शुक्रवार, ३० मार्च, २०१८

मुंबईची सुरक्षा असुरक्षित हातात

* सिक्युरिटी गार्डच्या भरतीत गोंधळ
* विनाचौकशी कोणीही होतो गार्ड
* बोगस एजन्सीजची चलती

मुंबई: सुरक्षा रक्षक किंवा सिक्युरिटी गार्ड ही मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्टÑाची एक महत्वाची गरज आहे. परंतु मुंबईसारख्या महानगरात सिक्युरिटी गार्डच्या भरतीत जो गैरप्रकार दिसतो त्यातून स्पष्टपणे जाणवते आहे की मुंबईची सुरक्षा असुरक्षित हातात आहे. यातून एखादे फारमोठे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सिक्युरिटी गार्डच्या बोगस एजन्सीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पाऊले उचलली पाहिजेत.काही नामांकीत कंपन्या सोडल्या तर बहुतेक ठिकाणी कोणत्याही एजन्सीजमार्फत सिक्युरिटी गार्ड पुरवले जातात. प्रत्येक आॅफीस, सोसायटी, मॉल, गृहनिर्माण संस्था यांना सिक्युरिटी गार्ड ही आवश्यक बाब बनलेली आहे. मॉलसारख्या ठिकाणी किंवा मोठमोठ्या कंपन्यांनाही सिक्युरिटी गार्ड पुरवण्यासाठी अनेक एजन्सीज काम करत आहेत. परंतु या एजन्सीजबरोबर अनेक बोगस एजन्सीज काम करताना दिसतात. या कंपन्या तरुणांच्या बेरोजगारीचा आणि असहायतेचा गैरफायदा उठवताना दिसतात. अशा कंपन्या बोरीवली, परेल, एलफिन्स्टन रोड, अंधेरी, नेरुळ, भांडुप येथे मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या दिसून येतात.मुंबईत नोकरीसाठी, सिनेमा, टीव्ही सिरीयल अशा आकर्षणाने अनेकजण देशाच्या कानाकोपºयातून येत असतात. कुठे काम मिळाले नाही की रिकाम्या हाताने घरी परत कसे जायचे? त्यामुळे वाटेल ते काम करायला त्यांची तयारी असते. अशा तरुणांना सिक्युरिटी गार्ड हे फार मोठे गाजर दाखवले जाते. स्टेशन आणि स्टेशन परिसरात ठिकठिकाणी भिंतीवर, खांबावर सिक्युरिटी गार्ड पाहिजेतच्या जाहीराती चिकटवल्या जातात. या जाहीरातीत फक्त एक फोन नंबर दिलेला असतो. १२ हजार ते १८ हजार पगारांचे आमिष दाखवले जाते. त्या फोन नंबरवर फोन केल्यानंतर पलिकडून बोलणारा लगेच इंटरव्'ूवला येण्याचे आमंत्रण देतो. त्यासाठी ताबडतोब येण्याची घाई करून पत्ता एसएमएस करतो. त्या पत्त्यावर पोहोचेपर्यंत सतत त्या व्यक्तिचे फोन येत राहतात. आज लगेच जॉईन झालात तर बोनस मिळेल वगैरे आमिष दाखवले जाते. यासाठी इंटरव्'ूवला बोलावलेले ठिकाण म्हणजे भांडूपचा ड्रिम्स मॉल, कधी बोरिवली पूर्वेला, कधी एलफिन्स्टन रोडला, तर कधी अंधेरी पश्चिमेला, नेरूळ स्टेशनजवळ असे बोलावले जाते. इंटरव्'ूव घेण्यासाठी २० ते २५ वयोगटातील मुली असतात. या मुली अर्ज मागवून घेतात. आधारकार्ड, ओळखपत्र मागवून घेतात. लगेच जाइॅनींग करणार का विचारतात. नोकरीची गरज असलेला उमेदवार हो म्हणतो. मग त्याला १५०० ते ३००० रुपयांची मागणी केली जाते. यातील १ हजार डिपॉजीट आणि २ हजार रुपये युनीफॉर्मचे असे सांगितले जाते. इंटरव्'ुवला आलेल्या शंभर मुलांपैकी ५० जण पैसे देऊ शकत नसल्याचे सांगून निघून जातात. २५ जण निम्मे पैसे देण्याची तयारी दर्शवतात तर काही जण सगळे देण्यास तयार होतात. पैसे दिले नाहीत तर जमा केलेले ओळखपत्र, आधारकार्ड ती मुलगी देण्यास नकार देते. तिच्या भोवती गुंडासारखी मुले बसलेली असतात. त्यामुळे मुलाखतीस गेलेले तरूण पैसे काढून देतात. मग त्यांना दुसरे दिवशी सकाळी १० वाजता येण्यास सांगितले जाते. लगेच जॉईनींग करण्याचे आमिष दाखवून दुसºया दिवसावर टोलवले जाते. रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफीकेशन होणार आहे असे सांगून, युनिफॉर्म आणण्यासाठी १ दिवसा मागितला जातो. दुसरे दिवशी सकाळी ती मुलगी तुमच्या कमरेची मापे घेते, उंची मोजते आणि पवई, खारघर, बेलापूर, अंधेरी इथे जाण्यास सांगते. त्या स्टेशनवर आमचा माणूस तुम्हाला पिकअप करेल आणि साईटवर घेऊन जाईल असे सांगितले जाते. असे अनेकांना सांगून कुठे कुठे पाठवले जाते. तो उमेदवार त्या स्थानकावर तासंतास वाट बघत बसतो. त्यानंतर संध्याकाळपर्यंत तो एजंट भेटायला येतो. युनिफॉर्म मिळाला नाही, उद्या या असे सांगतो. असे चार पाच दिवस खेळवतो. तोपर्यंत त्या तरुणाचे पार त्राण गेलेले असतात. त्याच्याकडे असलेले पैसेही संपलेले असतात. तो वारंवार नोकरी नसली तरी चालेल पण माझे जमा केलेले पैसे परत करा अशी मागणी करतो. असे पैसे घेऊन तरूणांची फसवणूक करण्यात बोरीवली, अंधेरी आणि नेरुळच्या एजन्सीज आघाडीवर आहेत.एलफिस्टन रोडच्या एजन्सीजना माणसे मिळत नसतात. त्यामुळे तिथले एजंट कोणी आला की लगेच त्याला भरती करून घेतात. कुठे सोसायटी, मॉल, कंपनीच्या गेटवर नेऊन बसवतात. एक महिना काम केल्यावर सुपरवाईजर करू असे सांगून आठ तासाऐवजी १२ तास काम करण्यास तयार करतात. पगार राऊंडर महिन्याच्या १० तारखेला देईल असे सांगून काम करून घेतात. दुसरा गार्ड येईपर्यंत हालायचे नाही असे सांगितलेले असते. तुरुण मिळेपर्यंत त्याला खोळंबून ठेवले जाते. १२ तासांनंतर दुसरा गार्ड येण्याअगोदर गेला तर पगार मिळणार नाही अशी भिती घातली जाते. तो तसाच उपाशीपोटी किंवा कोणी काही देईल त्यावर ताटकळत मरगळत केविलवाण्या स्थितीत काम करत राहतो. सुपरवाईजर, राउंडर सारखे बदलत राहतात. त्याला कसलीही पगाराची शाश्वती नसते. त्यामुळे तो कंटाळून काम सोडून निघून जातो.

परप्रांतियांची भरती मोठ्या प्रमाणात

या गार्डसाठी बहुतेक परप्रांतियांची भरती होते. त्यांना कुठेही राहण्याची तयारी असते. त्यामुळे जिथे साईट मिळेल त्याठिकाणी आसºयाला दिवसभर राहण्याची त्यांची तयारी असते. परंतु यातूनच अनेक गैरप्रकार घडताना दिसतात. सुरक्षारक्षकाने फ्लॅटमध्ये घुसून अत्याचार करणे, खून करण्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. पुण्यातही अशाच सुरक्षारक्षकाने इंजिनीअर तरुणीवर बलात्कार करुन खून केल्याची घटना घडली होती. त्यामुळे असे असुरक्षित सुरक्षारक्षक नेमून एजन्सीजकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होताना दिसते.                             कसलेही प्रशिक्षण नाहीकसलेही प्रशिक्षण नसताना असहाय अशा गरीब तरूणांचा, प्रौढ रिटायर्ड व्यक्तिंचा वापर सुरक्षारक्षक म्हणून केला जातो. यात मुंबईची सुरक्षा असुक्षित असल्याचेच दिसते. केवळ युनिफॉर्म घातला म्हणजे तो सुरक्षारक्षक कसा? त्याला पळण्याचे, हत्यार चालवण्याचे, संरक्षण विषयक काही प्रशिक्षण असणे आवश्यक असते. परंतु ज्याचा नेमका ठावठिकाणा नाही अशा असुरक्षित हातात सुरक्षा सोपवण्याचे काम एजन्सीजमार्फत होत असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: