शुक्रवार, १९ जून, २०२६

नेहरू आणि मोदी यांची तुलना करणे अयोग


कोणत्याही दोन व्यक्तींची तुलना करणे हे पूर्णपणे चुकीचे असते. पण, आपली मानसिकता तुलनेतून पाहण्याची असते, त्यामुळे कितीही चांगली कामगिरी केली तरी त्याचे योग्य मूल्यमापन होत नाही. हे फक्त राजकारणातच आहे असे नाही. पूर्वी दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांची तुलना केली जायची. कुठे अमिताभ आणि कुठे दिलीपकुमार? का तुलना करायची? प्रत्येकाचे श्रेष्ठत्व वेगळे असते. गावसकर आणि मोहिंदर अमरनाथ यांची तुलना केली जायची. ही तुलना कधीच योग्य नाही. प्रत्येकाने काही ना काही योगदान दिलेले आहे, म्हणून त्यांचे नाव असते. गेल्या पंधरा दिवसांपासून नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे. हे कशासाठी केले जात आहे?


देशाचे पहिले पंतप्रधान, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सध्याचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यासाठी वस्तुनिष्ठ विश्लेषण केले पाहिजे. कॅबिनेट मिशन योजनेंतर्गत नवीन काँग्रेस अध्यक्षांना ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील अंतरिम सरकारचे नेतृत्व करायचे होते. एप्रिल १९४६ मध्ये विविध राज्यांमधून नावे काँग्रेस कार्यकारिणी समितीकडे आली. कृपलानी आणि पट्टाभी सीतारामय्या यांना प्रत्येकी एक मत मिळाले, तर उर्वरित मते सरदार पटेलांना मिळाली, त्यामुळे नेहरूंना शून्य मते मिळाली. असे असूनही गांधीजींच्या कृपेने नेहरू पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले. हे संदर्भ नेहरूंच्या ‘सिलेक्टेड वर्क्स’ या पुस्तकात, तसेच मौलाना आझाद, सरदार पटेल आणि कृपलानी यांच्या पुस्तकांमध्ये आढळतात.

यानंतर नेहरूंनी २ सप्टेंबर १९४६ रोजी ब्रिटिश राजसत्तेशी निष्ठेची शपथ घेतली आणि त्यानंतर वेव्हेल व माऊंटबॅटन यांनी शपथ दिल्यानंतर १५ आॅगस्ट १९४७ रोजी अंतरिम सरकारचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर त्यांनी १३ मे १९५२ रोजी सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. गांधीजींच्या कृपेने, ब्रिटिशांच्या सोयीने आणि बिनविरोध निवडणुकीमुळे ते पंतप्रधानपदी पोहोचले. याउलट १३ सप्टेंबर २०१३ रोजी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून एकमताने निवड झाली. संपूर्ण पक्षाचा आणि त्यानंतर प्रबळ जनसमर्थन मिळवून, तसेच कोणत्याही प्रकारची मेहरबानी किंवा सोय न करता पूर्ण बहुमत मिळवून त्यांनी भारताच्या लोकशाही राजकारणात एक नवीन अध्याय लिहिला. त्यामुळे मोदींची नेहरूंशी तुलना करणे निरर्थक आहे.


जेव्हा चीन तिबेटमध्ये होता आणि चिनी सैन्यावर उपासमारीचे संकट होते, तेव्हा तिबेटमधील रस्ते चिनी बाजूला नव्हे, तर भारतीय बाजूला अधिक चांगले होते. नेहरूंनी चिनी सैन्याला ३,५०० टन तांदूळ पाठवला. १९४७ मध्ये चीनकडे हवाई दल नव्हते, पण भारताकडे होते. चीनचे हवाई दल १९४९ मध्ये स्थापन झाले. तरीही १९ नोव्हेंबर १९६२ रोजी नेहरूंनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांना पत्र लिहून केवळ विमानांचीच मागणी केली नाही, तर ईशान्य भारताच्या संरक्षणासाठी भारतीय हवाई दलाची कमान अमेरिकेकडे सोपवण्याचीही मागणी केली. नेहरूंचे पुतणे, बी. के. नेहरू जे त्यावेळी अमेरिकेतील भारताचे राजदूत होते, त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, ते पत्र इतके अपमानकारक होते की राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागाराकडे ते सुपूर्द केल्यानंतर त्यांना रडू आवरता आले नाही.

गलवान संघर्षात २० भारतीय सैनिक शहीद झाले असले, तरी आंतरराष्ट्रीय सूत्रांच्या अंदाजानुसार ५५-६० चिनी सैनिक मारले गेले. कदाचित या मोठ्या संख्येमुळेच चीनने आपल्या जीवितहानीची यादी कधीही जाहीर केली नाही. बालाकोटच्या वेळी, पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमधील एका खासदाराने सांगितले की, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री तिथे बसले होते आणि लष्करप्रमुख आत आले. त्यांचे पाय थरथरत होते आणि ते म्हणाले की, देवाच्या नावावर अभिनंदनला परत करा, नाहीतर भारत रात्री ९ वाजेपर्यंत हल्ला करेल. हे स्पष्ट आहे की नेहरूंच्या कमकुवत लष्करी धोरणाची आणि मोदींच्या भक्कम लष्करी धोरणाची तुलना होऊच शकत नाही.


१५ आॅगस्ट १९४७ रोजी नेहरूंनी स्वतंत्र भारताच्या सरकारचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, अक्साई चीन आणि मानसरोवर भारतापासून वेगळे झाले. पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले आणि नेहरूंनी स्वत: काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये नेला व संविधानात कलम ३७०चा समावेश केला. याउलट आॅगस्ट २०१९ मध्ये जेव्हा मोदींच्या नेतृत्वाखाली कलम ३७० रद्द करण्यात आले, तेव्हा पाकिस्तान आणि त्याचे आंतरराष्ट्रीय हस्तक संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या विरोधात एकही ठराव मांडण्यात अयशस्वी ठरले.

ब्रिटिश गेल्यानंतरही नेहरूंनी भारताच्या आत्मसन्मानाशी तडजोड करणे सोडले नाही. त्यांनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला विरोध केला, तर दुसरीकडे मोदींनी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरे केले. नेहरूंनी १७ मार्च १९५९ रोजी आपल्या भाषणात म्हटले होते की, दक्षिण भारतातील भव्य मंदिरांच्या दालनांमध्ये त्यांना नैराश्य येत असे, पण ताजमहालसमोर त्यांचे मन आनंदाने भरून येत असे. याउलट मोदींनी काशी विश्वनाथ, केदारनाथ, महाकाल, कर्तारपूर साहिब दालने आणि भव्य श्रीरामलल्ला मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा करून भारताचा आत्मसन्मान जागृत केला.


नेहरूंनी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी काही आवश्यक पावले उचलली, पण त्यांची दूरदृष्टी विज्ञानातही पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याच्या इच्छेने प्रेरित होती. भारत हे करू शकेल, असा आत्मविश्वास त्यांच्यात नव्हता. जर नेहरूंनी १९५० मध्ये बांधलेल्या एम्सच्या जोडीला जर आयुर्वेदिक एम्स बांधले असते, तर आज आपण वैद्यकशास्त्राच्या या क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी असतो. पण मोदींनी ते करून दाखवले. नेहरूंनी हे तेव्हाच केले असते तर मलेरियावरील वनौषधींसाठीचा नोबेल पुरस्कार चीनला मिळाला नसता आणि २०१६ मध्ये उपवासाच्या फायद्यांसाठीचा नोबेल पुरस्कार जपानला मिळाला नसता.

१९५९मध्ये राधाकृष्णन समितीच्या शिफारशीनुसार देशात कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली आणि पंतनगर हे देशातील पहिले असे विद्यापीठ ठरले. ही एक चांगली कल्पना होती, पण कृषी क्षेत्रात पाश्चिमात्य देशांचे आंधळे अनुकरण करण्याऐवजी, जर भारताच्या पारंपरिक सेंद्रिय शेतीसाठीही एक विद्यापीठ स्थापन केले असते, तर आज जगाला हव्या असलेल्या सेंद्रिय शेतीत आपण जगाचे नेतृत्व केले असते. मोदींनी आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळवून दिली आणि सेंद्रिय शेतीसाठी मोहीम सुरू केली. होमी भाभांच्या प्रयत्नांमुळे भारत नेहरूंच्या काळात अणुशक्ती बनू शकला असता, पण नेहरू तसे करू शकले नाहीत. मोदींनी भारताचे नौदल, भूदल आणि हवाई दल अणुशक्तीने सुसज्ज केले.


१६ मे २०१४ रोजी, जेव्हा मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले, तेव्हा लंडनस्थित ‘संडे गार्डियन’ने १८ मे रोजीच्या आपल्या संपादकीयाला भारताची नियतीशी दुसरी भेट, अशा अर्थाचा मथळा दिला होता. ही तुलना नेहरूंच्या १५ आॅगस्ट १९४७ रोजीच्या ‘भारताची नियतीशी भेट’ या ऐतिहासिक भाषणाशी करण्यात आली होती. या वृत्तपत्राने लिहिले की, १९४७ नंतर सत्तेवर आलेले पक्ष ब्रिटिश वारशाच्या विचाराने प्रेरित होते. आता निरंकुश सत्ता अशा पक्षाकडे आली आहे, ज्यावर कोणताही ब्रिटिश प्रभाव नाही. त्यात असेही लिहिले होते की, १६ मे २०१४ हा दिवस भारतीय इतिहासात ब्रिटिशांनी भारतातून अखेरचा आणि निर्णायक निरोप घेतल्याचा दिवस म्हणून नोंदवला गेला पाहिजे. त्यामुळे दोघांची तुलनाच होऊ शकत नाही, ती करणेच चुकीचे आहे.

प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: