भक्तीमार्गासाठी नवनाथी संप्रदाय आणि त्यांच्या ८४ सिद्धांची निर्मिती झाली. त्या ८४ सिद्धांपैकी एक म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आज दासनवमी हा रामदास स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस. भक्ती, शक्ती, युक्ती याचा साक्षात्कार म्हणजे समर्थ रामदास स्वामी. केवळ संत नाही, तर त्यांची साहित्य संपदा ही फार मोठी आहे. ते महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाºया समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते संत होते.समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते निस्सीम सूर्योपासक होते. ते रोज ‘आदित्यहृदय’ या स्तोत्राचा पाठ करीत असत. गंगाधर व नारायण या त्यांच्या दोन पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. समर्थ रामदासस्वामी (=नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्यान्ही झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षांचा असतानाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती, पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. इतरांहून वेगळा होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. लहानपणी नारायण अत्यंत साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा, एक लोहाराचा, तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला.नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. या तप:साधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा, तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राममंत्राचा जप करीत. म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच ‘करुणाष्टके’ म्हणून ओळखली जातात. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षांच्या या तीव्र तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षांचे होते.समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली.समर्थांच्या शिष्यमंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते - समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधीसोपी होती.आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा रामदासस्वामींना साहजिकच झाली, पण पुढील १२ वर्षांच्या प्रवासात त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतातील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले.मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राममंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गावी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण अकराशे मठ आहेत. मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा। यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला.समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. डोंगरकपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे, तर गंगा, यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठमहंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे। या त्यांच्याच सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणाºया समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदासस्वामी भारावून गेले.रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्या तत्त्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म, माया, जीव, जगत्ा्, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. पंचीकरण हा विषय समर्थांनी अतिशय सखोलपणे सांगितला आहे. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वत:कडे कर्तेपण घेतो, असे ते सांगतात.त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. परमात्मा हा चराचरांत भरलेला असून, त्याची प्राप्ती करून घेण्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे हे समर्थांनी अनेक स्थळी सांगितले आहे.समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या. आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना, तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, अनेक आरती उदाहरणार्थ ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची’ ही गणपतीची आरती, ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा’ ही शंकराची आरती, काही पदे इत्यादी त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदासस्वामींच्या आरतींनी घराघरांत स्थान मिळवले आहे. आपण ज्या विविध आरती म्हणतो, त्यांपैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत. मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुजाºयाला आरती येत नाही हे पाहून त्यांनी ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची’ ही गणपतीची आरती केली. तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेताना समर्थांना ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ ही आरती स्फुरली. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो.दासबोधाशिवाय रामायणातील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरती, भूपाळी, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्रिपु-विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे.जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।रामदासस्वामींची वाङ्मय संपदा अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरती त्यांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या वाङ्मयाचे मूल्यमापन भिन्न प्रकारे, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारवंतांनी केले आहे. त्यांच्या एक एक वाङ्मय प्रकाराचा उहापोह करून त्या प्रकारच्या वाङ्मयातून समर्थ काय सांगतात, हे पाहतानाही त्यांच्या भक्तीचे, शैलीचे, बुद्धिमत्तेचे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषावैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही.समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. अशा या साहित्यिक संत रामदासांनी कायम रामाचा दास म्हणवून घेण्यातच धन्यता मानली होती.
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०
दास रामाचा समर्थ रामदास स्वामी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा