छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्य उभे राहत असताना घडणाºया इतिहासातील कथांवर अनेक चित्रपट महाराष्ट्रात आजवर घडून गेले. किंबहुना मराठी माणसांचे असणार शिवप्रेम आणि महाराजांविषयी असलेल्या आदरामुळे हे चित्रपट भरपूर चालणार याची खात्रीच असल्यामुळे गेल्या साठ वर्षात अनेक मराठी चित्रपट यावर येवून गेले. त्यामध्ये छत्रपतींची भूमिका साकारणारे अनेक कलाकार होवून गेले. आजही स्वराज्य रक्षक संभाजीराजे सारखी मालिका झी मराठीवर गाजते आहे. त्यातूनही आपल्याला महाराजांचे दर्शन घडले आहे. यासाठी आजवर कोणी कोणी महाराजांच्या भूमिका केल्या आणि प्रेक्षकांना भारावून टाकले त्यावर नजर मारतानाही आपल्याला आनंद झाल्याशिवाय रहात नाही. पौराणिक चित्रपटातील देवदेवतांची भूमिका करणारे कलाकार जेंव्हा वास्तवात दिसतात तेंव्हा देव समजून त्यांच्या पाया पडणारे भोळे प्रेक्षक असंख्य असतात. किंबहुना त्या भूमिकेतून बाहेर पडणेही त्या कलाकारांना सहज शक्य होत नाही. त्याचप्रमाणे छत्रपतींची भूमिका पडद्यावर साकारणाºया कलाकारांना पाहून मनात अभिमान आणि शौर्याची भावना उभी राहते. आपल्याकडे भालजी पेंढारकरांनी छत्रपतींवर अनेक चित्रपट बनवले. या चित्रपटांमधून काम करणाºयांमध्ये आणि छत्रपतींची भूमिका साकारणाºयांमध्ये चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे यांचा वाटा मोठा आहे. इतका मोठा आहे की महाराज म्हटल्यावर चंद्रकांत सूर्यकांत यापैकीच एक चेहरा डोळ्यासमोर येतो. अनेक ठिकाणी महाराजाचे फोटो, चित्र, पोस्टर्स जेंव्हा पहायला मिळतात तेंव्हा ते फोटो महाराजांचे नाही तर चंद्रकांत सूर्यकांत यांच्यापैकी कोणाचा तरी असतो हे चाणाक्ष रसिकांच्या सहज लक्षात येते. पण महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने या कलाकारांना केवढी लोकप्रियता मिळवून दिली हे पण आश्चर्य म्हणावे लागेल. भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांमधून या दोघांनी आलटून पालटून केलेल्या महाराजांच्या भूमिका असल्या तरी त्या चित्रपटांची नावे लक्षात घेतली पाहिजेत. भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली. यामागचा उद्देश छत्रपतीं शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य येणे हाच होता. हे सगळे चित्रपट १९६० च्या दशकापर्यंत निर्माण झालेले होते. कृष्णधवल असे होते. फक्त गनिमी कावा हा एकमेव भालजी पेंढारकरांनी निर्माण केलेला रंगीत चित्रपट होता. याशिवाय ती पावनखिंड, राजा शिवछत्रपती, सर्जा, बालशिवाजी असे अनेक चित्रपट नंतरच्या काळात निर्माण झाले. त्यातून वेगवेगळ्या कलाकारांनी महाराजांची भूमिका सादर केलेली दिसून येते. चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे यांच्यानंतर महाराजांची भूमिका रंगित चित्रपटाद्वारे राजा शिवछत्रपतींमधून श्रीराम गोजमगुंडे या कलाकाराने साकारली होती. या चित्रपटालाही तुफान यश मिळाले होते. १९७५ च्या सुमारास आलेल्या या चित्रपटात मराठी हिंदी अशी सरमिसळ कलाकारांची जंत्रीच होती. १९८१ च्या दरम्यान बालशिवाजी हा चित्रपट आला होता. या चित्रपटात बालशिवाजीची भूमिका आनंद जोशी या कलाकाराने साकारली होती. मराठी चित्रपट सृष्टीत सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात कौटुंबिक चित्रपटातून काम करणारा देखणा कलाकार म्हणजे रविंद्र महाजनी. कोल्हापूरच्या या कलाकाराने १९८६ च्या सुमारास रमेश देव यांनी निर्माण केलेल्या सर्जा या चित्रपटात महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर दहा वर्षापूर्वी सध्याच्या परिस्थितीवर आधारीत असलेल्या मी शिवाजीराजे बोलतोय या चित्रपटात महाराजांची भूमिका महेश मांजरेकर यांनी केली होती. महेश मांजरेकर एक यशस्वी निर्माते दिग्दर्शक आहेत. पण कितीही आपण मोठे झालो तरी महाराजांच्या पायाशीच आपण असू शकतो. त्यामुळे महाराजांची ही भूमिका करायचा मोह त्यांना आवरणे शक्यच नव्हते. आज महाराष्टÑाला, मराठी माणसाला स्वाभिमानाची गरज आहे आणि स्वाभिमानानेच तो पुढे जाऊ शकतो हे सांगणारा, ऐतिहासिक नसला तरी महाराजांचा विचार पुढे नेणारा चित्रपट होता. सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजीराजे या मालिकेत शंतनू मोघे या कलाकाराने महाराजांची केलेली भूमिकाही अनेकांना आवडली होती. याशिवाय नाटक आणि अन्य मालिकांमधून अमोल कोल्हे वीर शिवाजी या मालिकेतून आणि नाटकातूनही महाराजांची भूमिका केली होती. याशिवायही अनेक कलाकारांनी महाराजांच्या भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षण, प्रेम सर्वाना कायमच असल्यामुळे महाराजांच्या प्रेमापोटी या कलाकारांना प्रेक्षक स्विकारतात. त्यात महाराजांचे रुप पाहून महाराजांना अभिवादन करत असतात. पण महाराजांचे नाव कोणत्याही रुपात आले, कोणत्याही माध्यमातून आले तरी फक्त प्रेरणा, स्फूर्ती आणि अभिमानच मिळतो याची साक्ष हे चित्रपट आणि मालिका देत असतात.
रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८
चित्रपटांतील शिवाजी महाराज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा