इराण, इराक, अमेरिका आणि भारत


अमेरिकेच्या भूमिकेमुळे आखाती प्रदेश आणि संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटण्याची भीती निर्माण झालेली आहे. मंदी किंवा आर्थिक परिस्थिती डबघाईला येते तेव्हा अमेरिकेकडून असे प्रयोग नेहमीच केले जातात. त्याचा सर्वाधिक फटका हा आशियाई देशांना विशेषत: भारताला बसत आलेला आहे. त्यामुळे अमेरिका, इराण, इराक या देशांमधील तणावाचा परिणाम भारतावर होताना दिसेल यात शंका नाही. चार दिवसांपूर्वी अमेरिकेने एक एअर स्ट्राइक करून इराणच्या सुलेमानी यांचा खात्मा केला. त्याचा बदला इराणकडून घेतला जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे संपूर्ण जगच एका युद्धाच्या छायेखाली आहे.रविवारी सकाळी इराकमधील अमेरिकन दूतावासाजवळ असलेल्या ग्रीन झोनवर रॉकेट हल्ला झाला असल्याचं इराकने सांगितलं. तसेच, इराणने जर सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा विचार केला तर आम्ही त्यांना सोडणार नाहीत, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. इराणच्या कुड्स सेनेचे प्रमुख कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर आखातात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला अमेरिकाविरोधी घोषणाबाजी झाली.
सुलेमानी यांच्या हत्येचा आम्ही बदला घेऊ असं इराणने म्हटलं. त्यांच्या या धमकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की, जर तुम्ही काही हालचाल केली तर याद राखा गाठ आमच्याशी आहे, पण याचा परिणाम सुलेमानीची प्रजा अमेरिकेशी घनिष्ठ संबंध असलेल्या मित्र देशांना त्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करतील. भारतावर त्यांचे लक्ष असेल. भारतात दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न होईल. थेट नाही पण अशाप्रकारचे लक्ष केले जाईल. युद्ध नाही तर छुपे दहशतवादी हल्ले भारतात वाढतील, कारण भारताची अमेरिकेशी असलेली मैत्री, मोदी, ट्रम्प यांचे संबंध, हौडी मोदी सारख्या कार्यक्रमातून जगभराने मोदींचे अमेरिकेत झालेले कौतुक सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे अमेरिकेवर हल्ला करण्याची हिंमत नसलेले इराणसारखे देश भारतावर काही हल्ले करू शकेल. किंबहुना त्यासाठी पाकिस्तानचा वापर केला जाऊ शकतो. यातून अमेरिकेला हवे ते होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.अमेरिका हा भांडवलदार देश आहे. त्यांचा मुख्य उद्योग हा शस्त्रास्त्र इंडस्ट्री हाच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली मंदी संपवण्यासाठी त्यांना या व्यवसायाला तेजीत आणण्याची गरज असणार आहे. त्यासाठी एखादे युद्ध त्यांना हवे आहे. हे वेळोवेळी घडलेले आहे. दोन शेजारी देशांना लढवून आपल्या शस्त्रांची विक्री करण्याची अमेरिकेची नीती असू शकते. त्यामुळे भारतावर इराणने केलेले हल्ले, त्यासाठी पाकिस्तानने मदत केली तर भारत-पाक युद्ध होऊ शकते. अशावेळी भारत-पाक हे अमेरिकेवर अवलंबून राहतील आणि अमेरिकेची तिजोरी भरेल. त्यामुळे अमेरिकेचा सुलेमानी उद्योग भारताला घातक असणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
इराणचे ५२ तळ आमच्या निशाण्यावर आहेत. त्यांनी काही जरी हालचाल केली तर त्यांच्यावर जलद आणि भेदक हल्ला केला जाईल, असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून इराण ही आमची डोकेदुखी बनल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकेवर हल्ला करण्याचा विचार इराणने पुन्हा पुन्हा बोलून दाखवला आहे. जर अमेरिकेच्या संपत्तीला अथवा अमेरिकन व्यक्तीला काही हानी झाली, तर त्यांच्या ५२ तळांवर आम्ही निशाणा लावलेला आहे ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी असं ट्रम्प म्हणाले, पण अमेरिकेची काळजी घेताना जर भारतावर इराणने हल्ला केला, तर अमेरिका भारताला फुकट मदत करणार नाही.रविवारी सकाळी राजधानी बगदादसह इराकमधील अन्य काही ठिकाणी रॉकेट हल्ले झाल्याची माहिती इराकच्या लष्करानं दिली. हे रॉकेट हल्ले अमेरिकन दूतावासाजवळील ग्रीन झोन, बगदादजवळील जदरिया आणि अमेरिकन सुरक्षारक्षकांच्या बलाद एअरबेसवर झाले. या रॉकेट हल्ल्यांमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं इराकच्या लष्करानं सांगितलं. इराणसमर्थक कट्टरतावाद्यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये असे हल्ले केले होते, मात्र अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे कमांडर कासिम सुलेमानी हे ठार झाल्यानंतर आखातातील तणावात वाढ झालीय. त्याचा धोका भारतालाही असणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
कताइब हिजबुल्लाह संघटनेनं इराकच्या सैन्याला रविवारी अमेरिकन तळांपासून किमान एक हजार किलोमीटर मागे हटण्यास सांगितलं होतं. इराक पोलिसांच्या माहितीनुसार, जदरियामध्ये मिसाईल हल्ल्यात पाच लोक जखमी झाले आहेत. हे वगळता इतर कुठेही नुकसान झालं नाहीय. हे रॉकेट ग्रीन झोनच्या जवळील जदरिया आणि अमेरिकनं सुरक्षारक्षकांच्या बलाद हवाईतळावर पडले, मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सेलिब्रेशन स्केअर, जदरिया परिसर, सलाहुद्दीन प्रांताचं हवाईतळ यांना निशाणा करून रॉकेट हल्ला करण्यात आला, ज्यात कुणाचाही मृत्यू झाला नाही, पण हा फक्त इशारा होता. इराणी कुड्स कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ल्यात ठार केलं. सुलेमानी हे इराणच्या कुड्स सेनेचे प्रमुख होते. कुड्स ही सेना इराणच्या ‘इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड कॉर्प्स’चं विशेष पथक आहे. याच हल्ल्यात कताइब हिजबुल्लाहचा कमांडर अबु महदी अल मुहान्दीस हादेखील ठार झाला होता.इराणच्या कर्मन प्रांतात ११ मार्च १९५७ रोजी कासिम सुलेमानी यांचा जन्म झाला होता. ८० च्या दशकात इराण-इराकमध्ये युद्ध झालं होतं. या युद्धावेळी इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशन गाडर््स कॉर्प्स’ या सेनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. १९८० मध्ये ते या सेनेत सामील झाले. १९८० ते १९८८ या काळात झालेल्या इराण-इराक युद्धावेळी सुलेमानी यांनी साराल्लाहच्या ४१ व्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं. इराणची पूर्वेची सीमा सांभाळण्याची जबाबदारी या तुकडीकडे होती. इराकविरोधात झालेल्या अनेक कारवायांमध्ये जनरल सुलेमानी यांचा सहभाग होता. आॅपरेशन डॉन ८, कबार्ला ४ आणि कबार्ला ५ या आॅपरेशनमध्ये त्यांचा सहभाग होता. इतकंच नाही तर लेबनॉन, सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये इराणने केलेल्या कारवाया या सुलेमानीमार्फत झाल्याचं स्पष्ट झालेले आहे. त्यानंतर मार्च २०१९ मध्ये सुलेमानी यांना इराणने ‘आॅर्डर आॅफ जोल्फाकार’ हा सर्वोच्च वीर पुरस्कार दिला होता. १९७९ नंतर हा पुरस्कार मिळालेले ते पहिले इराणी व्यक्ती होते. इराणचे शाह अयातुल्लाह खोमेनी हे सुलेमानी यांना ‘लिव्हिंग मार्टिर’ म्हणजे ‘जिवंत हुतात्मा’ असं म्हणत.
हे सर्व पाहता सुलेमानी याचा मृत्यू इराण इतक्या सहजपणे घेईल असे नाही. त्यामुळे भारताला याचा फटका बसण्याची जास्त शक्यता असल्याने आपल्यालाही सावध राहण्याची गरज असणार आहे.
महासत्तेचे लक्ष्यअमेरिका कायम महासत्ता असण्याचे कारण अमेरिकेला स्वत:च्या भूमीवर एकदाही युद्ध करावे लागले नाही. दुसºयाच्या भूमीवर जाऊन धुडघूस घालणे, नुकसान करणे सोपे असते, परंतु बाकी जगाला नेहमीच युद्धाला सामोरे जावे लागले आहे. अमेरिकेला एकदाच फटका बसला होता तो ९/११ ला लादेनने केलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यात. आता भारत महासत्तेच्या दिशेने जाण्याचे स्वप्न बघत असताना भारताला मागे रेटण्याचे काम करायला आयती संधी अमेरिकेला यातून मिळणार आहे. त्यामुळे अमेरिका, इराण या संघर्षाचा फटका आपल्याला बसणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा