पश्चिम बंगालचे राजकारण सध्या आपल्या सर्वात अशांत टप्प्यातून जात आहे. एकेकाळी बंगालमधील निर्विवाद सत्ता मानली जाणारी ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आता अंतर्गत बंड, खासदार आणि आमदारांचे पक्षांतर आणि राजकीय अस्तित्वाच्या संकटाशी झुंजत असल्याचे दिसत आहे. दिल्लीत ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यातील, तसेच अभिषेक बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यातील भेटींमुळे या संकटाचे अधिकच राजकारण झाले आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस दोन्ही पक्ष विलिनीकरणाची शक्यता जाहीरपणे नाकारत असले तरी, या घडामोडींवरून बंगालच्या राजकारणात मोठ्या पुनर्रचनेला सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत. एक प्रकारे हे स्पष्ट आहे की, केवळ टीएमसीचे खासदार, आमदार आणि नगरसेवकच पक्ष बदलत नाहीत, तर खुद्द टीएमसी प्रमुख आपला पक्ष विसर्जित करून काँग्रेसमध्ये परतण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे गेल्या तीस वर्षांत काँग्रेसचे जेवढे तुकडे पडले ते परत एकत्र येण्याचा विचार करत आहेत, त्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादीही आली. त्यामुळे हे पडलेले तुकडे पुन्हा जोडले जाणार का? आणि त्यानंतर काय रंजकता निर्माण होते हे पाहावे लागेल.
दिल्लीत राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात झालेली दीड तासाची भेट आणि त्यापूर्वी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसने या बैठकांना लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठीची सामायिक वचनबद्धता म्हटले आहे, परंतु राजकीय निरीक्षकांच्या मते या केवळ औपचारिक चर्चा नव्हत्या. बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस कमकुवत झाल्याने आणि पक्षात फूट पडल्याने ममता बॅनर्जींसाठी काँग्रेससोबत अधिक घनिष्ठ संबंध प्रस्थापित करणे ही एक राजकीय गरज बनली आहे.
परिस्थिती अशी आहे की, तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरी आता एक उघड आव्हान बनली आहे. पक्षाच्या ८० आमदारांपैकी ५८ आमदारांनी पक्षांतर करून हकालपट्टी केलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटात प्रवेश केला आहे. या गटाला विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. ऋतब्रता बॅनर्जी यांनी सातत्याने दावा केला आहे की, तेच खरी तृणमूल काँग्रेस आहेत आणि काँग्रेससोबत कोणत्याही विलिनीकरणाला किंवा कराराला त्यांचा विरोध आहे. त्यांचा दावा आहे की, त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि अनेक खासदारही त्यांच्या संपर्कात आहेत.
काँग्रेससोबत संभाव्य विलिनीकरण किंवा जवळीक साधण्याच्या अटकळींमुळे तृणमूल काँग्रेसमधील असुरक्षितता आणि अस्वस्थता आणखी वाढली आहे. पक्षाचे अनेक आमदार, खासदार आणि प्रादेशिक नेत्यांनी आपली संपूर्ण राजकीय ओळख काँग्रेसविरोधावरच उभारली होती. अशा परिस्थितीत, जर ममता बॅनर्जी यांनी अखेरीस काँग्रेससोबत विलिनीकरण किंवा व्यापक राजकीय करार करण्याचा प्रयत्न केला, तर आपली स्वतंत्र राजकीय ओळख नाहीशी होईल, अशी भीती त्यांना वाटते. यामुळेच तृणमूल काँग्रेसमधील पक्षांतर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पक्षातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये परतण्यास तयार नाही आणि त्यांना एकतर वेगळ्या गटात राहायचे आहे किंवा ते नवीन राजकीय पर्याय शोधत आहेत. ही अस्वस्थता आता उघड बंडखोरी आणि राजीनाम्यांच्या मालिकेतून प्रकट होत आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची भूमिका अत्यंत रंजक बनली आहे. बंगाल काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदही समोर आले आहेत. अधीर रंजन चौधरी आणि अब्दुल मन्नान यांच्यासारखे ज्येष्ठ नेते ममता बॅनर्जी यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या जवळीकीला उघडपणे विरोध करत आहेत. मन्नान यांनी तर स्वच्छ पाण्यात घाणेरडे पाणी मिसळल्यास स्वच्छ पाणीदेखील घाणेरडे होते, असे म्हटले आहे. अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर बंगालमधील काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला असून, त्या आता गांधी कुटुंबाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुभंकर सरकार यांनी तुलनेने सौम्य भूमिका घेतली आहे. राहुल गांधींना भावी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते मानणाºया कोणाचेही स्वागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांचा संपूर्ण राजकीय उदय काँग्रेसविरोधी बंडावरच उभा राहिला होता. १९९८ मध्ये त्यांनी काँग्रेसपासून जोरदारपणे फारकत घेऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी ममता यांनी काँग्रेस नेतृत्वावर बंगालच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून डाव्यांपुढे शरणागती पत्करल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला काँग्रेसला एक पर्याय म्हणून प्रस्थापित केले आणि बंगालमधील काँग्रेसची मुळे हळूहळू कमकुवत केली. २०११ मध्ये डावी आघाडी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी स्वत:च्या राजकीय विस्तारासाठी काँग्रेसपासून पूर्णपणे स्वत:ला दूर केले आणि गांधी कुटुंब व काँग्रेस नेतृत्वावर सातत्याने तीव्र हल्ले चढवले. पण आता खासदार आणि आमदार पक्ष सोडून जात असल्याने तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडत असताना आणि पक्षाची राजकीय पकड ढिली होत असल्याचे दिसत असताना, ममता बॅनर्जी आपल्या काँग्रेसच्या मुळांकडे परतत असल्याचे दिसत आहे.
तृणमूल काँग्रेसपाठोपाठ महाराष्ट्रातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची बातमी आहे. ज्या शरद पवारांनी विदेशीचा मुद्दा घेत राष्ट्रवादीची स्थापना केली ते आता सोनिया गांधींच्या चरणी शरण जाणार का हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. अशा परिस्थितीत उरले सुरले राष्ट्रवादीतील काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळणार का? असाही प्रश्न आहे. त्याहून खरी पंचाईत होणार आहे ती रोहित पवार यांची. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आपले स्थान निर्माण करण्यासाठी सतत काहीतरी प्रयत्न ते करत आहेत, काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांची काय अवस्था आणि स्थान असेल? त्यांना ना काँग्रेसमध्ये जाणे परवडणार आहे ना ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे या विलिनीकरणातून रोहित पवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आत्याबाई आणि आजोबा करणार का?
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा