शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

अंधेरे में एक चिंगारी


१९७७ साली सत्तेवर आलेले जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यातील मित्र खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने हाक दिली होती ती की, ‘अंधेरे में एक चिंगारी... अटलबिहारी अटलबिहारी.’ यामागचे कारण म्हणजे जनता पक्षाच्या स्थापनेनंतर इंदिरा गांधींच्या आणीबाणीतील दडपशाही विरोधात जेव्हा सर्वजण जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक झाले होते, तेव्हा ‘अंधरे में एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश’ अशी घोषणा होती. ती यशस्वी झाली होती; परंतु जयप्रकाश नारायण यांच्या निधनानंतर जनता पक्षच अंधारात गेला. त्यामुळे या अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती म्हणजे अटलबिहारी वाजपेयी नावाची चिंगारी होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने स्थापनेनंतर ही घोषणा सर्वात प्रथम केली.


जनता पक्षाचा भारतीय जनता पक्ष झाल्यानंतर अंधकारातून बाहेर काढण्यासाठी प्रकाश नसला तरी एक चिंगारी आम्हाला पुरेशी आहे हा विश्वास भाजपच्या माध्यमातून अटलजींनी दिला होता. वाजपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता. पण, त्याचवेळी ही चिंगारी भविष्यात देशाच्या पंतप्रधानपदावर जाईल, भाजप सत्तेवर येईल हा आशावाद, विश्वास अटलजींनी दिला होता. पक्ष स्थापन झाला तेव्हा भाजप प्रत्यक्ष निवडणुकीत उतरला नाही. १९८०च्या लोकसभेच्या मुदतपूर्व झालेल्या निवडणुकीत भाजपने निवडणुका लढवल्या नाहीत, पण शक्तिप्रदर्शन करून एक नवी चिंगारीची ठिणगी पडली आहे, आता त्या ठिणगीचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, असाच इशारा दिला होता. आज अटलबिहारी वाजपेयींचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने या थोर व्यक्तिमत्त्वाचे पैलू सर्वांना मार्गदर्शक ठरतील असे आहेत.

आज जे भाजपचे वादळ दिसते आहे, लाट दिसते आहे, त्यामध्ये या चिंगारीची भूमिका महत्त्वाची आहे. चिंगारी बनलेल्या अटलजींनी दाखवलेला आशावाद महत्त्वाचा आहे. ‘कमल जरूर खिलेगा’ हे त्यांनी एकही खासदार नसताना भाकीत केले होते. त्यामुळे त्यांच्या आशावादाला दाद द्यावी लागेल. अटलबिहारी वाजपेयी हे कवी आहेत. जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हणतात. त्याप्रमाणे सगळीकडे अंध:कार असतानाच त्यांनी भाजपला मिळालेली सत्ता पाहिली होती. हा आशावाद, स्वप्न पाहण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. इंदिरा गांधी १९८०ला जरी सत्तेवर आल्या तरी पुढच्या पाच वर्षांत त्यांची राजवट संपुष्टात आपण आणू शकतो याचा विश्वास अटलजींना होता. फक्त काळाच्या आणि घटनेच्या महिमेपुढे काही चालत नाही, त्याचा फटका भाजपला बसला, नाही तर अपघाताने पंतप्रधान झालेले राजीव गांधी १९८५ मध्ये पंतप्रधान झालेच नसते. खलिस्तानची चळवळ सुरू झाल्यानंतर शीख अतिरेक्यांचा सुळसुळाट झाला होता. सुवर्ण मंदिरावर त्यांनी ताबा घेतला होता. त्यावेळी सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवण्याशिवाय पर्यायच नव्हता. इंदिरा गांधी तसा निर्णय घेत आहेत म्हटल्यावर अटलजींनी भाजपच्या माध्यमातून त्याबाबत पाठिंबा दिला होता. विरोधकांनी देशहितासाठी सरकारला सहकार्य करायचे असते ही सभ्यता वाजपेयींनी दाखवून दिली होती. दुर्दैवाने आजच्या विरोधकांमध्ये अशी सद्भावना नाही. ते शत्रूसारखे वागतात विरोधकांसारखे नाही. पण विरोधकांनी किती ताणायाचे आणि कशी कशी भूमिका घ्यायची असते याचा आदर्श वाजपेयींनी घालून दिला होता. अर्थात आॅपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपचा पाठिंबा असला तरी इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकाकडून झालेल्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीख विरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपने विरोध केला होता; परंतु इंदिरा गांधींच्या हत्येच्या लाटेनंतर जनमत काँग्रेसच्या बाजूने गेले आणि १९८४-८५ च्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजप देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. मात्र त्यानंतर वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजपने मागे वळून पाहिलेच नाही. सतत चढत्या क्रमाने भाजपच्या यशाचा आलेख वाढत गेला. त्यानंतर भाजपवरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता. त्यामुळेच रामजन्मभूमीच्या विहिंप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नाला भाजपने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. १९९५च्या मार्चमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपला विजय मिळाला. भाजपच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५च्या अधिवेशनात अडवाणी यांनी वाजपेयी यांचे नाव १९९६च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. काँग्रेसला उत्तम पर्याय भाजप आणि नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी आहेत, हे देशाला भाजपने दाखवून दिले. १९९६च्या निवडणुकात भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसांत राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले. १९९८च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली. अखेर १९९८च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. या दुसºया खेपेत वाजपेयींनी स्वत:च्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली होती. त्यामुळे १९९९च्या निवडणुकीत रालोआ भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आला. पूर्णकाळ पंतप्रधान बनण्याचे भाजपचे स्वप्न साकार झाले. या काळात त्यांनी जी कामगिरी केली ती उज्ज्वल अशीच आहे. मे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खासकरून अमेरिकेला हादरवणाºया ठरल्या. कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले. तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे याची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या चाचण्या लाभदायीच ठरल्या. १९९८ च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तानसोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्लीदरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वत: पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद उमटले. कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशांदरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्न करत असताना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. १९९९च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवले. जून १९९९ मध्ये आॅपरेशन विजय सुरू केले. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अति उंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव केला. भारताने मोठ्या शिताफीने आॅपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसºया पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही शिताफीने उधळला. म्हणून अटलबिहारी वाजपेयी हे सौम्य, सभ्य, सोज्वळ दिसले तरी प्रत्यक्षात देशहितापुढे वज्राहून कठीण होणारे होते. आरपार की लढाई करेंगे असा इशारा देऊन त्यांनी पाकला नमवले होते.


- प्रफुल्ल फडके/अन्वय


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: