कचरा प्रकरणावरून औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, दिवा धुमसत आहे. त्यावरून गुरुवारी विधिमंडळातही धूर निघाला. कच-यामुळे झालेल्या धुमश्चक्रीचा परिणाम औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना सक्तीची रजा, तर महापालिकेच्या आयुक्तांच्या बदलीपर्यंत झाला. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारसू यांचीही याप्रकरणी बदली करण्यात आली. पण, हे प्रकरण एवढय़ावरच थांबणार आहे का?कचरा हा प्रश्न न सुटणाराच आहे. कारण तो फक्त औरंगाबादपुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबर वाढती लोकसंख्या यामुळे कचरा वाढणे हे स्वाभाविक आहे. पण, या कच-याचे व्यवस्थापन करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला येत असलेल्या अपयशामुळे हे संघर्ष वाढत जात आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कच-याबाबत सरकारने काहीतरी कायदा केला पाहिजे. ठोस उपाययोजना करण्यासाठी विशेष अभ्यास पथके तयार केली पाहिजेत. कचरा ही न संपणारी गोष्ट आहे. ती समस्या किंवा प्रश्न न राहता दैनंदिन क्रिया म्हणून पाहून त्याच्या विल्हेवाटाची योग्य दिशा देण्याची वेळ आलेली आहे. काही वर्षापूर्वी ठाणे, मुलुंड येथेही मुंबई आणि ठाणे महापालिकेत वाद झाला होता. हा वाद महाराष्ट्रात सगळीकडे थोडय़ा फार फरकाने पेटतो. औरंगाबादमध्ये त्याला राजकीय वळण लागल्याने तो हिंसाचाराकडे गेला, पण जनतेच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे कचरा निर्मूलन ही गरज बनलेली आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. आपल्याकडे कच-यासाठी डम्पिंग ग्राऊंड हाच एक उपाय केला जातो. त्या डम्पिंग ग्राऊंडवर तो पेटवला जातो. त्याचा धूर आसपासच्या पाच-दहा किलोमीटर परिसरात पसरतो आणि तेथील आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पण, या कच-याची कायमची विल्हेवाट लावण्याची सोय आमच्याकडे केली जात नाही. कारण, कच-याकडे आपण दशकानुदशके गांभीर्याने पाहिले नाही. कचरा हे अस्वच्छता आणि रोगराईला आमंत्रण देणारे कारण आहे. तो वेळीच उचलला आणि त्याची योग्य ती दखल घेतली तर तो कचरा न राहता टाकाऊ आणि वाया जाणारे घटक म्हणून त्याकडे पाहिले गेले पाहिजे. यासाठी सर्वात प्रथम कचरा व्यवस्थापनाबाबत मुळापासून उपाययोजना केली पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात कच-यावर चर्चा अभ्यास झाला पाहिजे. त्या कच-याचे विघटनाचे प्रशिक्षण आम्हाला देता आले पाहिजे. कच-यापासून नवनिर्माण काही करता येईल का, याचे संशोधन करता आले पाहिजे. पण, कच-याकडे पाहण्याची दृष्टी आमची सुधारली पाहिजे. आपण सहज जर कच-याकडे नजर टाकली तर आपल्याला काय दिसते? आपण कच-याकडे पाहूच शकत नाही. कचरा कुंडी समोर दिसताच, नाकाला रुमाल लावून आपण खूप स्वच्छ असल्याचे भासवतो. पण, प्रत्यक्षात तसे नसते. सगळ्याच प्रकारचा कचरा एकत्रित झाल्यामुळे त्यापासून काहीतरी भयंकर तयार होऊन दरुगधी पसरते. पण, त्याचे वर्गीकरण केले तर आपल्याला त्याचे व्यवस्थापन खूप सोपे जाईल. त्याचा प्रश्न जटील होणार नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे समस्या म्हणून पाहू नका, तर तोडगा काढायची इच्छा बाळगण्याची गरज आहे. आपल्याकडे फक्त ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवा, असे सांगितले जाते. पण, त्या ओल्या-सुक्याचे पुन्हा डम्पिंग ग्राऊंडवर मिक्सिंग होते. याला काहीच अर्थ राहात नाही. त्यासाठी सर्व प्रकारच्या कच-याचे वर्गीकरण करून कायमस्वरूपी आदर्श मॉडेल तयार करण्याची गरज आहे. सुक्या कच-यावर नजर मारली तर लक्षात येईल की, त्यात कागदी कचरा, रद्दी याचे प्रमाण जास्त असते. या कचरा कुंडीतील कागदी वस्तू वेगळय़ा केल्या तरी फार मोठे ओझे कमी होईल. कागदाची सहज विल्हेवाट लावणे शक्य होईल. त्याची कागद पुनर्निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून उपयोगिता सिद्ध होईल. त्यामुळे ओला, सुका बरोबर कागदी कचरा वेगळा ठेवण्याचे तंत्र विकसित केले पाहिजे. सुक्या कच-यात दुसरे दिसणारे घटक म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकचे कागद आदी प्लॅस्टिकच्या वस्तू. यात पाण्याच्या बाटल्या, पॅकिंगच्या सामानाचे प्लॅस्टिक असे बरेच काही असते. सर्व प्रकारचे प्लॅस्टिक वेगळे केले तर फक्त मातीजन्य कचरा बाकी राहील. कागदी कचरा कागद कारखान्यांना पुनर्निर्मितीसाठी देता येईल. प्लॅस्टिक कच-यापासून आजकाल इंधन निर्मितीचे प्रयत्न यशस्वी झालेले आहेत. ठाणे-डोंबिवलीतील महिलांचा एक गट प्रत्येक महिन्याच्या दुस-या रविवारी शहरातील प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून तो पुण्याला इंधन निर्मितीसाठी पाठवतात. हे सगळीकडे शक्य आहे. रस्त्याच्या डांबरीकरणासाठीही प्लॅस्टिकचा वापर करण्याचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. कागद आणि प्लॅस्टिक सोडून बाकीचा सगळा कचरा हा माती होऊ शकेल असा असतो. त्यामुळे त्याचा वापर हा खतासाठी खड्डे तयार करून जैविक खतासाठी करता येईल. गोबर गॅसप्रमाणे कच-यापासून अशी काही ऊर्जा निर्मिती करता येते का, हे पण पाहावे लागेल. या दोन्हीतून जवळपास ६० टक्के कचरा वेगळा होईल. हे करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कचरा व्यवस्थापनाची साक्षरता करण्याची गरज आहे. आज आपण गेली वीस वर्षे ज्याप्रमाणे पोलिओ, क्षयरोग निर्मूलनासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करत आहोत, त्याप्रमाणे कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती करण्याची वेळ आलेली आहे. शालेय अभ्यासक्रमात कच-याचा समावेश करण्याची गरज आहे. त्याचा समाजशास्त्रात विचार करण्याची गरज आहे. ते फक्त लिहिण्यापुरते नाही तर विज्ञानाप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी शिक्षण दिले जावे. शालेय अभ्यासक्रमात असणा-या उपक्रमावर आधारित शिक्षणात कचरा व्यवस्थापनाचे काम करणा-या, त्यावर अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था करावी. थोडक्यात भविष्यात सगळीकडे पेटणा-या कच-यातील आग अगोदरच शांत करण्याची वेळ आलेली आहे. शहरांनी गावाकडे सरकायचे आणि गावांनी विस्तारायचे हे सध्याचे चित्र आहे. त्यात दोघांनीही आपल्या हद्दीबाहेर कचरा टाकण्याचे काम करायचे. यातून हा प्रश्न पेटतच राहणार. यासाठी सर्वात प्रथम याकडे सकारात्मकतेने पाहून हा प्रश्न इच्छाशक्तीच्या जोरावर सोडवणे गरजेचे आहे. कोणताही प्रश्न न सुटणारा असत नाही, हे लक्षात घेऊन आपल्यापासून सुरुवात करण्याची हीच वेळ आहे.
शुक्रवार, १६ मार्च, २०१८
कचरा व्यवस्थापनाबाबत साक्षरता व्हावी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा