योगसाधना ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आहे, असे कोणाला वाटत असेल, तर ते चुकीचे ठरवत योग विद्येत मुलीही तितक्याच मोठ्या प्रमाणात कामगिरी करू शकतात हे डोंबिवलीच्या श्रृतीने दाखवून दिलेले आहे. त्यामुळेच तिचे वेगळेपण आहे. मोबाइल, स्मार्टफोन आणि सोशल मीडियावर अडकलेली तरुणाई एकीकडे दिसत असताना त्याकडे दुर्लक्ष करत आरोग्यं धनसंपदा असा संदेश देत निरोगी जीवनासाठी योगाचा प्रचार करण्यासाठी श्रृती बाहेर पडली. आज १७७ देशांत तिचे चाहते, अनुयायी आहेत, हे विशेष. अर्थात, या साºया यशाचे श्रेय ती आपले योगगुरू प्रवीण बांदकर यांना देते.राजकारण, समाजकारण एका वेगळ्याच दिशेने धावताना विद्यार्थी आणि आजची तरुणाई सध्या आपल्या भविष्याविषयी जास्तच जागरुक झाल्याची जाणवत आहे. त्याचं प्रमुख कारण पालकवर्गाला आलेली जाण. त्यामुळे हल्लीचे पालक व वृद्ध आपल्या मुलांचे हित कशात आहे, हे चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे श्रुतीसारख्या तरुणींकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. श्रुती शिंदे ही सतरा वर्षांची योगशास्त्रात पारंगत असणारी बालशिक्षिका योग प्रसाराच्या दृष्टीने काम करत आहे. तिचे हे कार्य तब्बल १७७ देशांत पोहोचले असून, आपले गुरू प्रवीण बांदकर यांच्या कार्याची ही पालखी आपण जगभर घेऊन जात आहोत, असे ती अभिमानाने सांगते.आज १७७ देशांत पोहोचलेली श्रृती महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. योगाभ्यासाने ती इतकी झपाटली आहे की, ती क्वचितच घरात आढळेल, पण महाराष्ट्रात कुठल्या ना कुठल्या शाळेत योग शिकवताना मात्र नक्की सापडेल. अलौकिक व्यक्तिमत्त्व, देहयष्टीने उंचपुरी, ओजस्वी चेहरा, लहान मुलांपासून थोरांपर्यंत अगदी कुणाचेही चटकन लक्ष वेधून घेईल अशी देहबोली, डोळ्यांत लहान लहान विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याची, मार्गदर्शन करण्याची उमेद, असे जितके वर्णन करता येईल तितके कमीच. प्रचंड आत्मविश्वास व आपल्या महत्त्वाकांक्षेवर कायम टिकून असणारे असे तिचे व्यक्तिमत्त्व आहे.केवळ मुलेच नव्हे, तर सिनेसृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडूंसारख्यांची श्रृतीच्या मार्गदर्शनाला मागणी आहे. केवळ १७व्या वर्षी तिने मिळवलेले हे यश अनमोल असे आहे.‘योग: कर्मसु कौशलम्’ या उक्तीप्रमाणे योगामध्ये आपले कार्य सातत्याने चालू ठेवलेले आहे, त्या सर्व ऋषीमुनींच्या योगाभ्यासाचा आधार घेत श्रुतीने योगामध्ये कार्य करण्याचा निर्धार केला आहे. प्रवीण बांदकर यांच्यासारखे प्रतिभावंत योगगुरू, सद्गुरु वामनराव पै यांसारखे थोर तत्त्वज्ञ श्रुतीला गुरू म्हणून लाभले व यांनी तिच्या जीवनाचा पायंडा रोवला. आपल्या कामाचे सर्व यश आणि श्रेय ती आपल्या गुरूंनाच देते हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे.विद्यार्थ्यांना योग शिकवताना हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे गेले पाहिजे ही सद्गुरू वामनराव पै यांची शिकवण प्रवीण बांदकर यांनी श्रुतीला दिली. ती आचरणात आणून श्रुतीची विचारसरणी वैश्विक झेप घेणारी झालेली आहे. त्यामुळे तिने योग कार्य करताना कधीच मागे वळून पाहिले नाही.इयत्ता आठवीपासून या शालेय कार्यासाठी शाळा सोडताना श्रुतीला वर्गशिक्षक, शेजारीपाजाºयांकडून टोचण्या मिळाल्या, पण तरीही न डगमगता तिने चांगल्या कार्याला स्वत:च्या मनात इतके घट्ट केले की, तिने दहावी उत्तीर्ण करताना व सोबत महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालय पिंजून काढताना दीड लाखाहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना योग शिक्षण दिले आहे.वयाच्या केवळ बाराव्या वर्षापासून योग शिकवणाºया या विद्यार्थिनीने शालेय विद्यार्थ्यांना व त्यांच्यासोबत असणाºया शिक्षकांनासुद्धा मार्गदर्शन केले आहे. इतकेच नव्हे, तर अंध, अपंग, कर्णबधिर, मूकबधिर, रिमांड होम, आदिवासी वर्गातील मुलं व मुली, अनेक वृद्धाश्रम येथे जाऊन श्रुतीने विनामूल्य योगाची सेवा दिली आहे .आज ९५ टक्के विद्यार्थी मोबाइल आणि सोशल मीडिया इंटरनेटच्या अक्षरश: अधीन झाले आहेत. याचा शरीरावर प्रचंड प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे. यावर सॉल्युशन म्हणून श्रुतीचा योग आज काम करू पाहात आहे. शरीराला जीवनातून वजा केले, तर काहीच उरणार नाही. शरीर सुदृढ, तर माणसाचं नाव, मोठेपणा, कर्तृत्व, घर, संपत्ती सर्व काही शक्य आहे. शरीर रोगांनी ग्रस्त असेल अथवा एखादा अवयव जरी निकामी होत असेल, तर त्याची फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते. सर्वात आधी स्वसुधारणा, त्यानंतर कुटुंब, राष्ट्र व नंतर देश असे टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना समुपदेशन करताना श्रुती मुलांकडून मुलांच्या स्वास्थ्याकरिता उत्तम असणारी योगासने लीलया करून घेते. प्राणायामचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्र समजावून सांगून फुप्फुसात श्वसनाचा विस्तार कसा करायचा, प्राणायाम कसे करावेत याचे सखोल मार्गदर्शन श्रुती आपल्या शिबिरात सहज करून जाते. शिबिराची सांगता सद्गुरू वामनराव पै यांच्या विश्व प्रार्थनेने करायला श्रुती कधीच विसरत नाही.योगकार्याकरिता शाळा सोडली, पण बाहेरून तिने दहावी, बारावीची परीक्षा दिली आणि पदवीसाठीही ती प्रयत्नशील आहे. कोणत्याही शाळेत शिबीर घेतल्यावर श्रुती शाळेच्या पटांगणातून निघेपर्यंत विद्यार्थी श्रुतीची पाठ सोडत नाहीत. एखाद्या सेलिब्रिटीची घ्यावी त्याप्रमाणे तिची स्वाक्षरी मिळवण्यासाठी धडपड करतात. अशी ही योगकलादायिनी, भारताची योगसम्राज्ञी आज विश्वात भारताची योग पताका फडकवण्यासाठी प्रयत्नरत आहे. तिला तिच्या कार्यासाठी आपणर सर्व भारतीयांच्या खूप खूप शुभेच्छा!
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०
१७७ देशांत पोहोचलेली डोंबिवलीची योगकन्या श्रृती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा