मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

भविष्याचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसचा कठोर निर्णय


१९०५ मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी भारतावरील त्यांच्या राजवटीत पहिल्यांदा बंगालची फाळणी केली, तेव्हा क्वचितच कोणी विचार केला असेल की हेच बीज एके दिवशी पाकिस्तानच्या रूपात पृथ्वीच्या नकाशावर उमटेल. हे वसाहतवादी सत्तेच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाचे परिणाम होते. या धोरणामुळे हळूहळू संपूर्ण उपखंडाचे सांप्रदायिक आधारावर विभाजन करण्याचा मार्ग मोकळा झाला.


विशेष म्हणजे २१व्या शतकातही एकाच धोरणाचा वेगवेगळ्या प्रकारे फायदा घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एनसीईआरटीचे विशेष मॉडलूल ‘द ट्रॅजेडी आॅफ फाळणी’ हे याच प्रवृत्तीचे एक उदाहरण असल्याचे दिसते. यामध्ये भारताच्या फाळणीसाठी जिना आणि माऊंटबॅटन तसेच काँग्रेसला जबाबदार धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे का केले गेले आणि यातून कोणाचे हित साधले जाईल हे समजणे कठीण आहे?अर्थात हे खरे आहे की फाळणी ही भारतीय इतिहासातील सर्वात भयानक दुर्घटनांपैकी एक होती. भारताच्या फाळणीत लाखो लोक मारले गेले, कोट्यवधी लोक विस्थापित झाले आणि सामाजिक रचनेला गंभीर दुखापत झाली. त्याच वेळी, हे देखील तितकेच खरे आहे की भारताच्या दुर्दैवी आणि दु:खद फाळणीचे कारण केवळ काही नेत्यांचे वैयक्तिक निर्णय नव्हते तर वसाहतवादी धोरणे, सांप्रदायिक राजकारण आणि दशकांपासून निर्माण झालेल्या दीर्घकालीन सामाजिक तणावांचे परिणाम होते.

अशा गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घटनांना धोकादायक पद्धतीने सोपे करणे आणि काँग्रेससह जिना आणि माऊंटबॅटन यांना दोष देणे हे केवळ अन्यायच नाही, तर सध्याच्या राजकारणानुसार इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे धाडस देखील आहे. याचा विरोध केला पाहिजे. इतिहास जसा घडला तसाच मांडला पाहिजे. इतिहासाचा अर्थ असा आहे की तो घडला होता. हे सत्य आहे की काँग्रेसने कधीही फाळणीची मागणी केली नाही. त्यांनी फाळणीला विरोध केला आणि ती थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. भारताची फाळणी हा मुस्लीम लीग आणि जिन्नांचा अजेंडा होता. ब्रिटिशांनीही याला प्रोत्साहन दिले, कारण त्यांचे उद्दिष्ट भारताला कमकुवत करणे आणि त्यावर दीर्घकाळ राज्य करणे होते. याशिवाय, ते भारताचे विभाजन देखील करू इच्छित होते जेणेकरून ते त्यांचा स्वत:चा देश, म्हणजेच पाकिस्तान, जो त्यापासून वेगळे होऊन तयार झाला होता, चालवू शकतील.


१९०९ च्या निवडणुकीत स्वतंत्र मतदारसंघांची व्यवस्था असो किंवा १९३२ चा सांप्रदायिक निवाडा असो, प्रत्येक टप्प्यावर ब्रिटिश राजवटीने हिंदू-मुस्लीम ऐक्याला धक्का पोहोचवण्याचे काम केले. ब्रिटिश हिंदू आणि मुस्लिमांमधील संबंधात दरी निर्माण करण्याचे काम करत राहिले. जेणेकरून त्यांना भारतावर राज्य करणे सोपे होईल. काँग्रेस राष्ट्रीय एकतेबद्दल बोलत राहिली, परंतु १९४० च्या दशकात जेव्हा सांप्रदायिक तणाव शिगेला पोहोचला, तेव्हा त्यांच्याकडे तडजोडीशिवाय पर्याय उरला नव्हता. आजच्या लोकांना त्या काळातील परिस्थिती समजली असती तर बरे झाले असते. असेही म्हटले जाते की, देशाने काळ आणि परिस्थितीनुसार वागले पाहिजे.

आपण नेहमीच हे लक्षात ठेवले तर बरे होईल की १९४६-४७ चा भारत आजच्या लोकशाही भारतापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्यावेळी ५०० हून अधिक संस्थांने होती, ज्यांच्या स्वत:च्या आकांक्षा आणि विचार होते. बंगाल, पंजाब आणि बिहारमध्ये भयानक दंगली झाल्या होत्या. जातीय तणाव इतका वाढला होता की, दररोज हजारो निष्पाप लोक मारले जात होते. अशा परिस्थितीत, देशातील सर्वात मोठी राजकीय शक्ती म्हणून काँग्रेसकडे फक्त दोनच पर्याय होते- एकतर फाळणी स्वीकारा आणि देशाला पुढे जाऊ द्या किंवा फाळणी थांबवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण उपखंडाला रक्तपातात ढकलून द्या.


अर्थात इतिहास साक्षी आहे की, काँग्रेसने पहिला मार्ग निवडला आणि भारताला लोकशाही व्यवस्थेचा मजबूत पाया दिला. फाळणीसाठी काँग्रेसला जबाबदार धरण्यासाठी विविध सोयीस्कर युक्तिवाद करणाºयांनी हे समजून घेतले पाहिजे. भारताची फाळणी स्वीकारून काँग्रेसने चूक केली असे म्हणणे सोपे आहे. त्याचप्रमाणे, त्या काळात नेत्यांकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध होता असे म्हणणे देखील चूक ठरेल. महात्मा गांधींसारखे नेतेही फाळणीच्या तीव्र विरोधात होते, परंतु जेव्हा लाखो लोकांचे जीवन धोक्यात होते, तेव्हा तडजोड हा एकमेव व्यावहारिक मार्ग मानला जात असे.

त्यावेळी काँग्रेसचे उद्दिष्ट सत्ता मिळवणे नव्हते तर देशाला एका भयानक गृहयुद्धाच्या आगीपासून वाचवणे होते. आज ७९ वर्षांनंतर, सुरक्षित वातावरणात बसून, फाळणी काळातील सक्तींकडे दुर्लक्ष करणे सोपे आहे, परंतु हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की जर काँग्रेसने त्यावेळी फाळणी स्वीकारली नसती तर परिस्थिती आणखी भयानक झाली असती. अशा परिस्थितीत, भारताचे भविष्य वाचवता यावे म्हणून काँग्रेसने एक कठीण पण आवश्यक निर्णय घेतला, असे म्हणणे अन्याय्य ठरणार नाही.


एनसीईआरटीचे मॉड्यूल इतिहासाच्या गुंतागुंती सोप्या करण्याचा आणि सध्याच्या राजकारणासाठी त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे नवीन मॉड्यूल कोणत्याही वर्गात धडा म्हणून शिकवले जाऊ शकत नाही, परंतु ते पूरक शैक्षणिक साहित्य म्हणून सादर करण्याचा आणि फाळणीसाठी जिना आणि माऊंटबॅटनसह काँग्रेसला दोष देण्याचा अर्थ काय आहे? सरकार कितीही शक्तिशाली असले तरी, इतिहास बदलण्याचा प्रयत्न नेहमीच अपूर्ण आणि संशयास्पद असतो.

खरा इतिहास आपल्याला शिकवतो की, भारताची फाळणी ही काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षेचा नव्हे तर वसाहतवादी धोरणांचा आणि जिन्नांच्या जातीय राजकारणाचा परिणाम होती. म्हणून, इतिहासाला निष्पक्ष आणि संतुलित पद्धतीने शिकवणे आवश्यक आहे. फाळणीच्या पानांवरून आपण शिकू शकतो. आपण पुढे जायला हवे आणि त्यांना आजच्या राजकारणाचे शस्त्र बनवू नये. काँग्रेसला दोष देणे सोपे आहे, परंतु सत्य हे आहे की देशाची एकता आणि भविष्य जपण्यासाठी त्या वेळी त्यांनी एक कठीण निर्णय घेतला. इतिहासाचे मूल्यांकन त्या काळातील परिस्थितीच्या प्रकाशात केले पाहिजे, आजच्या राजकीय सोयीच्या आधारावर नाही. खरे तर एनसीइआरटीने असे का केले हा पण तितकाच संशोधनाचा विषय आहे. पण त्यावेळी काँग्रेसने घेतलेली भूमिका समजून घेणे हे तितकेच आवश्यक आहे. मोठे युद्ध ंिजंकण्यासाठी छोटी लढाई हरावी लागते. त्याप्रमाणे ब्रिटिशांनी १९०५ ची बंगालची फाळणी लाल-बाल-पाल या तिघांमुळे रद्द केली. त्याचा त्यांनी घेतलेला तो सूड होता हे लक्षात घेतले पाहिजे.


प्रफुल्ल फडके/ अन्वय


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: