थोडं सकारात्मकतेनं पहा

२६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरू होणार हे जाहीर करताच तथाकथीत संस्कृतीरक्षकांनी त्याला लगेच विरोध करायला सुरुवात केली. वास्तविक पाहता हे सर्व प्रायोगिक तत्त्वावर होत असताना त्याकडे सकारात्मकतेने विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे मुंबईत नाईट लाईफ कधी नव्हते, हेही लक्षात घेतले पाहिजे. तथाकथीत विरोधकांना वाटते आहे की, सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात सुरक्षिततेची भावना उत्पन्न झाली, तर शहरातील नाईट लाईफला कुणाचाच आक्षेप असणार नाही, मात्र केवळ महसुलाच्या आशेने घाईघाईने याची अंमलबजावणी केल्यास ती धोक्याची नांदीही ठरेल.
नुसती बातमी आली की, जीवाची मुंबई करण्यासाठी मुंबईत येणाºया आणि मुंबईतच वास्तव्याला असणाºया रसिकांसाठी आता मुंबईचे दरवाजे २४ तास खुले राहणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये २६ जानेवारीपासून मॉल, पब, मल्टिप्लेक्स, दुकाने आणि हॉटेल-रेस्टॉरंट २४ तास सुरू राहणार असल्याचे सूतोवाच पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. वास्तविक हे प्रायोगिक तत्त्वावर होणार आहे. त्याबाबतचा निर्णय २२ जानेवारीच्या कॅबिनेटमध्ये होणार आहे. तत्पूर्वी सह्याद्री अतिथी गृहात मॉल मालक, हॉटेल मालक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस आयुक्त संजय बर्वे, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी व सरकारी अधिकाºयांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत नाईट लाईफची ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार असून, मॉल्स, मल्टिप्लेक्स, दुकाने आणि हॉटेल्स दिवस-रात्र सुरू राहिल्याने राज्याला अधिक महसूल प्राप्त होईल. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी प्रतिक्रिया पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. याचे स्वागत करायला काय हरकत आहे? रात्रीचे हॉटेल, टपºया, वडापावचे स्टॉल, दुकाने उघडी राहिली तर रात्री अपरात्री बाहेरून येणाºयांना, उशिरा घरी परत जाणारांचीही खाण्यापिण्याची सोय होईल. त्यात गैर काय आहे? रात्रीची मुंबई आणि नाईट लाईफ म्हणजे फक्त पब, बार आणि दारू याचाच विचार कशाला करायचा? असेही दारू पिणारे काय वेळ काळ पाहून किंवा नाईट लाईफ आहे म्हणून पितात का? ते तसेही पित राहणारच असतात. तेच थोडे अधिकृत झाले तर रोजगार आणि महसूल वाढेल. एक नवी शिफ्ट होईल. दिवसा काम करणारे रात्रीच्यावेळी काही बिझनेस करू शकतील. फक्त भांडवलदारांनाच ही संधी मिळेल असे नाही, तर छोटे व्यापारी, व्यावसायिकही तयार होतील या आशेने पहायला काय हरकत आहे?या बैठकीत उपस्थित असणारे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केले आहे की, २४ तास दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भात प्रशासनाकडून कोणताही दबाव आणला जाणार नाही. नव्या नियमानुसार, आठवड्याभरात आस्थापन कोणत्या दिवशी बंद ठेवायचे, याचा निर्णय व्यावसायिकांचा असणार आहे. मद्यविक्री करणारी दुकाने व आस्थापने रात्री १.३० वाजेपर्यंतच खुली असतील. इतके सगळे स्पष्ट असताना उगाच गळा काढण्यात काय अर्थ आहे?
मुंबईला जागतिक दर्जा देण्यासाठी कराव्या लागणाºया प्रत्येक विकासकामांना आणि त्यासाठी आवश्यक असणाºया तरतुदींना कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. अशा निर्णयांच्या अंमलबजावणीपूर्वी हे निर्णय राबवण्यासाठी आपल्याकडील यंत्रणा पुरेशी सक्षम आहे का, याचाही सारासार विचार होण्याची गरज आहे. असा विरोधकांचा प्रश्न आहे, पण ती यंत्रणा सक्षम केल्याशिवाय अतिरिक्त भरती करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. पोलिसांवर ताण पडेल ही भीती असेल, तर पोलिसांची भरती करावी. अतिरिक्त कुमक निर्माण करावी. त्यानिमित्ताने पोलीस दलातील पदे वाढतील. त्यांची कर्मचारी संख्या वाढल्याने रोजगारही वाढेल. फक्त चार तास मुंबई जादा सुरू ठेवल्याने जर फायदा होणार असेल, उलाढाल होणार असेल तर त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.आज मुंबईच नाही तर महाराष्ट्र पोलिसांतील एकूण कर्मचारी संख्या आणि दर दिवशी वाढणारी लोकसंख्या, पर्यटकांची संख्या यांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर लक्षात येते की, पोलिसांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे यानिमित्ताने नवी नोकरभरती होऊन नवा रोजगार वाढेल असे म्हणायला काहीच हरकत नाही. मुंबईतील शहरातील रात्रीचे विश्व हे गुन्हेगारांपासून असुरक्षित विश्व असल्याचे बोलले जाते आहे. पण तसेही दिवसाही गुन्हे घडतातच की. रात्रीचे गुन्हे हे चोºया दरोड्याचे असतील पण असंख्य गुन्हे हे दिवसाढवळ्याही होत असतात. मुंबईची लोकल, मेट्रो चोवीस तास सुरू केली तर रेल्वेतही अनेक कर्मचारी वाढवावे लागतील. सर्व यंत्रणांमधील उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील आणि रोजगार वाढू शकेल याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
नव्या संस्कृतीत खरेदीदार बनलेल्यांच्या रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहण्याबाबत गरजा वाढल्या. आयटी, कॉर्पोरेट कंपन्या, बँका यांच्या कामाच्या पद्धतीमुळे यात नोकरी करणाºयांना रात्रीचे काम अनिवार्य बनले. मॉल, मल्टिप्लेक्स आणि हॉटेलिंगच्या या नव्या अपरिहार्य दुनियेत सेलिब्रेशन हेच जगण्याचे सूत्र झालेल्या नव्या जीवनशैलीला दिवस अजून थोडा मोठा असावा असे वाटत होते. दुबई, सिंगापूर, न्यूयॉर्कसारख्या शहरांत नागरिकांना, पर्यटकांना संपूर्ण रात्र बाहेर मौजमजा करता येते. तशी सोय मुंबईत नव्हती. त्यामुळे मुंबईला जागतिक दर्जा मिळण्यासाठी नाईट लाईफ सुरू करणे ही काळाची गरज होती. त्यामुळे ते होत असेल तर चांगले आहे. त्याचे स्वागत करायला हरकत नाही.मुंबई, नवी मुंबईतून अनेक नोकरदार रात्री उशिरापर्यंत काम करून जातात. त्यांची शेवटची गाडी चुकली तर त्यांना रेल्वेस्थानकावर बसून वेळ घालवावा लागतो. अशावेळी रात्री त्यांना चहा, नाष्टा असे काहीही मिळत नाही. त्यामुळे अशाप्रकारे खाद्यपदार्थांचे स्टॉलही रात्रभर उघडे राहिले तर खूप लोकांची सोय होईल. रात्री बारानंतर भेळही मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे अनेकांची पैसे खिशात असूनही उपासमार होते. त्यामुळे फक्त सकाळच्या वेळी इडली चटणी, कांदापोहे, वडापाव विक्री करणारे जर रात्रभर वडापाव देत राहिले तर त्यांच्याही उत्पन्नात वाढ होईल. जास्तीचे विक्रेते तयार होतील. त्यामुळे रात्रीच्या मुंबईत फक्त दारूवाल्यांचाच फायदा होईल, असे समजण्याचे कारण नाही. मुंबई ही चोवीस तास सुरू राहिली, तर चांगलेच होईल. अनेकवेळा दिवसा फिरायला जाणे शक्य नसते. असे लोक रात्रीच्या शांत थंड वातावरणात मुंबईचा आनंद घेऊ शकतात. दिवसाढवळ्या नोकरदारांच्या गर्दीत लोकल आणि अन्य वाहनांची ट्रॅफिक जाम करण्यापेक्षा फिरायला जाणारे रात्री उशिरा जाऊ शकतील. खरेदीलाही रात्रीचे बाहेर पडू शकतील. शॉपिंगला वेळ रात्रीचा मिळाला तर दुकानेही रात्रभर सुरू ठेवता येतील. त्यामुळे दुकानदारही अतिरिक्त नोकर कामावर ठेवतील. त्यामुळेच या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहून हा बदल स्वीकारायला हरकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा