शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

विरोधक आता तरी जागे होतील का?


बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला. अपेक्षेप्रमाणे या खेपेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अगदी स्पष्ट बहुमत मिळाले. ते मिळणार होतेच. त्यामुळेच या खेपेला कधी नव्हे ते एक्झिट पोलचे अंदाजही अचूक ठरले. अर्थात त्यातील एनडीएकडे सत्ता जाईल हाच अंदाज बरोबर म्हणता येईल. आकडेवारीशी कुठेही जवळपास कोणी बरोबर नाही. पण या निकालानंतर विरोधक आता तरी जागे होतील का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.


भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांबरोबर निवडणुकीच्या मैदानात उतरतो ते जिंकण्यासाठी. त्यासाठी त्यांच्याकडे ठोस असा कार्यक्रम असतो. परंतु विरोधकांकडे टीका, टोमणे याशिवाय कोणताही कार्यक्रम नसतो. जनतेला, मतदारांना जे हवे ते संवादातून भाजप साध्य करतो. परंतु विरोधक मतदारांना गृहीत धरतात. किंबहुना एकीकडे भाजप जिंकण्यासाठी निवडणूक लढवत असताना विरोधक मात्र पराभूत मानसिकतेतून लढतात आणि त्याचा परिणाम त्यांना अपयश येते. या अपयशाचे खापर फोडण्याचे मग निमित्त शोधले जाते.

राहुल गांधींनी मतचोरी, ईव्हीएम, निवडणूक आयोग असे वाटेल ते आरोप लावले. कसलाही पुरावा नसताना हे निरर्थक उद्योग केले. काय परिणाम झाला त्याचा मतदानावर? हे असे निवडणूक आयोग, ईव्हीएम, मतदारयादीवर आरोप करणे म्हणजे लोकशाही व्यवस्था मान्य नसल्याचे प्रमाण आहे. हा मतदारांनी केलेल्या मतदानावर अविश्वास आहे. मतदारांनी तुम्हाला सपशेल नाकारले असताना मतदान यंत्र, दुबार मतदान, निवडणूक आयोग यांच्यावर दोष देण्याचा प्रकार केला. हे असले जादूचे प्रयोग मतदार करमणूक म्हणून पाहतात. पण निवडणुकीत असली हातचलाखी चालत नाही हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे विरोधकांनी आता तरी जागे झाले पाहिजे. राहुल गांधींच्या सूरात किती सूर मिसळायचा आणि नकारात्मक वागायचे याचा विचार आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनीही केला पाहिजे. अशाच मानसिकतेने ते आगामी महापालिका निवडणूक लढतील तर त्यांना यश मिळणार नाही. कारण निवडणुकीत मतदारांना ठोस कार्यक्रम हवा असतो. भावनिक मुद्दे करून मते मिळवण्याचे दिवस संपले आहेत. तुम्ही काय करणार हे सांगण्यासाठी जोपर्यंत विरोधकांकडे मुद्दे नाहीत, तोपर्यंत त्यांना कधीच यश मिळणार नाही. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे जाहीर सभांमधून आम्ही हे होऊ देणार नाही, एमएमआरडीए बंद करू, हा प्रकल्प होऊ देणार नाही, धारावीचा विकास होऊ देणार नाही असे जाहीर सभांमधून बोलत होते. त्याचा परिणाम मतदारांवर झाला आणि हे काहीच करणार नाहीत तर आहे तेच बंद करतील मग यांना निवडून का द्यायचे असा विचार मतदारांनी केला आणि त्यांना नाकारले. त्यासाठी विरोधकांनी आम्ही काय करू हे सांगण्याचे काम केले तर त्यांना यशाची आशा ठेवता येईल.


निवडणूक आयोगाने कोणतीही कसर न ठेवता बिहारच्या निवडणुका घेतल्या. तरीही निकालात काही बदल झाला नाही. मतदारांनी भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूला स्वीकारले आहे. ते त्यांच्या पाठीशी आहेत हे वास्तव विरोधकांनी मान्य केले पाहिजे. आता मतचोरी, ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या नावाने खडे फोडतील तर विरोधक पुन: पुन्हा तीच चूक करतील. हरियाणा निवडणुकांच्या एक वर्षानंतर मतचोरी झाली आहे, असा साक्षात्कार राहुल गांधींना झाला. ब्राझीलच्या मॉडेलने बावीस वेळा मतदान केले असा आरोप केला. जी मॉडेल भारतात कधीही आलेली नव्हती. तिला बदनाम केले. त्याला त्या मॉडेलने उत्तर देऊन राहुल गांधींना खोटे पाडले. हे सगळे जनता पाहत असते. म्हणून विरोधकांनी आता तरी जागे झाले पाहिजे. पराभव मान्य केला पाहिजे. नव्याने लढण्याची तयारी केली पाहिजे. लढण्यासाठी आपल्याकडे चांगले मुद्दे, कल्पकता असली पाहिजे. केवळ विरोधकांना दुषणे देणे, घाणेरडे टोमणे मारणे, टीका करणे हे विरोधकांचे काम नाही. काय केले पाहिजे, काय करता येईल आणि आम्ही काय करू हे जोपर्यंत विरोधक सांगत नाहीत, तोपर्यंत त्यांना कधीच यश येणार नाही. मतदारांना पटेल असे विषय मांडता आले पाहिजेत. बिहार निवडणुकीतील निकालाने हेच दाखवून दिले आहे.

नितीश कुमार यांनी १७ वर्षे सांभाळलेले राज्य, त्याला भाजपची साथ आणि ठोस कार्यक्रम यामुळे मतदारांचा विश्वास त्यांनी कमावला होता. मतदारांवर विश्वास ठेवायचा असतो. लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलणार असा अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. तो यशस्वी झाल्यामुळे प्रत्येकवेळी नवा अपप्रचार सुरू करण्याचे काम विरोधकांनी केले. हीच खरी मतचोरी होती. मतदारांची दिशाभूल करून मते मिळवणे ही मतचोरी असते. पण मतदारांना वास्तव समजले. त्यामुळे हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली पाठोपाठ आता बिहारमध्येही भाजप प्रणित एनडीए आघाडीला घवघवीत यश मतदारांनी दिलेले आहे. यातून विरोधकांनी काही बोध घेतला तर बरे आहे. पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येऊन विरोधकांनी वास्तव मान्य केले पाहिजे. महापालिका निवडणुकांना अजून महिना आहे. त्याआधीच विरोधकांनी ठोस कार्यक्रम हाती घेतला नाही, तर कोणत्याही यशाची अपेक्षा त्यांना करता येणार नाही. निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीवर किती दिवस खापर फोडत राहणार आहात? मतदारांवर दाखवलेला तो अविश्वास असतो, हे लक्षात घेण्याची गरज आहे.


प्रफुल्ल फडके/अन्वय


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: