सोमवार, ८ जून, २०२६

विरोधकांची भिस्त झुरळांवर


देशात सत्ताधाºयांच्या तुलनेत अत्यंत निष्प्रभ झालेल्या विरोधकांना कुठून तरी संजिवनी मिळावी असे वाटत आहे. सत्ता हातातून गेल्यानंतर आणि सत्तेपासून दूर झाल्यानंतर विरोधकांची अवस्था जलबिन मछली अशी झालेली आहे. त्यामुळे कुठून तरी आपल्याला उभारी मिळावी, अशी प्रतीक्षा करत असतानाच ही संजिवनी घेऊन सीजेपी म्हणजे झुरळे आल्यासारखी भासत आहेत. ही झुरळे स्वत:चे अस्तित्व निर्माण करणार की, विरोधकांना सलाईन देणार हे आता पाहावे लागेल.


वास्तविक गंमत म्हणून किंवा सोशल मीडियावर काहीतरी चमत्कारिक करावे म्हणून ही कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आणि त्याला गंमत म्हणूनच प्रतिसाद मिळाला. पण आता पाण्यात पडल्यावर हातपाय हालवावे लागणार आणि प्रसिद्धी मिळाली आहे तर ती कॅश केली पाहिजे या भावनेने झुरळांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. विरोधकांच्या सभांना, कार्यक्रमाला गर्दी जमत नाही, कार्यकर्ते मिळत नाहीत, त्यामुळे आयतीच ही गर्दी आपण संधी साधून आपली करून टाकू म्हणून एकेक विरोधी पक्ष या झुरळांना पाठिंबा देत आपले शक्ती प्रदर्शन असल्याचे भासवू लागले. सगळेच आभासी.

खरे तर बेरोजगार तरुणांना झुरळ असे संबोधले होते ते न्यायाधीशांनी. त्यावर त्यांनी नंतर स्पष्टीकरण देखील दिले. त्याचा सरकारशी काहीही संबंध नव्हता. पण ही झुरळे सरकारच्या नावाने बोंबलू लागली. पण या झुरळांमागचे सत्य समोर आले पाहिजे हे नक्की. एक तरुण अमेरिकेत जातो, तिथून प्रेरणा घेऊन एवढे आंदोलन उभे करतो. तो काही फारसा श्रीमंत घरातला आहे असे नाही, मग त्याच्यामागे एवढी आर्थिक रसद कोणी पुरवली? झुरळे मरत नाहीत, नष्ट होत नाहीत असे त्यांचे ब्रिद आहे. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. २०२५ मध्ये ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद, माओवाद, दहशतवाद संपवणार अशी प्रतिज्ञा गृहमंत्री अमित शाह यांनी केलेली होती. त्याप्रमाणे त्यांनी करूनही दाखवले. पण जसे काही आत्मसर्पण करून प्रवाहात आले तसे काही नक्षलवादी झुरळांच्या रूपात नव्याने जन्माला आले नाहीत ना याचा विचार केला पाहिजे. एकाएकी हे बळ कसे आले? खानदानी, आर्थिक परिस्थिती मजबूत असलेले विरोधक नामशेष होत असताना झुरळे कशी फोफावली? त्यांना कोणती परकीय रसद मिळत आहे याचा छडा लावावा लागेल.


विकासाच्या मार्गावर असलेल्या एका देशाला बरबाद करण्यासाठी नक्षलवादी, परकीय दहशतवादी, खलिस्थानी ताकद यामागे आहे का याचा तपास घेतला पाहिजे. झुरळांच्या या निर्मात्याला अभिजीत दीपकेला ब्रेनवॉश करण्यासाठी कोणी पाठवले होते का? तो तिथे कशासाठी गेला होता? याची नीट चौकशी केली पाहिजे. दिल्ली तर शेतकºयांच्या आंदोलनात कॅनडाच्या खलिस्तानवाद्यांची ताकद लागली होती. तशी ताकद येथे कोणी लावली आहे काय याचा तपास हा केलाच पाहिजे. या ताकदीच्या बळावर विरोधक मोठे होऊ पाहत असतील तर हा फार मोठा धोका असेल हे पण लक्षात घेतले पाहिजे. इसापनीतीत आपल्याच बांधवांना धडा शिकवण्यासाठी बेडूक सापाशी मैत्री करतो. विरोधक आपल्याकडे ठोस कार्यक्रम नसल्याने, विकासाचा अजेंडा नसल्याने अपयशाचा सामना करत आहेत. जनाधार मिळत नसल्याने झुरळरूपी साप आणून सरकारला संपवण्याचा प्रयत्न करत असतील तर यात विरोधक स्वत:ची कबर खणत आहेत हे पण लक्षात घेतले पाहिजे. दहशतवादी ताकदीवर, नक्षलवादाचा वापर करून सत्तेवर येण्याचे स्वप्न विरोधक पाहत असतील आणि त्यासाठी झुरळांचा वापर करत असतील तर ते देशापुढचे फार मोठे संकट असेल. त्यासाठी या झुरळांचा बंदोबस्त करावा लागेल. त्यांच्यामागे असलेल्या दुष्ट शक्तींचा शोध घेतला पाहिजे.

प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: