बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

साफ नाकारले


राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को आॅपरेटिव्ह के्रडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल बुधवारी पहाटे जाहीर झाला आहे. १८ आॅगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. यानंतर मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मतमोजणी सुरू होण्यास उशीर झाला होता. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पण आता तरी उबाठाने विचार केला पाहिजे. जनतेने आपल्याला साफ नाकारले आहे हे सत्य आता तरी मान्य केले पाहिजे.


बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत फारशा चर्चेत नसलेल्या शशांक राव पॅनेलने कमाल करून दाखवली. बेस्ट पतपेढीच्या एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये शशांक राव पॅनलचे सर्वाधिक १४ उमेदवार विजयी झाले. तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील ९ वर्षांची सत्ता गमावली आहे. ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता न आल्याने शिवसेना आणि मनसेची चिंता वाढली आहे. पण याची जबाबदारी कोण घेणार आहे? वारंवार वाईट बोलून, सकाळ सकाळ कॅमेºयापुढे भोंगा लावून, अफवा पसरवून सत्य बदलता येत नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. उरलेली शिवसेना वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्यावर थोटे नियंत्रण ठेवावे लागेल हे लक्षात घेण्याची हीच वेळ आहे. नाहीतर महापालिका निवडणुकीत चित्र यापेक्षा वेगळे असणार नाही.

ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरवले होते. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली होती. तर दुसरीकडे महायुतीनेसुद्धा ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजपप्रणीत श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना, तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनल यांनीसुद्धा आपले २१ उमेदवार रिंगणात उतरवले होते.


विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत आणि उबाठा सेनेच्या नेत्यांचा तोल पुरता ढळला होता. त्यामुळे अतिशय खालच्या पातळीवर टीका करून वाटेल ते बोलण्याची त्यांच्यातच चढाओढ लागलेली होती. त्यात दिल्लीतून राहुल गांधींनी काही वक्तव्ये केली की, त्यांच्या सुरात सूर मिसळायला हे नेते कमी करत नव्हते, ते मराठी माणसाला अजिबात आवडत नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. मराठी माणूस, अमराठी माणूस म्हणून जे राजकारण चालवले होते त्याचा बुरखा या निकालाने फाडला आहे. आम्ही मराठी माणसांचे कैवारी म्हणून टेंभा मिरवणाºयांचा टेंभा किंवा मशाल पुरती विझली आहे. कारण बेस्टमध्ये सगळे मराठी मतदारच होते. बेस्ट पतपेढी ही मुंबईतील मराठी कामगारांची होती. इथे परप्रांतीयांचा शिरकाव बिलकुल नव्हता. त्याच मराठी माणसांनी तुम्हाला नाकारले आहे हे वास्तव आता उबाठाने लक्षात घेतले पाहिजे. विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम मशीन, निवडणूक आयोग, भारतीय जनता पक्ष यांच्या नावाने रोज शंख चालला होता. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर तर उबाठा नेत्यांना हवा भरल्यासारखे झाले होते आणि निवडणूक आयोगापासून ते ईव्हीएमपर्यंत सगळ्याला दोष देत मतचोरीचा आरोप केला जात होता. निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा आग्रह धरला जात होता. बेस्ट पतपेढीची निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली होती. तुमची सत्ता असताना तुमच्या मर्जीनुसार घेतली होती. तरीही मतदारांनी तुम्हाला नाकारले आहे, हे सत्य स्वीकारणार आहेत की नाही? सतत खोके, बोके, टरबुजे, मोदी-शाह आणि भाजपच्या नावाने खडे फोडून मतांमध्ये वाढ होणार नाही. जनतेचा कौल मिळवण्यासाठी विकासाची दृष्टी असावी लागते याचे बेस्ट हे उत्तम उदाहरण आहे.

मुंगी होऊन साखर खाण्याचे काम शशांक राव यांच्या पॅनेलने या निवडणुकीत केले. भाजप आणि उबाठा यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. आषाढी एकादशीच्या अगोदर एक दिवस मराठी माणसांसाठी दोन बंधू एकत्र झाले याचा जल्लोष अशा प्रकारे केला होता की, आता जगाला गवसणी आम्ही घालणार आहोत. पण हे दोघे एक झाले काय किंवा नाही झाले काय, याच्याशी सर्वसामान्य जनतेचा काय संबंध आहे? सामान्य जनतेला विकासकामे हवी आहेत. घाणेरडी भाषा, तिरस्काराची भाषा रोज ऐकायला नको आहे. तुम्हाला निवडून देऊन तुमच्याकडून अशी घाणेरडी भाषा, टीका टिप्पणी ऐकण्यापेक्षा आम्ही योग्य लोकांना निवडून देऊ हा निर्णय मतदारांनी घेतला आणि उबाठाला पूर्णपणे नाकारले. मनसेचा यात पराभव झाला असे म्हणता येणार नाही, कारण २१पैकी फक्त दोन जागा मनसेला उबाठाने सोडल्या होत्या. तेवढे गाजर दाखवून मनसेला खूश करण्याचा प्रयत्न होता आणि तो यासाठी होता की, आगामी महापालिका निवडणुकीतही मनसेचे स्थान असेच असेल हे दाखवायचे होते. महायुतीने ७ जागा मिळवून केलेला शिरकावही स्वागतार्ह आहे. पण आता तरी उबाठासेनेच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सत्य स्वीकारले पाहिजे. ईव्हीएम असो वा मतपत्रिका जनता आपल्याला नाकारते आहे हे सत्य समजून घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: