नाराजांना कसे हाताळणार?म्भाजप प्रणित राष्टÑीय लोकशाही आघाडीतून तेलगु देसमचे चंद्राबाबू बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. आंध्र प्रदेशात त्यांच्या पक्षाशी सत्तेत आघाडी केलेल्या भाजप मंत्र्यांनीही प्रत्युत्तरादाखल राजीनामे दिले आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षावर केंद्र आणि राज्य पातळीवर घटक पक्षांनी नाराज होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे चंद्राबाबूंच्या निमित्ताने अशा नाराजांना हाताळण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा कसे करतात हे फार महत्वाचे आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सगळया मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाणारे, अन्य पक्षांमधील अनेक नाराजांना पायघड्या घालून आपल्याकडे खेचणारे आज आपल्याच मित्र आणि सत्तेतील घटक पक्षांकडे दुर्लक्ष करत आहेत असे चित्र दिसत आहे. ही नाराजी वाढत गेली तर तर ती भाजपला आणि एनडीएला मारक ठरेल हे मोदी शहांनी लक्षात घेतलेच पाहिजे. कोणत्याही युद्धात समोरून थेट लढणाºया शत्रूंपेक्षा स्वकीय आणि गुप्त शत्रू हे घातक असतात. फितूर झालेले आणि नाराज झालेले आप्त आपल्याला महाग पडू शकतात. आजकाल निवडणुकीकडेही युद्ध म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे या रणसंग्रामात मोदी शहांनी नाराजांचे समाधान करण्याचे काम करावे लागेल. कोणत्याही निवडणुकीत पराभूत होणाºया उमेदवाराचा अभ्यास केला तर ज्यावेळी मात्रब्बर नेत्यांना पराभव पत्करावा लागतो तेंव्हा त्यात स्वकीयांकडून घात केल्याचे दिसून येते. बलाढ्य योद्धयांना नामोहरम करण्यासाठी प्रतिस्पर्धी नेहमीच असे कमकुवत दुवे शोधत असतो. हे कमकुवत दुवे आज अशा नाराजांमुळे प्रतिस्पर्ध्यांना मिळत जातात. त्यामुळे ही नाराजी वेळीच दूर केली नाही तर मी मी म्हणणाºयांना पतन व्हावे लागते. आपला इतिहास, पुराणकथा हेच सांगतात. रावणाचे कच्चे दुवे रामाला बिभिषणाकडून समजले म्हणून रावणाच्या सैन्यातील मेघनाद, कुंभकर्ण यांना मारून रावणाला संपवणे शक्य झाले. महाभारत युद्धात अर्जुनाला कर्णाचा वध करण्यासाठी कृष्णाच्या सारथ्यापेक्षाही अधिक कर्णाच्या सारथ्याची मदत झाली होती. कारण अर्जुनाशी लढायला जाण्यापूर्वीच कर्णाचे सारथ्य करणारा मद्रनरेश कर्णाचे मानसिक खच्चीकरण करत होता, मानसिक पराभूत करण्याचे काम करत होता. हे युद्धनितीतील राजकारण होते. युद्धतीनीतील राजकारण आणि राजकारणातील युद्धनीती यात फारसा फरक नसतो. दोन्ही ठिकाणीही घात हा नाराजांकडूनच होत असतो. त्यामुळे घटक पक्ष आणि आघाडीत आपण ज्यांना सामावून घेतले आहे त्यांना बरोबर घेऊन जाण्याचे नवे आव्हान आता रालोआच्या नेतृत्वावर असेल. आज चित्र असे आहे की राष्टÑीय लोकशाही आघाडी २०१४ ची निर्मिती तत्कालीन गरजेनुसार झाली पण नंतर त्या आघाडीतील घटक पक्षांकडे गरज सरो वैद्य मरो या प्रकारे पाहिले गेले. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी साधारण वर्षभर अगोदर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा गोव्यातील अधिवेशनातून भाजपने केली होती. मोदींच्या नेतृत्वाला मित्र पक्षांची साथ मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. सुमारे वर्षभर अगोदरपासूनच या मोदी लाटेचा वापर प्रसारमाध्यमांनी सुरू केला आणि निवडणूकपूर्व अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. मतदान होईपर्यंत दर आठ पंधरा दिवसांनी कोणत्या ना कोणत्या एजन्सीजचा अहवाल आणि आकडेवारी येत राहिली. या प्रत्येक अंदाजात वर्षभरात वाढ केली गेली होती. मोदींच्या नेतृत्वावर भाजप १६० जागा मिळवेल आणि २७३ चा आकडा मिळवण्यासाठी भाजपला अजून १०० ते १२५ जागांची मित्रपक्षांकडून जुळणी करावी लागेल इथपासून सुरूवात झालेला अंदाज भाजपच्या जागा प्रत्येक नव्या अंदाजानुसार वाढवत राहिला. त्यात दहा वीस टक्केनी वाढ करत आकडा फुगवत गेला. मग तो ऐन मतदानापर्यंत येईपर्यंत २०० पर्यंत पोहोचला. अखेरच्या टप्प्यात २३० पर्यंत भाजपला जागा मिळतील इथपर्यंत अंदाज येऊन मित्र पक्षांशिवाय मोदी पंतपधान होवूच शकत नाहीत हे पुढे आले. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या मित्र पक्षांना जवळ घेण्याचे काम भाजपने केले. महाराष्टÑ, आंध्रप्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, अशा भाजपशासीत राज्य नसलेल्या राज्यांमधून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचे काम मोदींनी पभावीपणे केले. मोदी लाटेचा फायदा आपल्याही होईल हे या प्रादेशिक पक्षांच्याही लक्षात आले होते. त्याचप्रमाणे काँग्रेसमधील नाराजांना जवळ करण्याचे कामही त्या काळात भाजपने केले होते. कोणाला आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देऊन तर कोणाला घटक पक्ष, मित्र बनवून आपली भक्कम आघाडी तयार केली. पण या आघाडीतून तयार झालेली लाट मतदारांनी थोपवली नाही. दर आठ पंधरा दिवसांनी व्यक्त होणाºया अंदाजात भाजपचे वाढते संख्याबळ दाखवण्याची लागलेली वाहिन्यांची चटक आणि ते पाहणाºया प्रेक्षकांचे भाराऊन जाणे मतदानापर्यंत थांबवता आले नाही. साहजिकच व्यक्त केलेल्या अंदाजातील २३० चा आकडा पार करून २८३ पर्यंत पोहोचला. एकटा भाजप स्वबळावर सरकार बनवू शकत होता. अर्थात आघाडी केलेली असल्याने त्यांनी सरकारमध्ये सगळयांना संधी दिली. पण यामध्ये घटक पक्षांना निवडणुकीपूर्वी ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा राहिल्या नाहीत. भाजपकडे एकहाती सत्ता असल्यामुळे घटक पक्षांची जरुरी त्यांना नाही असा संदेश भाजपतील काही अतिउत्साही वाचाळ नेत्यांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मित्र पक्षांना दिला गेला. त्यामुळे मित्र पक्षांना हिणवले गेले. आपल्याला आघाडीत राहुन समाधान मिळणार नाही ही भावना पहिल्या दिवसापासूनच या घटक पक्षांमध्ये निर्माण होऊन एक प्रकारची असुरक्षितता त्यांच्या मनात तयार झालेली होती. या असुरक्षिततेच्या भोवºयात आंध्र प्रदेशातील तेलगुु देसम, पंजाबातील शिरोमणी अकाली दल, महाराष्टÑातील शिवसेना, खा. राजू शेट्टी यांची स्वाभीमानी संघटना असे पक्ष आणि अन्य पक्षातून येऊन भाजपच्या तिकीटावर लढलेले नाना पाटोळेंसारखे नेते पोळले गेले. त्यामुळे या नाराजांची नाराजी दूर करण्याचे काम आता भाजप नेत्यांना करावे लागेल. येत्या दोन महिन्यात येणाºया कर्नाटक त्यानंतर पुढच्या सहा महिन्यात येणाºया मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकांचे भवितव्य असणार आहे. त्यामुळे नाराजांना हाताळण्याचे आव्हान पेलवत भाजपला पुढे जावे लागेल.
गुरुवार, ८ मार्च, २०१८
नाराजांना कसे हाताळणार?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा