कर्नाटक विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून काँग्रेस आणि भाजपने तिथे शिमग्यापूर्वीच राजकीय धुळवडीला सुरुवात केलेली आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा कर्नाटकचे दौरे करत आहेत. पंतप्रधान मोदीही परदेशवारीतून वेळ काढून शक्यतितके कर्नाटकावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये उभय पक्षांच्या नेत्यांना विविध संघटनांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. कुठे काळे झेंडे दाखवणे, तर कुठे एकमेकांची उणी-दुणी काढत हा राजकीय शिमगा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच सुरू झालेला दिसतो आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ येत्या २८ मे २०१८ ला संपत आहे. एप्रिल-मेमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळेच या राजकीय हालचालींना वेग आला आहे. अर्थातच या निवडणुकीत प्रमुख लढत ही काँग्रेसविरुद्ध भाजप अशीच होणार आहे. गुजरातमध्ये मिळालेल्या यशाने आणि वाढलेल्या संख्याबळाने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. त्यातच काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी विराजमान झाल्यानंतर आता कर्नाटकचा गड राखण्यात ते यशस्वी होणार का, हाच प्रश्न आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी देवदर्शनापासून ते विविध उपायांसाठी ते कर्नाटकात ठाण मांडून आहेत. अर्थात गुजरातमध्येही निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच ते ठाण मांडून होते. त्याचा काँग्रेसला चांगला लाभ झाला. गुजरातमध्ये काँग्रेसचे संख्याबळ तर वाढलेच; परंतु पराभवाच्या मानसिकतेतून कार्यकर्त्यांना बाहेर काढतानाच भाजपला आता कोणतीही निवडणूक सहज जिंकणे कठीण असल्याचा इशारा गुजरातच्या निकालाने दिला. त्यामुळेच आता शिमग्याच्या महिन्यातच मैदानात उतरून राजकीय धुळवड सुरू झालेली आहे. यामुळे येत्या काही काळात काँग्रेस आणि भाजपमध्ये ‘बोरीचा बार’ उडणार यात शंकाच नाही. कर्नाटक विधानसभेतील एकूण २२४ जागांपैकी गुजरातप्रमाणेच १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी या निवडणुकीसाठी ठेवले आहे. ते अशक्य असले तरी भाजप सर्व मार्गाचा वापर करून दक्षिणेतील स्वारी यशस्वी करण्याचा कसोशीने प्रयत्न करणार. त्यामुळे सत्ता स्थापनेचा जादूई आकडा पार करण्यासाठी निवडून येण्याची क्षमता असणा-या अन्य पक्षांच्या उमेदवारांना आयात करण्याचे धोरण भाजप इतर राज्यांप्रमाणे इथेही राबविणार हे स्पष्ट आहे. कर्नाटकातील राजकीय धुळवडीत अनेक झेंडय़ांचे रंग बदलल्याचे प्रकारही बघायला मिळतील. भाजपने मुख्यमंत्री पदासाठी बी. एस. येडियुरप्पांचा चेहरा समोर आणला आहे. येडियुरप्पा हे राज्यातील प्रभावशाली लिंगायत समाजाचे असून त्यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. तरीही त्यांचा राज्यात प्रभाव असल्याने निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याशिवाय पर्याय नाही, हे सध्या तरी भाजपने ठरवलेले दिसत आहे. येडियुरप्पांच्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडण्याची संधी यानिमित्ताने काँग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून चांगलीच चिखलफेक होणार हे निश्चित आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप नेहमीच काटेकोर नियोजन करते. २०१४ नंतरचा इतिहास विचारात घेऊन काँग्रेसही सावध पावले टाकताना दिसत आहे. ही पावले उचलताना भाजपचा भ्रष्ट चेहरा समोर आणणे हे काँग्रेसच्या अस्त्रांपैकी प्रमुख अस्त्र असणार आहे. त्याला जोडून पीएनबी घोटाळा, नोटाबंदी, जीएसटी हे मुद्दे कोशिंबिरीप्रमाणे वापरले जातील. त्यासाठीच काँग्रेसने जवळपास आठ लाख कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे. ही फौज बूथ पातळीवर जाऊन काम करेल, असे त्यांचे नियोजन आहे. २०१४ च्या निवडणुकीत माध्यमांपेक्षा सोशल मीडियाचा भाजपने केलेला प्रभावी वापर पाहता तोच गुरुमंत्र काँग्रेसने घेऊन सोशल मीडियावरील कार्यरत तरुणांना या ८ लाखी फौजेत समाविष्ट केलेले आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस गेले सहा महिने काम करत आहे. आतापर्यंत ९९ टक्के बूथ पातळीवर गटाची स्थापना केली आहे, असा काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे ही फौज भाजपच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून राहुल गांधींच्या सभांपूर्वी वातावरण तयार करणे आणि थिंक टँकच्या माध्यमातून त्यांना पूरक माहिती पुरविण्याचे काम करणार हे निश्चित आहे. कर्नाटकमध्ये भाजपसाठी गुजरातसारखी सुपीक जमीन नाही. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला म्हटले जायचे. तसेच, २०१४ नंतर काँग्रेसला इथे विजय मिळविता आलेला नाही. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसला दुय्यम स्थानावर समाधान मानावे लागले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र झपाटय़ाने बदलले आहे. सध्या कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे भाजपला नेहमीसारखा फाजील आत्मविश्वास ठेवून चालणार नाही. कारण, इथे काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेत नाही. इथे सत्ता राखण्याचे राहुल गांधींपुढे, तर सत्ता पुन्हा काबीज करण्याचे नरेंद्र मोदींपुढे आव्हान असणार आहे. ज्या चार राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, त्यात कर्नाटक हे एक महत्त्वाचे राज्य आहे. मोदी-शहा यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिलेला असल्याने काँग्रेसच्या ताब्यातील उरलेली चारही राज्ये हिसकावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यामुळेच कर्नाटकची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार यात कोणताही वाद नाही. कर्नाटकात शिमगा तर आता सुरू झालाच आहे. सत्तारूढ काँग्रेसविरोधातील नाराजी, गुजरातमध्ये सत्ता राखण्यात मिळालेले यश, काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष, प्रदेश युवक काँग्रेसचा मुख्य असलेल्या मुस्लिम आमदाराच्या मुलाने जखमी असलेल्या विश्वनाथ या तरुणाला विनाकारण केलेल्या बेदम मारहाणीचा राजकीय फायदा भाजप उठवण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभेत भाजपच्या सध्या ४४ जागा आहेत. बहुमतासाठी या जागा जवळपास तिप्पट करणे हे भाजपपुढे कठीण आव्हान असेल. काँग्रेस व्यतिरिक्त भाजपला जनता दल सेक्युलरशी देखील मुकाबला करावा लागणार आहे. गुजरात निवडणुकीपासून राहुल गांधींनी स्वीकारलेल्या सॉफ्ट हिंदुत्व आणि विविध मंदिरांमधून केलेले देवदर्शन यामुळे कर्नाटकात काँग्रेस कोणाशी आघाडी असे चित्र दिसत नाही. जनता दल व मायावतींच्या बसपची आघाडी झाल्याने दलित व मुस्लिम मते फुटून काँग्रेसचे नुकसान होईल, असे दिसते. त्याचा भाजपला लाभ होऊ शकतो, पण निवडणुकीनंतर जनता दल आणि बसप यांची आघाडी कोणाकडे झुकणार यावर सत्तेचे समीकरण अवलंबून असणार आहे. आजवरच्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार काँग्रेस आणि भाजप यापैकी कोणालाही पूर्ण बहुमत मिळेल याची शक्यता दिसत नाही. जनता दलाची भूमिका निर्णायक ठरू शकते. कर्नाटक विधानसभेत सत्ता राखण्यासाठी काँग्रेस, तर दक्षिणेचा गड काबीज करण्यासाठी भाजप नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तर भाजपकडून पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा दिवसांपासून एकमेकांच्या नावाने शिमगा करण्यास सुरुवात केली आहे. आरोप-प्रत्यारोपांची धुळवड?कोणत्या थराला जाते तेही लवकरच दिसून येईल.
बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८
कर्नाटकात राजकीय शिमगा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा