१२ मार्च हा महाराष्टÑाचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस. यशवंतराव चव्हाण हे राजकारणी असले तरी ते सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी होते. त्यांनी काळाच्या पुढचा विचार करून तत्कालीन परिस्थितीत महाराष्टÑाचे चित्र पाहिले होते. त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्ताने त्यांची कार्यपद्धती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे असे वाटते. असे कोणतेच क्षेत्र नव्हते की, त्या क्षेत्रातील दिग्गजांबरोबर यशवंतरावांचा वावर नव्हता. त्यामुळे त्यांच्या समृद्ध आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे अवलोकन नव्या पिढीने करणे काळाची गरज आहे. महाराष्टÑाच्या मुख्यमंत्रीपदाबरोबरच केंद्रातील संरक्षण, परराष्टÑ, गृह, अर्थ अशी महत्त्वाची खाती सांभाळत काही काळ त्यांनी उपपंतप्रधानपदही सांभाळले होते. वित्त आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पण, वरच्या पदावर पोहोचूनही त्यांचे पाय जमिनीवर होते. क्षमता असूनही काँग्रेसच्या महाराष्टÑाला डावलण्याच्या भूमिकेमुळे त्यांना पंतप्रधानपदावर जाता आले नाही, ही महाराष्टÑाला असलेली कायमची खंत असेल. पण, ही खंत का वाटते यासाठीच त्यांच्या कर्तृत्वावर नजर मारणे गरजेचे आहे. खंत त्यांनी बोलून दाखवली नाही, पण ती महाराष्टÑाला वाटते हेच त्यांचे मोठेपण म्हणावे लागेल.यशवंतराव चव्हाण यांचा जन्म तत्कालीन सातारा आणि सध्याच्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात; परंतु त्यांच्यामागे लावलेली ही बिरुदावली दिवंगत व्यक्तिंच्यामागे लावतात तशी कृत्रिम नाही तर अगदी मनापासून अशी आहे. ज्या मोठेपणाने आपण महाराष्टÑाचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून पु. ल. देशपांडेंचे नाव घेतो तसेच निर्मळपणे महाराष्टÑाचे शिल्पकार म्हणून यशवंतरावांचे नाव घेतले जाते. ते त्यांचे विरोधकही मान्य करतात. याचे कारण यशवंतराव चव्हाण हे प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणूनच त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. राजकारणात पडले नसते तर कदाचित यशवंतराव चव्हाण हे महान साहित्यिक झाले असते. त्यांची भाषणे, लिखाण वाचून त्यातील सहजसुंदर भाषाशैलीवरून ते अगदी साहित्यक्षेत्रात गेले असते तर ज्ञानपीठापर्यंत पोहोचले असते इतकी त्यांची प्रतिभा होती. पुस्तकांवर त्यांनी प्रचंड प्रेम केले. त्यांच्या खजिन्यातील पुस्तके ही आजही कराडच्या वाचनालयात आणि संग्रहालयात पाहायला मिळतात. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्यसंपदा अत्यंत अनमोल अशी आहे. प्रत्येकाने ती वाचली पाहिजे अशीच आहेत. यशवंतराव चव्हाण काय होते हे समजण्यासाठी आणि महाराष्टÑ कसा असला पाहिजे हे कळण्यासाठी ही पुस्तके प्रत्येकाने वाचली पाहिजेत.महाराष्टÑाच्या निर्मितीपूर्वी १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली होती. मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. पण, १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पंडित नेहरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी जेव्हा यशवंतराव चव्हाण गेले, तेव्हा त्यांच्या या कार्याचा उल्लेख ‘हिमालयावर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला’ असा केला जातो. महाराष्टÑाच्या विकासाचे स्वप्नयशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडित आहेत. नव्याने निर्माण झालेल्या महाराष्टÑाचा विकास सहकाराच्या माध्यमातूनच होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी सहकारी चळवळीला उत्तेजन दिले. ही चळवळ ग्रामीण भागातून उभी करण्याचे काम त्यांनी केले. हे करत असताना राज्यातील महत्त्वाच्या उद्योजकांनाही त्यांनी चांगले प्रोत्साहन दिले. खासगी क्षेत्रातूनही उद्योग चालले पाहिजेत यासाठीही त्यांनी प्रोत्साहन दिले. कारण, उद्योग वाढला तर रोजगार वाढणार आहे हे यशवंतरावांचे धोरण होते. महाराष्टÑाचा विकास हा शेतीचा विकास, रोजगार आणि उद्योग वाढीवर आहे हे ओळखून त्यांनी काम केले. आज त्या धोरणांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याकाळात सुबत्ता, तांत्रिक प्रगती नसतानाही त्यांनी करून दाखवले मग आज का आपण अजून पुढे जात नाही हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहतो. त्यासाठी यशवंतरावांचे नियोजन सरकारने अभ्यासणे गरजेचे आहे. कृषी विषयक यशवंतरावांची भूमिकायशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न आणि कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. याकडे जर आजच्या सरकारने सकारात्मकदृष्टीने पाहिले तर आमच्या शेतकºयांना आत्महत्या कराव्या लागणार नाहीत. यशवंतरावांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांचीसंख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाºया लोकांनी त्यांच्या जमिनीच्या एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी ही भूमिका त्यांनी धाडसाने मांडली होती. यावर आपल्याला टीकेला, कोणाच्या रोषाला सामोरे जावे लागेल याचा विचार त्यांनी केला नाही. याचे कारण यशवंतराव चव्हाण हे मूठभरांपेक्षा सामान्यांचा विचार करणारे होते. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडिक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारीतत्त्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. यावर यशवंतरावांचा भर होता. त्यामुळे शेतकºयांना समाधान होते. आज शेतकºयांच्या होणाºया आत्महत्या, त्यांना करावी लागणारी आंदोलने, त्यांचे विधान भवनावर येणारे मोर्चे पाहिले तर वाटते की, या राज्यकर्त्यांनी एकदा यशवतरावांच्या विचारांचा अभ्यास करावा. शेतकरी जगला पाहिजे, तरंच आपल्या जगण्याला अर्थ आहे हे सांगण्याची आता वेळ आली आहे. त्यासाठी यशवंतरावांच्या धोरणांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या जयंतीनिमित्ताने उद्या त्यांच्या प्रतिमेला हार घातला जाईल, चार कौतुकाचे शब्द विधान भवनात बोलले जातील, पण ते काही खरे नाही. यशवंतरावांचे अभ्यासू विचार आत्मसात केल्यानेच शेतकºयांना न्याय मिळेल असे वाटते. हे सरकार आमचे आहे, शेतकºयांचे आहे असे शेतकºयांना वाटले पाहिजे.
समतोल विकासाचे पुरस्कर्ते नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाºया लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकºयांनी कृषिशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत यशवंतरावांनी मांडले होते. यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना त्यांनी मांडली. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. हे सगळे आपल्या सरकारच्या बळावर शक्य आहे. फक्त सरकारची इच्छाशक्ती आवश्यक आहे. आज मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्टÑसारख्या कल्पना सरकार करते आहे. पण, जुने प्रकल्प आज मोडकळीस येत आहेत. त्यांना कसले संरक्षण नाही, त्यांचे पुनर्रुज्जीवन करण्याची गरज आहे. औद्योगिक रोजगार संपुष्टात येत आहे, अशा परिस्थितीत नव्या योजना आणण्यापेक्षा जुन्यांकडे नीट लक्ष दिले तर आपोआपच अच्छे दिन येतील. पण, नियोजन न करता केल्या जाणाºया घोषणा हवेत विरून जातात. शासकीय योजना या जनतेपर्यंत पोहोचत नाहीत, ही आजची परिस्थिती आहे. यशवंतरावांनी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. सहा दशके ग्रामीण भागात काँग्रेस रुजण्याचे कारण यशवंतराव चव्हाणांचे धोरण हे आहे. कारण या विकासाच्या धोरणामुळे एक काळ असा होता की, ग्रामीण भागात काँग्रेस शिवाय कोणता पक्ष आहे तिथल्या जनतेला माहीत नव्हते. तशी आवश्यकताच भासली नाही. विकासापासून दूर गेल्यावर आणि राजकारणाचा अतिरेक झाल्यावर बाकी पक्षांचा शिरकाव झाला आहे. तो यशवंतरावाच्या माघारी झाला आहे. विकासाची एक बुलंद भिंत उभी करून यशवंतरावांनी विरोधकांना सीमेपार रोखले होते. आज त्या भिंती पडू लागल्या आणि विकासाची स्वप्न दाखवणारे आले त्यामुळे शेतकºयांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. यासाठी समतोल विकासासाठी यशवंतरावांच्या ध्येय-धोरणांचा अभ्यास आजही मार्गदर्शक आहे. पंचायत राज पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात ही यशवंतराव चव्हाणांची संपूर्ण देशाला असलेली फार मोठी देणगी आहे. सत्तेच्या केंद्रीकरणाला आळा घालून विकेंद्रीकरणाची योजना या योजनेतून यशवंतरावांनी निर्माण केली. आज त्याच पायावर सामान्यांना विविध सभागृहांची दारे खुली झाली आहेत. लोकप्रतिनिधित्वाची संधी मिळत आहे. या योजनेतून त्यानी प्रशासकीय विकास करण्याचे धोरण अवलंबले होते. हे समजणे आवश्यक आहे. आज शासन आणि प्रशासन यांच्यात मेळ नसतो, अशी परिस्थिती आहे. शासनाने कितीही चांगले निर्णय घेतले, तरी ते लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीत. याचे कारण या पंचायत राज या त्रिस्तरीय साखळीचा योग्य वापर कसा केला पाहिजे हे सरकारला लक्षात येत नसावे. आर्थिक विकास राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ करून यशवंतराव चव्हाण यांनी आर्थिक विकासाचे नियोजन केले होते. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा या देशाला झाला पाहिजे, कृषी आणि सामान्य घटकाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे हे यशवंतरावांचे स्वप्न होते. त्यादृष्टीने त्यांनी आर्थिक विकासावर भर दिला होता. यातूनच त्यांनी कोल्हापूर प्रकारच्या बंधाºयांचा प्रचार केला. महाराष्टÑाची भाग्यलक्ष्मी म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, त्या कोयना धरणाच्या निर्मितीसाठी यशवंतरावांचे नियोजन महत्त्वाचे होते. कोयना आणि उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती त्यांनी दिली. त्यातून मूलभूत सोयी-सुविधांचा विकास साधण्यावर भर दिला. सहकाराला चालनायशवंतरावांनी आपल्या काळात एकूण १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले. हे साखर कारखाने म्हणजे विकासाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. कारण, एका सहकारी साखर कारखान्याच्या जोरावर औद्योगिक वसाहत निर्माण करण्याची फार मोठी ताकद निर्माण झाली होती. फार मोठी आर्थिक गणिते तिथे होती. साखर कारखान्यामुळे सहकारी बँका, सहकारी कुकुटपालन केंद्रे, बझार यातून शेतीचे मार्केटिंग आणि रोजगाराची निर्मिती झाली होती. आज ते संपुष्टात आणले जात आहेत याचे वाईट वाटते. शैक्षणिक धोरण मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) आणि कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना हे फार मोठे काम यशवंतरावांच्या काळातील आहे. त्याशिवाय कृषी विकासासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग त्यांचा होता. केवळ इथेच न थांबता त्यांनी मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना केली. आज मराठी भाषेला अभिजातचा दर्जा देण्यासाठी झगडावे लागते आहे. पण, त्याची पार्श्वभूमी कित्येक वर्षांपूर्वी यशवंतरावांनी केली होती. कारण, त्यांना साहित्याबद्दल, मराठी भाषेबद्दल प्रेम होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो. यासाठीच राजकारणात पडले नाही तर एका संभाव्य ज्ञानपीठ पुरस्काराला महाराष्टÑ मुकला असे म्हणावेसे वाटते.प्रादेशिक समतोल आणि विकास साधून विकासाचे राजकारण करणारे, विकासासाठी बेरजेचे राजकारण करणारे यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत नेते होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा