शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

ंमध्यप्रदेशात भाजपला रोखण्याची काँग्रेस रणनीती

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने दक्षिण मोहिम हाती घेतल्याचे पाहुन काँग्रेसने भारताचा आणि भाजपचा मध्य गाठायचे ठरवले आहे. त्यादृष्टीने गेली पंधरा वर्ष भाजपच्या हातात असलेली सत्ता खेचून काँग्रेसला नवसंजिवनी देण्यासाठी डावपेच टाकणे सुरु केले आहे. त्यापैकी एक महत्वाचा एक्का सुरुवातीलाच बाहेर काढल्याचे दिसते आहे. तो म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचा उमेदवार ज्योतिर्आदित्य शिंदे यांचे नाव पुढे आणले जात आहे.येत्या काही महिन्यात मध्यप्रदेश विधानसभा निवडणुका होतील. या निवडणुका यासाठी महत्वाच्या आहेत की त्यानंतर नियोजीत कार्यकालाप्रमाणे सहाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होतील. मध्यप्रदेश बरोबर राजस्थानातील निवडणुकाही होणार आहेत. ही दोन्ही महत्वाची आणि मोठी राज्ये आहेत. या राज्यांबरोबरच लोकसभेच्या निवडणुका घेण्याच्या चर्चा जरी असल्या तरी त्या कोणत्या तरी असुरक्षिततेतून घेतल्या जातील. म्हणूनच या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आणि खºया अर्थाने लोकसभेची रंगित तालीम अशा आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसने उचललेली पावले महत्वपूर्ण असून ज्योतिर्आदित्य शिंदे हा टाकलेला मोहरा फार महत्वाचा ठरू शकतो असे काँग्रेसला वाटते.मध्यप्रदेशच्या एकूणच विधानसभेचे चित्र पाहिले तर लक्षात येईल की या विधानसभेत एकूण जागा या २३० आहेत. बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. सध्या भाजपच्या १६५ जागांसह विधानसभेत वर्चस्व आहे. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारली तरी भाजपचे पूर्ण पानीपत करून सत्ता खेचून आणणे तितकेसे सोपे राहिलेले नाही.१९५६ पासून अस्तित्वात असलेल्या मध्यप्रदेशात यापूर्वी सर्वाधिक काळ काँग्रेसने या राज्यात सत्ता मिळवलेली आहे. म्हणजे गेल्या ६२ वर्षात तब्बल ४० वर्ष इथे काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. यामध्ये १९५६ ते ६७, त्यानंतर १९६९ ते १९७७, १९८० ते १९९० आणि त्यानंतर १९९३ ते २००३ अशी ती चाळीस वर्ष आहेत. याशिवाय बिगर काँग्रेस ज्या सत्ता आल्या त्यामध्ये भाजप वगळता अन्य कोणी पूर्णकाळ केलेला नाही. त्यामध्ये १९६७ ते १९६९ यामध्ये सुमारे पावणेदोन वर्ष संयुक्त विधायक दलाचे सरकार होते. त्यानंतर १९७७ ते १९८० या अडीच वर्षाच्या काळात जनता पक्षाचे सरकार होते. त्यानंतर भाजपनेही एकदा १९९० ते १९९२ या काळात अल्प मुदतीचे सरकार स्थापन केले होते. मात्र २००३ नंतर भाजपची सलग १५ वर्ष सत्ता राहिलेली आहे. या राज्यात तीन वेळा दोन महिने ते एक वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी राष्टÑपती राजवटही लागलेली आहे. परिणामी साठ वर्षांच्या कालावधीत काँग्रेस आणि भाजप यांच्याकडेच दीर्घकाळ सत्ता राहिलेली आहे. अन्य पक्ष तीथे शिरकाव करू शकलेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने हे राज्य मिळवणे महत्वाकांक्षेचे आहे.काँग्रेसला गुजरातमध्ये मिळालेला कौल, वाढलेल्या जागांमुळे मोदींची लोकप्रियता घटली किंवा आपली वाढली असे वाटत असले तरी ते तितकेसे खरे नाही. कारण सत्ता मिळवण्या इतपत लोकप्रियता गुजरातमध्ये मिळवता आलेली नाही. त्याचप्रमाणे मोदी लाटेपेक्षा २०१४ मध्ये लोक काँग्रेसला कंटाळले होते त्यामुळे त्यांना नवा पर्याय काँग्रेसला नाकारण्यासाठी हवा होता. त्याचा परिणाम मोदींना कौल मिळाला होता. मिळालेला सगळा कौल हा भाजपप्रेमींचा नव्हता. त्यामुळे भाजपच्या मतात झालेली वाढ ही लाट नव्हती तर भाजपची मते फिक्स होती त्यात काँग्रेसविरोधी मतांची वाढ झालेली होती. त्यामुळे गुजरात निवडणुकीत भाजपची मूळची जी मते आहेत ती कायम राखत त्यांना सत्ता राखता आली. पण त्याचा अर्थ काँग्रेसला अनुकूल वातावरण झाले असे पसरवण्यात काँग्रेस थोडीफार यशस्वी झाली खरी. पण ते तितकेसे खरे नाही. म्हणूनच तोच ट्रेंड मध्यप्रदेशात कायम राखत भाजपला जोरदार धक्का देताना भाजपचे संख्याबळ कमी करणे हेच काँग्रेसचे ध्येय असेल असे दिसते. भाजपकडे असलेले मध्यप्रदेशातील १६५ चे संख्याबळ १२५ पर्यंत आले तरी भाजप स्पष्ट बहुमतात असणार आहे, पण भाजपच्या ४० जागा खेचून घेतल्याचे काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत दाखवता येणार आहे. मोदी लाट ओसरली आणि काँग्रेसला अच्छे दिन आले हे भासवण्यासाठी त्यांना या निवडणुका लढवायच्या आहेत. काँग्रेसला पसंती मिळते आहे हे सांगायला नाही मिळाले तरी चालेल, सत्ता मिळाली नाही तरी चालेल फक्त मोदी लाट ओसरती आहे हे बिंबवण्यापुरते यश मिळवण्याची व्यूह रचना काँग्रेसची असेल. त्यादृष्टीने मध्यप्रदेशची जबाबदारी त्यांनी ज्योतिआदित्य शिंदे यांच्याकडे सोपवलेली दिसते.भाजपकडील जी महत्वाची राज्ये आहेत त्यापैकी गुजरात आणि मध्यप्रदेश ही राज्ये आहेत. दोन्ही ठिकाणी दीर्घकाळ भाजपची सत्ता आहे. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर होईपर्यंत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहन यांनाही वाटत होते की आपणही पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार असू शकतो. त्यामुळे भाजपअंतर्गत जे मोदी विरोधक होते त्यामध्ये शिवराजसिंह चौहान एक होते. त्यामुळे चौहान यांना आपले वर्चस्व राखण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न हे त्यांच्यापुढचे आव्हान असेल. त्याचबरोबर मोदींच्या स्पर्धेत येणाºया प्रत्येकाला ज्या प्रकारे बाजूला जावे लागते तसे चौहान यांना बाजूलाही पडावे लागेल. २००८ मध्ये या राज्याचे निवडणूक निरीक्षक आणि जबाबदार नेते म्हणून भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्री असलेल्या मोदींची निवड केली होती. तेंव्हाच त्यांनी ३० टक्के नवे उमेदवार देणे आणि डागी आमदारांना बाजूला करणे हे धोरण आखत नवे चेहरे आणले. त्यामुळे मध्यप्रदेशात सत्तांतर झाले पण सत्ता भाजपकडेच राहिली होती. त्यामुळे मोदींच्या रणनीतीप्रमाणे पक्ष महत्वाचा आहे, व्यक्ती नाही असे भासवून भाजपची पडझड रोखण्यासाठी ते पावले उचलू शकतात. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ज्योतीर्आदित्य शिंदे यांचे पुढे आणलेले नाव हे फार महत्वपूर्ण आहे. याचे कारण ते तरूण आहेत. त्यांची लोकप्रियता चांगली आहे. खानदानी राजघराण्यातील आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अभ्यासू आहेत. काँग्रेसमध्ये अभ्यासू माणसांचा काही उपयोग नसला तरी भाजपला रोखण्यासाठी अभ्यासू माणसांचीच गरज आहे हे आता काँग्रेसला पटले असावे कदाचित, पण त्यांनी ज्योतिर्आदित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या तर नक्कीच काँग्रेसचे इप्सित साध्य होवू शकते. त्यादृष्टीने ही रणनीती महत्वाची आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: