बुधवार, १८ एप्रिल, २०१८

नसलेल्या संकटांची भीती

मागील चार-पाच दिवसांपासून बहुसंख्य राज्यांतील एटीएममध्ये खडखडाट झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झालेली आहे. पैसे मिळाले नाहीत तर आपले काय होणार या भीतीने सर्वसामान्य माणूस बँकांच्या दारात जाऊन बसला आहे. माध्यमांनी केलेली चर्चा, त्याचे माजवलेले अवडंबर आणि वर्तमानपत्रांतून आलेल्या बातम्यांमुळे आता आपल्याला बँकेतून पैसेच मिळणार नाहीत का, अशी अकारण भीती सामान्य माणसांनी घेतलेली आहे. नको त्या गोष्टीचा बाऊ केला जात आहे. एटीएममधून ठरावीक दिवसांत ४५ हजार कोटी काढले गेले यावरून अनेकजण हैराण झाले आहेत. सरकारच्या गैरव्यवस्थापनाचा तडाखा लोकांना बसू लागला आहे. ही चलन टंचाई किती काळ चालणार आहे, याची कोणतीही माहिती सरकारकडून उपलब्ध झालेली नाही. सुदैव इतकेच की यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बाजारात निर्माण झालेल्या या स्थितीची त्वरेने कबुली दिली आहे. नोटाबंदीच्या काळातही देशात अभूतपूर्व चलन टंचाई निर्माण झाली होती. सुमारे महिनाभर ही गोंधळाची स्थिती होती. त्या परिस्थितीतून सुधारणा होत असतानाच पुन्हा एकदा चलन टंचाई निर्माण झाली आहे.सरकार म्हणून देशातील चलन व्यवहार सुरळीत ठेवण्याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारायला हवी. निर्माण झालेल्या चलन टंचाईच्या कारणांचेही स्पष्टीकरण त्यांना द्यावेच लागेल. कायमच समस्यांचे खापर काँग्रेस आघाडी सरकारवर फोडायचे आणि स्वत: नामानिराळे राहायचे, असे आता करता येणार नाही. चलन टंचाईचा घोळ नोटाबंदीच्या काळापासून सुरू झाला आहे. आज ज्या राज्यांमध्ये रोकड टंचाई निर्माण झाली आहे, त्या राज्यांमध्ये युद्ध पातळीवर चलन पुरवठा करणे सरकारचे कर्तव्य आहे. देशातील जनतेला चलन टंचाईच्या प्रसंगांना वारंवार सामोरे जावे लागू नये याची दक्षता सरकार कधी घेणार, हाच खरा प्रश्न आहे. एवढय़ा मोठय़ा देशात लाखो एटीएममधून कोटय़वधी लोक पैसे काढत असताना ठरावीक काळात ४५ हजार कोटी काढल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही. अनेकजण आपल्या जवळच्या एटीएममध्ये गर्दी करताना दिसत आहेत. यापैकी अनेकजण गरज नसतानाही पैसे काढायला गेले आहेत. पण चलन किंवा नोटांना आपल्याकडे पर्याय आहेत याचा कोणीही सजगपणे विचार करताना दिसत नाही. तसे एटीएम बंद असणे, त्यातील पैसे संपणे हे काही फार नवीन आहे का? बँकांना सुट्टी असली की बहुतेक वेळा एटीएममध्ये खडखडाट झाल्याच्या बातम्या येतच असतात. सेकंड, फोर्थ सॅटर्डे आणि रविवारला जोडून बँकेला सुट्टी आली की हे प्रकार नेहमीच घडतात. त्यात नवीन ते काय आहे? कधी इंटरनेटच्या सव्‍‌र्हरचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे बारा-बारा तास एटीएम बंद राहिल्याचेही प्रकार आपल्याकडे अनेकवेळा घडलेले आहेत.त्यामुळे एटीएममधील खडखडाट आणि नोटांची टंचाई याचा विनाकारण बाऊ करण्याची गरज आहे, असे बिलकूल वाटत नाही. फक्त या खेपेला भीती निर्माण केली ती आकडा समजल्यामुळे. ४५ हजार कोटी एटीएममधून काढले गेले. ते कुणी काढले, कसे काढले याबाबत विनाकारण संभ्रम निर्माण केला आहे. नागरिकांना, बँकेच्या ग्राहकांना विनाकारण घाबरवले जात आहे. पण या देशातील सगळय़ा एटीएममधून दररोज कितीतरी हजार कोटी काढले जात असतात. तो आकडा आजपर्यंत कधीच समोर आलेला नव्हता. त्यामुळे नागरिक फसताना दिसत आहेत. नोटाबंदीसारखी ही गोष्ट बिलकूल नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात सलग सुट्टय़ा येतात, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पैसे काढले जातात. त्यात काही वेगळे घडले आहे असे बिलकूल वाटत नाही. पण प्रसारमाध्यमांमधून असे वातावरण निर्माण केले गेले आहे की, फार मोठे आभाळ कोसळले आहे. माध्यमांच्या मते नोटाबंदीला तब्बल दीड वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांत पुन्हा एकदा चलन तुटवडा निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार आणि मध्य प्रदेशात चलन तुटवडय़ाचा सर्वाधिक परिणाम दिसत आहे. एटीएममधून काढण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटा पुन्हा चलनात येत नसल्याने बँक अधिकारीही चक्रावून गेले आहेत. ब्लॅकमनी व्हाईट करण्यासाठी या नोटांचा वापर केला जात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. आकाराने छोटी पण, देशातील सर्वाधिक मूल्य असलेली दोन हजारांची नोट अचानक चलनातून गायब झाल्याने या नोटा ब्लॅकमनीसाठी वापरल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे एकीकडे कॅशलेस होण्याचा जनता प्रयत्न करते आहे, ऑनलाईन, कार्ड स्वाईप करून व्यवहार करत आहे. अशा परिस्थितीत दोन हजारांच्या नोटांची काही गरज वाटत नसेल.त्यामुळे ती चलनात पुन्हा पुन्हा येत नसेल. पाचशेच्या नोटा, दोनशेच्या, शंभरच्या नोटा पुन्हा पुन्हा येतात कारण छोटे व्यवहार रोखीने होतात. २ हजारांची नोट मोठय़ा व्यवहारासाठी वापरण्याऐवजी लोक कॅशलेस व्यवहार करताना दिसत असतील तर ती नोट परत व्यवहारात येईल कशी? राजकीय नेत्यांनी याचा फायदा उठवत या भीतीच्या आगीत तेल ओतण्याचा प्रकार केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा पैसा कर्नाटक निवडणुकीकडे वळवला का, असा संशय व्यक्त केला आहे. पण ग्राहकांनी लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या खात्यातून पैसे गेलेले नाहीत. आपला पैसा दुसरे कसे कोणी काढू शकतील? कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात मतदान होत आहे. त्यामुळे नोटांची चणचण भासू नये यासाठी काही राजकीय नेते आणि पक्षांकडून दोन हजारांच्या नोटा साठवून ठेवल्या जात आहेत. त्यामुळेच देशात चलन तुटवडा निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण एटीएममध्ये फक्त २ हजारांच्याच नोटा असतात का? पाचशे, शंभरच्याही असतातच की. एटीएममध्ये आम्ही जेवढय़ा दोन हजारांच्या नोटा टाकतो, त्या ग्राहक काढून घेतात.पण नंतर या नोटा चलनात येत नाहीत. त्यामुळे दोन हजारांच्या नोटांची चणचण भासत असल्याने एटीएममध्ये खडखडाट झाला आहे, असे बँकांचे म्हणणे आहे. मोठे व्यवहार हे चेकने, ऑनलाईन केले जातात. पेटीएम किंवा विविध अ‍ॅपचाही वापर वाढला आहे. त्यामुळे हा पैसा परत आला नाही तर त्याची चिंता ग्राहकांनी करण्याची काहीच गरज नाही. मुंबईत खासगी एटीएममध्ये भरपूर पैसा आहे. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे एटीएमच्या वापरावर पडणारे चार्जेस आणि जीएसटीमुळे आता कमी एन्ट्री करण्यापेक्षा एकदाच पैसे काढण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पैसे काढले गेले असावेत. त्याचा अर्थ फार मोठे आर्थिक संकट आले आहे, असे बिलकूल समजायचे कारण नाही. पण यामागे सरकारचे गैरव्यवस्थापन कारणीभूत आहे, हे लक्षात घ्यावेच लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: