मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

आवडीने पोलिसात भरती व्हा, तडजोडीने नको!


मुंबई पोलीस दलातील १ हजार १३७ पोली शिपाईपदांच्या भरतीसाठी दोन लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. म्हणजे या भरतीतील एका पदासाठी साधारण १७५ उमेदवार इच्छुक आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता किमान आठवी पास असताना दहावी, बारावी आणि पदवीधरच नव्हे तर डॉक्टर, वकील, एमबीए आणि इंजिनीयर असलेल्या उमेदवारांनीही पोलीस शिपाईपदासाठी अर्ज केले आहेत. हा बेरोजगारीचा परिणाम म्हणायचा की गुणवत्तेचा अभाव म्हणायचा? बेरोजगारी असेल तर त्याला जबाबदार कोण आणि गुणवत्तेचा अभाव असेल तर त्याची कारणे नेमकी काय, याचा उहापोह होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए हे शिक्षण घेणे तितके सोपे नसते, ते खर्चिक असते. चांगले गुण मिळवूनच हे शिक्षण घेतले जात असले तरी त्यासाठी पैसा खर्च करायला लागतो. इतके करूनही आमचा मुलगा डॉक्टर, इंजिनीअर, वकील आहे असे न सांगता ज्या आईबापांना आमचा मुलगा इतका शिकून पोलिस शिपाई भरतीसाठी गेला आहे हे सांगावे लागत असेल तर ही शरमेची बाब म्हणावी लागेल. डॉक्टर होऊन जर तो मुलगा पोलीस भरती होत असेल आणि रुग्णसेवा करत नसेल तर कशासाठी हे शिक्षण घेतले? वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर ग्रामीण भागात जाऊन दवाखाना काढला तरी खूप पैसा कमावता येईल. एमबीएच्या शिक्षणाचा फायदा शेती आणि स्वत:च्या व्यवसायासाठी, समुपदेशनासाठी करता येणे शक्य असते. इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनाही छोटासा व्यवसाय करणे शक्य असते. सरकारी स्वयंरोजगाराच्या योजनांचा फायदा घेण्यास काय हरकत आहे?  इतके हे कौशल्याचे शिक्षण घेऊन पोलीस भरतीच व्हायचे होते, तर हे शिक्षण घेऊन पालकांचा पैसा का वाया घालवला असा प्रश्न निर्माण होतो. डॉक्टर, इंजिनीअरींग आणि एमबीएचे शिक्षण, वकिलीचे शिक्षण हे काही नोकरी करण्यासाठी घेतले आहे असे नाही. स्वत:च्या पायावर उभे राहण्याची धमक या शिक्षणात आहे. असे असताना पोलीस शिपाई पदाकडे ही मुले वळतात याचा अर्थ त्यांनी गुणवत्ताप्राप्त आणि दर्जेदार शिक्षण घेतलेले नाही. बेसुमार निघालेली खासगी वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये यातून दर्जेदार शिक्षण मिळाले नसल्यामुळे आज या तरुणांवर ही वेळ आलेली आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आज शेकडो अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थी मिळत नसल्यामुळे बंद केली जात आहेत. त्यांची मान्यता रद्द होत आहे. अशा परिस्थितीत या महाविद्यालयांमधून कशाप्रकारचे शिक्षण मिळाले असेल याचा विचार केला पाहिजे. अशा शिक्षणाची आणि अभ्यासक्रमांची पुनर्रचना करावी लागेल. सध्या पोलीस शिपाईपदाच्या भरतीसाठी शारीरिक चाचणी घेतली जात आहे. दररोज सुमारे ९ हजार अर्जदारांना नायगांवचे हुतात्मा मैदान, गोरेगांव पोलीस मैदान आणि विक्रोळीतील सर्व्हिस रोडवर चाचणीसाठी बोलावण्यात येत आहे. ८ एप्रिलपासून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ८ मे रोजी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी चाचणी देणाºयांमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनीअर दिसल्यावर अनेकांना मोठा धक्का बसला. काही करून आपल्याला काम मिळाले पाहिजे या इराद्याने हे बेरोजगार तरुण आपले शिक्षण विसरून आठवी पास व अन्य उमेदवारांच्या रांगेत स्पर्धा करण्यासाठी उभे आहेत. पण याचा अर्थ त्या जागी हे उच्चशिक्षित भरती व्हावेत असे नाही. ही नोकरी कमी शिकलेल्या आणि कष्टाची तयारी असलेल्या तरुणांसाठी आहे. डॉक्टर, इंजिनीअर आणि वकील होऊनही त्या पदाचे काम करू न शकणारे अशी कष्टाची कामे तरी करु शकतील का?  हे जे डॉक्टर, वकील, इंजिनीअर अशा परिक्षेसाठी येऊ पहात आहेत त्या मुलांवर आई-वडिलांच्या इच्छेखातर हे शिक्षण लादले गेले असावे. त्यामुळे त्यांनी पालकांच्या इच्छेखातर तशी पदवी प्राप्त केली, पण त्या विषयात नोकरी किंवा व्यवसाय करण्याची आंतरप्रेरणा त्यांना मिळाली नसेल. आज हे गुणवत्तेच्या अभावी झालेले शिक्षण त्या तरुणांना रोजगार देण्यास असमर्थ आहे असे दिसून येते.  पोलीस शिपाईपदाच्या भरतीसाठी डॉक्टर आणि इंजिनीयर येत आहेत, ही आश्चर्याची बाब आहे, असे मत पोलीस अधिकारीही व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे हे शिकलेले उमेदवार ग्रामीण भागांतून आलेले आहेत. त्यांच्याकडे सराईतपणे इंग्रजी बोलण्याचे कसब नाही. त्यामुळे त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी मिळत नसल्याचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाया कच्चा असल्यावर बाहेरच्या जगात जगण्याचे शिक्षण त्यांना मिळाले नाही हेच यातून दिसून येते. पोलीस शिपाई झाल्यास राहण्यासाठी पोलीस वसाहतीत निवासस्थान मिळते. २५ हजार रुपये मासिक वेतन आणि इतर भत्ते मिळतात. तसेच विभागीय परीक्षांना बसून एटीएस, गुप्तचर विभाग आणि सायबर क्राइमसारख्या विभागात पाच वर्षांत प्रमोशन घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत पोलीस दलात सामील व्हायचे असते असे मत या तरुणांबद्दल पटनायक यांनी व्यक्त केले आहे. पण जे शिक्षण घेतले आहे त्याचा उपयोग केला जात नसेल तर त्या शिक्षणाचा फायदा तरी काय? पोलीस शिपाईपदाच्या भरतीसाठी ४२३ इंजिनीयर्स, १६७ एमबीए, ५४३ एम.कॉम, २८ बीएड पदवीधारक, ३४ एमसीए, २५ मास मीडिया अँड कम्युनिकेशन्स, ३ बीएएमएस. १६७ बीबीए आणि ३ एलएलबी पदवीधारकांनी अर्ज केले आहेत. खरोखरच ही चिंतेची बाब आहे. आपल्या क्षेत्रातील काम मिळवू शकण्यात अपयशी ठरल्यामुळे कुठे तरी चरितार्थासाठी तडजोड करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. पण यातून ते समाधानाने काम करू शकणार नाहीत. कदाचित त्यांच्या मनातील वैफल्य यातून प्रकट होऊ शकते. म्हणूनच अशा तरुणांची भरती होणे किंवा अशा तरुणांनी नाईलाजाने पोलीस शिपाई होणे ही आश्चर्याची, कौतुकाची बाब नसून चिंतेची बाब म्हणावी लागेल. पोलीस आणि सैन्यदलात भरती होण्यामागे देशप्रेम आणि शौर्याची आवड असली पाहिजे. काही जमले नाही म्हणून त्याठिकाणी भरती होण्याचा प्रकार असेल तर ही तडजोड धोकादायक होऊ शकेल असे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: