गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

डिजिटल दहशतवादाचे आव्हान

सध्या भारत पाक सीमेवर होत असलेल्या चकमकी, त्यामुळे वाढत्या शहीदांची संख्या आणि दहशतवादी हल्लयांची चिंता जरी देशाला भेडसावत असली तरीही देशापुढचे फार मोठे आव्हान आहे ते डिजीटल दहशतवादाचे. फार मोठे आव्हान आहे ते सायबर क्राईमचे. जेवढी भयानकता एका अणूबाँम्बमध्ये आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने दाहकता ही डिजीटल शस्त्रांची आहे. सोशल मिडीयाचा वापर करुन सोडलेली ही डिजीटल अस्त्रे नियंत्रित करणे हे आपल्या देशापुढचे फार मोठे आव्हान आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. लॅपटॉप आहे. समोर पीसी आहे. वायफाय आहे. इंटरनेट आहे. हे सगळं कशासाठी आहे, तर जगाला जवळ करण्यासाठी हे सगळं विकसीत झालेले आहे. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ असे म्हणत जग जवळ करण्यासाठी या डिजीटल साधनांचा उपयोग होण्याऐवजी माणसांना लांब करण्यासाठी या तंत्राचा अवलंब होताना दिसतो आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. आपल्याकडे जसा या साधनांचा दुरुपयोग होताना दिसतो आहे तसाच उपयोग किंबहुना दुरुपयोग शत्रूराष्ट्रांकडून आणि देशविघातक संघटनांकडून होताना दिसत आहे. दहशतवाद्यांच्या हातात गेलेले हे तंत्रज्ञानाचे हत्यार म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण््याचा प्रकार झाल्याचे दिसत आहे. याचा अर्थ या तंत्रज्ञानाला किंवा सोयीसुविधांना विरोध आहे असे नाही तर त्याचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. चारच दिवसांपूर्वी देशातील महत्त्वाच्या व्यक्तिंची व्टिटर अकौंट हॅक केली होती. यामध्ये अभिनेते अनुपम खेर, भाजपचे नेते राम माधव अशा अनेक दिग्गजांचे अकौंट हॅक केले होते. यातून बरीचशी गोपनीय माहिती बाहेर जावू शकते. अनेकजण महत्वाच्या चर्चा मेसेंजरवरुन करतात. ते सगळे व्टिटर, फेसबुक, जीमेल अशा विविध माध्यमांना लिंक केलेले असते. त्यामुळे यातून होणारी चर्चा, गोपनीय माहिती, धोरणे ही परकीय शक्तींच्या हातात लागली तर फार मोठा धोका निर्माण होवू शकतो. अनुपम खेर, राम माधव अशांची अकौंट हॅक करणे ही एक लिटमस टेस्ट असू शकते. त्यानंतर जर भारतीय लष्काराचे अधिकारी, संरक्षण मंत्रालयातील महत्वाचे दुवे, पंतप्रधान, राष्ट्रपती, पोलीस अधिकारी यांची खाती हॅक केली गेली आणि गोपनीय माहिती बाहेर पडली तर त्याचा दुरूपयोग निश्चित होवू शकतो. हाच फार मोठा धोका आहे. सीमेवर होत असलेल्या छोट्या मोठ्या लढाईकडे देशाचे लक्ष वेधायचे आणि दुसरीकडे असे सायबर हल्ले, डिजीटल रॉबरी करण्याचे प्रकार करायचे, हे फार भयानक असे आहे. गनिमी कावा म्हणतात तो हाच आहे. आपण सीमेवरच्या झटापटींकडे लक्ष केंद्रित करत असताना या दुष्टशक्ती आमच्या डिजीटल इंडियावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिजीटल इंडिया हे फार मोठे महासत्तेत जाण्याचे स्वप्न पूर्ण होवू नये म्हणून परकीय शत्रू शक्ती त्यासाठी आक्रमक झालेल्या आहेत हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. या डिजीटल युध्दाचे अनेक प्रकार आहेत. समाजातील एकजूट संपुष्टात आणून माणसामाणसांमध्ये कलह निर्माण करण्याचे होत असलेले प्रयत्न हे त्याचेच एक स्वरुप आहे. या माध्यमातून अफवा पसरवून साप सोडण्याचा जो प्रकार होतो त्यातून समाजात दुही माजते. अगदी सव्वा महिन्यापूर्वीचे भीमा कोरेगांव प्रकरण असो वा तत्सम अनेक प्रकरणात सोशल मिडीयावरुन ज्याप्रकारे भडकावू वक्तव्ये होत होती ती देशप्रेमी भारतीयांची असूच शकत नाहीत. आम्ही शाळेत प्रवेश घेतल्यावर ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ अशी प्रतिज्ञा शिकतो. शाळेची दहा वर्षे तरी किमान नियमाने म्हणतो. त्याचा उद्देश तो विचार अंगात भिनला पाहिजे. तो भिनल्यानंतरच माणूस सुशिक्षित होतो. अशा परिस्थितीत या देशात जातीय दंगली कशा काय घडू शकतात? समाजातील एकजूट रुजवण्यात आम्ही कमी पडतो आहे की आमच्यात फूट पाडण्यात या शक्ती वरचढ होत आहेत हे पहायला पाहिजे. पण ही फूट पाडण्याचे फार मोठे साधन म्हणजे सोशल मिडीया होताना दिसते आहे. ही फार मोठी चिंतेची बाब आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनाची, चारित्र्यहननाची अफवा पसरवून, विविध प्रकारच्या साधनांचा वापर करुन देश मानसिकदृष्ट्या विभाजीत केला जात आहे. याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही एलओसीची चिंता करतो. नियंत्रण रेषा ओलांडून शत्रू या देशात प्रवेश करणार नाही ना याची डोळ्यात तेल घालून चिंता करतो. काळजी घेतो. पण डिजीटल मार्गाने, सायबर क्राईमच्या मार्गाने जो शत्रू देशात प्रविष्ठ झालेला आहे त्याचे काय करायचे याचा ताबडतोब विचार केला पाहिजे. सध्या असलेले सायबर सेल या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास कमी पडते आहे का? त्याची पुनर्रचना केली पाहिजे का? मिलीटरी प्रमाणे तो अधिक सक्षम केला पाहिजे का? याचा सरकारने विचार केला पाहिजे. आज आम्ही अण्वस्त्र सज्ज आहोत हे अभिमानाने आम्ही सांगत असू तर आम्ही डिजीटल इंडियाला सांभाळायलाही मजबूत आहोत हे सांगायची आता गरज आहे. सोशल मिडीयाचा गाव पातळीवरुन होणारा वापर, त्यामधून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली होणारा स्वैराचार हे जेवढे चिंतेचे आहे तेवढेच असे विचार पसरवून दुही माजवणारी, माथी भडकवणारी शक्ती कोण आहे, त्यामागचा मास्टर माइंड कोण आहे याचाही शोध घेतला गेला पाहिजे. सुरवातीला सोशल मिडीयातून ओळखी वाढवून मैत्री, प्रेमप्रकरणे, लव्ह जिहाद या छोट्या पण गंभीर प्रकारानंतर आपल्या गोटात महत्वाच्या व्यक्तींच्या अंतरंगात शिरुन गोपनियता काढून घेण्याची चाललेली षडयंत्रे थांबवण्याचे फार मोठे आव्हान आम्हाला पेलावे लागेल. कॉलसेंटर, जाहिरातीच्या माध्यमातून विविध कंपन्या, मल्टिनॅशनल कंपन्या यांच्याकडून कर्जाचे, विविध बक्षिसांचे आमिष दाखवून कागदपत्रे मिळवणे, माहिती मिळवणे, डेटा मिळवणे हे प्रकार सातत्याने होत असताना त्याचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी होत आहे हे तपासायची गरज आहे. एकुणच असलेले हे भयावह चित्र म्हणजे डिजीटल दहशतवादाचे आव्हान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: