रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

इस प्यार को हम क्या नाम दे?



२१ फेब्रुवारीच्या शुक्रवारी संपूर्ण देशभरात एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने सर्वांनाच अवाक् करून टाकले. विचार करायला लावला. या चित्रपटाचे नाव आहे ‘शुभमंगल ज्यादा सावधान!’ एक वेगळा विचार देणारा उत्कृष्ट चित्रपट म्हणून याकडे पाहावे लागेल. कारण यामध्ये समलैंगिकतेचा विचार ज्याप्रकारे धाडसाने मांडला आहे, त्या धाडसालाही दाद दिली पाहिजे. हितेश केवल्य या लेखक आणि दिग्दर्शकाने अत्यंत संयमाने विनोदी पद्धतीने या विषयाला स्पर्श करून संपूर्ण समाजाला विचार करायला लावला आहे.कोणताही चित्रपट म्हटला की, त्यात हीरो, हिरोईन आली, पण इथे दोन हीरोच परस्परांचे हीरो आहेत आणि हिरोईन आहेत. कार्तिक (आयुष्मान खुराना) आणि अमन (जितेंद्र कुमार) या दोघांची ही लव्ह स्टोरी आहे. आपल्याकडे लव्ह स्टोरी म्हटल्यावर लैला-मजनू, हिर-रांझा, सोहनी-महिवाल, वासू-सपना यांच्या पलीकडे जात नाही. किंबहुना लव्ह स्टोरी ही फक्त एक युवक-युवतीचीच असते असा समज आहे, पण दोन तररुणांमध्येही प्रेमसंबंध असू शकतात, असा विचार रुजवणारा हा अत्यंत धाडसी चित्रपट.उत्तर प्रदेशातील त्रिपाठी कुटुंबातील ही कथा घेतली आहे. अत्यंत व्यंगात्मक आणि हास्यपूर्ण वातावरणात, संयमाने हाताळलेले कथानक हे लेखक आणि दिग्दर्शक कैवल्य यांचे कौशल्य म्हणावे लागेल. समलैंगिक आहे म्हणून कुठेही बिभत्सपणा न दाखवता त्यांच्या भावना, इमोशन्सचा विचार करून हा चित्रपट तयार केला आहे, म्हणून त्याचे कौतुक करावे लागेल.समलैंगिक असणे हा गुन्हा नाही, किंबहुना कोणी आपण होऊन ठरवत नाही, मी समलैंगिक असावे. त्याला निसर्गाने तसे घडवलेले असते. मुलगा होणे, मुलगी होणे हे जसे निसर्गाने ठरवले आहे, तसेच समलैंगिक मानसिकतेचा पिंड तयार होणे हेही निसर्गाच्या हातात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे घृणेने पाहू नका, त्यांना त्यांचे जीवन जगू द्या, असा विचार मांडणारा हा चित्रपट आहे. अत्यंत नाजूक विषय या चित्रपटाने मांडला आहे, म्हणजे एकादा माणूस मी मुलगा आहे, मी मुलगी आहे हे जसे सहजपणे अभिमानाने सांगू शकतो, तसाच मी गे आहे, मी समलिंगी आहे, हे पण अभिमानाने सांगता आले पाहिजे.आज समलिंगी किंवा गे लोकांकडे अत्यंत वाईट दृष्टीने समाज पाहतो, पण याच समाजाचे वाभाडे हा चित्रपट काढतो. जो समाज या गे लोकांना नावे ठेवतो, नाके मुरडतो, तो समाज तरी कुठे धुतल्या तांदळासारखा आहे? ‘हमाम में सब नंगे होते हैं’ त्याप्रमाणे पुरुष किंवा स्त्री म्हणून भिन्नलिंगी प्रेमावर विश्वास ठेवणाºयांचे प्रेमही किती मुखवट्याचे आहे, खोटे आहे हे दाखवताना आमचे प्रेम कसे खरे आहे, हे या शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटातून दाखवून दिलेले आहे.आज एखाद्याला गतीमंद मूल झाले, अंध, अपंग जन्माला आले, तर त्याला कोणी सोडून देत नाही. आहे त्या अवस्थेत त्याला जगवले जाते. त्याला सहानुभूतीने वागवले जाते. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केला जातो. मग गे म्हणून जन्माला आलेल्या अपत्यांबाबत आईबाप का असे वागत नाहीत? आपला मुलगा गे आहे म्हणून स्वत:ची प्रतिष्ठा कमी झाली असे का वाटते? तोही जीव आहे. त्यालाही भावना आहेत. गे म्हणून जन्माला यावे असे त्याने ठरवलेले नसते, पण मुलगा म्हणून त्याची वेगळी ओळख आहे, मुलगी म्हणून तिची वेगळी ओळख आहे, तशीच गे म्हणून किंवा समलिंगी आकर्षण असलेली व्यक्ती म्हणून आमची स्वत:ची ओळख असली पाहिजे, एवढीच त्यांची मागणी आहे, पण समाज त्यांना जगू देत नाही. केवळ शरीर पुरुषाचे आहे, म्हणून तू पुरुष म्हणूनच जगला पाहिजे. तू भिन्नलिंगी व्यक्तीशीच प्रेम केले पाहिजे. पुरुषाचा स्त्रीशीच विवाह झाला पाहिजे, असे त्याच्यावर बिंबवून त्याचा कोंडमारा केला जातो. त्याच्यावर औषधोपचार करून गे व्यक्तीला मूळ लिंगात आणण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्याला ते हवे आहे का? आपण गे आहोत, म्हणून त्याला अपराधी वाटत नसेल, तर आई-वडिलांनी, समाजाने त्याच्यावर जबरदस्ती का करावी? त्यांना त्यांचे जीवन जगू दिले पाहिजे. त्यामुळेच या चित्रपटातील दोन नायकांचा हा जो सहजीवनासाठी हक्क मिळवण्याचा संघर्ष आहे, तो लाजवाब आहे.या चित्रपटात कार्तिकची भूमिका आयुष्मान खुराना जगला आहे. अमनची भूमिकाही जितेंद्र कुमारने तितक्याच सहजतेने केलेली आहे. माझं कार्तिकवर प्रेम आहे हे सांगताना तो घाबरत नाही, तर आपल्या आईव्-वडिलांना ज्याप्रकारे पटवून देतो, त्यातून त्यांचा तो सभ्यतेचा बुरखाच फाडतो. कार्तिकला पाहिल्यावर आपल्या मनात काय आले, ते तुम्ही कधी प्रेम केलेत का? असे आई आणि बापाला विचारतो. आईचे पहिले प्रेम दुसरीकडे असते आणि लग्न दुसºयाशी होते. त्या प्रेमाला ती विसरू शकत नसते. बापाचेही तसेच असते. त्या प्रेमाचीच मला जाणीव झाली आहे, असे सांगून तो धक्का देतो, पण प्रेम कोणावर व्हावे याला काही अर्थ नसतो. ‘गधी पे आया दिल, तो परी भी क्या चीज हैं?’ अशी आपल्याकडे म्हण आहे. एखादा फालतू माणूस असतो, निकम्मा असतो, त्याच्यावर सुशिक्षित तरुणी भाळते. तिच्या जीवावर तो ऐषोआराम करतो, पण त्याला कोणी नावे ठेवत नाही. कारण ते दोन स्त्री-पुरुष आहेत, भिन्नलिंगी आहेत! पण मेड फॉर इच अदर दोन तरुण असतील, तर त्यांच्या सहजीवनाला, लग्नाला कोणी संमती देत नाही. कारण हे अनैतिक म्हणून संबोधले जाते, पण हे अनैतिक ठरवणारे कोण आहोत आपण? त्या दोघांची परस्परसंमती आहे आणि त्यांचे खरोखरच प्रेम असेल, तर राहू देना त्यांना एकत्र.प्रेम हे प्रेम असते. त्याचा शारीरिक आकर्षणाशी संबंध नसतो. त्यामुळे ते पुरुषावर केले काय, स्त्रीवर केले काय किंवा समलिंगी व्यक्तीवर केले काय, ते प्रेमच असते. त्याची तुलना कशाशीच होत नाही. त्यामुळे समलिंगी प्रेमाचे समर्थन करा असा आक्रोश करणारा हा चित्रपट आहे. कार्तिक जन्माला तसा आला म्हणून त्याच्या बापाने त्याला सतत मारहाण करायची, हा त्याचा दोष आहे का? पण तो बंड करून बाहेर पडतो आणि आहे मी गे, मला गे म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे समाजाला तो ओरडून सांगतो. मजनूला जशी मारहाण होते, तसाचा काठीने तो आपल्या प्रेमासाठी मार खातो, पण प्रेमात हार मानत नाही. अखेर त्यांच्या खºयाखुºया प्रेमापुढे समाज झुकतो आणि दोघांच्या लग्नाला समाज मान्यता देतो. गेल्या काही वर्षांपासून ३७७ कलमाची चर्चा या देशात झाली. परस्पर संमतीने कोणी समलिंगी संबंध ठेवले, तर तो अपराध असणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आणि या लोकांना मोकळा श्वास घेता आला, पण तरीही त्यांच्याकडे अनैतिक किंवा तिरस्काराने पाहण्याची समाजाची दृष्टी असते.आपले अनेक मित्र असतात. ते विवाहित असतात. त्यांच्याशी आपण मैत्री करतो, बोलतो, पण एखादी व्यक्ती समलिंगी आहे हे समजल्यावर सगळे जण त्यांना वाळीत टाकल्याप्रमाणे चार हात लांब राहतात. एखादी व्यक्ती समलिंगी आहे याचा अर्थ ती कोणाही बरोबर जाईल असे नाही. त्यांनाही काही आपला चॉईस आहे. समलिंगी कोणती व्यक्ती आपल्याला आवडते हे सर्वस्वी त्यांना ठरवण्याचा अधिकार असतो, पण उगाचच एखादी व्यक्ती गे आहे म्हणजे ती आपल्याही गळ्यात पडेल, असे समजून अनेक जण त्यांना टाळतात. कोणताही पुरुष किंवा स्त्री कोणाच्याही गळ्यात पडत नाही. त्या जोड्या ठरलेल्या असतात. तशाच गे लोकांच्याही जोड्या ठरलेल्या असतात. ते कोणाच्याही मागे लागत नाहीत.शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटात कार्तिक आणि अमनचा विवाह लावण्यास तो पुरोहित भटजी नकार देतो. त्यावेळी कार्तिक त्याची बाजू मांडताना म्हणतो की, तुम्हीच म्हणता ना, लग्न म्हणजे दोन आत्म्यांचे मिलन? पण आत्म्याला कुठे लिंग असते? आज आमच्या आत्म्यांचे मिलन होणार आहे. त्यामुळे तो भटजीही ते लग्न लावतो. त्यांना मोकळे आकाश करून देतो, पण त्याअगोदर त्यांना जो संघर्ष करावा लागतो, तोही फार महत्त्वाचा आहे. आपल्याकडे प्रेम समलिंगींचे असो वा भिन्नलिंगींचे, त्यांना संघर्ष हा करावा लागतोच. लैला-मजून, रोमिओ-जुलिएट, वासू-सपना सर्वांनाच तो करावा लागला. मग अमन आणि कार्तिकला तो करावा लागला, तर आश्चर्य काय? पण प्रेम हे शरीरावर नाही तर आत्म्यावर, मनावर केले जाते. दोन मनांचे मिलन होते, दोन आत्म्यांचे मिलन होते, तेव्हा ते स्त्री-पुरुष आहेत की, समलिंगी, याला काहीच अर्थ नसतो, पण तरीही समाजापुढे आजही प्रश्न पडतो की, ‘इस प्यार को हम क्या नाम दे?’ पचवायला थोडं कठीण आहे, पण अवघड नाही!
....
तो कीस तितकाच खरा..साधारण लव्ह स्टोरी असलेला चित्रपट असला की त्यात प्रियकर प्रेयसीचा एखादा कीस किंवा चुंबन दृष्य अपरिहार्य असतेच. १९८१ च्या एक दुजे के लिये मध्ये कमल हसत रती अग्निहोत्री यांचे चुंबनदृष्य चांगलेच गाजले होते. त्याचप्रमाणे बेताब या चित्रपटातील सनी देओल अमृता सिंगचा कीस करतो तेंव्हाही प्रेक्षकांना सुखद आनंद मिळत होता. तसाच खरा चुंबनाचा आनंद या चित्रपटात जितेंद्रकुमार या चित्रपटात आयुष्यान खुर्रानाचा कीस घेतो तेंव्हा प्रेक्षकांना मिळतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: