prafulla phadke mhantat
मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०
चित्रपट : प्रेम आणि हिंसा
कोणतीही घटना घडली की, पूर्वी सिनेमा पाहून मनुष्य बिघडला आणि असं काही तरी केलं. नंतर हे खापर टीव्हीवर फोडलं जायला लागलं. आता सोशल मीडिया, मोबाइल, स्मार्टफोनवर फोडलं जातंय, पण ही माध्यमे लोकांना बिघडवायला नाहीत, तर घडवायला आहेत. बिघडणारी कोणत्याही माध्यमातून बिघडतातच. जेव्हा रेडिओ ट्रान्झिस्टरही नव्हता तेव्हाही अशा घटना घडत असाव्यात. फक्त आता जशी पटापट प्रसिद्धी मिळते, तशी तेंव्हा मिळत नव्हती, म्हणूनच कोणत्या चित्रपटातून प्रेम, एकतर्फी प्रेम आणि त्यातून हिंसा दाखवली आहे, यावर नजर मारण्याची गरज आहे.
एकतर्फी प्रेम आणि नकारात्मक नायक उभा करणे हे प्रत्येक कलाकाराला आवडते. त्यातून पहिला सुपरस्टार राजेश खन्नाही सुटला नव्हता. सुरेंद्र मोहन यांनी दिग्दर्शित केलेला १९८१ सालचा ‘धनवान’ हा तो चित्रपट. धनवान, श्रीमंत असलेल्या राजेश खन्नाला खूपच घमेंड असते, ती पैशाची. पैशाच्या जीवावर आपण काहीही खरेदी करू शकतो, हा त्याचा माज. त्यामुळेच रिना रॉयचे प्रेमही आपण मिळवू शकू, असे त्याला वाटते, पण रिना रॉयचे प्रेम राकेश रोशनवर असते. राकेश रोशन हा त्याच्याच कंपनीत अकाऊंटंट म्हणून नोकरीला असतो. रिना रॉयने राकेश रोशनशी लग्न केल्याने तो भयंकर संतापलेला असतो. त्या रागातच राजेश खन्नाचे अपघाताने डोळे जातात, तो आंधळा होतो. तो भरपूर पैसे देऊन डोळे विकत घेण्याचा प्रयत्न करतो, पण नेत्रदान करणारा कोणी भेटत नाही. पैशाने सगळे काही मिळवता येत नाही, हे त्याला कळते, पण काही दिवसांनी त्याला एक नेत्रदाता भेटतो. ते डोळे असतात राकेश रोशनचे. राकेश रोशनला एका चोरीच्या प्रकरणात फसवलेले असते. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा होते. काय विरोधाभास आहे पाहा. चित्रपटसृष्टीत चोरालाही फाशी दिलेले दाखवले आहे, आम्ही बलात्कारी, खुनी यांनाही फाशी देऊ शकत नाही. झालेली फाशी रोखण्यासाठी काही लोक धडपडतात. फाशीपूर्वी राकेश रोशन शेवटची इच्छा म्हणून नेत्रदान करण्याचे सांगतो. ते डोळे राजेश खन्नाला मिळतात. इथे नकारात्मक, व्हायोलंट, हिंसक बनू पाहणाºया हीरोचे मतपरिवर्तन या चित्रपटात झालेले दाखवले आहे. प्रेमाने जग जिंकता येते. पैशाच्या जोरावर गुंडांकरवी तो रिना रॉयला पळवून आणू शकला असता, पण तसे होत नाही. चित्रपटातून इतका चांगला संदेश दिला असताना त्यामुळे माणसं बिघडली कसे म्हणता येईल?
त्यानंतर १९८५ साली रवींद्र पिपट या दिग्दर्शकाचा ‘लाव्हा’ हा चित्रपट आला होता. त्यात राज बब्बर, डिंपल आणि राजीव कपूर हे तिघे होते. राज बब्बरचे डिंपलवर प्रेम असते, पण डिंपलचे राजीव कपूरवर. काहीही करून डिंपलला मिळवायचेच या इराद्याने राज बब्बर पछाडलेला असतो. त्यामुळे तो राजीव कपूरचा खून करतो. डिंपलला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. डिंपलला मजबूर करून रेल्वेतून घेऊन जाताना तो सतत म्हणत असतो की, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या प्रेमापोटीच मी त्याचा खून केला. तू माझे खरे प्रेम स्वीकार कर. त्यावर डिंपल त्याला म्हणते, प्रेम करणारे जीव घेत नाहीत, खरे प्रेम करणारे आपल्या प्रेयसीसाठी जीव देण्यास तयार होतात. त्यामुळे आपले प्रेम हिंसक असले, तरी ते खरेच आहे हे सांगण्यासाठी राज बब्बर रेल्वेतून उडी मारून आत्महत्या करतो. प्रेमासाठी जीव देतो. इथेही नकारात्मक नायक असला, तरी त्याचे परिवर्तन करण्यात नायिका यशस्वी होते. नायिकेला मारण्यासाठी हा एकतर्फी प्रेमवीर धजावत नाही, पण आजकाल काय घडते आहे?
एकतर्फी प्रेमातून नायिकेला मारण्यासारखा प्रकार शाहरूख खानच्या चित्रपटांनी केला. त्यामुळे महिला संघटनांनी त्याच्यावर बंदी आणण्याचा संघर्ष १९९० च्या दशकात केला होता. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे ‘डर’. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटामध्ये सनी देओल, जुही चावला व शाहरूख खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाजीगर नंतर नकारात्मक भूमिका केलेला हा शाहरूख खानचा दुसरा चित्रपट होता, पण यश चोप्राचा असल्यामुळे त्याला जास्त महत्त्व होते. यात जुहीला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारा विकृत असा नायक शाहरूखने केलेला आहे. त्यामुळे त्याचा शेवटही तसाच होतो. सनी देओलकडून त्याला मार खाऊन मरावे लागते. एकतर्फी प्रेमाची वाईट बाजू मांडणारा हा पहिला चित्रपट.
प्रेमाचा त्रिकोण, त्यामुळे एकतर्फी प्रेम आणि त्यात कोणी तरी मरणे हा विषय चित्रपटसृष्टीचा आवडीचा विषय. प्रत्येकाने तो वेगवेगळ्या प्रकारे मांडलेला आहे, पण अशा प्रेमात त्यागाची भूमिका बॉलिवूडने नेहमीच मोठी केलेली आहे. १९६०च्या दशकातील आणि राज कपूरने काढलेला पहिला प्रेमपट म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल, तो चित्रपट म्हणजे ‘संगम’. त्यापूर्वीचे राज कपूरचे सगळे चित्रपट हे समाजप्रबोधनपर, वैचारिक असे होते. हा पहिला प्रेमाचा त्रिकोण असलेला चित्रपट. या संगममध्ये राज कपूर वैजयंतीमाला राजेंद्रकुमार हे तिघे आहेत. राज कपूरचे वैजयंती मालावर प्रेम असते. राजेंद्रकुमारचेही तिच्यावर प्रेम असते. ती दोघांचीही बालपणापासूची मैत्रिण असते. तिला मिळवण्यासाठी दोघांची धडपड चाललेली असते, पण दोघांनाही आपलं एकीवरच प्रेम आहे हे समजते, तेव्हा राजेंद्रकुमार स्वत: आत्महत्या करतो. इथे प्रेमात त्यागाचा संदेश दिलेला आहे.
१९७८ चा प्रकाश मेहराचा चित्रपट ‘मुकद्दर का सिकंदर’, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि राखी हे तिघे प्रमुख कथानकात असले, तरी यातील एकतर्फी प्रेमाची मालिका लांबलचक आहे. यामध्ये अमजद खानचे रेखावर प्रेम असते. रेखाचे अमिताभवर प्रेम असते. अमिताभचे राखीवर प्रेम असते. राखीचे विनोद खन्नावर प्रेम असते. विनोद खन्नावर अमिताभचे उपकार असतात, पण प्रेमाच्या या त्रिकोणात राखीवर कोणतीही जबरदस्ती न करता अमिताभ मरतो. त्याग आणि समर्पणच प्रेमातून चित्रपटांनी दाखवले आहे. कुठेही हत्या नाही, जाळपोळ नाही.
जीपी सिप्पी, रमेश सिप्पी यांनाही प्रेमाचा त्रिकोण दाखवण्याचा मोह आवरला नव्हता. त्यामुळेच त्यांनी सागर हा चित्रपट काढला होता. यात ऋषी कपूर, डिंपल आणि कमल हसन होता. डिंपलवर दोघांचेही प्रेम असते. एक बालपणाचे आणि एक वयात आल्यानंतरचे. डिंपलपर्यंत कमल हसनचे प्रेम व्यक्त होत नाही. ते होण्यापूर्वीच ऋषी कपूर प्रेम व्यक्त करतो. कमल हसनच्या खोडसाळ स्वभावाने तिला त्याचे प्रेम गंमत वाटते, पण यातही कमल हसन मरतो आणि त्यागातून प्रेमाचा गौरव करतो.
राज कपूर, प्रकाश मेहरा, रमेश सीप्पी अशा दिग्गज निर्माता, दिग्दर्शकांनीही प्रेमात त्याग भावनेला महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे एखादा शाहरूखचा डर सोडला, तर जिच्यावर आपण प्रेम करतो, ती मिळत नाही म्हणून तिला मारण्याचा संदेश कोणताही चित्रपट देताना दिसत नाही. त्यामुळे चित्रपट पाहून कोणी बिघडले म्हणण्यात अर्थ नाही. तसेही देशप्रेमावरचे चित्रपट भरपूर निघतात. दबंगसारखे निघतात. ते बघून जर माणसं घडत नाहीत, तर असे चित्रपट पाहून कोणी बिघडेल, असेही मानायचे काही कारण नाही. माणसाच्या मनातील हिंसक प्रवृत्ती त्यांनी स्वत:च विकसीत केलेली असते. त्या विकृतीमुळे जाळण्याचे प्रकार घडतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा