गुरुवार, १५ मार्च, २०१८

एखादी लढाई हरावी लागते

मोठे युद्ध जिंकण्यासाठी एखादी लढाई हरावी लागते, हा युद्धाचा नियम आहे. इतिहासात डोकावल्यावर याचे प्रत्यंतर दिसून येते. निवडणुका हेही एक राजकीय युद्धच असते. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव होण्याने लगेच २०१९ ला सत्तांतर होईल असे स्वप्न पाहून भाजप आणि मोदी विरोधकांनी हुरळून जाण्याची गरज नाही. कारण या निवडणुकीकडे हेतुपुरस्सरही भाजपने गांभिर्याने पाहिले नाही असे असु शकते. गुजरात, राजस्थान मध्यप्रदेशातील यशाने हुरळून गेलेल्या काँग्रेस आणि मोदी विरोधकांना ईशान्य भारत तेंव्हा दिसला नव्हता. त्यामुळे भाजप कदाचित दक्षिणेत मोठी चढाई करेल आणि आगामी कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानात चमकदार कामगिरी करुन मोठे युद्ध जिंकून आपली ताकद पुन्हा दाखवू शकतो हे काँग्रेस आदी विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. ईतिहासात १९०५ साली जेंव्हा बंगालची फाळणी झाली तेंव्हा लाल, बाल, पाल या त्रिकुटाने ब्रिटीशांना विरोध केला. पंजाब, महाराष्टÑ आणि बंगाल यांच्या या विरोधामुळे ब्रिटीशांनी ही फाळणी रद्द केली. तेंव्हा आम्ही जिंकलो असे आम्हाला वाटले होते. पण ब्रिटीश ती फक्त एक छोटी लढाई हारले होते. पण मोठे युद्ध तर त्यांनी भारताचे दोन तुकडे करून, भारत पाकीस्तान फाळणी करुन जिंकले होते, त्याची जखम आपण अजूनही भोगतो आहोत. हे झाले इतिहासाचे एक उदारहरण. अशी कित्येक उदाहरणे आपल्याला देता येतील. त्यामुळे कालचा पराभव म्हणजे लाट विरत गेली असे समजण्याचे कारण नाही. गोरखपूर आणि फुलपूर पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे, त्याची अनेक कारणे आहेत. गोरखपूर मतदारसंघात ४७.१५ टक्के तर फुलपूर मतदारसंघात ३७.३९ टक्के मतदान झाले होते. अपेक्षेपेक्षा हे मतदान कमी होते. त्यामुळे भाजपचा बहुसंख्य मतदार हा मतदानासाठी बाहेर पडला नव्हता. त्या तुलनेत सपा, बसपाने आपल्या मतदारांना बाहेर काढले. २०१४ ला हे पक्ष दुसºया आणि तिसºया क्रमांकावर होते. परस्पर विरोधी होते. तरीही मतदारांना गृहीत धरण्याची भूमिका थोडी भाजपला महागात पडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते कबूलही केले आहे. अतिआत्मविश्वास आम्हाला महागात पडला. शेवटच्या क्षणी सपा आणि बसपा यांनी युती केली. स्थानिक मुद्द्यांनी निवडणुकीवर प्रभाव टाकला. अशी स्पष्ट कबूली त्यांनी दिली. त्यांना त्यांच्या पराभवाची कारणे समजली हीच जमेची बाजू आहे. पण सातत्याने होणाºया पराभवानंतरही काँग्रेसला अजून आपल्या पराभवाची कारणे सापडली नाहीत याचे काय? दुसरीकडे, बिहारच्या अररिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे खासदार तसलीमुद्दीन यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवरही पोटनिवडणूक घेण्यात आली. इथं त्यांचा मुलगा सरफराज अहमद हे राजदच्या तिकीटावर निवडणुकीत उभे होते. भाजपचे उमेदवार प्रदीप सिंह यांचा केला. यात वेगळे असे काही नाही. ही निवडणूक अनुकंपेचीच होती. भाजपचा पराभव हा पक्षाचा पराभव नव्हता तर चुकीचे उमेदवार दिल्याने झालेला होता. असा पराभवाचा फटका २००८ साली राजस्थानात भाजपला बसला होता. योग्य उमेदवार द्या असा तेंव्हाही राजस्थानचे प्रभारी असलेल्या तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री मोदींनी सांगितले होते. पण वसुंधरा राजे यांनी ते ऐकले नाही. पण मोदींच्या सूचनेप्रमाणे मध्यप्रदेशात योग्य उमेदवार दिले आणि त्यांनी सत्ता राखली. त्यामुळे हा प्रकार भाजपला नवा नाही. मतदारांना योग्य उमेदवार हवा असतो. योगी यांनी पक्षाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पष्टपणे सांगितले होते की, गोरखपूरमध्ये केवळ गोरखपूर पीठावरील व्यक्तीच निवडणूक जिंकू शकते. पण पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने गोरखपूरमधले पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र शुक्ल यांची निवड केली. गोरखपूरच्या आजूबाजूच्या परिसरात जगदंबिका पाल यांना सोडले तर इतर सर्व खासदार ब्राह्मण आहेत. अशा वेळी आणखी एका ब्राह्मण उमेदवाराला निवडणुकीत उभे करणे, हे जातीय समीकरणांच्या हिशोबाने चुकीचे होते. त्या चुकीचा हा फटका बसला आहे. वास्तविक गोरखपूरमध्ये निषादसह मागासवर्गीय जातींची संख्या मोठी आहे. त्यामुळेच समाजवादी पार्टीने इथून यापूर्वी फूलनदेवीला उमेदवारी दिली होती. तेंव्हा हे महत्त्व मुलायम सिंह यांनी ओळखले होते. अशा परिस्थितीत फुलपूरमध्ये मौर्य हे आपल्या पत्नीला उमेदवारी देऊ इच्छित होते. पण पक्ष यासाठी तयार नव्हता. पक्षाने कौशलेंद्र सिंह पटेल यांना तिकीट दिले जे स्थानिक नव्हते. दुसरीकडे समाजवादी पार्टीचा उमेदवार हा स्थानिक असल्याचा फायदा त्यांना मिळाला. आणखी एक म्हणजे राज्य सरकारच्या कामकाजाने लोक नाराज होते. एक वर्षात राज्य सरकारने शेतकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ यांना नाराज केले आहे. ज्येष्ठांची पेंशन बंद करण्यात आली. विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आणि शेतकºयांच्या उत्पन्नावरच घाला घातला. याशिवाय पक्षाचे कार्यकर्ते नेतृत्वावर नाराज होते. नेते त्यांना भेटत नाहीत. त्यांची कामे होत नाहीत. यातून एक संदेश गेला की सत्ता मिळाल्यानंतर नेते हे सत्तांध झाले आहेत. हेच नव्हे तर संघटनेचे दायित्व सांभाळणारे लोकही कार्यकर्त्यांना टाळत होते. शेवटी कोणताही पक्ष हा कार्यकर्त्यांमुळेच मजबूत असतो. हेच कारण असेल की भाजपच्या पराभवाच्या जल्लोषात सपा आणि बसपाशिवाय भाजपचेही काही कार्यकर्ते सहभागी होते. पक्षाच्या केंद्रीय आणि प्रदेश कार्यकारिणीने या निवडणुकांना कितपत गंभीर्याने घेतले होते, हे जाहीर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे प्रचारासाठी गेले नव्हते. असे गृहीत धरून चालत नाही. मोदी शहा हा पक्षाचा चेहरा असताना तो चेहरा न दिसल्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा लाटेतला मतदार बाहेर पडला नाही. योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या युतीने भाजपचा पराभव केला आहे. जे अशक्यप्राय होते कारण या दोन्ही पक्षांची मागच्या दोन्ही निवडणुकांमधील टक्केवारी एक केली तरी ते योगींना हरवू शकत नव्हते, तरीही आज त्या मतदारसंघात भाजपचा पराभव झालेला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: