कर्नाटक विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून काँग्रेस आणि भाजपने तिथे शिमग्यापूर्वीच राजकीय धुळवडीला सुरुवात केलेली आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा कर्नाटकचे दौरे करत आहेत. पंतप्रधान मोदीही परदेशवारीतून वेळ काढून शक्यतितके कर्नाटकावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये उभय पक्षांच्या नेत्यांना विविध संघटनांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. कुठे काळे झेंडे दाखवणे, तर कुठे एकमेकांची उणी-दुणी काढत हा राजकीय शिमगा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच सुरू झालेला दिसतो आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ येत्या २८ मे २०१८ ला संपत आहे. एप्रिल-मेमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळेच या राजकीय हालचालींना वेग आला आहे. अर्थातच या निवडणुकीत प्रमुख लढत ही काँग्रेसविरुद्ध भाजप अशीच होणार आहे. गुजरातमध्ये मिळालेल्या यशाने आणि वाढलेल्या संख्याबळाने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. त्यातच काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी विराजमान झाल्यानंतर आता कर्नाटकचा गड राखण्यात ते यशस्वी होणार का, हाच प्रश्न आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी देवदर्शनापासून ते विविध उपायांसाठी ते कर्नाटकात ठाण मांडून आहेत. अर्थात गुजरातमध्येही निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच ते ठाण मांडून होते. त्याचा काँग्रेसला चांगला लाभ झाला. गुजरातमध्ये काँग्रेसचे संख्याबळ तर वाढलेच; परंतु पराभवाच्या मानसिकतेतून कार्यकर्त्यांना बाहेर काढतानाच भाजपला आता कोणतीही निवडणूक सहज जिंकणे कठीण असल्याचा इशारा गुजरातच्या निकालाने दिला. त्यामुळेच आता शिमग्याच्या महिन्यातच मैदानात उतरून राजकीय धुळवड सुरू झालेली आहे. यामुळे येत्या काही काळात काँग्रेस आणि भाजपमध्ये ‘बोरीचा बार’ उडणार यात शंकाच नाही. कर्नाटक विधानसभेतील एकूण २२४ जागांपैकी गुजरातप्रमाणेच १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी या निवडणुकीसाठी ठेवले आहे. ते अशक्य असले तरी भाजप सर्व मार्गाचा वापर करून दक्षिणेतील स्वारी यशस्वी करण्याचा कसोशीने प्रयत्न करणार. त्यामुळे सत्ता स्थापनेचा जादूई आकडा पार करण्यासाठी निवडून येण्याची क्षमता असणा-या अन्य पक्षांच्या उमेदवारांना आयात करण्याचे धोरण भाजप इतर राज्यांप्रमाणे इथेही राबविणार हे स्पष्ट आहे. कर्नाटकातील राजकीय धुळवडीत अनेक झेंडय़ांचे रंग बदलल्याचे प्रकारही बघायला मिळतील. भाजपने मुख्यमंत्री पदासाठी बी. एस. येडियुरप्पांचा चेहरा समोर आणला आहे. येडियुरप्पा हे राज्यातील प्रभावशाली लिंगायत समाजाचे असून त्यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. तरीही त्यांचा राज्यात प्रभाव असल्याने निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याशिवाय पर्याय नाही, हे सध्या तरी भाजपने ठरवलेले दिसत आहे. येडियुरप्पांच्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडण्याची संधी यानिमित्ताने काँग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून चांगलीच चिखलफेक होणार हे निश्चित आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप नेहमीच काटेकोर नियोजन करते. २०१४ नंतरचा इतिहास विचारात घेऊन काँग्रेसही सावध पावले टाकताना दिसत आहे. ही पावले उचलताना भाजपचा भ्रष्ट चेहरा समोर आणणे हे काँग्रेसच्या अस्त्रांपैकी प्रमुख अस्त्र असणार आहे. त्याला जोडून पीएनबी घोटाळा, नोटाबंदी, जीएसटी हे मुद्दे कोशिंबिरीप्रमाणे वापरले जातील. त्यासाठीच काँग्रेसने जवळपास आठ लाख कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे. ही फौज बूथ पातळीवर जाऊन काम करेल, असे त्यांचे नियोजन आहे. २०१४ च्या निवडणुकीत माध्यमांपेक्षा सोशल मीडियाचा भाजपने केलेला प्रभावी वापर पाहता तोच गुरुमंत्र काँग्रेसने घेऊन सोशल मीडियावरील कार्यरत तरुणांना या ८ लाखी फौजेत समाविष्ट केलेले आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस गेले सहा महिने काम करत आहे. आतापर्यंत ९९ टक्के बूथ पातळीवर गटाची स्थापना केली आहे, असा काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे ही फौज भाजपच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून राहुल गांधींच्या सभांपूर्वी वातावरण तयार करणे आणि थिंक टँकच्या माध्यमातून त्यांना पूरक माहिती पुरविण्याचे काम करणार हे निश्चित आहे. कर्नाटकमध्ये भाजपसाठी गुजरातसारखी सुपीक जमीन नाही. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला म्हटले जायचे. तसेच, २०१४ नंतर काँग्रेसला इथे विजय मिळविता आलेला नाही. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसला दुय्यम स्थानावर समाधान मानावे लागले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र झपाटय़ाने बदलले आहे. सध्या कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे भाजपला नेहमीसारखा फाजील आत्मविश्वास ठेवून चालणार नाही. कारण, इथे काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेत नाही. इथे सत्ता राखण्याचे राहुल गांधींपुढे, तर सत्ता पुन्हा काबीज करण्याचे नरेंद्र मोदींपुढे आव्हान असणार आहे. ज्या चार राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, त्यात कर्नाटक हे एक महत्त्वाचे राज्य आहे. मोदी-शहा यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिलेला असल्याने काँग्रेसच्या ताब्यातील उरलेली चारही राज्ये हिसकावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यामुळेच कर्नाटकची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार यात कोणताही वाद नाही. कर्नाटकात शिमगा तर आता सुरू झालाच आहे. सत्तारूढ काँग्रेसविरोधातील नाराजी, गुजरातमध्ये सत्ता राखण्यात मिळालेले यश, काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष, प्रदेश युवक काँग्रेसचा मुख्य असलेल्या मुस्लिम आमदाराच्या मुलाने जखमी असलेल्या विश्वनाथ या तरुणाला विनाकारण केलेल्या बेदम मारहाणीचा राजकीय फायदा भाजप उठवण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभेत भाजपच्या सध्या ४४ जागा आहेत. बहुमतासाठी या जागा जवळपास तिप्पट करणे हे भाजपपुढे कठीण आव्हान असेल. काँग्रेस व्यतिरिक्त भाजपला जनता दल सेक्युलरशी देखील मुकाबला करावा लागणार आहे. गुजरात निवडणुकीपासून राहुल गांधींनी स्वीकारलेल्या सॉफ्ट हिंदुत्व आणि विविध मंदिरांमधून केलेले देवदर्शन यामुळे कर्नाटकात काँग्रेस कोणाशी आघाडी असे चित्र दिसत नाही. जनता दल व मायावतींच्या बसपची आघाडी झाल्याने दलित व मुस्लिम मते फुटून काँग्रेसचे नुकसान होईल, असे दिसते. त्याचा भाजपला लाभ होऊ शकतो, पण निवडणुकीनंतर जनता दल आणि बसप यांची आघाडी कोणाकडे झुकणार यावर सत्तेचे समीकरण अवलंबून असणार आहे. आजवरच्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार काँग्रेस आणि भाजप यापैकी कोणालाही पूर्ण बहुमत मिळेल याची शक्यता दिसत नाही. जनता दलाची भूमिका निर्णायक ठरू शकते. कर्नाटक विधानसभेत सत्ता राखण्यासाठी काँग्रेस, तर दक्षिणेचा गड काबीज करण्यासाठी भाजप नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तर भाजपकडून पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा दिवसांपासून एकमेकांच्या नावाने शिमगा करण्यास सुरुवात केली आहे. आरोप-प्रत्यारोपांची धुळवड?कोणत्या थराला जाते तेही लवकरच दिसून येईल.
बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८
कर्नाटकात राजकीय शिमगा
मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८
बेडूक फुगून फुगून किती फुगणार?
शिवसेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने आता पावले टाकण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे.गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा सेना लढवणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी नुकतीच दिली आहे. आता ही शिवसेनेची भूमिका की संजय राऊत यांची भूमिका हे स्पष्ट झालेले नाही. नेते स्पष्ट मताचे नसले की बाकीचे बोलतात त्यातला हा प्रकार आहे. आता गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली. हा प्रकार म्हणजे बेडकी फुगवून आपण मोठे पहिलवान आहोत हे दाखवण्याचा आव आणण्याचा प्रकार आहे. शेवटी बेडकी कितीही फुगली तरी ती काही बैलाएवढी होत नाही, तर त्या प्रयत्नात फुटून जाते. तसाच हा प्रकार आहे.शिवसेनेकडून होणारी वक्तव्ये ही अतिशय बालिश आणि उथळ होताना दिसत आहेत. संजय राऊत म्हणतात, आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. पण महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला कोणी ओळखते का? अजून संपूर्ण महाराष्ट्र काबीज करता आला नाही, मुंबई-कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्रात घुसता आले नाही. पश्चिम महाराष्ट्रात साता-यातील कार्यालयाचे भाडे भरले नाही म्हणून कार्यालय बंद करण्याची वेळ आलेल्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या सीमा कशा काय ओलांडता येतील? स्वबळावर लढताना लोकसभेसाठी राज्यात ४८ उमेदवार शिवसेनेला मिळू शकतात का? विधानसभेला २८८ उमेदवार उभे करता येऊ शकतात का, याचा अगोदर शिवसेनेने विचार केला पाहिजे. २०१४ च्या निवडणुकीत लोकसभेला भाजप-शिवसेना यांची युती होती. तेव्हा जागावाटपात पश्चिम महाराष्ट्रात सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेच्या वाटय़ाला गेली होती. त्यावेळी शिवसेनेकडे उमेदवार नसल्यामुळे ती जागा रिपब्लिकन पार्टीला देण्याची वेळ आघाडीत आली. अशा परिस्थितीत अन्य राज्यांत उमेदवार देण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे बेडकीने बैल होण्याचा अट्टाहास करून स्वत:चे शरीर फुगवण्याचा प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाने नियोजन करून देश पादाक्रांत केला आहे. काँग्रेस या मातीत अशीच पसरत गेली. तसे कोणतेच नियोजन शिवसेनेकडे नसताना केवळ विरोधासाठी विरोध करण्याच्या भूमिकेवर जगणा-या सेनेवर कोण विश्वास ठेवणार?गेल्या वर्षी २०१७च्या फेब्रुवारीत झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. त्या सगळय़ांच्या मतांची बेरिज करूनही एका उमेदवाराचे डिपॉझिट वाचू शकणार नाही, अशी परिस्थिती तेव्हा सेनेवर ओढवली होती. असे असताना गोव्यात लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघणे ही हास्यास्पद बाब आहे. लोकशाही आहे म्हणून कोणीही मैदानात उतरतो. पण अस्सल कोल्हापुरी पहिलवानापुढे सुदाम पहिलवानाने षड्ड ठोकून उभे राहणे म्हणजे, त्याला विनोदच म्हणावा लागेल. तोच प्रकार आज शिवसेना करताना दिसते आहे. शिवसेना म्हणते आहे की, हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून आतापर्यंत इतर राज्यात निवडणुका लढवल्या नाहीत, पण यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. हा तर फार मोठा विनोद आहे. हिंदू मतांचे विभाजन? निवडणुका म्हणजे काय धार्मिक स्पर्धा आहेत, असे शिवसेना समजते काय? भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण सगळे हिंदू काही भाजपच्या दावणीला बांधले गेलेले नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी असे ढीगभर पक्ष रिंगणात असतात. त्यातही हिंदू मतदार, उमेदवार असतात की. काँग्रेस हा पक्ष काही मुस्लिम लिग नाही. काँग्रेसला पडणारी मते फक्त बिगर हिंदूंची आहेत, असा विचार शिवसेना कशी काय करू शकते? हिंदू मतांच्या विभाजनाचा प्रश्न कसा काय शिवसेनेला पडला? धर्माच्या लोकसंख्येवर उमेदवार निवडून दिले गेले असते तर राजकीय पक्षांची नावे ही धर्माच्या नावानेच पडली असती. भारत हे निधर्मी राष्ट्र आहे, असा उल्लेख सातत्याने केला जातो. तो लोकशाहीबाबत केला जातो. शिवसेनेला मतांच्या विभाजनाचा प्रश्न नेहमीच पडत आलेला आहे. राज ठाकरे यांनी मनसे हा पक्ष काढला तेव्हाही शिवसेनेला मराठी मतांच्या विभाजनाची चिंता लागली होती. हिंदू मते किंवा मराठी मते असा विचार शिवसेना करते इथेच त्यांच्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडते. म्हणजे महाराष्ट्रात मराठी मते फक्त शिवसेना किंवा मनसेला मिळतात आणि अन्य पक्षांना काय बिगर मराठी मते मिळतात, असे शिवसेनेला वाटते काय? काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, रिपाइं, शेकाप अशा अनेक पक्षांचे उमेदवार महाराष्ट्रात निवडून येतात, त्यांना पडणारी मते ही मराठी मते नसतात का? पण२००९ला मनसेचे १४ आमदार निवडून आले आणि सेनेला त्यांनी रोखले होते. त्यावेळी आपल्या या अपयशाचे खापर फोडताना मनसेमुळे मराठी मतात विभाजन झाले असे बोलून शिवसेना मोकळी झाली होती. त्यामुळे हिंदू मते, मराठी मते यांची काळजी करत आपण आजवर एकत्रित निवडणुका लढवल्या, अशी चिंता करणे शिवसेनेने सोडले पाहिजे. हिंदू मतांच्या विभाजनापेक्षा स्वबळावर निवडणुका लढवल्या तर शिवसेनेला कोण निवडून देणार हाच प्रश्न असेल. कारण कसलेही स्पष्ट मत नाही, कसलेही धोरण नाही, कसलाही विचार नाही, अशा अवस्थेत सेना भरकटते आहे. धड सत्ताधारी नाही, धड विरोधक नाही, अशी ना घर का, ना घाट का अशा अवस्थेत हा पक्ष चाचपडत असताना राज्याबाहेर ताकद लावण्याचा प्रकार म्हणचे गल्लीतल्या क्रिकेटमध्ये त्रिफळाचीत झालेल्या आणि तिन्ही दांडय़ा उडालेल्या असताना आयपीएलमध्ये किंवा विश्वचषक सामन्यात खेळण्याचे स्वप्न बघण्याचा प्रकार आहे. पण अशाप्रकारे बेडकी फुगून फुगून किती फुगणार आहे?
सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८
prafulla phadke mhantat: महंताचे आचरण कसे असावे
prafulla phadke mhantat: महंताचे आचरण कसे असावे: समर्थ रामदास हे रामभक्त होते. हनुमंताचा अवतार होते. हनुमान हा रामसेवक, रामभक्त, रामदास होता. तितकाच तो एक कुशल मंत्री होता. प्रचंड बुद्धि...
महंताचे आचरण कसे असावे
समर्थ रामदास हे रामभक्त होते. हनुमंताचा अवतार होते. हनुमान हा रामसेवक, रामभक्त, रामदास होता. तितकाच तो एक कुशल मंत्री होता. प्रचंड बुद्धिमान होता. तो किश्किंधा नरेश सुग्रिवाचा उत्तम मंत्री होता. संकटकाळी आणि कठीण समयी नेमके कसे वागावे याचे चातुर्य हनुमंतामध्ये होते. शक्ती, युक्ती, भक्ती याचे उत्तम उदाहरण म्हणजे हनुमान. म्हणूनच रामदासांनी हनुमंताकडे एक उत्तम व्यवस्थापक म्हणून पाहिले आहे. हनुमंताकडे पाहूनच त्यांना उत्तम महंताची लक्षणे सुचली असावीत असे वाटते. अशा बुद्धिमान हनुमंताचा आदर्श ठेवून सर्वत्र चोख व्यवस्था ठेवली तर रामराज्य येऊ शकते हे जाणणार्या समर्थांनी अकरा मारुंतीची स्थापना तत्कालीन काळात केली. याचे कारण हनुमंतामधील महंत लक्षणे समर्थांना दिसली होती. तीच लक्षणे या 11 व्या दशकातील 6 व्या समासात समर्थांनी वर्णन केलेली आहेत. एका उत्तम महंताने आपले जे काही लिखाण असते ते स्वच्छ नीटनेटके आणि स्पष्ट लिहावे. त्याने इतरांकडून काम करवून घेताना त्याच्या सूचना योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी त्या अत्यंत स्पष्ट आणि सोप्या प्रकारे द्याव्यात. त्यात कसलीही गुंतागुंत असता कामा नये. त्याचे लेखन, वाचन हे अत्यंत शुद्ध असावे. एक उत्तम महंत आपल्या सहकार्यांकडून झालेल्या चुका सुधारवून घेण्याचे काम करतो. त्या चुका त्यांच्या लक्षात आणून देतो. महंत म्हणजे एक व्यवस्थापक. ज्याच्यामागे फार मोठी जनशक्ती असते. अशा महंताने वागताना नेमके कसे असले पाहिजे याचा उहापोह समर्थ अकराव्या दशकातील सहाव्या समासात करतात. महंतामध्येे असणारे सभा चातुर्य फार मोठे असते. आपले मत प्रदर्शित करताना, ते व्यवस्थितपणे तो सांगतो. त्यासाठी योग्य ते दाखले तो देतो. त्याचे चांगले वाचन असते. त्या वाचनाचा वापर असा महंत योग्य प्रकारे कथा सांगण्यास करतो. उत्तम महंत हा अगोदर चांगला अभ्यास करतो. चांगले पाठांतर करतो. केवळ शाद्बिक अर्थात अडकत नाही तर त्यातील गर्भीत अर्थ समजून घेतो. आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून तो अडलेल्या लोकांना शिकवतो. उत्तम महंताचे अक्षर सुंदर असते, त्याचे वाचणे म्हणजे उच्चारही सुंदर असतात. त्याचे संपूर्ण वागणेच अतिशय सुंदर असे असते. उत्तम महंत हा कोणतीही गोष्ट प्रयत्नसाध्य असते यावर विश्वास ठेवतो. कोणत्याही प्रसंगाला तो सहजपणे आणि धाडसाने सामोरा जातो. रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा अशी अवस्था महंताची असते. कारण कोणत्याही गोष्टीकडे अलिप्तपणे पाहण्याची त्याची बुद्धि असते. म्हणजे भगवत गीतेत ज्या स्थितप्रज्ञतेबद्दल सांगितले आहे अशी स्थितप्रज्ञता एका उत्तम महंताकडे असते. आपल्या सहकार्यांना ज्ञान देण्याची, शिकवण्याची आणि सर्वांना आपल्या कामात तरबेज करण्याची हातोटी ही उत्तम महंताकडे असतात. समर्थांनी दासबोधातील अकराव्या दशकातील सहाव्या समासात जी महंताची लक्षणे सांगितली आहेत ती व्यवस्थापकास लागू पडतात. कारण महंताला आपल्या मठाची, मठातील सर्वांची उत्तम व्यवस्था पहायची असते. जो विचार सर्वत्र पोहोचवण्याचे कार्य महंताला करायचे असते त्या कार्यासाठी लागणारी चोख व्यवस्था महंताला करायची असते. महंत म्हणजे प्रधान. महंत म्हणजे सेनापती. महंत म्हणजे व्यवस्थापक. पण आजच्या व्यवसाय व्यवस्थापन किंवा कोणत्याही एमबीएच्या अभ्यासक्रमात शिकण्यासारखे विचार या एका व्यवस्थापकाची म्हणजे महंताची जबाबदारी आहे की तो त्या संस्थेचा विश्वस्त आहे. व्यवस्थापक हा संस्थेचा रक्षक आहे. व्यवस्थापक हा त्या संस्थेचा सेवक आहे. ज्या संस्थेचे व्यवस्थापन करायचे आहे ती संस्था टिकवणे, मोठी करणे हे व्यवस्थापकाचे परमकर्तव्य आहे. त्यासाठी एखाद्या तटाप्रमाणे, पर्वताप्रमाणे त्याने खंबीर असले पाहिजे. एक उत्तम व्यसस्थापक सागरासारखा असला पाहिजे. तो सागरासारखा शांत असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत त्याचा तोल जाता कामा नये. त्याने मर्यादेचा भंग करता कामा नये. कितीही वादळं आली तरी सागर आपली मर्यादा कधी ओलांडत नाही. उथळ पाणी असलेली नदी पावसाने रूंद होती, उन्हाने रोडावते. नदी आटते नदीला पूर येतो. पण सागर मात्र कोणत्याही परिस्थितीत स्थिर असतो. तो अथांग असतो. त्याचा थांगपत्ता कोणाला लागत नाही. तोच गुण एका महंतामध्ये असावा. तोच गुण एका उत्तम व्यवस्थापकाकडे असला पाहिजे. ही सर्व लक्षणे आपल्याला रामभक्त हनुमंतामध्ये आढळतात. एका उत्तम व्यवस्थापकाने कधीही कोणावरही अन्याय होणार नाही याचा विचार केला पाहिजे. त्याने अत्यंत न्याय बुद्धिने वागावे असे समर्थ या समासात सांगतात. असा महंत असा उत्तम व्यवस्थापक हा सर्वांना बरोबर घेऊन जातो. कारण अशा महंतामध्ये, अशा उत्तम व्यवस्थापकाकडे अनेक गोष्टींचे ज्ञान असते. हे ज्ञान अत्यंत सूक्ष्म असे असते. या ज्ञानाचा वापर तो इतरांसाठी करतो. महंत लक्षण समासातून समर्थ रामदास स्वामींनी हेच सर्व गुण एका उत्तम व्यवस्थापकाच्या अंगी असावेत हे सुचीत केल आहे. ॥ जय जय रघुवीर समर्थ॥
prafulla phadke mhantat: चला जरा मराठी बनुया!
prafulla phadke mhantat: चला जरा मराठी बनुया!: मराठी भाषा जागतीक पातळीवर पोहोचली असताना आणि त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे चालले असताना आपल्यावर मराठी भाषा दिन साजरा करायची ...
prafulla phadke mhantat: मराठीची अवहेलना आधी थांबवा
prafulla phadke mhantat: मराठीची अवहेलना आधी थांबवा: आज जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जात आहे, पण या मराठी भाषा दिनाचे औचित्य आमच्या सरकार दरबारी मात्र फक्त औपचारिकच दिसते. केवळ चटावरचे श्...
मराठीची अवहेलना आधी थांबवा
आज जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जात आहे, पण या मराठी भाषा दिनाचे औचित्य आमच्या सरकार दरबारी मात्र फक्त औपचारिकच दिसते.केवळ चटावरचे श्राद्ध केल्याप्रमाणे हा दिवस उरकून टाकायचा नाही तर या भाषेचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात राजभाषा असलेल्या मायमराठीची अवहेलना आणि उपेक्षा अद्याप थांबलेली नाही. इंग्रजीशिवाय आधुनिक जगात तरणोपाय नाही, अशा समजुतीचे भूत बोकांडी बसलेल्या मराठी जनतेलाही मायमराठीच्या अनास्थेबद्दल गंभीर विचार करावा, असे वाटत नाही. मराठी भाषा दिवस हा काही फक्त कोणाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नंतर तो पुढच्या कार्यक्रमापर्यंत सुकवत ठेवण्याचा आणि दीपप्रज्वलन करून भाषणे संपण्यापूर्वीच समई शांत करण्याचा कार्यक्रम नाही. हा दिवस मराठी भाषेच्या सन्मानाचा आहे. त्याची दखल सरकारने घेतलीच पाहिजे. त्यानिमित्ताने सरकारने काही संकल्प करून या भाषेला असलेले वैभव सर्वासमोर आणण्याची गरज आहे. हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत, याचे भान असले पाहिजे. त्यामुळे ती महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक अशाप्रकारे असली पाहिजे. त्यामुळे यानिमित्ताने आठ-पंधरा दिवस शासकीय कार्यालयातील भाषाही मराठीच असली पाहिजे, याची दखल घेतली पाहिजे. सप्ताह, पंधरवडा यासाठी की त्यामुळे सवय लागेल, गोडी लागेल आणि नंतर अंगवळणी पडेल म्हणून. फक्त एक दिवसासाठी हे महात्म्य असता कामा नये. लहान बाळाला ज्याप्रमाणे दात येईपर्यंत आहार वाढवताना दुधाशिवाय खिमटी किंवा धान्याचा रवा काढून त्याची खीर देऊन ती बोंडल्याने पाजली जाते तशी आमच्या महाराष्ट्रात राहणा-या अन्य भाषिक बांधवांना या दिवशी, या निमित्ताने साजरा केला तर आठवडा, पंधरवडय़ात मराठी भाषेचे बोंडले तोंडात ओतावे लागेल. कारण त्यांच्या राज्यात जाऊन आपण त्यांची भाषा बोलायची आणि आपल्या राज्यात आल्यावरही आपण त्यांचीच भाषा बोलायची हा प्रकार जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मराठी भाषेचा सन्मान ख-या अर्थाने झाला आहे, असे म्हणता येणार नाही. आज आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे काम बरेच दिवस रखडले आहे. हे काम का वाटावे? ते आमचे कर्तव्य आहे असे सरकारमधील घटकांना का वाटत नाही? तसा दर्जा प्राप्त करायचा असेल तर ही होणारी अवहेलना थांबवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढाकार सरकारने घेतलाच पाहिजे. सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. यामध्ये राज्यपालांचे जे अभिभाषण होते त्याचा मराठी अनुवाद झालाच नाही. अन्य भाषेतील म्हणजे गुजराती भाषेतील अनुवाद आला, पण मराठी भाषेचा आला नाही. हा विनोद म्हणायचा की महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा अपमान म्हणायचा? भाषावार प्रांतरचनेनंतर निर्माण झालेल्या महाराष्ट्राला हे असे बहुभाषिक बनवून मराठीवर अत्याचार, अन्याय करण्याचे काम का केले जात आहे? गुजराथी भाषेतील भाषण महाराष्ट्रात अधिवेशनात येते पण मराठीतील येत नाही, हे मराठी तोडण्याचे काम का केले जात आहे? याबाबत सरकारला दोष दिला जाणार हे निश्चित. याचे कारण सरकारचे प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण असणे, वचक असणे महत्त्वाचे असते. सरकार येते-जाते, पण अधिकारी, कर्मचारी कायम असतात. ते जुनेच काम करत असतात. या कारभारात बदल करण्याची आणि प्रशासनाला कामाला लावण्याची हिंमत ज्याच्यात असते तो खरं सरकार चालवण्यास खंबीर असतो. फडणवीस यांचे सरकार निर्णय चांगले घेते, भाषणे चांगली करतात फक्त ते जर प्रत्यक्षात येत नसेल तर त्या घोषणाबाजीला हवेतच विरून जावे लागते. हे होते कारण सरकारी निर्णयांची अंमलबजावणी करणारे प्रशासन नाही. शासन आणि प्रशासनाचा मेळ नाही. त्याचा परिणाम आमच्या महाराष्ट्राला भोगावा लागतो आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयांची तंतोतंत अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासन, अधिकारी, कर्मचारी यांच्यात योग्य तो संवाद असला पाहिजे, त्यांच्यावर वचक असला पाहिजे, त्यांच्यात सरकारबद्दल आदर असला पाहिजे. कामे पेंडिंग ठेवण्याच्या मानसिकतेतून प्रशासनाला बाहेर काढण्याची धमक सरकारमध्ये असली पाहिजे. त्यामुळेच मराठी अनुवाद सदस्यांना ऐकता आला नाही. यावर अंकुश कोणाचा असला पाहिजे? महाराष्ट्राच्या विधानसभेतच मराठी भाषेला असे दुय्यम लेखले जात असेल आणि गुजराथी तसेच अन्य भाषांचे लाड केले जात असतील तर हा मराठीचा अपमान नाही का? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यामुळे खिळच बसणार आहे. हे तातडीने थांबवण्याची जबाबदारी सरकारची आहे. आज ज्या कारणांमुळे राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद विधिमंडळ सदस्यांना मिळू शकला नाही, त्याला जबाबदार असलेल्या प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी माफीनामा सादर केला असला तरी, प्रशासनाच्या ढिलेपणाचे, गबाळेपणाचे आणि निष्क्रियतेचे पाप हे सरकार जर सातत्याने आपल्या माथ्यावर घेत असेल तर ती फार मोठी चूक सरकारची असेल. याचे कारण प्रशासन नाही तर सरकार बदलण्याची ताकद जनतेत असते. त्यामुळे मराठी भाषेचा वारंवार होणारा अवमान थांबण्याच्या दृष्टीने प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे धाडस आता सरकारने केले पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आमच्याकडून आतून, हृदयापासून प्रयत्न झाले पाहिजेत. आम्हालाच त्याचे महत्त्व नसेल समजत तर तो दर्जा मिळणार कसा? मराठी अस्मिता हा काही फक्त भाषणांचा आणि घोषणांचा विषय नाही. मराठी अस्मिता जगण्यातून, वागण्यातून आणि रक्तातून दिसली पाहिजे. आज आमची सरकारी मराठी भाषा मराठी माणसांनाच कळत नाही इतकी दिव्य असते. भाषा ही संवादाचे माध्यम असताना ती भाषाच नागरिकांना समजत नसेल तर उपयोग काय? शासकीय परिपत्रकातील भाषा ही अनाकलनीय असते. शब्दश: भाषांतर करून न समजणारी असते. ती समजेल अशी करणे याबाबतही सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सरकारपासूनच मराठीतून बोला हे सांगायची वेळ येत असेल तर तोही फार मोठा विनोद म्हणावा लागेल. मराठी भाषेची वारंवार होणारी अवहेलना थांबवण्यासाठी सरकारने प्रशासनाकडून काम करून घेतले पाहिजे. त्या इच्छाशक्तीशिवाय आम्ही अभिजात भाषेचे स्वप्न कसे पूर्ण करणार आहोत?
चला जरा मराठी बनुया!
मराठी भाषा जागतीक पातळीवर पोहोचली असताना आणि त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे चालले असताना आपल्यावर मराठी भाषा दिन साजरा करायची फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे हा दिवस आपण प्रत्येकाने केवळ मराठी बोलून नाही तर जगून साजरा केला पाहिजे. मराठी ही भाषा जगण्याची भाषा आहे, हे जगाला दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून तरुणाईला सांगावेसे वाटते की चल जरा मराठी बनुया. आज केवळ बोलायचे आणि वाचायचेच मराठी नाही तर आज व्यक्तही मराठीतच व्हायला हवे. तर मराठी जगण्याचा आनंद आम्हाला मिळेल.संगणकीय युगात संकेतस्थळ आणि इमेल हा अत्यावश्यक झालेला आहे. पण त्या मायक्रोसॉफ्टलाही या मराठीचे महत्व पटल्याने आता इमेल आयडीही मराठी भाषेतून बनवण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी या संगणकीय भाषेतील सगळया नामांना शब्दांना मराठी शब्दकोषात उतरवण्याचे आव्हान स्विकारले पाहिजे. याचे कारण कोणत्याही भाषेला अस्सल प्रतिशब्द हा फक्त मराठीतच मिळू शकतो. अगदी लग्नानंतरच्या प्रणयदिनांना इंग्रजी संस्कृतीत हनीमून म्हणतात तर त्याला तितकाच चपखल शब्द आमच्या मराठीत मधुचंद्र असा आहे. म्हणूनच आज व्यक्त व्हायचेच तर चक्क मराठीत होवूया, चला जरा मराठी बनुया!तसे ते फारसे अवघड नाहीच. आपण दिवसातून कितीतरीवेळा सॉरी म्हणतो, एक दिवस माफ करा म्हणून बघा सॉरी म्हणताना तोंडातून हवा जाते आणि अंतर पडते पण माफी मागताना ओठ एकमेकांना भिडतात आणि जवळीक लवकर साधली जाईल, ही आहे मराठीची कमाल. म्हणून आज आपण मराठीतच व्यक्त होवूया, चला जरा मराठी बनुया!आज फोन कोणाचेच रिसीव्ह करू नका आज फक्त भ्रमणध्वनी किंवा दुरध्वनीवर संभाषण करा, हॅलोला रामराम करा आणि नमस्काराने सुरुवात करा बघा किती नम्रपणे कामे होतील आपली कारण आज दिवस आहे मराठी भाषा दिन. हा दिवस एक दिवस साजरा करण्याचा नाही, तर एक मराठी बनण्याचा संकल्प करण्याचा आहे, म्हणून चला मराठीतून व्यक्त होवूया, जरा मराठी बनून पाहुया!आपले काम करून घेण्यासाठी प्लीज नका म्हणू प्लीज. कारण आहेना आज मराठी भाषा दिन, मग करूना जरा आपण कृपा मराठी बोलण्याची, मराठी वागण्याची, मराठी बनण्याची. प्लीजला कृपा करून बाजूला सारू आणि कृपया अश्आी विनंती करू म्हणजे पहा कशी आपल्यावर काम करणाराची छान कृपा होते ते. म्हणून म्हणतो, चला जरा मराठीतून व्यक्त होवूया, थोडे मराठी बनुयात!काही नवल समोर आले तर व्यक्त होण्यासाठी ओह माय गॉड नको...आज आपण नवल व्यक्त करण्यासाठी आपल्या मराठी भाषेचे शब्द वापरून पाहू. हे देवा, असे शब्द नाहीत का मराठीत? आज व्यक्त होताना मुलींनीही पुन्हा मराठमोळया इश्श्य, अगोबाई, अय्याचा वापर करून पहा म्हणजे चेहºयावर कसे नकळत नैसर्गिक सौदर्य खुलेल आणि समोरच्याला भुरळ पाडेल. कारण शब्दांची ताकद आणि भावनांचा भडिमार करायला आमची मराठी समृद्ध आहे हे कळुद्याना जगाला, म्हणून म्हणतो चला जरा बनुया मराठी.आज तुम्हाला भांडायचे आहे का कोणाशी? खुश्शाल भांडा पण त्यासाठी इंग्रजी भाषेतील शिव्यांचा वापर बिल्कूल करू नका. कारण मराठी इतक्याय इरसाला आणि अचूक शिव्या तुम्हाला इंग्रजीत देता येणार नाहीत. मराठी शिव्यांची सर अन्य कोणत्याही भाषेतल्या शिव्यांमध्ये नाही. म्हणून आज व्यक्त होताना व्हा मराठीतच, कारण मराठीसारखी ताकदवान भाषा दुसरी नाही. मराठी भाषेसाठी आम्ही मराठी जगायला शिकले पाहिजे, तरच हा दिवस खºया अर्थाने साजरा होईल.मराठी भाषा दिवस हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो. मराठीतील श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. आपल्याय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,ही समस्त मराठीजनाची मागणी आहे. ‘इये मºहाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी’,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवांनी मराठीचा उल्लेख केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठीचे वर्णन करताना अनेक उपमा आणि अलंकार वापरून तिचे कौतुक केले आहे. त्यांनी या भाषेला ब्रम्हविध्या म्हंटले आहे तर कधी शब्दब्रह्मही म्हंटले आहे. जिथे सर्व काही येते ते ब्रम्ह. ज्यातून सर्व काही निर्माण होते ते ब्रह्म. अशा शब्दब्रम्हात संपन्न असलेली ही भाषा असल्यामुळे ज्ञानेश्वरांच्या या उपमांची यथार्थता आज आपल्याला मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने आणि मनोमन पटते. याच ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठीचा बोल कौतुके म्हणताना तीची थोरवी, अमृतातेही पैजासी जिंकणारी असे म्हटले आहे. हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. पण कुसुमाग्रजांचे वर्णन नाशिकचे म्हणून नाही तर संपूर्ण महाराष्टÑाचे, भारताचे आणि जिथपर्यंत मराठी आहे तिथपर्यंत अथांग असे आहे. म्हणूनच आकाशात असलेल्या एका ताºयाचे नावही कुसुमाग्रज आहे. त्या ताºयाप्रमाणे या विशाल प्रतिभेच्या व्यक्तिचे कार्य देदिप्यमान आहे, अढळ आहे. यासाठीच त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।एवढ्या जगात माय मानतो मराठी। असे कविवर्य गझलकार सुरेश भटांनी म्हणून या मराठीची थोरवी वर्णन केली आहे. आपल्या या मराठीची थोरवी अनेकांनी गाताना मुक्तहस्ते शब्दांचे केलेले लालित्य मनाला मोहवून टाकणारे असेच आहे.मराठी असे आमुची मायबोली... म्हणजे मराठी भाषा ही आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्दही बोलू शकते तशीच ही मायमराठी आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळे काम करतात ,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी ही माझी मायबोली माझी मराठी, कारण या मराठी भाषेच्या शब्दांना सत्याची धार आहे.मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व , ज्ञानपिठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले, जिने आपल्याला लहानाचं मोठं केले, या बहुआयामी जगात स्वत: ला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली, आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली आज तिच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठीचा हा पवित्र दिवस आहे.या निमित्ताने आज आपण मराठी भाषा दिनाच्या विविध कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे. मराठीचा पुरस्कार केला पाहिजे. मराठी भाषेतच बोलण्याचा प्रयत्न आपल्या अन्य भाषिक बांधवाना करायला भाग पाडले पाहिजे. त्यात कसलाही संकोच वाटायचे कारण नाही. ज्यांना यानिमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नसेल त्यांनी आपला मित्र परिवार, कुटुंबिय यांच्यासमवेत मराठीचा जागर केला पाहिजे. अगदी घरातील सदस्य कुणी कथाकथन, कविता वाचन, परिच्छेद वाचन, नाट्य सादरीकरण, मराठी गाणी अशा माध्यमातून हे करता येऊ शकते. आपणच आपल्या मुलाबाळाना हा मराठीचा समृद्ध वारसा दाखवायला हवा. आणि या निमित्ताने मराठी वापराचा व अभ्यासाचा वसा आपण घेऊन मराठीला समृद्ध केले पाहिजे.
रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८
श्रीदेवी, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ आणि राजकारण
बॉलिवुडमध्ये श्रीदेवीचे झालेले पदार्पण आणि तिची वाढती लोकप्रियता, यशाची शिखरे पादाक्रांत करणे आणि काँग्रेसला उतरती कळा लागणे, हा कालावधी एकच आहे. एकीकडे श्रीदेवी वर वर जात होती तर काँग्रेस खाली खाली येत होती. ‘हिंमतवाला’ झालेल्या श्रीदेवीने मात्र आपली ताकद वाढवत नेली होती.बॉलिवुडची अभिनेत्री श्रीदेवीचे अकाली निधन झाले. गेली तीस-पस्तीस र्वष श्रीदेवी रसिकांचे कायम आकर्षण राहिलेली आहे. सर्वसामान्य माणसांवर बॉलिवुड आणि रुपेरी पडद्यावरील झगमगत्या ता-यांचा नेहमीच प्रभाव असतो. पण, राजकीय लोकांवरही तिचा प्रभाव होता. म्हणजे राजकारणात अभिनेत्रीने येणे किंवा पडद्यावरील तारे-तारकांनी येणे हे काही नवीन नाही. ते आपल्याकडे सातत्याने आहेच. पण, श्रीदेवीचे वेगळेपण हे आहे की, प्रत्यक्ष राजकारणात न येता राजकीय नेत्यांना तिचे आकर्षण होते. अर्थात हे आकर्षण फक्त तिच्याभोवती असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाचे होते. बाकी कसले नाही. याचे कारण श्रीदेवी ही १९८० च्या दशकात इतकी व्यस्त अभिनेत्री होती की, सुपरस्टार अमिताभ बच्चननंतर सर्वाधिक मानधन घेणारी ती अभिनेत्री आहे, असा तिचा बोलबाला होता. अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी ती त्या काळातील कलाकार होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्याच तत्कालीन दिग्गज वलयांकित अभिनेत्यांबरोबर तिचे चित्रपट येत होते. त्यामुळे ते सगळेच सुपरहिट होत होते. एकीकडे पद्मालयातून दाक्षिणात्य मसाल्याचे जितेंद्र बरोबरचे होते, तर दुसरीकडे अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, रजनीकांत या सुपरस्टारबरोबर तिचे चित्रपट होते. याशिवाय कमल हसन, सनी देओल, ऋषी कपूर, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांच्याबरोबरही तिचे चित्रपट येत होते. प्रत्येक हिरोचा कोणता ना कोणता तरी सुपरहिट चित्रपट येत असताना त्यात श्रीदेवी असायचीच.त्यामुळे ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून गणली गेली होती. तिची लोकप्रियता एका उंचीवर पोहोचलेली होती. केवळ तरुणांना किंवा पुरुषांनाच आवडणारी नाही तर स्त्रियांनाही आवडणारी अशी ती अभिनेत्री होती. तिचे वैशिष्टय़ असे होते की, तिने कोणताही ड्रेस घातला तरी तो छानच दिसायचा. लांबसडक वेणी आणि कोपरापर्यंत ब्लाऊज असलेला, मोठा पदर काढून पिनअप केलेल्या साडीतील खानदानी श्रीदेवी असो की, अगदी उनाड मैना वाटावी अशी आईस्क्रीम खाओगी, मम मिया, प्यार की गाडी तेज चलाओ म्हणत जितेंद्र बरोबर बेलबॉटम किंवा जिन्स टी-शर्ट घालून तिचा वावर असला तरी छानच दिसायची. साहजिकच प्रत्येकाच्या मनात या ८० च्या दशकात तिने धुमाकूळ घातला होता. साहजिकच राजकीय नेत्यांना तिचे आकर्षण वाटले नाही तरच नवल. पण, हे आकर्षण जेव्हा काँग्रेसचे नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांना वाटले आणि त्यांनी श्रीदेवीचा वापर आपल्या सभागृहातील भाषणासाठी केला तेव्हा सगळ्यांनीच विठ्ठलराव गाडगीळांचेही कौतुक केले होते. याचे कारण म्हणजे बॉलिवुडमध्ये श्रीदेवीचे झालेले पदार्पण आणि तिची वाढती लोकप्रियता. यशाची शिखरे पादाक्रांत करणे आणि काँग्रेसला उतरती कळा लागणे हा कालावधी एकच आहे. एकीकडे श्रीदेवी वर वर जात होती, तर काँग्रेस खाली खाली येत होती. १९८० च्या दशकात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुका वगळता काँग्रेसला आपले अस्तित्व दाखवता आले नाही. काँग्रेस स्वबळातून आघाडीमध्ये घुसली. त्याच काळात ‘सोलवा साल’सारख्या फारसा न चाललेल्या चित्रपटातून पदार्पण करणा-या नंतर ‘हिंमतवाला’ झालेल्या श्रीदेवीने मात्र आपली ताकद वाढवत नेली होती.त्यामुळे तिच्या लोकप्रियतेचा वापर करण्याचे राजकारणातील चतुर किंवा पुणे काँग्रेसमधील साडेतीन शिरोमणी म्हणतात, त्यापैकी एक असलेल्या बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी तिचा वापर खुबीने सभागृहात केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष राजकारणात न येताही श्रीदेवी लोकसभेत सभागृहात पोहोचली होती. बॅ. गाडगीळ म्हणजे विद्वत्तापूर्ण वक्तव्य करणारे नेते. त्यांची सभागृहातील भाषणे ऐकायला विरोधी पक्षही सरसावून कान देऊन बसायचा. याचे कारण ते आपल्या भाषणात नेहमीच छानसे किस्से, चुटकुले सांगायचे. एकदा त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू होता. अध्यक्षांचे कोणीच ऐकत नव्हते. दोन गट एकमेकांशी जोरजोरात वाद घालत होते. विशेष म्हणजे हे वाद घालणारे दोन विभिन्न पक्षांचे गट नव्हते किंवा सत्ताधारी आणि विरोधक असेही नव्हते. दोन्ही गटात सगळ्याच पक्षांचे आणि सत्ताधारी, विरोधी पक्षांचे नेते होते. असा प्रकार नवीनच होता. एक गट होय म्हणत होता तर दुसरा गट नाही म्हणत होता. शेवटी अध्यक्षांनी ओरडून विचारले की, नेमका वाद काय आहे? तुम्ही कशावरून भांडत आहात, होय-नाही म्हणत आहात ते सांगा अगोदर. त्याचा निवाडा करू मग सभागृहाचे कामकाज करू. तेव्हा अध्यक्षांना कोणीतरी सांगितले की, श्रीदेवीचे लग्न ठरले आहे. यातील एक गट म्हणतो ठरले आहे, तर दुसरा गट म्हणतो नाही ठरले.त्यावरून हे सभागृह दणाणले आहे. अध्यक्ष म्हणाले, मग तुम्ही थेट श्रीदेवीलाच फोन लावा अन् विचारा. तिने काय ते सांगितल्यावर आपोआप वाद मिटेल, तुम्ही का भांडता? ताबडतोब संसदेच्या कार्यालयातून श्रीदेवीला लायटनिंग कॉल लावला गेला. त्याकाळी मोबाईलच काय एसटीडीही नव्हता. त्यामुळे र्अजट कॉलसाठी लायटनिंग कॉल लावला जायचा. तसा तो लावला गेला. नेमकी श्रीदेवी घरात होती अन् तिने फोन उचलला. तिला विचारण्यात आले की, ‘बाई तुझे लग्न ठरले हे खरे की अफवा?’ तेव्हा तिने सांगितले की, माझे लग्न ठरले होते हे खरे आहे. पण ते मी मोडले आहे हे लेटेस्ट बुलेटीन आहे. कारण माझे लग्न एका लाल नावाच्या माणसाशी ठरले होते. लग्नानंतर माझे नाव श्रीदेवीलाल झाले असते आणि सध्या श्रीदेवीलाल इतके बदनाम नाव कोणतेच नाही. त्यामुळे माझ्या कारकिर्दीला, लोकप्रियतेला धक्का लागू नये म्हणून मी हे लग्न मोडले आहे. गाडगीळांनी हा किस्सा सांगितल्यावर उपस्थित किमान तासभर हसत होते. याचे कारण उत्तर भारतातील राजकारणात ताउची भूमिका बजावणारे देवीलाल हे उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले असले तरी त्यांच्या किंगमेकरच्या भूमिकेमुळे ते सतत वादग्रस्त आणि बदनाम चर्चेत राहिले. काँग्रेसने त्यांच्यावरील राग काढण्यासाठी गाडगीळांच्या मुखातून असा वचपा काढला. त्यासाठी श्रीदेवीला काल्पनिक का होईना; संसदेतून फोन लावला गेला होता.
prafulla phadke mhantat: शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यां...
prafulla phadke mhantat: शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यां...: दासबोधातील पाचव्या दशकातील सहाव्या समासात समर्थांनी शुद्ध ज्ञान निरूपण केलेले आहे. यामध्ये उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास कसा करावा याचे ...
शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास
दासबोधातील पाचव्या दशकातील सहाव्या समासात समर्थांनी शुद्ध ज्ञान निरूपण केलेले आहे. यामध्ये उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास कसा करावा याचे नेमके मार्गदर्शन समर्थांनी केले आहे. समर्थ म्हणतात, मुख्य देव जो ईश्वर त्याला जाणावे. आपल्यांतील खरा मी तो आपलें खरें स्वरुप. तें ओळखावेआणि टिकणारे काय व तात्पुरते काय हे नक्की करावे. याला ज्ञान म्हणतात. मला ज्ञान आहे ही जाणीव अज्ञान समजलें जाते, असें अत्यंत मलरहित, शुद्ध जें स्वरुपभान त्याला ज्ञान म्हणतात. दृश्यरहित शुद्ध स्वरुप जाणणें याचें नाव आत्मज्ञान होय. आत्मज्ञानमध्ये संपूर्ण अद्वैत असते. तुर्येमध्ये तर प्रत्यक्ष द्वैत आढळतें. म्हणून शुद्ध आत्मज्ञान स्वतंत्र आहे. निराळेच आहे. शुद्ध ज्ञानाचें लक्षण म्हणजे जें शुद्ध परमात्मस्वरुप आहे, तेंच आपण आहोत असा जो साक्षात अनुभव येतो, त्याचें नांव शुद्ध स्वरुपज्ञान होय. हे सांगतान यातील महावाक्यांचा उपदेश उत्तमच आहे. पण त्यांचा जप करण्यास सांगितलेला नाही. साधकानें महावाक्यांच्या अर्थाचा विचार करणें आवश्यक आहे. म्हणून या महावाक्यांवर समर्थांनी सविस्तर सांगितले आहे. महावाक्यांमध्यें परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे. हे निःसंशय पण त्यांचे मननच केले पाहिजे. जप केल्यानें अज्ञानाचा अंधकार नाहीसा होत नाही. महावाक्यांचा नुसता अर्थ घेतला, तरी आत्मा ब्रह्मस्वरुप किंवा परमात्मस्वरुप आहे. आणि आपण वास्तविक आत्मस्वरुप आहोत. या महावाक्यांचा जप केल्याने कांहीं आत्मज्ञान होत नाही. उगाचच शीण मात्र होतो. माहावाक्यांचे उपदेश असा आहे. मी देह नसून आत्माच आहें, आणि आत्मा ब्रह्मस्वरुप असल्यानें मी ब्रह्मस्वरुप आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे समजावे. हा आपला आपणालाच होणारा लाभ आहे. हें आत्मज्ञान फार दुर्लभ आहे. जें आधी व नंतरही स्वतः स्वरुपच असते. ज्या ठिकाणाहून हे प्रगट होते व जेथे सर्व नाहीसे होते, ते ज्ञान झाल्यावर सर्व बंधनांपासून सुटका होते. जेथेसर्व मते व मतांतरे निर्विकार होतात आणि सूक्ष्मत्वाने विचार केल्यावर सर्व एकच आहे हे पटते. तेच आत्मज्ञान होय. वेदांच्या मताप्रमाणे जें या चराचराचे मूळ आहे. ते केवळ शुद्ध, निर्मळस्वरुप आहे. यालाच ज्ञान म्हणतात. वेदांच्या मते आपण कोठून आलो, याचा शोध घेता घेता सहजच अज्ञान नष्ट होते. हेच ते मोक्ष मिळवून देणारे ब्रह्मज्ञान होय. आपल्यामधील खरा मी कोण आहे याचा विचार करता, आत्मज्ञान होते. आत्मा सर्वव्यापी असल्यानें आपण आत्मज्ञानामुळें सर्वज्ञ होतो. सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे असा अनुभव आल्याने देहापुरताच मी आहे ही आकुंचित वृत्ती लोप पावते. मी कोण आहे असा हेतु मनांत बाळगुन जर आपण शोध घेऊ लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो. देहाच्या पलीकडे असलेल्या मीला पाहता पाहता आपण निश्चितपणे आत्मस्वरुपच होतो. पूर्वीचे खरे थोर पुरुष ज्या ज्ञानाने संसारांतून पार पडले त्याची माहिती समर्थांनी याठिकाणी नमूद केलेली आहे. ज्या ज्ञानाच्या आनंदाने महादेवही निरंतर डोलत असतो. जें आत्मज्ञान वेदशास्त्रांचे तात्पर्य आहे, जें योग्य प्रमाणांनी निश्चित केलेले आहे, जें साक्षात् अनुभवाला येते. आणि जें अति सूक्ष्म विचारांती योग्य ठरतें, तें आत्मज्ञान श्रद्धावंतांना त्याच्या भाग्याप्रमाणे प्राप्त होते. पूर्वी होऊन गेलेले, सध्या हयात असलेले, व पुढें होणारे सर्व साधुसंत आणि सज्जन यांचें गुप्त असलेले असें जें आत्मज्ञान समर्थांनी वर्णन केले आहे. तीर्थयात्रा, व्रतें, तप, दान, धुम्रपान, पंचाग्नि साधन, गोरांजनें या साधनांनी आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान हेंच सगळ्या परमार्थसाधनेचे फळ आहे. तेंच ज्ञानाची परमावधि आहे. त्यामुळें संशयवृत्तीचे मूळच नष्ट होते. पुराणांचा अभ्यास करुन आत्मज्ञान प्राप्त होत नाही. तें ज्ञान सांगतांना वेद थकले. असें आत्मज्ञान आतां या क्षणीं गुरुकृपेने समजावून देतो, असे श्री समर्थ सांगतात की, संस्कृत ग्रंथांत काय आहे ते आपण पाहिले नाही. मराठी ग्रंथांत आपला प्रवेश नाही. पण आपल्या हृदयांत सद्गुरुस्वामीची कृपामूर्ति मात्र स्थिरपणें राहिली आहे. वेदांतावरील ग्रंथ सर्व श्रेष्ठ आहेत. वेदान्तापेक्षां दुसरें कांहीं श्रेष्ठ नाही. कारण वेदांचे सारें रहस्य वेदान्तामध्ये प्रगट झाले आहे. अशा वेदान्ताचा जो तात्पर्यार्थ आहे. तसेच अति गहन जो परमार्थ आहे, तो पण याठिकाणी समर्थांनी सांगितला आहे. अतिशय खोल व अर्थगंभीर असें फक्त सद्गुरु वचनच आहे. या वचनाने निश्चित समाधान मिळते. सद्गुरुवचन म्हणजेच खरा वेदान्त व तोच सिद्धान्तही आहे. तें वचन हेंच प्रत्यक्ष अनुभविलेले ज्ञान होय.समर्थ म्हणतात, अहं ब्रह्मास्मि हें महावाक्य आहे. मी ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ आहे. या अर्थाचे रहस्य तर्काने समजणार नाही. त्या अर्थामध्यें गुरु व शिष्य दोघे एक होऊन जातात. विश्व निर्माण होते तेव्हा पंचमहाभूतें क्रमाने निर्माण होतात. विश्वाच्या कल्पान्ती तीही त्याच क्रमाने नष्ट होतात. इतकेंच नव्हे तर उरणारी प्रकृति आणि पुरुष तीं देखिल परब्रह्मांत विलीन होतात. अशा रीतीने सर्व दृश्य वस्तु नाश पावल्या म्हणजे वास्तविक मी पणाने वावरणारा मी देखील उरत नाही. कारण मुळांतच परमात्मा एकरुप असल्यानें एकरुप होण्यास निराळें कांहीं करावेंच लागत नाही. सर्व सृष्टी मूळ स्वरुपांत विलीन झाल्यावर मग ते एकस्वरुप ब्रह्मच तेवढें उरते. त्यामध्ये पिंड व ब्रह्मांड यांना पहावयाचे म्हटले तरी ते आढळणार नाहीत. ज्ञानाचा वन्ही पेटला म्हणजे दृश्याचा केरकचरा संपूर्ण जळून नष्ट होतो. ज्ञाता स्वतः ज्ञानरुप झाल्यावर वेगळेपणाचें मूळच जळून जातें. आपल्या इंद्रियांना दिसणारे दृश्य विश्व हें खोटे आहे हे पटले की वृत्ती पालटून हृदयांतील आत्म स्वरुपाकडे धांव घेऊ लागली कीं, दृश्य असुनही नसल्यासारखें होते व आपोआपच आत्मनिवेदन होते.खरा मी आत्मरुप आहे. म्हणून मी स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या चार देहांहून वेगळा आहे. तो भ्रम आहे व त्यानें लोक भुलले आहेत. मी देहच आहे हा देहाभिमान घट्ट धरुन ठेवल्यानें मी बांधलेला आहे हा भ्रम निर्माण होतो. परमार्थाचे अखंड स्मरण व श्रवण करीत राहीले तरच समाधान मिळते. अज्ञान संपूर्णपणे नाहीसे होऊन ब्रह्मज्ञान पूर्णतेला पोहोचते. अंगांत वैराग्य भरुन जाते. दृश्याबद्दल थोडीही वासना मनांत उरत नाही. इंद्रियांचे भोग समाधान देत नाहीत. हे उमजून ज्याचे मन विरक्त बनते तेव्हां पूर्ण आत्मज्ञान प्राप्त होते. जो जागा असतो त्याला स्वप्न खोटें असतें. जो झोपलेला असतो त्याला तें सर्व बाजूनीं वेढून टाकते. तोच माणूस जागा झाला म्हणजे त्याला भीति उरत नाही. ज्यावेळी अविद्यारुप झोप जीवाला भुलवून झोपच घालते त्यावेळी दृश्याची वाईट स्वप्ने त्यास पडतात, त्यामुळें तो घाबरतो व भयाने त्याचें सर्व शरीर कांपू लागते. या अविद्यारुप झोपेंतून संपूर्ण जाग येण्यास सारखें श्रवण व मनन केल्यास दृश्याचे भय नाहीसे होते. ज्याला संपूर्ण विरक्ति साधली नाही त्याला साधक असे म्हणतात. ज्याला साधन करावेसे वाटत नाहीं तो सिद्धपणाच्या अभिमानानें बांधला जातो. अशा अहंकारी सिद्धापेक्षां मुमुक्षु केव्हांही चांगला कारण त्याला ज्ञानाची तळमळ असल्यानें तो ज्ञानाचा अधिकारी असतो.
॥ जय जय रघुवीर समर्थ॥
prafulla phadke mhantat: गुरू आणि सदगुरू यातील फरक
prafulla phadke mhantat: गुरू आणि सदगुरू यातील फरक: दासबोधातील पाचव्या दशकातील दुसर्या समासात समर्थांनी गुरू आणि सदगुरू यातील फरक दाखवून दिला आहे. त्याबाबत समर्थ म्हणतात की, कांहीं माणसें...
गुरू आणि सदगुरू यातील फरक
दासबोधातील पाचव्या दशकातील दुसर्या समासात समर्थांनी गुरू आणि सदगुरू यातील फरक दाखवून दिला आहे. त्याबाबत समर्थ म्हणतात की, कांहीं माणसें विलक्षण करामती करुन दाखवतात. त्यांनाही गुरु म्हणतात. पण मोक्ष देणारे हे गुरु नव्हेत. सभेतील लोकांची नजरबंदी करणे, चेटुक करुन भुरळ पाडणे, साबरमंत्र व कौटाळे या नाथ पंथीय मंत्राद्वारे चमत्कार करणे, अशक्य वाटणार्या गोष्टी करुन दाखविणे, अनेक वनस्पती व रसायनांचे औषधीप्रयोग सांगणे, दुसर्या धातुचा सोन्यांत रुपांतर करण्याचा प्रयोग सांगणे, नजरबंदी करुन ताबडतोप इच्छापुर्तीचा मार्ग सांगणे, साहित्य, संगीत, रागज्ञान, गायन, नृत्य, ताना, निरनिराळी वाद्यें शिकवीणारे, तेही एक प्रकारचे गुरु असतात. कांहीं मंत्र जाणणारे मंत्र शिकवतात, ताईत, गंडेदोरे देण्याचे शिकवतात, कांहीं पोट भरण्याची कला शिकवतात. ज्या जातीचा जो व्यापार असतो तो त्या जातींतील लोकांना पोट भरण्यास शिकवतात. ते सुद्धा एक प्रकारचे गुरुच पण सद्गुरु मात्र नव्हेत. आपली आई व वडिल हे पण गुरुच पण संसारांतुन पैलतीराला नेणारा तो सद्गुरु वेगळाच असतो. गायत्रीमंत्राचा उपदेश देणारा कुळगुरु. पण तो कांही आत्मज्ञान देत नाही. त्याज्ञानवाचून पैलपारास जातां येत नाही. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंधार नाहींसा करतो, व जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य घडवून आणतो. तो सद्गुरु असतो. देव आणि भक्त यांचा वियोग झालेला असल्यामुळे जीव व शिव असे द्वैत निर्माण झालेले असते, तें द्वैत नाहीसे करुन देव व भक्त यांची गांठ घालून देऊन ऐक्य करतो, तो सद्गुरु असतो. भवरुपी वाघाने उडी घालून गाय-वासराची ताटातूट केली हे पाहून दया येऊन त्या भवरुपी वाघापासून सोडविणारा तो सद्गुरु. प्राणी (जीव ) मायेच्या जाळ्यांत अडकून प्रपंचांतील दुःखाने दुःखी होतात. अशांना मायेच्या जाळ्यांतून जो सोडवितो. तो सद्गुरु होय. वासनारुपी नदीला महापूर आलेला असतां जीव त्यामधें गटांगळ्या खात बुडू लागतो. त्यावेळी तेथें उडी घालून जो तारतो, तो सद्गुरु होय. वासनेच्या बंधनाची बेडी त्यामुळे जीवाला गर्भवासाचे दुःख भोगावे लागते. आत्मज्ञान देऊन त्या बंधनांतून जीवास जो मुक्त करतो, तो सद्गुरु होय. शब्दांचे अंतरंग अर्थ त्यावरुन आत्मसोरुपाकडे नेणारा सद्गुरु म्हणजे अनाथांचे जणूं माहेरघरच असतो. जीव हा एकांगी असतो. अपूर्ण असतो. ब्रह्म सर्वांगी, पूर्ण स्थळ काळ परिस्थिती यांच्या पलीकडे असते. आपल्या उपदेशाने सद्गुरु जीवाला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरुप बनवितो. वेदांच्या अंतरंगामधे म्हणजे उपनिषदामधे जे ज्ञान गुप्तरुपे आहे ते ज्ञान सद्गुरु लहान मुलाला जसे घास भरवितात तसे शिष्याला आपल्या बोलण्यांतून हळूहळू कानांत सांगतात. वेद, शास्त्र व सद्पुरुष ज्ञानानुभवाने एकरुप झालेले असतात. तेच ज्ञान तोच अनुभव सद्गुरुचा असतो. ज्ञान या दृष्टीने सर्वांचे ज्ञान सारखेंच असते. सद्गुरु भक्ताचे सर्व प्रकारचे संशय मुळापासून नष्ट करतो. तो मोठ्या आदराने स्वधर्माचे पालन करतो. वेदरहित म्हणजे आत्मज्ञान असलेले सर्व मिथ्या भाषण तो करत नाही. मनांत जें जें येते ते ते लज भीड न बाळगता जो उघड करतो. तो कांहीं सद्गुरु नव्हे. तो भिकारी आपल्यामागे लागण्यासाठी आला आहे असे सनजावे. जो आपल्या शिष्याला साधनांत कसें राहावे हे शिकवत नाही. इंद्रियें ताब्यांत कशी ठेवावीत हे शिकवत नाही. असले गुरु दमडीला तीन मिळाले तरी त्यांच्यापासून लांब राहावे. जो आत्मज्ञान समजावून सांगतो, सर्वच्या सर्व अविद्या म्हणजे आत्मज्ञाना व्यतिरिक्त असलेले मिथ्या ज्ञान समूळ नष्ट करतो. इंद्रियें आवरुन कशी धरावी हे शिष्याला शिकवीतो. तो सद्गुरु समजावा. कांही गुरु पैशाचे मिंधे होतात. शिष्याच्या आधीन होतात. वासनेच्या नादी लागून दिनवाणें बनतात. असे गुरु शिष्याच्या एवढे आधीन होतात की, शिष्याला जे जे आवडेल ते ते सर्व करतात कारण वासनेचा विळखा त्यांच्या मानेभोवती बसलेला असतो. शिष्याच्या भीडेला बळी पडून त्याची मनधरणी करणारा गुरु अधमाहूनही अधम असतो. असा गुरु चोरटा, द्रव्याचा लोभी, दुष्ट, नीच व फसवा असतो. वैद्यकीचे ज्ञान नसणारा एखादा दुराचारी वैद्य रोग्याला सर्वस्वी लुबाडतो. तसेच रोग्याला भीड घालून शेवटी त्याचा घात करतो. तसे हे नामधारी गुरु असतात. ज्यांच्यामुळे भक्त व देव यांतील अंतर वाढते. जो भीड घालून भक्ताला देहबुद्धिच्या बंधनांत अधिकाधिक अडकवितो. असा गुरु नसावा. ज्याच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान व प्रत्यक्ष व्यवहारांत साधनेचे आचरण आहे. असा सद्गुरु आपल्याला आपले आत्मस्वरुप दाखवितो. कांहीं गुरु आपल्या शिष्यांना मोठ्या कौतुकाने प्रकाश, नाद, सुगंध यांचे अनुभव दाखवितात. कांहीं शिष्याच्या कानांत मंत्र सांगतात. इतकेच ज्ञान त्यांच्यापाशी असते, पण ते बिचारे भगवंतापासून दूरच असतात. शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती ज्याच्यापाशी आहे, तोच उत्तम लक्षणांनी संपन्न अशी सद्गुरुची खूण आहे. ज्याला मोक्ष मिळवून घेण्याची इच्छा आहे, त्याने अशा सद्गुरुस शरण जावे. कांही वेळेस एखादा माणूस वेदांत उत्तम प्रकारे सांगतो. पण मन मात्र इंद्रियसुखाला लालचावलेले असते. असा गुरु केल्याने आपले सार्थक होणार नाही. उत्तम वक्ता जसा प्रसंग तसा त्यांत रंग भरतो. परंतु देहबुद्धिचे सारे संदेह नाहीसे होऊन त्याच्या अंतर्यामी आत्मज्ञानाचा जय झालेला नसतो. कोणत्या तरी वासनेनें वेडी झालेली शब्दज्ञानी माणसे परमार्थ न साधखरल्यामुळे फुकट गेली. अशी माणसें बिचारी मरुन गेली. ज्याला कशाचीही वासना असत नाही असा संत विरळाच असतो. सर्व लोकांहून त्याचे मत वेगळेच असते. तो अक्षै भगवंताबद्दलच बोलत असतो. यावरुन असे दिसते की, जो अत्यंत निष्काम आहे वासनारहीत आहे, आणि ज्याच्या बुद्धिमधे आत्मस्वरुपाविषयी दृढ निश्र्चय आहे असा स्वानुभवी सद्गुरु या संसारसागरांतून पलीकडे नेतो.सद्गुरला शुद्ध ब्रह्मज्ञान पाहिजे हे सद्गुरुचे प्रथम लक्षण आहे. तो निश्चल समाधानी पाहीजे. आत्मस्वरुपांत तो नेहमी स्थिर राहिला पाहीजे. याच बरोबर तो अतिशय वैराग्यसंपन्न असतो. त्याचे मन कशांतही गुंतलेले नसते. त्याचा स्वधर्माविषयीं आचार अत्यंत निर्मळ असतो.त्याचे सद्गुरुजवळ बसून अध्यात्माचे श्रवण चालू असते. त्याच्यापाशी नेहमी हरिकथा व निरुपण चालते. ज्याठिकाणी नवविधा भक्ती आचरली जाते, आणि साधनमार्गास महत्व दिले जाते, हे सद्गुरुचे लक्षण आहे असे समर्थ सांगतात. ज्या परमार्थामधे कर्म व उपासना या दोन्हींना जागा नाही. तेथे भ्रष्टाचार होण्याला सहज अवसर सांपडतो. अशा लोकांचा परमार्थ खोटा असतो. प्रापंचिक लोक त्याला हसतात. सर्व प्रकारचे उत्तम गुण सद्गुरु लक्षण म्हणून मानावयास हरकत नाही. तरी सद्गुरुची बरोबर ओळख होण्यास इतर गुरुंबद्दल माहिती सांगणे जरुरचे आहे. एक नुसता गुरु, तर एक मंत्रगुरु, एक यंत्रगुरु तर एक तंत्रगुरु असतो. एक व्यायामाचा गुरु तर एखाद्याला राजगुरु म्हणजे राजाचा उपाध्याय म्हणतात. अशाप्रकारे समर्थांनी गुरू आणि सदगुरू यांच्यातील भेद स्पष्ट केलेला आहे. ॥ जय जय रघुवीर समर्थ॥
अखेरची संधी
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची वार्षिक परीक्षा आहे. सगळीकडे दहावी-बारावी परीक्षांचे वातावरण असताना त्या परीक्षार्थीना जसे टेन्शन असते, त्या परीक्षार्थीच्या पालकांना जसे टेन्शन असते, तसेच टेन्शन आज या सरकारला असले पाहिजे. कारण, दहावीचा टप्पा जसा परीक्षेचा महत्त्वाचा असतो, तसाच पंचवार्षिक सत्तेतील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प मांडताना या अधिवेशनात फडणवीस सरकारचा कस लागलेला असेल. त्यात हे सरकार पास होते की, नापास होते यावर त्यांचे भविष्य आणि निवडणुकीनंतरचे अस्तित्व अवलंबून असणार आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्प केवळ राज्याच्या वर्षभरापुरत्या नियोजनाचे असणार नाही, तर भाजप आणि एकूणच फडणवीस सरकारच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नेमके काय करतात, यापेक्षा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री आपल्या सहका-यांसह विरोधकांचा कसा सामना करतात, हे या अधिवेशनात पाहावे लागेल. निवडणुका एक वर्षावर येऊन ठेपलेल्या असल्याने विरोधक सभागृहात सरकारला उघडे पाडण्याचा प्रयत्न करणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विरोधकांसह सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे, आमदार आशीष देशमुख हे स्वकीय फडणवीस सरकारला कसे अडचणीत आणतील, यावर विरोधकांचीही मदार असणार आहे.त्यामुळे सेना आणि खडसे हे विरोधकांच्या हातातील शस्त्र होऊ शकतात. शस्त्राचा नेहमीच वापर केला जातो. जिंकतो ते चालवणारा. जिंकल्यानंतर शस्त्राचे कौतुक होत नाही, कारण शस्त्र ज्याच्या हातात असते त्याची त्यावर हुकूमत असते. तरीही शिवसेना आणि खडसे विरोधकांच्या हातातील कोलीत बनू पाहत आहेत. त्या कोलिताचे चटके सरकारला बसणार नाहीत, असे नाही त्यामुळे ती सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय मंत्रालयातील आत्महत्या, कर्जमाफीचे रडगाणे, गारपीट आणि बोंडअळीग्रस्त शेतक-यांना जाहीर होऊनही अद्याप न मिळालेली मदत हे मुद्दे विरोधकांच्या दृष्टीने कळीचे मुद्दे ठरू शकतात.याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील रखडलेले स्मारकाचे काम यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सरकारची तिजोरी रिकामी आहे, कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतो आहे. विकासकामे ठप्प आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या प्रश्नांना सरकार कसे सामोरे जाणार, विविध कामांसाठी आर्थिक निधीची तरतूद कशी करणार, याची उत्तरे हे सरकार किती प्रभावीपणे देते यावर या सरकारचे भवितव्य ठरणार आहे. निवडणुका केव्हाही होऊ शकतात. मुदतपूर्व किंवा लोकसभेबरोबरही निवडणूक घेण्याबाबत चर्चा असल्यामुळे सरकारच्या हातात असलेले हे अखेरचे पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अर्थसंकल्पात सरकारची कामगिरी कशी ठरते, यावर बरेच काही घडणार आहे हे निश्चित. कदाचित डिसेंबर २०१८ मध्ये निवडणुका होतील अशी एक शक्यता आहे. त्यामुळे हे या सरकारचे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरू शकते.त्याचप्रमाणे अगदी नियोजित वेळेत पुढीलवर्षीच निवडणुका असल्या तरी सरकारसाठी हाच अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. याशिवाय आता सर्वच पक्षांना आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. गुजरात निकाल, राजस्थानातील पोटनिवडणुकांचे निकाल यावरून भाजपला कोंडीत पकडण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे विरोधकांना वाटते. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या तर त्या आपल्या पथ्यावर पडतील, असा विरोधकांचा कयास आहे. साहजिकच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण राज्यात हल्लाबोल यात्रा काढून वातावरण ढवळून काढले आहे, तर काँग्रेसनेही प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क केले आहे. याशिवाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतल्यात जमा आहे. त्यामुळेच विरोधकांची एकजूट होत असताना, आशीष देशमुख, एकनाथ खडसेंसारख्या नेत्यांच्या अंतर्गत कुरबुरी वाढत असताना आणि सत्तेतील वाटेकरी शिवसेनेची शंभर टक्के साथ नसताना या सरकारला हा शेवटचा अर्थसंकल्प मांडायचा आहे. त्यात ते किती पास होतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.मंत्रालयात एकाच महिन्यात झालेल्या दोन आत्महत्या आणि दोघांनी आत्महत्येचा केलेला प्रयत्न हे आणखी एक शस्त्र विरोधकांच्या हातात आहे. कापसावरील बोंडअळीचा प्रश्न नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला होता. हा मुद्दा अंगावर यायला नको म्हणून दोन दिवसांपूर्वीच सरकारने मदतीची घोषणा केली आहे. आता बोंडअळीग्रस्तांना मदत जाहीर झाली असली तरी ती कधी मिळणार याची शाश्वती नाही. राज्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीबरोबरच अनेक जनावरांचे प्राणही गेले. यावेळी सरकारने कोंबडय़ांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. या मुद्दय़ाने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. शिवाय कर्जमाफीची घोषणा होऊन दहा महिने उलटून गेले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, यावरून सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. याला हे सरकार कसे तोंड देते, यावर त्यांचे भवितव्य आहे हे निश्चित. याशिवाय एक भावनेचा मुद्दाही इथे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा जलपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. दादर येथील इंदू मिलच्या जागेत होणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचेही भूमीपूजन झाले आहे.मात्र, त्याचेही काम पुढे सरकलेले नाही. त्याशिवाय धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणाचा वाद आहेच. या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारकडून घेण्यासाठी विरोधक कमालीचे आक्रमक राहणार हे निश्चित. त्यामुळे या सरकारचा कस, परिपक्वता, एकूणच निर्णय घेण्याची इच्छा यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. विरोधकांना तोंड देताना सरकारचा कस लागणार आहे. याचे कारण हे अधिवेशन म्हणजे या सरकारला आपली कर्तबगारी दाखवण्याची अखेरची संधी आहे. आतापर्यंत सरकारने निव्वळ घोषणा केल्या, कार्यवाही शून्य झाली आहे. त्यामुळेच सरकारच्या भवितव्याचा निकाल या अधिवेशनातील निर्णयांवर अवलंबून असेल.
शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८
ंमध्यप्रदेशात भाजपला रोखण्याची काँग्रेस रणनीती
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने दक्षिण मोहिम हाती घेतल्याचे पाहुन काँग्रेसने भारताचा आणि भाजपचा मध्य गाठायचे ठरवले आहे. त्यादृष्टीने गेली पंधरा वर्ष भाजपच्या हातात असलेली सत्ता खेचून काँग्रेसला नवसंजिवनी देण्यासाठी डावपेच टाकणे सुरु केले आहे. त्यापैकी एक महत्वाचा एक्का सुरुवातीलाच बाहेर काढल्याचे दिसते आहे. तो म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचा उमेदवार ज्योतिर्आदित्य शिंदे यांचे नाव पुढे आणले जात आहे.येत्या काही महिन्यात मध्यप्रदेश विधानसभा निवडणुका होतील. या निवडणुका यासाठी महत्वाच्या आहेत की त्यानंतर नियोजीत कार्यकालाप्रमाणे सहाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होतील. मध्यप्रदेश बरोबर राजस्थानातील निवडणुकाही होणार आहेत. ही दोन्ही महत्वाची आणि मोठी राज्ये आहेत. या राज्यांबरोबरच लोकसभेच्या निवडणुका घेण्याच्या चर्चा जरी असल्या तरी त्या कोणत्या तरी असुरक्षिततेतून घेतल्या जातील. म्हणूनच या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आणि खºया अर्थाने लोकसभेची रंगित तालीम अशा आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसने उचललेली पावले महत्वपूर्ण असून ज्योतिर्आदित्य शिंदे हा टाकलेला मोहरा फार महत्वाचा ठरू शकतो असे काँग्रेसला वाटते.मध्यप्रदेशच्या एकूणच विधानसभेचे चित्र पाहिले तर लक्षात येईल की या विधानसभेत एकूण जागा या २३० आहेत. बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. सध्या भाजपच्या १६५ जागांसह विधानसभेत वर्चस्व आहे. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारली तरी भाजपचे पूर्ण पानीपत करून सत्ता खेचून आणणे तितकेसे सोपे राहिलेले नाही.१९५६ पासून अस्तित्वात असलेल्या मध्यप्रदेशात यापूर्वी सर्वाधिक काळ काँग्रेसने या राज्यात सत्ता मिळवलेली आहे. म्हणजे गेल्या ६२ वर्षात तब्बल ४० वर्ष इथे काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. यामध्ये १९५६ ते ६७, त्यानंतर १९६९ ते १९७७, १९८० ते १९९० आणि त्यानंतर १९९३ ते २००३ अशी ती चाळीस वर्ष आहेत. याशिवाय बिगर काँग्रेस ज्या सत्ता आल्या त्यामध्ये भाजप वगळता अन्य कोणी पूर्णकाळ केलेला नाही. त्यामध्ये १९६७ ते १९६९ यामध्ये सुमारे पावणेदोन वर्ष संयुक्त विधायक दलाचे सरकार होते. त्यानंतर १९७७ ते १९८० या अडीच वर्षाच्या काळात जनता पक्षाचे सरकार होते. त्यानंतर भाजपनेही एकदा १९९० ते १९९२ या काळात अल्प मुदतीचे सरकार स्थापन केले होते. मात्र २००३ नंतर भाजपची सलग १५ वर्ष सत्ता राहिलेली आहे. या राज्यात तीन वेळा दोन महिने ते एक वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी राष्टÑपती राजवटही लागलेली आहे. परिणामी साठ वर्षांच्या कालावधीत काँग्रेस आणि भाजप यांच्याकडेच दीर्घकाळ सत्ता राहिलेली आहे. अन्य पक्ष तीथे शिरकाव करू शकलेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने हे राज्य मिळवणे महत्वाकांक्षेचे आहे.काँग्रेसला गुजरातमध्ये मिळालेला कौल, वाढलेल्या जागांमुळे मोदींची लोकप्रियता घटली किंवा आपली वाढली असे वाटत असले तरी ते तितकेसे खरे नाही. कारण सत्ता मिळवण्या इतपत लोकप्रियता गुजरातमध्ये मिळवता आलेली नाही. त्याचप्रमाणे मोदी लाटेपेक्षा २०१४ मध्ये लोक काँग्रेसला कंटाळले होते त्यामुळे त्यांना नवा पर्याय काँग्रेसला नाकारण्यासाठी हवा होता. त्याचा परिणाम मोदींना कौल मिळाला होता. मिळालेला सगळा कौल हा भाजपप्रेमींचा नव्हता. त्यामुळे भाजपच्या मतात झालेली वाढ ही लाट नव्हती तर भाजपची मते फिक्स होती त्यात काँग्रेसविरोधी मतांची वाढ झालेली होती. त्यामुळे गुजरात निवडणुकीत भाजपची मूळची जी मते आहेत ती कायम राखत त्यांना सत्ता राखता आली. पण त्याचा अर्थ काँग्रेसला अनुकूल वातावरण झाले असे पसरवण्यात काँग्रेस थोडीफार यशस्वी झाली खरी. पण ते तितकेसे खरे नाही. म्हणूनच तोच ट्रेंड मध्यप्रदेशात कायम राखत भाजपला जोरदार धक्का देताना भाजपचे संख्याबळ कमी करणे हेच काँग्रेसचे ध्येय असेल असे दिसते. भाजपकडे असलेले मध्यप्रदेशातील १६५ चे संख्याबळ १२५ पर्यंत आले तरी भाजप स्पष्ट बहुमतात असणार आहे, पण भाजपच्या ४० जागा खेचून घेतल्याचे काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत दाखवता येणार आहे. मोदी लाट ओसरली आणि काँग्रेसला अच्छे दिन आले हे भासवण्यासाठी त्यांना या निवडणुका लढवायच्या आहेत. काँग्रेसला पसंती मिळते आहे हे सांगायला नाही मिळाले तरी चालेल, सत्ता मिळाली नाही तरी चालेल फक्त मोदी लाट ओसरती आहे हे बिंबवण्यापुरते यश मिळवण्याची व्यूह रचना काँग्रेसची असेल. त्यादृष्टीने मध्यप्रदेशची जबाबदारी त्यांनी ज्योतिआदित्य शिंदे यांच्याकडे सोपवलेली दिसते.भाजपकडील जी महत्वाची राज्ये आहेत त्यापैकी गुजरात आणि मध्यप्रदेश ही राज्ये आहेत. दोन्ही ठिकाणी दीर्घकाळ भाजपची सत्ता आहे. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर होईपर्यंत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहन यांनाही वाटत होते की आपणही पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार असू शकतो. त्यामुळे भाजपअंतर्गत जे मोदी विरोधक होते त्यामध्ये शिवराजसिंह चौहान एक होते. त्यामुळे चौहान यांना आपले वर्चस्व राखण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न हे त्यांच्यापुढचे आव्हान असेल. त्याचबरोबर मोदींच्या स्पर्धेत येणाºया प्रत्येकाला ज्या प्रकारे बाजूला जावे लागते तसे चौहान यांना बाजूलाही पडावे लागेल. २००८ मध्ये या राज्याचे निवडणूक निरीक्षक आणि जबाबदार नेते म्हणून भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्री असलेल्या मोदींची निवड केली होती. तेंव्हाच त्यांनी ३० टक्के नवे उमेदवार देणे आणि डागी आमदारांना बाजूला करणे हे धोरण आखत नवे चेहरे आणले. त्यामुळे मध्यप्रदेशात सत्तांतर झाले पण सत्ता भाजपकडेच राहिली होती. त्यामुळे मोदींच्या रणनीतीप्रमाणे पक्ष महत्वाचा आहे, व्यक्ती नाही असे भासवून भाजपची पडझड रोखण्यासाठी ते पावले उचलू शकतात. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ज्योतीर्आदित्य शिंदे यांचे पुढे आणलेले नाव हे फार महत्वपूर्ण आहे. याचे कारण ते तरूण आहेत. त्यांची लोकप्रियता चांगली आहे. खानदानी राजघराण्यातील आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अभ्यासू आहेत. काँग्रेसमध्ये अभ्यासू माणसांचा काही उपयोग नसला तरी भाजपला रोखण्यासाठी अभ्यासू माणसांचीच गरज आहे हे आता काँग्रेसला पटले असावे कदाचित, पण त्यांनी ज्योतिर्आदित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या तर नक्कीच काँग्रेसचे इप्सित साध्य होवू शकते. त्यादृष्टीने ही रणनीती महत्वाची आहे.
आर्थिक निकषांवर आरक्षण घटनाबाह्यच!
पुण्यात नुकत्याच झालेल्या मुलाखतीत राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आर्थिकदृष्ट्या आरक्षण असावे असे विधान केले. पवारांच्या या विधानानंतर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पण आर्थिक निकषावर आरक्षण घटनाबाह्य असल्याचे माहित असूनही शरद पवारांनी हा मुद्दा काढलाच कसा याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. याचे कारण तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासावरून, घटनेतील तरतूद आणि न्यायालयाने यापूर्वी दिलेले निर्णय यावरून आर्थिकदृष्ट्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवारांनी आरक्षणासाठी संघर्ष करणाºया आणि आरक्षणाचे खºया अर्थाने हकदार असणाºया मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाजाच्या जखमेवर मीठच चोळण्याचा प्रकार केलेला आहे.गेली साठ वर्षे आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील तरुणांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. कुवत असूनही संधी नसल्यामुळे अन्यायाच्या भावनेने महाराष्टÑातील ग्रामीण भागातील गोरगरीब, सुशिक्षीत तरुण चेपला गेला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ३४ टक्के इतकी मोठी संख्या या राज्यात असताना त्यांनी आरक्षण मागणे हे योग्यच आहे. गुजरात, हरयाणा, पंजाबात जसा तरुण पेटून उठला आणि त्यांचा उद्रेक झाला तसा मराठा समाज पेटला नाही. अतिशय संयमी भूमिका घेत लोकशाही मार्गाने त्यांनी आपल्या भावना मांडल्या. शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आपल्या भावना सरकार दरबारी पोहोचवल्या. तत्पूर्वीच नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील समितीने शिफारस करून मोठ्या अभ्यासाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ही भूमिका योग्य होती. सरकारलाही ती मनोमन पटली आणि राणे समितीच्या शिफारसीवरून हे आरक्षण लागू होणार होते. मात्र कुठेतरी माशी शिंकली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना शरद पवारांसारख्या जबाबदार नेत्याने या विचाराला छेद देत आर्थिक आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. मराठा तरुणांच्या अपेक्षांवर पाणी फिरवण्याचा हा प्रकार आहे. ज्या संयमाने लोकशाहीचा आणि कायदा सुव्यवस्थेचा मान राखत मराठा समाजाने एकजूट दाखवली त्याला शरद पवारांच्या लेखी काहीच किंमत नाही का? पटेल, जाट समाज ज्याप्रमाणे हिंसक झाला, रस्त्यावर उतरला तसा प्रकार मराठा समाजाने करावा असे पवारांना वाटते का? विनाकारण हा वाद निर्माण करून, आर्थिक आरक्षणचा बाद झालेला मुद्दा उकरून काढून पवारांनी काय साधले?शरद पवारांच्या या विधानानंतर अनेकांनी आपणही त्याच मताचे आहोत हे सांगून आपले अज्ञान प्रकट केले. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यावे लागेल. आर्थिक निकषावर आरक्षण असावे ही शिवसेनेची अगोदरच मागणी होती, शरद पवारांच्या अगोदर हे शहाणपण आम्हाला सुचले होते हे सांगून उद्धव ठाकरे, संजय राऊत मोकळे झाले. या दोघांचा याबाबत कदाचित अभ्यास नसेल किंवा अज्ञानाने त्यांनी असे म्हटले असेल असे मान्य केले तरी शरद पवारांना आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही हे माहित नव्हते का? माहिती असूनही त्यांनी असे विसंगत विधान का केले त्याचा शोध आता मराठी माणसाला घ्यावा लागेल. पवारांच्या नंतर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनीही पवारांच्या भूमिकेची रि ओढली.नारायण राणे यांच्या नेतृत्वाखलील समितीने आरक्षणाबाबत इतका खोलवर अभ्यास केला आहे, त्यातील बारकावे टिपले आहेत की मराठा समाजाला १६ टक्के, मुस्लिम समाजाला ६ टक्के आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही, ही शिफारस त्या अभ्यासातूनच आलेले फलीत आहे. आर्थिकदृष्ट्या आरक्षणाने सामाजिक न्याय दूर होणार असता तर या समितीने तशीही शिफारस केली असती. पण सर्व समाजघटकांना न्याय देवून कोणावर अन्याय होऊ न देता ही शिफारस केली असताना शरद पवारांनी त्यावर केलेले भाष्य हे कोणाही सुजाण माणसाला न पटणारे आहे.निकाली निघालेला मुद्दायापूर्वीच केंद्रात असलेल्या नरसिंहराव सरकारने २५ सप्टेंबर १९९१ रोजी आर्थिक निकषांवर आरक्षण दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने १६ नोव्हेंबर १९९२ रोजी ते घटनाबाह्य ठरवून रद्द केले. या खंडपीठातील न्या. पी. बी. सावंत यांनी यासाठीचा घटना दुरुस्तीचा पर्यायही न्यायालयात टिकणार नाही, असे मत नोंदवले होते. त्यामुळे हा मुद्दा निकाली निघालेला असताना, त्याच सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या शरद पवारांकडून आर्थिक आरक्षणाचे विधान कसे काय केले जाऊ शकते?अनेक अभ्यासकांचे याबाबत मत आहे की, आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर ते सर्व जाती-धर्मांच्या लोकांना दिले जाईल. म्हणजेच एससी, एसटी, ओबीसींना गट आणि आर्थिक आधार असे दुहेरी आरक्षण द्यावे लागेल आणि तेही घटनाविरोधी ठरेल. ही बाब शरद पवारांना माहिती नाही असे होणार नाही. यापूर्वी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती एस.एम.शिकरी यांच्या अध्यक्षतेखालील १३ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने केशवानंद भारती खटल्यात २४ एप्रिल १९७३ रोजी दिलेल्या निकालाचा दाखला काही अभ्यासकांनी याबाबत दिला आहे. घटनेचा मूलभूत गाभा (बेसिक स्ट्रक्चर) अपरिवर्तनीय आहे. त्यात घटना दुरुस्तीद्वारे संसदेला बदल करता येणार नाही. म्हणजे बेसिक स्ट्रक्चरमध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही व्यवस्था, धर्मनिरपेक्षता, मुलभूत अधिकार आदी बाबी येतात. त्यात संसदेला वाढ करता येईल, मात्र त्यांचा संकोच करणे किंवा त्या रद्दच करणे याचा अधिकार संसदेला नाही. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा कोणीही प्रयत्न केला तर तो घटनाबाह्य होईल. समतेचा मूलभूत अधिकारआरक्षण हा समतेच्या मुलभूत अधिकाराचा भाग आहे. ते घटनेच्या कलम १४, १५, १६, १७, १९, २१, २५ ते ३०, २४३, ३२६, ३३० ते ३४२ मध्ये येते. त्यात संसदेला घटना दुरुस्तीद्वारे मुलभूत बदल करता येणार नाहीत हे अनेकांना माहितच नसते. शरद पवारांनाही हे माहित नसेल असे वाटत नाही. त्यामुळे आर्थिक निकषावर त्यांनी केलेले भाष्य आश्चर्यकारक, चिंताजनक आणि संतापजनकही आहे.काळानुरूप गरज पडल्यास संसदेला राज्यघटनेत दुरूस्ती करता येते. भारतीय संविधानाच्या कलम ३६८ द्वारे ही घटना दुरूस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. विधेयक एकूण सदस्यांच्या बहुमताने किंवा सदनात त्यावेळी उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी दोन तृतीयांशपेक्षा कमी नाहीत अशा संख्येने मंजूर करता येते. त्याला राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते. याशिवाय राज्यांशी संबंधित अशा काही कलमांच्या घटना दुरुस्तीला किमान निम्म्या राज्यांच्या विधान मंडळांची मान्यताही घ्यावी लागते. त्यामुळेच आवश्यकतेनुसार आजपर्यंत १२३ वेळा घटना दुरूस्त्या झालेल्या आहेत. आणखी काही प्रस्तावित आहेत. पुढे आणखीही होतील. पण आरक्षण हा विषय वेगळा आहे. इथे घटना दुरुस्ती करूनही आर्थिक आरक्षण देता येत नाही. हे ५ दशके कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य असलेल्या शरद पवारांना माहित नाही असे कसे म्हणता येईल?
शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८
prafulla phadke mhantat: शिष्यांची लक्षणे अंतरी बाणवली पाहिजेत
prafulla phadke mhantat: शिष्यांची लक्षणे अंतरी बाणवली पाहिजेत: पाचव्या दशकातील तिसर्या समासात समर्थांनी शिष्यांनी कोणती लक्षणे अंतरी बाळगावीत याबाबत विवेचन केले आहे. सद्गुरु जर मिळाला नाही तर सत्शिष...
शिष्यांची लक्षणे अंतरी बाणवली पाहिजेत
पाचव्या दशकातील तिसर्या समासात समर्थांनी शिष्यांनी कोणती लक्षणे अंतरी बाळगावीत याबाबत विवेचन केले आहे. सद्गुरु जर मिळाला नाही तर सत्शिष्य वाया जातो. सत्शिष्य मिळाला नाही तर सद्गुरुला शिष्याला सत्शिष्य बनविण्यास बरेच श्रम घ्यावे लागतात. समजा, उत्तम जमीन आहे. तिच्यांतील खडे गोटे तण काढून ती चांगली साफ केली. पण तिच्यांत किडके बीज पेरले. किंवा उत्तम बीज खडकाळ जमीनींत पेरले. या दोन्ही ठिकाणी चांगले पीक येत नाही. तसेच सत्शिष्य आहे पण त्याला मंत्र-तंत्र सांगणारा गुरु भेटला तर ना प्रपंच ना परमार्थ अशी अवस्था होऊन हाती कांहींच लागत नाही. किंवा सद्गुरु ब्रह्मज्ञानी, पूर्ण कृपा करणारा व कृपाळू असला परंतु त्याचा शिष्य जर अनधिकारी, अपात्र, परमार्थाला अयोग्य भेटला तर एखाद्या भाग्यवान बापाचा मुलगा दरिद्री निघावा अशी अवस्था होते. यासाठी शिष्याने काही गुण आपल्या अंतरी बाळगणे आवश्यक असते. सद्गुरु व सत्शिष्य अशी जोडी जेथे असते तेथे सद्गुरुला कष्ट न होता सत्शिष्य तयार होतो. दोघांची हौस एकदम पुरविली जाते. आपलें ज्ञान दान योग्य ठिकाणी होते म्हणून सद्गुरु समाधानी तर आपल्याला उत्तम ज्ञानी सद्गुरु भेटला म्हणून सत्शिष्य पण समाधानी होतो. सत्शिष्याने साधना केली नाही तर सर्व फुकटच जाते. जोपर्यंत शेतांतील पीक घरी येऊन पडत नाही, तोपर्यंत सर्व गोष्टी करुन निगा राखावी लागते. पीक घरी आल्यावरही त्याची काळजी घ्यावी. थंडपणे बसून राहू नये. त्याप्रमाणे आत्मज्ञान झाल्यानंतरसुद्धा साधकाने सद्गुरुने सांगितलेले साधन चालू ठेवले पाहीजे. अविद्येच्या अमंमलाने ते ज्ञान मंद होता कामा नये. जसे एकदा पोटभर जेवले तरी परत जेवण बनविण्यासाठी सामुग्रीजवळ ठेवावीच लागते. म्हणून साधना, अभ्यास, सद्गुरु, सत्शिष्य, सत्शास्त्र विचार, सत्कर्माचार, सद्वासना या सगळ्या गोष्टी सातत्याने एकत्र राहील्या तरच निर्मळ आत्मज्ञान उदय पावते. आणि सत्शिष्य संसारांतून पार पडतो. नाहींतर लोकांमधे पाखंडाचा प्रचार होतो. म्हणून समर्थ याठिकाणी शिष्याच्या अंगी जी लक्षणे असावीत ते वर्णन करतात. ते म्हणतात, सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे सद्गुरुच्या वचनावर उपदेशावर त्याचा पूर्ण विश्वास हवा. सद्गुरुला तो अनन्यभावाने शरण असला पाहीजे. तोच खरा उत्तम शिष्य होय. शिष्य निर्मळ, आचारशीळ, अगदी विरक्त व चुकीबद्दल वाईट वाटणारा असावा. शिष्य निष्ठावंत, शुचिमंत आणि सर्व बाबतींत नियमाने वागणारा असावा. शिष्य मोठा उद्योगी तत्पर व अतींद्रिय लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणारा असाना. अशा सामर्थ्यानेच आत्म्याचे अनुसंधान साधते. शिष्य मोठा धीराचा व उदार व परमार्थाविषयीं अति तत्पर असावा. शिष्य परोपकारी असावा. तो निर्मत्सरी हवा. ग्रंथाचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या अंतरगांत शिरणारा असावा. ग्रंथकर्त्याचा आशय आकलन होणारा असावा. शिष्य अति शुद्ध, अति सावध आणि उत्तम गुणांचा असावा. शिष्य स्वतंत्र विचारशक्ति असलेला, तो प्रेमळ भक्त असावा. तो नीतीवंत व नीति मर्यादा सांभळणारा असावा. शिष्य मोठ्या युक्तीचा असावा. शिष्य मोठा बुद्धिवंत हवा. चांगल्या वाईटाचा विचार करणारा असावा. शिष्य धाडसी, निश्चयानें व्रत सांभाळणारा असावा. तो उत्तम कुळांतील व पुण्यशील असावा. शिष्य सात्विक, भगवंताला भजणारा आणि मनापासून साधन करणारा साधक असावा. शिष्य विश्वास ठेवणारा असावा. शरीराचे कष्ट सोसणारा असावा. परमार्थ कसा वाढेल याचे ज्ञान असणारा असावा. शिष्य स्वतंत्र, जगाचा मित्र असावा. तो सर्व गुणांनी संपन्न असलेला सत्पात्र असावा. भगवंतावर खरा भाव असलेला असावा. तो शुद्ध अंतःकरणाचा असावा. शिष्य अविवेकी नसावा. तो गर्भश्रीमंत नसावा. तो संसारांतील दुःखाने दुःखी झालेला, पोळलेला असावा. संसारांतील दुःखाने जो पोळलेला आहे, जो शारिरीक व मानसिक आधिव्याधींनी पोळलेला आहे, तोच परमार्थ साधण्याच्या दृष्टीने योग्य ठरतो. ज्यानें संसारांत पुष्कळ दुःख भोगलेले असते, त्याच्या अंगी परमार्थ बाणतो. अति दुःख भोगल्याने त्याच्या मनांत वैराग्य येते. ज्याला संसाराचा त्रास वाटूं लागतो, त्याच्या अंतरी परमार्थाबद्दल विश्वास निर्माण होतो. तो सद्गुरुची कास घट्ट धरतो. कांहीं कारणाने विश्वास उडून मधेंच सद्गुरुची साथ सोडणारे लोक, परत संसारांत बुडतात. संसारांतील सुखदुःखानी ते तसेच मरुन जातात. सद्गुरु व देव यांची जो बरोबरी करतो, तो शिष्य दुराचारी समजावा. त्याच्या मनांत भ्रामक खोट्या कल्पना बसलेल्या असतात त्यामुळे खरे तत्व काय आहे ते त्याला कळत नाही. ज्याच्यावर सद्गुरुकृपा असते त्याच्यावर इतर कोणाचीही सत्ता चालत नाही. आपल्या ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्यानें तो सार्या वैभवाला तुच्छ मानतो. सद्गुरुच्या कृपेने व सामर्थ्याने सत्शिष्याला आत्मसाक्षात्कार होतो. त्यामुळे मायेसह सारें विश्व त्याला दिसत नाही. खोट्या दृश्याचा आत्मज्ञानामुळे लोप होतो. उत्तम शिष्याचे वैभव व ज्ञान अशा प्रकारचे असते. सद्गुरुच्या वचनावर त्याचा दृढ विश्वास असतो. त्यामुळें तो सत्शिष्य ईश्र्वरस्वरुप बनुन जातो. सत्शिष्याचे अंतःकरण पश्चातापाच्या आगीने पोळतें ते निर्मळ व शुद्ध होते. ते पोळलेले अंतःकरण सद्गुरुच्या बोधाने शांत होते. सत्शिष्य हा असा असतो. सद्गुरुनें सांगितलेल्या मार्गाने साधना करीत असतां सारें ब्रह्मांड पालथे झाले तरी सद्गुरुच्या वचनावर असलेला सत्शिष्याचा अढळ व शुद्ध विश्वास कमी होत नाही. अशा रीतीनें जे खरे सद्गुरुला शरण जातात तेंच सत्शिष्य म्हणुन निवडले जातात. त्याच्यांत अंतरबाह्य बदल होऊन ते ईश्वर स्वरुप बनतात. सत्शिष्याच्या चित्तामधे सद्गुरुबद्दल अशी अढळ श्रद्धा असते. तोच मोक्षाचा अधिकारी होतो. बाकीचे शिष्य नुसते पोशाखीच असतात. एखाद्या शिष्याला स्मशानवैराग्य येते म्हणुन तो गुरुला शरण येऊन त्याच्यापुढें लोटांगण घालतो. पन ते वैराग्य फार वेळ टिकत नाही. त्यामुळे त्याला आत्मज्ञान होत नाही. थोडावेळ टिकेल एवढा भाव आणुन सद्गुरुकडून मंत्र घेतला त्या मंत्रपुरते तात्पुरते शिष्यत्व घेतले. अशा पद्धतीने पुष्कळ गुरु केले तरी परमार्थाचे ज्ञान होणार नाही. अशा शिष्याला लोकांत मिरवायला शब्दज्ञान पुष्कळ येते. तो अति बडबड्या, शिरजोर आणि दुष्ट तर्कवादी बनतो. जे लोक बिचारे मदोन्मत्त असतात त्यांना भगवंताची भेट होत नाही. पूर्वीं केलेल्या पापकर्मांमुळे त्यांची बुद्धि भगवंताकडे वळत नाही. असे अवगुण ज्यांच्यांत नाहीत असे सत्शिष्य वेगळेच असतात. त्यांची श्रद्धा बळकट असते. भाव शुद्ध असतो. त्यामुळें त्यांना आत्मज्ञान होते व ते आत्मानंदाची मजा चाखतात. शिष्याने हे गुण आपल्या अंगी बाणावेत आणि आपल्या गुरूची कृपा प्राप्त करावी असे समर्थ सांगतात.॥ जय जय रघुवीर समर्थ॥
prafulla phadke mhantat: ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर
prafulla phadke mhantat: ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर: आत्म निवेदनाला समर्थांनी नववी भक्ती असे म्हटले आहे. या भक्ती प्रकारो पदर उलगडून दाखवताना समर्थ सांगतात की, आपण सर्वस्वी स्वतःला भगवंताकडे...
‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर
आत्म निवेदनाला समर्थांनी नववी भक्ती असे म्हटले आहे. या भक्ती प्रकारो पदर उलगडून दाखवताना समर्थ सांगतात की, आपण सर्वस्वी स्वतःला भगवंताकडे सोपविणे, म्हणजे आत्मनिवेदन. त्याच्या ताब्यांत देणे किंवा स्वतःला देवाच्या हाती सोपविणे. सर्व काही त्याच्या हातात देणे. स्वतःला देवाला वाहाणे ही निवेदनाची खूण आहे. तत्वाचा शोध घेतल्यावर जे उरते ते म्हणजेच मी हा देवाला ममत्व सोडून वाहून टाकणे, हा त्यातील भाव आहे. मी भक्त आहे आहे असे एकीकडे म्हणायचे आणी दुसरीकडे वेगळेपणा धरुन भगवंताची भक्ती करायची. यामधिल विरोधाभास याठिकाणी विलक्षण वाटतो. म्हणजे एकीकडे एखादे लक्षण आहे असे म्हणायचे व दुसरीकडे तें लक्षण नाही असे वागायचे. किंवा एखाद्याला ज्ञान आहे असे म्हणायचे व दुसरीकडे तें ज्ञान नाही असे वागायचे. त्यामुळे लक्षण आहे व लक्षण नाही, किंवा ज्ञान व अज्ञान या गोष्टी एकावेळी असू शकत नाहीत. त्याचप्रमाणे एखादा माणुस एकाचवेळी भक्त व विभक्त असू शकत नाही. भक्त हा भगवंतापासून वेगळा नाही. जो भगवंतापासून वेगळा आहे तो भक्त नव्हे. परंतु आत्मानात्म विचार केल्याखेरीज या गोष्टी समाधानकारक रीतीने समजणार नाहीत. म्हणून विचार करुन देव कोण ते ओळखावे. आपला आपणच आपल्या अंतरी शोध घ्यावा. आणी जाणून घ्यावे, असे याठिकाणी समर्थ उलगडा करतात. मी कोण आहे हा साधा प्रश्न वाटतो. पण याच्या मागच्या तत्वाचा विचार करायला लागल्यावर जो मी आपण समजतो तो खरा मी नाही असे समजते. एका तत्वाने दुसर्या तत्वाचे निरसन होत नाही. तेव्हां आपण निराळे उरत नाही. अशारीतीने तत्वनिरसनाने आत्मनिवेदन सहजच होते. सगळे दृश्य विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे. त्यांचे विवेकानें विवरण केले तर सर्वांचा निरास होतो. म्हणजे ती शेवटपर्यंत खरेपणाने टिकत नाहीत.अशारीतीने दृश्य विश्वाचे अथवा प्रकृतीचे निरसन झालें की आत्मस्वरुपच शिल्लक उरते. मग आपला मी वेगळा राहातच नाही. मुख्य मुलतत्वे दोनच आहेत. एक परमेश्वर व दुसरी विश्वाचा आकार. त्या दोघांमध्ये तिसरा मी हा कोणी येतच नाही. परमात्मा आणी प्रकृती हीं दोन मूलतत्वें स्वतः सिद्ध आहेत. परंतु मुळांत नसलेला आणी या कारणासाठी खोटा असलेला देहाहंकार आपल्याला चिकटतो. तरीपण विचारानें शोध घेतल्यास त्याला कांही आधार नाही असा निश्चय होतो. व्यक्ति आणि विश्व यांमधील तत्वांची रचना शोधून पाहिली, त्याचप्रमाणें तत्वांची मीमांसा करुन पाहिली तर असे आढळते की, या विश्वामधील अनेक प्रकारचे अगणित आकार किंवा दृश्य वस्तु हा सगळा तत्वांचाच विस्तार आहे. आपल्या देहासकट या विश्वाकडे आपण साक्षित्वाने पाहूं लागलो, म्हणजे केवळ बघणार्याची भूमिका ठेवून तिर्हाईतपणाने पाहूं लागलो तर ती तत्वें सहज नाहीशी होतात. नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला कीं साक्षीपणाही उरत नाही. विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता. तसाच विश्वाच्या शेवटीसुद्धा आत्माच शिल्लक राहतो. हें जर खरे तर आपल्या मीपणाला वेगळें अस्तित्व राहातच नाही. आत्मा सगळीकडे व्यापून आहे. आपल्या आनंदानें तो संपूर्ण भरलेला आहे. मीच तो आत्मा आहे असे श्रुति सांगते. तर मी आणखी कोणी निराळा असू शकत नाही. म्हणून देहाचा अहंकार खोटा आहे. कोऽहम् या प्रश्नाचे उत्तर सोऽहम् मी कोण याप्रश्नाचे उत्तर तो मी आहे. या उत्तरामध्ये असणारा सर्व अर्थ उकलून पहावा. आत्म्याच्या विचारांत शिरले कीं मी आणखी कोणी निराळा आहे हे सिद्ध होत नाही.अशाप्रकारे अतिशय गूढ अर्थ समर्थांनी याठिकाणी उलगडलेला दिसतो. सोऽहम् म्हणजे तो आत्मा मी आहे. आत्मा निर्गुण व निरंजन म्हणजे दृश्याच्या पलीकडे व मलरहित आहे. मी तोच असल्याने त्याच्याशी अनन्य आहे. अनन्य म्हणजे मी व तो वेगळे नाही. हें जर खरे तर मी कोणी निराळा आहे असे कसे म्हणता येईल. आत्मा अद्वैत आहे, अद्वैत म्हणजे द्वैत नाहीं तें, ज्यांत दुसरेपणा नाहीं तें. असें जर आहे तर आणखी वेगळ्या मी पणाचे कारण असूंच शकत नाही. आत्मा सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे. तो मूर्तिमंत पूर्णता आहे. तेथें गुण व अवगुण दोन्हीही नाहीत. मानवी बुद्धिला गुणांवाचून वस्तूची कल्पनाच करता येत नाही. म्हणुन सर्व अनात्मवस्तु आपण सगुण म्हणतो. पण आत्मवस्तु मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने आपण तिला निर्गुण म्हणतो. तत् त्वम् असि म्हणजे तूं ते ब्रह्म आहेस असें उपनिषदांतील स्वानुभवाचे वाक्य आहे. या तिनही पदांच्या पलिकडे असलेल्या आत्मस्वरुपापर्यंत जो पोहोचला, त्याला भेद व अभेद दोन्ही लटके होतात. त्याला मी देह आहे अशी मीपणाची निराळी अवस्था कशी असणार? म्हणून मीपणा असत्य आहे. मी जीव आहे व तो शिव आहे. हा विद्या अविद्यांनी निर्माण केलेला भेद आहे. त्या भेदाची उपाधि नाहींशी केली तर आत्मस्वरुपांत जीवशिव असा भेद नाही हे लक्षांत येईल. असा निश्चय झाला की मी राहणार नाही. मी देह आहे या भावनेमुळे आपण कोणी निराळे आहोत, स्वतंत्र आहोत, असा जो आपला दृढ विश्वास असतो, तो भ्रम असतो. तो असत्य आहे. एक भगवंत काय तो खरा आहे.तसेच भक्त व भगवंत दोघे निराळे दिसले तरी ते वेगळे नसतात. दोघे एकमेकाशी अनन्य असतात. एकरुप असतात. हे जे मी (समर्थ) सांगतो त्याचा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळेल. भक्तानें आपला संपूर्ण मीपणा भगवंताला वाहणें आणि त्याच्याशी संपूर्णपणे एकरुप होऊन जाणें यास आत्मनवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदनानेच ज्ञानी पुरुषांना समाधान लाभते. याप्रमाणे नवव्या भक्तीचे लक्षण समर्थांनी सांगताना त्याचे विविध अंगांनी पदर उलगडलेले आहेत. ज्याप्रमाणे पंचमहाभूतांमध्यें आकाश, सगळ्या देवांमध्ये जगदिश श्रेष्ठ, त्याचप्रमाणें भक्तीचे जे नऊ प्रकार सांगितले त्यामध्यें नववी म्हणजे आत्मनिवेदन भक्ति सर्वांत श्रेष्ठ भक्ति आहे. नववी भक्ति जी आत्मनिवेदन ती जर साधली नाही तर माणसाचें, भक्ताचे जन्ममरण चुकणार नाही, हे माझे बोलणे अगदी खरे आहे, अनुभवाला धरुन आहे, तें खोटे होणार नाही. असे समर्थ सांगतात. नवविधा भक्ति ही अशी आहे. ती आचरली तर सायुज्यमुक्ति मिळते. या सबंध विश्वाचा लय झाला तरी सायुज्यमुक्ति अचल राहते. तिच्यामध्यें बदल होत नाही. एकंदर मुक्ति चार आहेत. त्यापैकी पहिल्या तीन मुक्तींमध्ये फरक घडून येतो. सायुज्यमुक्ति मात्र अचल राहते, तिच्यांत फरक पडत नाही. तिन्ही लोकांचा शेवट झाला तरी सायुज्यमुक्तिमध्यें कोणताही फेरबदल होत नाही ती जशीच्या तशीच कायम राहते. वेद व शास्त्रे यांनी एकंदर चार प्रकारच्या मुक्ति वर्णन केल्या आहेत. त्यापैंकी तीन नश्वर आहेत. अशाश्वत आहेत. पण चौथी मात्र शाश्वत आहे. अविनाशी आहे. पहिली मुक्ति स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरुपता आणि चौथी सायोज्यमुक्ती होय. अशा या चार मुक्ति भगवंताच्या भक्तीनें माणसाला त्या प्राप्त होतात. अशा प्रकारे समर्थांनी याठिकाणी आत्मनिवेदन भक्तीचे पदर उलगडून हे गूढ ज्ञान सोपे करून सांगितले आहे. ॥ जय जय रघुवीर समर्थ॥
“ दास्यभक्ती” हा देवदर्शनाचा उंबरठा
देवाचें दास्य करणें म्हणजे सातवी भक्ति होय. देवाच्या दाराशी त्याची सेवा करण्यासाठी असणे, देवाचे जे काम असेल ते आपण करणे. म्हणजे अर्थातच खर्या अर्थाने तो देवदर्शनाचा उंबरठाच म्हणावा लागेल. या दास्यभक्तीमध्ये देवाच्या वैभवाचे रक्षण करणे, ते कमी होऊं न देणे, ते वाढेल तसे वाढवणे व वाढवण्याचा प्रयत्न करणे. ही जबाबदारी येते. त्यामुळे हे साक्षात करणे म्हणजेच देवदर्शनाचा तो उबंरठा आहे. आता फक्त देवाच्या जवळ पोहोचण्याची वाट पहायची आहे, इतक्या आपण या भक्तीतून जवळ पोहोचला आहोत. थोडीशीच उंबरठ्याची सीमा ओलंडण्याइतकी भक्ती करणे बाकी आहे. त्यासाठी काय काय केले पाहिजे हे समर्थ याठिकाणी सांगतात. त्यासाठी भंगलेली देवालयें दुरुस्त करावीत. मोडलेले तलाव, पाण्याचे साठे दुरुस्त करावेत. सोपे, धर्मशाळा बांधाव्या. मोडल्या असतील तर त्यांचे नूतनीकरण करावे. या वास्तु नगररचनेतील वैभव असते. हे देवाचेच वैभव आहे असे समजून त्यांचा जिर्णोध्दार करावा.जेणेकरून गरजू लोकांना त्याचा लाभ होईल आणि परमेश्वराची आपल्यावर कृपा होईल. त्यासाठी जुन्या मोडकळीसआलेल्या धर्मशाळा वगैरे बांधकामांचा जीर्णोद्धार करावा. देवाचे जे जे कार्य असेल ते ते लगोलग करीत जावे. हत्ती, रथ, घोडे, सिंहासनें, चौरंग, पालख्या, सुखासने, पलंग, डोलारे, विमानें वगैरे सर्व नविन करावें. मेघडंबर्या, छत्रें, चौरें, अबदागिर्या, पुष्कळ निशाणें, या वस्तु साफ करुन निट जतन कराव्या.ही कर्म आपल्याला परमेश्वराच्या दाराकडे घेवून जातात. तो म्हणजे देवदर्शनाच उंबरठा असतो. प्रयत्नपूर्वक करावीत. घरें, खोल्या, पेट्या, पेटारे, रांजण, पाण्यासाठी मोठी भांडी, पुष्कळ घागरी, अशा किमती वस्तु देवासाठी द्याव्या. ज्याचा लाभ इतरांना घेता येईल अशा सुविधा निर्माण करणे म्हणजेच देवदर्शनाजवळ पोहोचणे. दास्यभक्तीत परमेश्वराचे काम केले जाते. ते निरपेक्षपणे केले जाते. त्यासाठी कसलाही मोबदला, वेतन, पगार, मजूरी मिळण्याची अपेक्षा नसते. या कामाचा लाभ घेणारा माणूस म्हणजे तो परमेश्वराने लाभ घेतला आहे असे ेसमजणे म्हणजेच परमेश्वराच्या दर्शनासाठी सिद्ध होणे. त्याच्या दर्शनाच्या उंबरठ्यापर्यंत जाणे असे असते. अनेक ठिकाणी भुयारे, तळघरे, बोगदे करावेत. त्यांना गुप्त दारे ठेवावीत.मौल्यवान वस्तु ठेवण्यासाठी कोठारे प्रयत्नपूर्वक करावीत. देवासाठी, त्याच्या उत्सवासाठी दागिने, भूषणें, उंची वस्त्रे, सुंदर रत्नें, अनेक धातुंची व सोन्याची भांडी मोठ्या प्रयत्नाने मिळवावीत. फुलबागा, रानें, झाडांच्या राया, तयार कराव्या, त्यांना पाणीवगैरे देऊन त्यांची निगा राखावी. निरनिराळ्या जनावरांसाठी, तबेले, निरनिराळे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह, अनेक वाद्ये, नाटकशाळा व रंगभूमी, पुष्कळ चांगले गायक, स्वयंपाकघरे, जेवण्यासाठी पाकशाळा, स्वयंपाकाचे सामान ठेवण्यासाठी कोठ्या, झोपण्यासाठी कोठ्या, सर्व कोठ्या मोठ्या ठेवाव्यात. हा सर्व सेवाभावी वृत्तीने करायचा प्रकार आहे. याचा उपभोग घेणारा परमेश्वर आहे हे समजून हे कार्य करायचे आहे. अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तु ठेवण्यासाठी जागा, निरनिराळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ व फळे ठेवण्यासाठी जागा, पातळ पदार्थ ठेवण्यासाठी जागा, प्रयत्नपूर्वक बनवाव्यात. निरनिराळ्या वस्तु ठेवण्याच्या जागा जर जुन्या झाल्या असतील अगर मोडकळीस आल्याअसतील तर नविन कराव्या, देवाचे वैभव वर्णन करुन सांगावे तेवढे थोडेच. त्यामुळे हे वैभव जपण्याची जबाबदारी या दास्यभक्तीत येत असते. म्हणजे साक्षात देव आपल्या जवळ आहे, त्याचे काम आपण करतो आहोत ही समजूत होणे म्हणजे देवाच्या उंबरठ्यावर आपण पोहोचलो आहोत. देवाकडे येणार्या सर्व भक्तांविषयी आदर बाळगावा. त्यांची व भगवंताची सेवा करण्यास तत्पर असावे. आपल्या वाट्याचे काम लगेच करावे. देवाच्या जयंत्या, पर्वे मोठ्या वैभवाने करावेत की जे पाहून स्वर्गांतील देवसुद्धा थक्क होतील. देवाचे वैभव वाढवत ठेवावे. तसेच हलक्यांतील हलकी देवाची सेवा करण्यासही नेहमी तयार असावे. देवासाठी जें जें आवश्यक असेल तें तें त्वरित द्यावे. अत्यंत आवडीने देवाची सर्व सेवा करावी. देवाचे पाय धुण्यासाठी, स्नानासाठी, आचमनासाठी पाणी ठेवावे. गंधक्षता, वस्त्रे, अलंकार, आसनें, निरनिराळी फुलें, धूप, दीप, नैवेद्य तयार ठेवावा. हे सर्व आपण देवाने नेमलेले दास आहोत असे समजून निरपेक्षपणे करायचे असते. एका दासाला ज्याप्रमाणे त्याचा धनी भेटतो तसाच देव आपल्याला भेटणार आहे याची खात्री मनात बाळगायची असते. त्यामुळे दास्य भक्ती हा खर्या अर्थाने देवदर्शनाचा उंबरठा आहे. देवाला निद्रा घेण्यासाठी चांगल्या खोल्या, पिण्यासाठी गार पाणी, विडा, रागदारीने रसाळ गायन गावे. सुगंधी पदार्थ, फुलांची तेले, निरनिराळी सुगंधी तेलें, पुष्कळ खाण्याचे पदार्थ, फळे,देवाच्या जवळच ठेवावीत व प्रसाद म्हणून लोकांना पण द्यावीत. झाडलोट करावी, सडा घालावा, रांगोळ्या काढाव्या, पाण्याच्या भांड्यांत स्वच्छ पाणी भरुन ठेवावे, देवाचे कपडे, वस्त्रे स्वच्छ धुवून ठेववीत. देवाच्या दर्शनास येणार्या सर्वांचे आदरातिथ्य करावे. अशी ही सातवी दास्य भक्ती आहे. देवाच्या दासाचे बोलणे करुणेने भरलेले दयाद्र असावे, दुसर्याबद्दल व देवाबद्दल चांगले बोलावे की त्यामुळे सर्वांना समाधान वाटेल. अशी ही भक्ती माझ्या अल्पबुद्धिने वर्णन केली. प्रत्यक्षांत सर्व करता आली नाही तरी मानसपूजेंत करावी, असे या भक्तीचे वर्णन समर्थांनी केलेले आहे. असे देवाचे व तसेच सद्गुरुचे दास्यत्व करावे. जरी प्रत्यक्ष करता आले नाही तरी मानसपूजेंत करावे. हे सर्व आपणास देवदर्शन घडवणारे आहे. इथे असलेला सेवाभाव आपले मी पण, अहंकार नष्ट करून टाकणारा आहे. आपला स्वामी तो परमेश्वर, राम आहे हे समजून केलेले कार्य म्हणजेच मी पण संपणे. अहंकाराचा नाश जिथे होतो तिथे माझे काही रहात नाही. जे काही आहे ते त्या ईश्वराच्या, देवाच्या, रामाच्या कृपेने आहे हा भाव माणसाला देवदर्शन घडवतो. त्यामुळे दास्यभक्ती करणे म्हणजे देवदर्शनाच्या उंबरठ्यावरच पोहोचणे असे आहे.
॥ जय जय रघुवीर समर्थ॥
गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८
हा पवारांकडून मराठा समाजाचा अपमानच
विविध समाजघटकांकडून आरक्षणासाठी आंदोलने होत असली तरी जातीच्या निकषावर नव्हे, तर आर्थिक निकषावरच आरक्षण द्यायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात झालेल्या जाहीर मुलाखतीत व्यक्त केले. राजकारणात ५ दशके घालवून कोणाला कसे अडचणीत आणायचे याचे धूर्त आणि मतलबी राजकारण केलेल्या शरद पवारांची सवय ही जुनीच आहे. पण या वक्तव्यामुळे ज्या लोकशाही मार्गाने, सर्वांचा सन्मान करत मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू होते त्याला जाता खिळ घालण्याचे काम शरद पवारांनी केलेले दिसते. शरद पवारांनी केलेले गोंधळ आणि गुंते नेहमीच अवघड असे असतात. इतके की ते चालता चालता पायाने गाठी मारतात त्या कोणाला हाताने सुटणार नाहीत याची खबरदारी त्यांनी घेतलेली असते. त्यामुळे अशा विचारांना आता मराठी माणसाने कितपत जवळ करायचे याचा विचार करायची वेळ आलेली आहे. मुंबईत तीस वर्षांपूर्वी झालेल्या जागतीक मराठी परिषदेत एका ख्यातनाम गोंधळींचा सत्कार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे उपस्थितीत करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्टÑाचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या पु ल देशपांडे यांनी व्यासपीठावर त्या गोंधळींचा उल्लेख करताना म्हटले होते की यांच्याइतका छान गोंधळ आमच्या राजकीय नेत्यांनाही घालायला जमत नाही. असे म्हणून शरद पवारांकडे त्यांनी कटाक्ष टाकला होता. त्यावर शरद पवार आडवे पडून जोरात हसले होते. पण आज पुलंचे शब्दही शरद पवारांनी खोटे ठरवून टाकले आहेत असे यातून दिसते.व्यक्त केले. यापुढील काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाच आरक्षण दिले गेले पाहिजे, असे पवार यांनी स्पष्ट केले आणि गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रयत्नांवर प पाणी फेरण्याचे काम त्यांनी केले असेच म्हणावे लागेल. शरद पवारांनी आपल्या मुत्सद्दीपणाने आपल्या मागासवर्गीय मतांना धक्का लागू नये याबाबत पूर्ण काळजी यावेळी घेतली. ते म्हणाले की, दलित आणि आदिवासी समाजघटकांना आरक्षण देण्याबाबत कोणाचीच तक्रार नाही; परंतु जातिनिहाय आरक्षणाऐवजी आर्थिक दुर्बलांनाच आरक्षण अधिक योग्य राहील. म्हणजे ज्यांच्यासाठी पूर्वीपासून आरक्षण आहे ते कायम ठेवून नवे कोणाला देवू नये असेच त्यांनी सुचवले आणि मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम जाता जाता केले. त्यामुळे अशा कायम अडचणीत आणण्याचे राजकारण करणाºयांना किती जवळ करायचे याचा विचार आता मराठा तरूणांना करायला पाहिजे. आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलनाबाबत राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी जाती-जातींतील संघषार्बाबत खेद व्यक्त केला. ही त्यांची दुटप्पीपणाची भूमिकाच म्हणावी लागेल. पवार म्हणतात, जातीनिहाय संघटना बळ देण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सत्तेत असलेल्या घटकांकडून अशा संघटनांना प्रोत्साहन दिले जात असल्याने सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हा रोख नक्की कोणावर होता? आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज एकवटत असताना त्या एकजुटीला अशा चष्म्यातून पाहणे हे ज्येष्ठ नेत्याला शोभणारे आहे काय? मराठा समाज शांततेने आणि लोकशाही मार्गाने आपल्या उत्कर्षासाठी एकवटला असेल तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय? मराठा समाजाने आपल्या हक्कासाठी काही मागण्या केल्या तर त्यात गैर काय आहे? आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज संघर्ष करत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून सतत मागणी हा समाज करत आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मराठा आरक्षणच्या समितीची जबाबदारी पार पाडत असताना राणे समितीने मराठा समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणा आहे हे पाहिले होते. त्यामुळे हे आरक्षण देण्यासाठी अनेक तज्ज्ञांसोबत त्यांनी चर्चा केली होती. राज्यघटनेतील कलम १५ आणि १६ (४) मध्ये मागासवगीर्यांसाठी आरक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार राज्य सरकारला अशा प्रकारचे आरक्षण देण्याचा अधिकार आहे. त्यातही तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण कसे देता येईल, याचा विचारही या समितीनकडून करण्यात आला होता. यासाठी अनेक अधिकाºयांनी तामिळनाडूला जावून त्याचा अभ्यास केला. यामुळे कायदेशीरदृष्टया हे आरक्षण मिळावे, यासाठी जेवढे पुरावे लागतील ते देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले करून या समितीचा अहवाल सादर केला होता. अत्यंत अभ्यासूपणाने केलेल्या समितीच्या शिफारसीवरुन मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षणाची तरतूद करण्याचे ठरले होते. पण अन्य काही लोकांनी त्याविरोधात न्यायालयात जावून त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. आज न्यायप्रविष्ठ बाब असताना आणि अशा महत्वपूर्ण बाबीचा निर्णय होण्याची वेळ आलेली असताना शरद पवारांनी आपल्या सवयीप्रमाणे या वाटचालीत कोलदांडा घातला आहे. आपल्या हक्कासाठी गेल्या वर्षभरात ज्या प्रकारे मराठा समाज एकवटला आणि ज्याप्रकारे शांततेत ५५ मोर्चे यशस्वी करुन दाखवले त्यावरुन खºया अर्थाने लोकशाहीचा सन्मान कसा करायचा हे या समाजाने दाखवून दिले आहे. असे असताना मराठ्यांना आरक्षण देण्याची वेळ आल्यावर आर्थिकदुर्बलांसाठी आर्थिक आरक्षणाचा विचार शरद पवारांना सुचत असेल तर सर्वच आरक्षणो रद्द करून फक्त आर्थिकदृष्ट्या मागासांनाच आरक्षण द्यावे असे शरद पवारांनी का जाहीर केले नाही? १९६१ साली महाराष्ट्र राज्य स्वतंत्रपणे अस्तित्वात येऊन स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. शंकरराव चव्हाण यांच्यासारखे समाजाची जाण असणारे बुर्जग मंत्री महाराष्ट्राला लाभूनही मराठा समाजाच्या संपूर्ण उन्नतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्याकडून दुदैर्वाने ठोस प्रयत्न झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर कोकणचे भूमिपुत्र नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाकरिता उचललेले पाऊल अत्यंत महत्वाचे होते. तमाम मराठा समाजानेच नाही तर अन्य समाजानेही या कार्याचे कौतुक केले होते. असे असताना ऐन निर्णयाच्या वेळी असे वक्तव्य करून शरद पवारांनी मराठा समाजाचा अपमानच केलेला आहे, असेच म्हणावे लागेल.Attachments area
Click here to Reply or Forward
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)