या दोन घटना तशा काल-परवाच्याच. आपल्या देशात अशा घटना सातत्याने कुठे ना कुठेतरी घडतच असतात. पण ठाणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनांमुळे आपले विद्यार्थी शाळेच्या वातावरणात सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.यातील एक घटना आहे विद्यार्थ्यांशी असलेल्या मैत्रीचा संबंध एका शिक्षकाने प्रेमाशी जोडला. त्यावरून शालेय विद्यार्थिनीला बदनाम केले, शिक्षा केली म्हणून त्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. वय जेमतेम १२ वर्षे. दुसरी घटना आहे एका मुलावर स्कूलबसच्या चालकाने शारीरिक अत्याचार केला. त्याचा जाब विचारायला गेलेल्या त्या मुलाच्या पित्यावर जीवघेणा हल्ला त्या स्कूलबसचालक आणि कंपूने केला. यातील पीडित मुलगाही वय वर्षे जेमतेम ६ आहे. या दोन्ही घटना शाळेच्या प्रांगणात आणि शाळेच्या कार्यक्षेत्र आणि वेळेत घडल्याचे दिसते. पण एकूणच हा प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे आमचे विद्यार्थी शाळेच्या वातावरणात सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न पडतो. विद्यार्थी आणि पालक यांच्यात संवाद होत नाही का? शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात दरी निर्माण झालेली आहे का? या सगळय़ांचा सरकारी पातळीवर, कायद्याच्या पातळीवर, सामाजिक स्वास्थ्याच्या पातळीवर, कौटुंबिक पातळीवर वेध घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे उघडपणेही बोलण्याची आणि संवादाची गरज आहे. अंबरनाथ येथील घटनेत एका १२ वर्षाच्या मुलीची मुलांबरोबर मैत्री होती, एकमेकांशी बोलणे होत होते याचा गैरअर्थ काढून शिक्षकाने तिला का त्रास द्यावा? मुलगा-मुलगी भेदभाव शाळेपासूनच बंद करण्याची गरज आहे. स्त्री-पुरुष समानतेचा लढा जगभर सुरू असताना बाल वयातच मुलगा-मुलगी यांच्यात असणारी मैत्री म्हणजे पाप आहे असा सूर का आळवला जातो आहे? निरागस मैत्रीला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यात भेदभावाची दरी कशी काय निर्माण होऊ शकते? एका वाडय़ात, चाळीत, कुटुंबात लहान मुले ही मुलगा-मुलगी या भेदभावापलीकडे वाढत असतात. तेच वातावरण शालेय पातळीवर सांभाळता का येत नाही? मुलगा काय किंवा मुलगी काय ती जन्माला कोणतेही लेबल लावून येत नाही. पण आपल्याकडे तू मुलगी आहेस आणि तू मुलगा आहेस हे बिंबवले जाते. निसर्गाने भेदभाव केलेला नाही तो मनाने केला जातो. त्यामुळे बंधनाच्या नावाखाली तणावात अडकवले जाते. या तणावातून या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न झालेला दिसतो. अत्यंत नाजूक विषय आहे. मुलगा किंवा मुलगी यांच्यात फक्त दोनच नाती आहेत असे या समाजाला वाटते का? ही दोन नाती म्हणजे एक तर ते बहीण, भाऊ असावेत किंवा प्रियकर, प्रेयसी असावेत. या व्यतिरिक्त मैत्रीचे नाते का असू शकत नाही. खरं तर बाकी सर्व नाती ही जन्माने येतात, नात्याने लादलेली असतात. तिथे इच्छेचा प्रश्नच नसतो. पण मैत्री मात्र स्वीकारलेली असते. त्या निखळ मैत्रीचे रूपांतर कोणत्या नात्यातच असले पाहिजे ही अपेक्षा का? मुलींना फक्त मैत्रिणीच असल्या पाहिजेत. मुलांना फक्त मित्रच असले पाहिजेत हा कायदा कोणी केला? मुलीला असलेला मित्र म्हणजे ते संबंध प्रेमाचेच असले पाहिजेत ही मानसिकता कशामुळे तयार झाली? या सगळय़ा गोष्टींचा विचार करायची वेळ या सर्व घटकांची आहे. कारण शिक्षकांमधील या विचाराने आमची मुले तणावाखाली जगत असुरक्षित आहेत. दुस-या घटनेत स्कूलबस चालकाने एका बालकावर लैंगिक अत्याचार केला. त्याहीपेक्षा भयावह प्रकार म्हणजे याची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या त्या मुलाच्या पित्यावर त्या चालकांनी जीवघेणा हल्ला केला. किती भयानक ही विकृती? मुलींवर अत्याचार होतच होते, आता लहान मुलांनाही सोडत नाहीत? जनावरे, पशूही अशाप्रकारे वागत नाहीत. राक्षस, दानव, भुतेही अशाप्रकारे वागू शकणार नाहीत. पण अशाप्रकारचे कृत्य करणा-या माणसाला माणूस तरी कसे म्हणायचे? लहान मुलांच्या, शाळकरी मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. यामध्ये ब-याच घटनांमध्ये बसचालक, रिक्षाचालक, शाळेचा शिपाई आणि काही ठिकाणी शिक्षकही असल्याचे दिसत आहे. अशा वातावरणात आमचे विद्यार्थी शाळेच्या परिसरात सुरक्षित नाहीत हेच दिसून येते आहे. याची कोंडी फुटण्याची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरच्या शाळेतील एका मुलीला ५०० बैठका काढण्याची अघोरी शिक्षा एका शिक्षिकेने दिली होती. आज शिक्षकांच्या संशयी वृत्तीने मुलीला आत्महत्या करण्याची वेळ आली. स्कूल बस चालकाच्या विकृत वासनेचा बळी एक खूपच लहान मुलगा पडला आणि त्यानंतर त्याच्या पालकांवरही हल्ला झाला. हे सगळे असुरक्षित वातावरणाचे परिणाम आहेत. कोणत्याही वाईट घटनांचे अनुकरण किंवा पुनरावृत्ती झपाटय़ाने होत असते. २०१२ च्या डिसेंबरमध्ये दिल्लीत सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर गेल्या सहा वर्षात सातत्याने सामूहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, आजकाल एकटय़ा-दुकटय़ाने केलेल्या बलात्काराचे गांभीर्य कोणाला वाटेनासेच झाले आहे. म्हणूनच या असुरक्षित वातावरणात बळी पडणा-या विद्यार्थ्यांबाबतच्या घटनांमध्ये वाढ होऊ नये यासाठी आता काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी सर्वात प्रथम शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात उत्तम सुसंवाद असला पाहिजे. शिक्षक आणि पालक यांच्यात चांगला संवाद असला पाहिजे. पालक आणि विद्यार्थी यांच्यात चांगला संवाद असला पाहिजे. आमची निखळ मैत्री आहे हे शिक्षकांपर्यंत त्या मुलीला संवादाअभावी पोहोचवता आले नाही. अशी मैत्री पालकांना मान्य आहे, माहिती आहे याबाबत शिक्षकांनी खात्री करून घेतली नाही. शिक्षक अशाप्रकारे संशय घेत आहेत याची कल्पना त्या विद्यार्थिनीने घरात सांगितली नसावी. त्यामुळे या तणावामुळे हा प्रकार घडला आहे. आमच्या मुलांना तणावमुक्त वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे. त्याचप्रमाणे घटना घडल्यानंतर त्या बालकाने आपल्याशी असे गैरप्रकार चालकाने केले आहेत हे पालकांना सांगितले. पण त्या चालकाशी त्याची किती जवळीक होती? अन्य विद्यार्थी बसमध्ये असताना या एकटय़ालाच त्याने कोठे नेले याबाबत पालक आणि शाळा प्रशासनाने संवादाअभावी दुर्लक्ष केले. शाळेचे शिपाई, स्कूल बसचालकच नाही तर शालाबाह्य विद्यार्थ्यांशी कोणी भेटी-गाठी घेत असतील तर त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. हे नाही केले तर आमचे विद्यार्थी असुरक्षित असतील.
शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८
शालेय वातावरण असुरक्षित
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा