शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

 आत्म निवेदनाला समर्थांनी नववी भक्ती असे म्हटले आहे. या भक्ती प्रकारो पदर उलगडून दाखवताना समर्थ सांगतात की, आपण सर्वस्वी स्वतःला भगवंताकडे सोपविणे, म्हणजे आत्मनिवेदन. त्याच्या ताब्यांत देणे किंवा स्वतःला देवाच्या हाती सोपविणे. सर्व काही त्याच्या हातात देणे. स्वतःला देवाला वाहाणे ही निवेदनाची खूण आहे. तत्वाचा शोध घेतल्यावर जे उरते ते म्हणजेच मी हा देवाला ममत्व सोडून वाहून टाकणे, हा त्यातील भाव आहे. मी भक्त आहे आहे असे एकीकडे म्हणायचे आणी दुसरीकडे वेगळेपणा धरुन भगवंताची भक्ती करायची. यामधिल विरोधाभास याठिकाणी विलक्षण वाटतो.  म्हणजे एकीकडे एखादे लक्षण आहे असे म्हणायचे व दुसरीकडे तें लक्षण नाही असे वागायचे. किंवा एखाद्याला ज्ञान आहे असे म्हणायचे व दुसरीकडे तें ज्ञान नाही असे वागायचे. त्यामुळे लक्षण आहे व लक्षण नाही, किंवा ज्ञान व अज्ञान या गोष्टी एकावेळी असू शकत नाहीत. त्याचप्रमाणे एखादा माणुस एकाचवेळी भक्त व विभक्त असू शकत नाही. भक्त हा भगवंतापासून वेगळा नाही.  जो भगवंतापासून वेगळा आहे तो भक्त नव्हे. परंतु आत्मानात्म विचार केल्याखेरीज या गोष्टी समाधानकारक रीतीने समजणार नाहीत. म्हणून विचार करुन देव कोण ते ओळखावे. आपला आपणच आपल्या अंतरी शोध घ्यावा. आणी जाणून घ्यावे, असे याठिकाणी समर्थ उलगडा करतात.      मी कोण आहे हा साधा प्रश्न वाटतो. पण याच्या मागच्या तत्वाचा विचार करायला लागल्यावर जो  मी  आपण समजतो तो खरा  मी नाही असे समजते. एका तत्वाने दुसर्‍या तत्वाचे निरसन होत नाही. तेव्हां आपण निराळे उरत नाही. अशारीतीने तत्वनिरसनाने आत्मनिवेदन सहजच होते. सगळे दृश्य विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे. त्यांचे विवेकानें  विवरण केले तर सर्वांचा निरास होतो. म्हणजे ती शेवटपर्यंत खरेपणाने टिकत नाहीत.अशारीतीने दृश्य विश्वाचे अथवा प्रकृतीचे निरसन झालें की आत्मस्वरुपच शिल्लक उरते. मग आपला मी वेगळा राहातच नाही.    मुख्य मुलतत्वे दोनच आहेत. एक परमेश्वर व दुसरी विश्वाचा आकार. त्या दोघांमध्ये तिसरा  मी  हा कोणी येतच नाही. परमात्मा आणी प्रकृती हीं दोन मूलतत्वें स्वतः सिद्ध आहेत. परंतु मुळांत नसलेला आणी या कारणासाठी खोटा असलेला देहाहंकार आपल्याला चिकटतो. तरीपण विचारानें शोध घेतल्यास त्याला कांही आधार नाही असा निश्चय होतो. व्यक्ति आणि विश्व यांमधील तत्वांची रचना शोधून पाहिली, त्याचप्रमाणें तत्वांची मीमांसा करुन पाहिली तर असे आढळते की, या विश्वामधील अनेक प्रकारचे अगणित आकार किंवा दृश्य वस्तु हा सगळा तत्वांचाच विस्तार आहे. आपल्या देहासकट या विश्वाकडे आपण साक्षित्वाने पाहूं लागलो, म्हणजे केवळ बघणार्‍याची भूमिका ठेवून तिर्‍हाईतपणाने पाहूं लागलो तर ती तत्वें सहज नाहीशी होतात. नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला कीं साक्षीपणाही उरत नाही. विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता. तसाच विश्वाच्या शेवटीसुद्धा आत्माच शिल्लक राहतो. हें जर खरे तर आपल्या मीपणाला वेगळें अस्तित्व राहातच नाही. आत्मा सगळीकडे व्यापून आहे. आपल्या आनंदानें तो संपूर्ण भरलेला आहे. मीच तो आत्मा आहे असे श्रुति सांगते. तर मी आणखी कोणी निराळा असू शकत नाही. म्हणून देहाचा अहंकार खोटा आहे. कोऽहम्  या प्रश्नाचे उत्तर  सोऽहम्   मी कोण  याप्रश्नाचे उत्तर  तो मी आहे. या उत्तरामध्ये असणारा सर्व अर्थ उकलून पहावा. आत्म्याच्या विचारांत शिरले कीं  मी  आणखी कोणी निराळा आहे हे सिद्ध होत नाही.अशाप्रकारे अतिशय गूढ अर्थ समर्थांनी याठिकाणी उलगडलेला दिसतो.  सोऽहम् म्हणजे तो आत्मा मी आहे. आत्मा निर्गुण व निरंजन म्हणजे दृश्याच्या पलीकडे व मलरहित आहे. मी तोच असल्याने त्याच्याशी अनन्य आहे. अनन्य म्हणजे मी व तो वेगळे नाही. हें जर खरे तर  मी  कोणी निराळा आहे असे कसे म्हणता येईल. आत्मा अद्वैत आहे, अद्वैत म्हणजे द्वैत नाहीं तें, ज्यांत दुसरेपणा नाहीं तें. असें जर आहे तर आणखी वेगळ्या  मी पणाचे कारण असूंच शकत नाही. आत्मा सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे. तो मूर्तिमंत पूर्णता आहे. तेथें गुण व अवगुण दोन्हीही नाहीत. मानवी बुद्धिला गुणांवाचून वस्तूची कल्पनाच करता येत नाही. म्हणुन सर्व अनात्मवस्तु आपण सगुण म्हणतो. पण आत्मवस्तु मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने आपण तिला निर्गुण म्हणतो. तत् त्वम् असि  म्हणजे  तूं ते ब्रह्म आहेस असें उपनिषदांतील स्वानुभवाचे वाक्य आहे. या तिनही पदांच्या पलिकडे असलेल्या आत्मस्वरुपापर्यंत जो पोहोचला, त्याला भेद व अभेद दोन्ही लटके होतात. त्याला मी देह आहे अशी मीपणाची निराळी अवस्था कशी असणार? म्हणून मीपणा असत्य आहे.   मी जीव आहे व तो शिव आहे. हा विद्या अविद्यांनी निर्माण केलेला भेद आहे. त्या भेदाची उपाधि नाहींशी केली तर आत्मस्वरुपांत जीवशिव असा भेद नाही हे लक्षांत येईल. असा निश्चय झाला की मी राहणार नाही. मी देह आहे  या भावनेमुळे आपण कोणी निराळे आहोत, स्वतंत्र आहोत, असा जो आपला दृढ विश्वास असतो, तो भ्रम असतो. तो असत्य आहे. एक भगवंत काय तो खरा आहे.तसेच भक्त व भगवंत दोघे निराळे दिसले तरी ते वेगळे नसतात. दोघे एकमेकाशी अनन्य असतात. एकरुप असतात. हे जे मी (समर्थ) सांगतो त्याचा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळेल. भक्तानें आपला संपूर्ण मीपणा भगवंताला वाहणें आणि त्याच्याशी संपूर्णपणे एकरुप होऊन जाणें यास आत्मनवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदनानेच ज्ञानी पुरुषांना समाधान लाभते. याप्रमाणे नवव्या भक्तीचे लक्षण समर्थांनी सांगताना त्याचे विविध अंगांनी पदर उलगडलेले आहेत. ज्याप्रमाणे पंचमहाभूतांमध्यें आकाश, सगळ्या देवांमध्ये जगदिश श्रेष्ठ, त्याचप्रमाणें भक्तीचे जे नऊ प्रकार सांगितले त्यामध्यें नववी म्हणजे आत्मनिवेदन भक्ति सर्वांत श्रेष्ठ भक्ति आहे. नववी भक्ति जी आत्मनिवेदन ती जर साधली नाही तर माणसाचें, भक्ताचे जन्ममरण चुकणार नाही, हे माझे बोलणे अगदी खरे आहे, अनुभवाला धरुन आहे, तें खोटे होणार नाही. असे समर्थ सांगतात. नवविधा भक्ति ही अशी आहे. ती आचरली तर सायुज्यमुक्ति मिळते. या सबंध विश्वाचा लय झाला तरी सायुज्यमुक्ति अचल राहते. तिच्यामध्यें बदल होत नाही. एकंदर मुक्ति चार आहेत. त्यापैकी पहिल्या तीन मुक्तींमध्ये फरक घडून येतो. सायुज्यमुक्ति मात्र अचल राहते, तिच्यांत फरक पडत नाही. तिन्ही लोकांचा शेवट झाला तरी सायुज्यमुक्तिमध्यें कोणताही फेरबदल होत नाही ती जशीच्या तशीच कायम राहते. वेद व शास्त्रे यांनी एकंदर चार प्रकारच्या मुक्ति वर्णन केल्या आहेत. त्यापैंकी तीन नश्वर आहेत. अशाश्वत आहेत. पण चौथी मात्र शाश्वत आहे. अविनाशी आहे. पहिली मुक्ति स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरुपता आणि चौथी सायोज्यमुक्ती होय. अशा या चार मुक्ति भगवंताच्या भक्तीनें माणसाला त्या प्राप्त होतात. अशा प्रकारे समर्थांनी याठिकाणी आत्मनिवेदन भक्तीचे पदर उलगडून हे गूढ ज्ञान सोपे करून सांगितले आहे.     ॥ जय जय रघुवीर समर्थ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: