिळवायचा प्रयत्न झाला पाहिजे असे वाटते. आज ६६ पदकांवर समाधान मानणे म्हणजे अल्पसंतुष्टपणा आहे. तरीही या पदकांची संख्या कमी झालेली आहे, याकडेही आम्ही लक्ष दिले पाहिजे. ग्लास्गो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपेक्षा यंदा त्यापेक्षा उत्तम कामगिरी भारताने केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, दुस-या क्रमांकावर ब्रिटन आणि तिस-या क्रमांकावर भारत आहे.पण, भारताने दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सर्वाधिक १०१ पदके जिंकली होती. त्यानंतर मँचेस्टरमध्ये ६९ आणि आता ६६ पदकांची कमाई केली आहे. याचा अर्थ भारताच्या पदकांना उतरती कळाच लागलेली आहे. भारत तिस-या क्रमांकावर आहे. पण, पदकांची संख्या घटलेली आहे. तीन अंकीवरून दोन अंकी संख्येवर आम्ही आलो आहोत. भारतात जी गुणवत्ता दिसली, ती अन्य देशांत दिसली नाही. यामागच्या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. राष्ट्रकुल स्पर्धेला जाणा-या संघाला निरोप देण्यासाठी काही मान्यवर माजी खेळाडू आले होते, तेव्हा त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर आपल्याकडे खेळाच्या सरावासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणा-या कोणत्याही सुविधा नसल्याची खंत व्यक्त केली होती. या स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांना सुविधा, पोषक वातावरण निर्माण करून देण्याची फार गरज आहे. त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात क्रीडा शिक्षण, प्रशिक्षण, विशेष प्रशिक्षण देणा-या संस्था निर्माण होण्याची गरज आहे. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय स्पध्रेत पदक मिळाल्यावर सरकारकडून त्या खेळाडूंचा गौरव केला जातो. त्यांना सुविधा दिल्या जातात, बक्षिसे दिली जातात. पण, तोपर्यंत या खेळाडूंनी प्रचंड संघर्ष केलेला असतो. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला असतो. या अडचणींवर मात करून त्यांनी हे यश मिळवलेले असते. अपु-या सुविधा असताना त्यांनी हे यश मिळवलेले असते. पण, खेळाडूंच्या संघर्षाच्या काळात त्यांना सुविधा मिळाल्या, तर अधिक चांगली कामगिरी ते करू शकतील. यासाठी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, क्रीडा प्रबोधिनी अशा संस्था शासकीय पातळीवर उभारल्या गेल्या पाहिजेत. खासगीत कोणी अशा संस्था उभ्या करत असेल, तर शासनाने त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. मुख्य शहरांच्या ठिकाणीसुद्धा अपु-या सुविधा असतात. ग्रामीण भागाबाबत बोलायलाच नको. या सुविधा आपण जोपर्यंत देत नाही आणि ग्रामीण भागातील गुणवत्ता शोधून त्यांना प्रोत्साहन देत नाही, तोपर्यंत आपली पदक तालिकेतील कामगिरी सुधारणार नाही. ही तर अवस्था राष्ट्रकुलची आहे. ऑलिम्पिकला आमच्याकडे फारच वाईट अवस्था असते. क्वचित एखाद दुसरे पदक मिळते. तो आकडा आमचा कधी वाढणार आहे? आम्हाला ऑलिम्पिक पदकांचे उद्दिष्ट ठेवून आत्ताच सक्षम कामगिरी केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा दिल्या पाहिजेत. खेळाडूंचे कशा प्रकारचे गुणांकन केले जाते, याचा सराव असला पाहिजे. तरच आम्ही त्याला पात्र ठरू. आम्ही ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीतूनच बाहेर पडतो. त्यामुळे जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतके खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतात. आज आम्हाला ऑलिम्पिकची तयारी करण्याची गरज आहे. राष्ट्रकुलच्या ६६ पदकांनी हुरळून जाऊन चालणार नाही, तर आम्हाला ऑलिम्पिक जिंकायचे धोरण आखले पाहिजे. आमच्याकडचे क्रीडा धोरण केंद्रीय आणि राज्य पातळीवर दोन्ही ठिकाणी कमी पडताना दिसते. जगात १२५ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला देश असताना गुणवत्ता पण त्या प्रमाणातच दिसली पाहिजे. यासाठी क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध घेतला पाहिजे.यावर्षी भारताने नेमबाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. नेमबाजीत भारताने ७ सुवर्णपदकांसह एकूण १६ पदके जिंकली. तेजस्विनी सावंत, जीतू राय, हीना सिद्धू, मनू भाकर, अनीश भानवाला, मेहुली घोष अशा अनुभवी नेमबाजांनी भारताला पदके जिंकून दिली आहेत. त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे, पण यातील सातत्य वाढवण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने ९ पदके जिंकली. यात ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदकांचा सामावेश आहे. मीराबाई चानू, संजीता चानू आणि पूनम यादव यांनी भारतासाठी सुवर्णपदके जिंकली. कुस्तीत भारतीय पैलवानांनी चमकदार कामगिरी केली. राहुल आवारे, विनेश फोगट, साक्षी मलिक, सुमित या पैलवानांनी मैदान मारले. बॅडमिंटनमध्ये भारताने ६ पदकांची कमाई केली. महिला एकेरीत सायना नेहवालने सुवर्णपदक जिंकले. पुरुष गटात किदाम्बी श्रीकांतने रौप्य पदक जिंकले. तसेच मिश्र दुहेरीत भारताने सुवर्णपदकाची कमाई केली. टेबल टेनिसमध्ये महिला आणि पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. याशिवाय महिला एकेरीत मोनिका बत्राने सुवर्णपदक जिंकले. बॉक्सिंगमध्ये भारताने एकूण ९ पदके  जिंकली. यात ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताने ३ पदके  जिंकली. यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये भारतीय हॉकी संघांच्या हाती निराशा आली. पुरुष आणि महिला या दोन्ही संघांना रिकाम्या हाताने परतावे लागले. हॉकी हा आमचा राष्ट्रीय खेळ आहे, हे आम्ही विसरलो आहोत का? त्यावर आमची मक्तेदारी कशी राहील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. केवळ क्रिकेटशिवाय आम्हाला खेळ माहीत नाहीत का, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: