‘शांतपणे गुपचूप बैस,’ एक जण दुसºयाला समजावत होता, पण त्याचे समाधान होत नव्हते. तो म्हणत होता की, ‘पण मला भीती वाटतेय रे’. ‘टेन्शन घेऊ नकोस, मी सांभाळतो सगळं,’ पहिल्याचे दुसºयाला धीर देणे चालूच होते, पण तिसरा अधिकच घाबरत होता, किंबहुना पहिल्याच्या समजावण्याने तो अधिकच टेन्शनमध्ये येत होता. शेवटी अखेरचे समजावत त्याला पहिला म्हणाला, ‘अरे, काय होईल फार फार तर? जरा सर्व्हाव्ह करायला शिक. मुंबई आहे ही. जास्तीत जास्त काय, तर पकडले जाऊ. फासावर तर देणार नाही ना तो? दंड भरू.’ ‘ पण कुणी पाहिलं तर? बाकीचे कसे बघतील आपल्याकडे?’ त्याने शंका विचारली, तसा पहिला म्हणाला, ‘ही मुंबई आहे, इथे कुणालाही कुणाकडे बघायला वेळ नाही. आणि अशी वेळ प्रत्येकावर कधी ना कधी आलेली असतेच.’ आता त्याला थोडा धीर आला. लोकल धावत होती. एकेक स्टेशन पुढे जात होती. लोकलची धडधड आणि त्याच्या छातीतील धडधड वाढतच होती. शेवटी पहिला पुन्हा एकदा म्हणाला, ‘लहानपणी चोर-पोलीस हा खेळ कधी खेळला नाहीस का?’ खिन्न हसत तो म्हणाला, ‘खेळायचो ना, पण मी लगेच पकडला जायचो.’ त्यावर हसत पहिला म्हणाला, ‘सामान्य पापभिरू माणसाचं असंच असतं. किरकोळ चूकही त्याला खूप मोठे पाप वाटते आणि तो त्यातच पकडला जातो, पण आपण दंड भरू आणि मोकळे होऊ.’लोकलमधला हा संवाद लक्ष वेधून घेणारा होता. गर्दीच्या वेळी तिकीट काढायचे राहून गेले आणि ते दोघे पटकन गाडीत चढले होते. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की, अरेच्चा! तिकीट काढायचे राहूनच गेले. त्यापैकी एकाचा पास होता. त्यामुळे तो भराभरा गाडीत चढला, त्याच्यापाठोपाठ दुसराही चढला. त्याच्या लक्षात आले नाही की, तिकीट काढायचे आहे. अनवधानाने झालेली चूक, पण त्याचे टेन्शन त्याने घेतले होते, पण त्याला समजावताना लहानपणीच्या चोर-पोलीस खेळाची आठवण करून दिली होती त्याच्या मित्रानं.खरंच मुंबईतील लोकल आणि त्यातील फुकटे प्रवासी हा चोर-पोलिसाचाच खेळ असतो. या खेळात बहुतेक सर्वांनीच कधी ना कधी भाग घेतलेला असतो. अगदी भल्याभल्यांनीही. त्यात कुठे चोरी करण्याचा वाईट हेतू असतो असे नाही, पण कळत-नकळत विदाऊट तिकीट जाणे भाग पडते आणि नेमके पकडले जाण्याची भीती असते. त्यामुळे आपण पकडले जाणार नाही यासाठी घेतली जाणारी खबरदारी म्हणजेच हा चोर-पोलीस खेळ. मी एकदाही विदाऊट तिकीट प्रवास केला नाही, असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही, पण पकडला तर चोर, नाही तर राजाहून थोर अशी अवस्था असते.रेल्वेचे टीसी नेमक्या माणसांना कसे पकडतात हे न उलगडणारे कोडे आहे. त्यातून आजकाल टीसी वेगळेच दिसतात. पूर्वी टीसी लोकलमधूनही हिंडायचे, पण आता गर्दीत चेकिंग करणे सोपे नसल्याने शक्यतो ते प्लॅटफॉर्मवरच सापळा लावून बसलेले असतात. पूर्वी काळ्या कोटामुळे पटकन टीसी कुठून येतोय हे कळायचे आणि दुसºया दाराने कलटी देणे सोपे जायचे, पण आजकाल पांढºया शर्टमुळे टीसी चटकन ओळखूच येत नाही. एकदम पकडल्यावरच समजते, पण ते अचूकपणे विदाऊट तिकीट प्रवाशांना पकडतात हे नक्की. ते ज्यांना अडवतात, त्यापैकी बहुतेक जणांकडे तिकीट नसते, कुणी जुने तिकीट दाखवतो, कुणाचा पास संपलेला असतो, कुणी तिकीटच काढलेले नसते, कुणी अलीकडच्या चार स्टेशनचे तिकीट काढलेले असते, म्हणजे सीएसएमटीला उतरणाºयाकडे दादरपर्यंतचेच तिकीट असते. असे अनेक प्रकारचे विदाऊट तिकीट पकडले जातात. मग त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो, म्हणजे चोर-पोलीस हा खेळ इथे सतत चालूच असतो. प्रत्येकाने त्यात कधी ना कधी भाग घेतलेला असतो. त्यामुळे कधी कधी वाटते की, जर दीवार हा चित्रपट पुन्हा काढला, तर त्या अमिताभच्या-विजयच्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असे न लिहिता ‘हम सब चोर हैं’ असं गोंदवलं जाईल.विदाऊट तिकीट प्रवाशांची एक मानसिकता असते. टीसीला चुकवल्यानंतर फार मोठा विजयी आनंद त्यांच्या चेहºयावर असतो. सुटलो बुवा म्हणून स्टेशनमधून बाहेर पडतात. काही जण अत्यंत हिशोबी असतात. नेहमी विदाऊट तिकीट प्रवास केल्यावर एखाद्वेळी पकडलो गेलो आणि दंड भरला, तर काही फरक पडत नाही, असे त्यांचे मत असते. हे निर्ढावलेले प्रवासी असतात, पण कधी तरी अनवधानाने विदाऊट तिकीट प्रवास करणाºयांचे छातीचे ठोके रेल्वे इंजिनसारखे धडधडत असतात, हे नक्की. पकडल्यावर काय अपमान होतो याची त्यांना भीती असते, म्हणजे पकडून दंड भरण्यापेक्षा आपण विदाऊट तिकीट पकडले गेलो आणि आसपासचे लोक आपल्याला पाहात आहेत, यानेच त्यांना मेल्याहून मेल्यासारखे होते, म्हणजे आपण जेव्हा घसरून पडतो, तेव्हा पडल्याचे दु:ख किंवा लागल्याचे दु:ख नसते, तर कोणी पडल्यावर हसले की त्याचे दु:ख असते. तसेच इथे होते. आपली चूक आहे, आपण दंड भरायचा, पण त्याने अडवून दंड भरा म्हणताना बाकीचे ज्या नजरेने बघतात त्याचे टेन्शन असते. काय सुशिक्षित माणूस आहे, पण विदाऊट तिकीट जातो? काय बाई आहे, चांगल्या घरची दिसते, पण तिकीट नाही काढले? या तरुणांना तिकीट काढायचेही भान नाही का? अशा असंख्य प्रतिक्रिया येणार. तशीच आपल्याबाबत असणार याची भीती असते.कधी कधी अनवधानाने आपण विदाऊट तिकीट प्रवास करतो. पास काल रात्री बारा वाजता संपला, ते लक्षातच नाही आणि थेट रोजच्याप्रमाणे गाडीत बसलो. गाडीत सहज कोणी तरी आज अमूक एक तारीख आहे म्हणतो आणि आपल्या लक्षात येते, अरे बापरे, पास संपलाय... आता पकडले गेलो तर? कधी शेवटची गाडी असते, त्यानंतर लवकर गाडी नसते, कधी नेहमीची गाडी पकडली नाही आणि लेटमार्क लागला तर? या काळजीने रांगेत उभे न राहता थेट गाडीत घुसले जाते. अनेक कारणांनी केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाचा विदाऊट तिकीट प्रवास झालेला असतोच. अशाच प्रकारचा तो आज चिंतेत होता.सीएसएमटीला गाडी थांबली, तसा तो निश्चयानेच पुढे गेला. समोर टीसी होताच. टीसीच्या दिशेनेच तो जात होता. निर्धार एकच केला होता, त्याला आपण होऊन सांगायचे की, दंड भरतोय, तिकीट नाहीये. टीसीच्या दिशेने तो जात असतानाच टीसी त्याच्याकडेच पाहात होता, पण तो ठाम होता. मग टीसीच वेगाने पुढे आला आणि त्याने झेपावून मागच्या माणसाला पकडले. अरेच्चा, आपण सुटलो? आता तो पाहात राहिला काय होते पुढे ते? टीसीने त्याला नेहमीचा पासधारक आहे म्हणून दुर्लक्षिले होते, पण त्याच्या मागून येणाºया विदाऊट तिकीट प्रवाशाला पकडले होते. आता तो पकडला गेलेला तरुण गयावया करू लागला. ‘साहेब, मी गरीब आहे. मला महत्त्वाच्या कामाला जायचं होतं.’ ‘दंड भरा प्रथम...’ टीसीने सांगताच तो काकुळतीला येत म्हणाला, ‘एवढे पैसे नाहीत हो माझ्याकडे.’हे पाहून सुटलेल्या विदाऊट तिकीट प्रवाशाला वाईट वाटले. आपण सुटलो, पण हा पकडला गेला आहे. तो तसाच मागे वळला आणि म्हणाला, ‘साहेब, नेहमीचा सभ्य तरुण आहे तो. त्याला मी ओळखतो. त्याचा दंड मी भरतो. हे घ्या पैसे, त्याला सोडा. त्याच्या नोकरीचा प्रश्न आहे. नसतील त्याच्याकडे. मदतीसाठी धावलेल्या त्या विदाऊट तिकीट प्रवाशाच्या पाठीवर हात ठेवत टीसी म्हणाला, ‘ठीक आहे, सोडतो त्याला. तुम्हाला कशाला दंड?’‘नाही, रेल्वेचे नुकसान नको, हवे तर किमान तिकिटाचे पैसे तरी घ्या,’ असे म्हणत पन्नासची नोट टीसीच्या हातात टेकवून त्या तरुणाला घेऊन तो विदाऊट तिकीट माणूस निघूनही गेला. आपल्याला दंड पडला नाही, म्हणून त्याने वेगळ्या मार्गाने दंड भरला होता!
गुरुवार, ३० जानेवारी, २०२०
दंड!
भोंगा
काही काही आवाज हे स्वत:ची ओळख निर्माण करणारे असतात, म्हणजे गायक-गायिकांचे आवाज असतात, तसेच यांत्रिक आवाजही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे असतात. यामध्ये काही तरी जाणीव करून देण्याची, कसला तरी सूचक इशारा देण्याची ती कृती असली, तरी त्या आवाजाला कोणतीही वेगळी भाषा लागत नाही. ते जगभर तसेच असतात. यामध्ये काही आवाज हे धडकी भरवणारेही असतात. ती का भरते माहिती नाही, पण गर्दीतून प्रवास करत असताना अचानक येणारा अॅम्ब्युलन्सचा आवाज, सगळ्या वाहनांची रस्ता मोकळा करून देण्याची चाललेली धडपड. यामध्ये आतल्या पेशंटला त्या आवाजाचा त्रास होत नाही का? असेलही कदाचित, पण ‘मी खूप आजारी आहे, मला तातडीची सेवा हवी आहे, माझी वाट सोडा’ असा आक्रोशच त्या अॅम्ब्युलन्सच्या आवाजातून होत असतो. अंगावर शहारा आणणारा तो आवाज असतो. आपल्या ओळखीचे, जवळचे तर या गाडीत नाही ना, अशी उगाचच चिंता लावणारा तो आवाज असतो. तसाच आणखी एक भयानक आवाज म्हणजे पोलिसांच्या वाहनाच्या सायरनचा. जो गोंगाट करत ती गाडी, तो ताफा येतो की, ऐकणाºयांच्या अंगाचे पाणी पाणी होते. कुठे तरी दरोडा पडला असावा, कुठे तरी काही तरी भयानक प्रकार घडला असावा अशी चिंता देणारा तो आवाज. याशिवाय आणखी एक धडकी भरवणारा आवाज म्हणजे अग्निशमन दलाच्या सायरनबरोबर घंटी वाजवत जाणारा आवाज. कुठे आग लागली? आपल्या घराजवळ तर नाही ना? अशी चिंता निर्माण करणारा आवाज. हे आवाज आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे रौद्र स्वरूपाचे आहेत. अशाच आवाजात एक कालबाह्य होत असलेला आणि काही अंशी झालेला आवाज म्हणजे भोंगा.भोंगा ही एक आपल्याकडची कामगार संस्कृती होती. भोंग्याचा कर्कश आवाजही छातीत धडकी भरवणाराच होता, पण कित्येक मैल दूरवर तो पोहोचायचा. गावाकडच्या निरव शांततेत तर खूप लांबवर तो ऐकायला यायचा. औद्योगिक वसाहती जशा आपला विस्तार करू लागल्या, तसा या भोंग्याचा पसारा वाढत होता, म्हणजे उद्योग-धंद्याचे विकेंद्रीकरण करण्यासाठी आणि मुंबईकडे येणारे लोंढे थांबवून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्यासाठी औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या. या एमआयडीसीतून असे भोंगे वाजू लागले आणि गावोगाव त्यांचा आवाज पोहोचला, म्हणजे पूर्वी गिरणगावात किंवा मुंबईतील कारखान्यांमधून हा भोंगा ऐकायला जायचा. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांवर हा भोंगा ऐकायला मिळायचा. पुण्यातही पूर्वी महापालिकेचा भोंगा वाजायचा. साडेदहा वाजले की, पुण्याच्या टिळक रोडवरून तो आवाज यायचा. तो संपूर्ण नारायण पेठ, नाना पेठ, सदाशिव पेठेत जागवून जायचा. रास्ता पेठेत एमएसईबीचाही भोंगा वाजायचा. औद्योगिक वसाहती असलेल्या ग्रामीण भागातून सकाळी ८, दुपारी १२, सायंकाळी ४ आणि रात्री ८ चा भोंगा हा हमखास वाजायचा. आज हा भोंगा अनेक ठिकाणी कालबाह्य झालेला आहे.कारखान्यात आता काम सुरू करा, असा आदेश देणाराच तो भोंगा असायचा. आता जेवणाची सुट्टी झाली, आता काम थांबवा, असा आदेश देणारा तो भोंगा असायचा. दोन भोंग्यांच्या मध्ये आपले सगळे आटोपले पाहिजे ही वेळेचे महत्त्व जाणवून देणारी भावना त्या भोंग्यांमध्ये असायची, पण हा भोंगा वाजला की, अनेक प्रकारच्या भावना त्यातून निर्माण व्हायच्या. औद्योगिक वसाहतीत काम करणाºया कामगाराची पत्नी त्या भोंग्यावरच आपले वेळापत्रक ठरवायची. सकाळची शिफ्ट आहे, आठच्या भोंग्याला पोहोचायचे आहे. घरातून तो साडेसातला तरी बाहेर पडला पाहिजे. त्याच्या आत डबा तयार करून त्याला द्यायचा आहे. डबा घेऊन पती बाहेर पडल्यावर जेव्हा आठचा भोंगा वाजायचा तेव्हा तिला समाधान वाटायचे. गेले वेळेवर कामावर. मग क्षणभर डोळे मिटून ती समाधानाने आपला संसार पाहायची. मग मुलांच्या शाळेची तयारी. ते झाल्यावर मग आवराआवर आणि सर्वात शेवटी स्वत:कडे लक्ष द्यायचे. मुलं साडेदहा-अकराला शाळेत गेली की, ती एकटीच घरात असायची. मग झाडलोट कर, आवराआवर कर, धुणं धू, निवडणं-टिपणं कर. सगळा स्वयंपाक तयार असला, तरी स्वत:च्या जेवणाची तिला घाई नसायची. मग बाराचा भोंगा झाला की तीला आनंद व्हायचा. दहा मिनिटे ती दरवाजाकडेच डोळे लावून बसायची. मग पुन्हा छोटा भोंगा वाजायचा. मग ती उठून जेवणाची तयारी करायची आणि स्वत:चे भोजन करायची. पहिला बाराचा भोंगा वाजला म्हणजे आपले पतीराज आता जेवणार. त्यानंतर दहा मिनिटांनी वाजलेला भोंगा म्हणजे जेवण झाल्याची जाणीव करून देणारा भोंगा असायचा. हा भोंगा म्हणजे जेवणानंतरचा आलेला ढेकरच असायचा. मग ती आनंदाने उठून स्वत: जेवायची. घरात एकटी आहे म्हणून कधीही जेवण करण्याचा तिचा स्वभाव नव्हताच. पती जेवल्याशिवाय, त्याची खात्री झाल्याशिवाय ती जेवायची नाही. ही संस्कृती या भोंग्यात होती.सगळं आयुष्य त्या भोंग्याशी जोडलं होतं. चारचा भोंगा वाजला म्हणजे आता थोड्या वेळात तो घरी येईल. आल्या आल्या हातात गरम चहा, पोहे, नाही तर काही तरी नाश्ता त्याला द्यायचा आहे, याची जाणीव होऊन ती कामाला लागायची. त्याचे हसतमुखाने स्वागत करायचे यासाठी तिचा आटापिटा असायचा. तिने बाहेरून आल्यावर हसतमुखाने स्वागत केले म्हणजे दिवसभराचा सगळा कामाचा शिणवटा त्याचा नाहीसा व्हायचा. त्यामुळे कामगाराच्या आयुष्यात हा भोंगा अत्यंत महत्त्वाचा होता. कारखानदारीत तो भोंगा म्हणजे कामगारांचा आवाज होता. आता हा कामगारांचाच आवाज अत्यंत क्षीण झालेला आहे. कामगारांचा आवाज जसा दडपला जाऊ लागला आहे, तसाच हा भोंगाही आता वाजेनासा झाला आहे. कामाची जाणीव करून देणारे आणि औद्योगिक वसाहतीचे वातावरण निर्माण करणारे जे घटक होते, त्यात भोंगा फार महत्त्वाचा होता. चिमणीतून सुटणारा धूर आणि भोंग्याचा आवाज आला म्हणजे ही कामगारांची वसाहत आहे, ही कारखानदारी आहे, हे सगळे वातावरण असायचे. छोटे छोटे पंधरा-वीस फुटी चकाचक डांबरी रस्ते, कडेला तारेचे कम्पाऊंड, त्याच्या कडेकडेने लांबवर बैठी घरे, घरापासून जवळच वाटावा, पण प्रत्यक्षात चार-पाच किलोमीटर अंतरावर असणारा कारखाना.मंदीच्या लाटेत, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणामुळे, परदेशी बाजारपेठांनी केलेल्या आक्रमणामुळे अनेक कारखाने बंद पडले. संप, ताळेबंदी, बंदीमुळे कारखाने बंद झाले. कामगार बेरोजगार झाले. कारखान्यांच्या जमिनींवर टॉवर उभे राहिले. औद्योगिक शहरे म्हणून ओळख असलेली शहरे ही वसाहतींची शहरे झाली. अनेक इस्टेट या औद्योगिक इस्टेट म्हणून ओळखल्या जात होत्या. त्या इस्टेटवर आता टॉवर आले आणि भोंगे बंद झाले. भोंगे बंद करून कामगारांचा आवाजच बंद झालेला आहे. सगळीकडे तीच परिस्थिती आहे. कामगारांची मुले रोजगारासाठी वणवण हिंडत आहेत. आता त्यांच्या मनाचा आक्रोशही कोणाला ऐकू येत नाही. हा मूक आक्रोश हजारो भोंग्यांपेक्षा जास्त आहे, पण तो सरकारपुढे, व्यवस्थेपुढे पोहोचत नाही. भोंगे बंद झाले, कामगारांची तोंडे बंद झाली. आता कंत्राटी कामगार. उद्या कामावर राहू याची कोणाला शाश्वती नाही. त्यामुळे भोंग्यांच्या तालावर चालणारे कामही आता आऊट आॅफ डेट झाल्याचे दिसते, पण हा भोंगा म्हणजे कामगारांना प्रेरणा, ऊर्जा देणारा आणि चैतन्य निर्माण करणारा आवाज होता. धडकी भरणारा असा कर्कश आवाज होता. कामावर जाताना ‘घाई करा, घाई करा’ असे म्हणायचा, तर कामावरून सुटताना ‘आता घरी जाऊन आराम करा’ म्हणायचा. तो आवाज आता ऐकायलाच येत नाही.
बुधवार, २९ जानेवारी, २०२०
महाराजा होणार की, गुलाम?
एके काळी डोक्यावर मस्तपैकी फुगीर फेटा, तुरा आणि त्याच्या झुपकेदार मिशांमधून हसत स्वागत करणारा महाराजा म्हटले की, एअर इंडिया असे समीकरण असायचे. एअर इंडियाची विमाने आणि त्यातून प्रवास करणे हे श्रीमंतांचेच काम, गरीबांचे नाही, पण त्या महाराजाकडे पाहूनही सर्वांना आनंद मिळायचा. त्या महाराजाची स्टीकर आपल्या घरात आरशाच्या कपाटावरच लावण्याचे, घरातील पडद्यावर भरतकाम करताना हा महाराजा हमखास असायचा. लग्नकार्यातील रुखवातातही या महाराजाला स्थान होते. इतका हा महाराजा आमच्या जवळचा होता. कालांतराने अनेक विमान कंपन्या आल्या आणि या महाराजाचे विस्मरण होऊ लागले, पण कधी प्रवास केला नसला, तरी एअर इंडियाचा महाराजा हा घराघरांत पोहोचला होता, हे नक्की. आज तोच महाराजा गुलाम होऊन त्याची विक्री होताना दिसत आहे, म्हणजे एके काळी भारताची शान असलेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी सरकारने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा ७६ टक्के वाटा सरकारने विकायला काढला होता, परंतु उर्वरित २४ टक्के भांडवल सरकारकडेच राहणार असल्याने एकानेही त्यासाठी बोली लावली नव्हती. परिणामी आता पुन्हा एकदा बोलीदारांना आकृष्ट करण्यासाठी एअर इंडियाची सर्वच्या सर्व शंभर टक्के निर्गुंतवणूक करण्यासाठी सरकारने सोमवारी प्रस्ताव पुन्हा मागवले. खरे तर एअर इंडियाच्या महाराजाची शान केव्हाच घसरणीला लागली आहे. आता हा राजा गुलाम झालेला आहे, असेच वाटते.यूपीएचे मनमोहन सिंग सरकार असताना आठ वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने तीस हजार कोटींचे मदत पॅकेज पुरवून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील एअर इंडियाला चालते ठेवले होते, परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेला तोटा पाहता सरकारपुढे आता निर्गुंतवणुकीशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही. एअर इंडियाचा एकूण तोटा साठ हजार कोटींच्या पुढे आहे. निर्गंुतवणूक करताना बोलीदारांना आकृष्ट करण्यासाठी या कर्जाचा काही वाटा सरकारने स्वत:कडे वळवला. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी एअर इंडिया होल्डिंग लि. ही खास कंपनी स्थापन केली व तिच्याकडे काही कर्ज वळवले. सध्याच्या प्रस्तावानुसार यावेळी बोलीदारांना एअर इंडिया खरेदी करताना तिचे २३ हजार कोटींचे कर्ज उचलावे लागणार आहे. उर्वरित भार सरकार सोसेल, पण ही आलेली परिस्थिती पाहून सरकारच्या ताब्यातील एकेक उद्योगाचे होणारे खाजगीकरण ही चिंतेची बाब आहे.वास्तविक पाहता एअर इंडिया ही एकेकाळची देशातील अग्रणी कंपनी, परंतु गैरव्यवस्थापनामुळे आणि सरकारच्या सततच्या हस्तक्षेपामुळे ती गाळात जात राहिली. कर्मचाºयांची खोगीरभरती, सरकारी कंपनी असल्याने तोट्याच्या हवाई मार्गांवरही सेवा पुरविण्याची अपरिहार्यता, गैरव्यवस्थापन अशा अनेक कारणांमुळे या महाराजाचे ऐश्वर्य ओसरत गेले. खरे तर आजही देशातील कानाकोपºयात आणि विदेशांत तिचे व्यापक जाळे विस्तारलेले आहे. देशातील महत्त्वाचे विमानमार्ग ताब्यात आहेत, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने विमानतळांवर प्राधान्यक्रम आहे, सर्व साधनसामुग्री उपलब्ध आहे, केंद्र सरकारच्या वतीने शासकीय विमान प्रवास करताना तिच्याच सेवेचा वापर केला पाहिजे, असाही दंडक आहे, परंतु एवढे सगळे असूनही एअर इंडिया तोट्यात आहे, परंतु या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचे निर्गुंतवणुकीकरण हाच एकमेव उपाय होता काय? असा प्रश्न पडतो. नवे प्रशासन आणून, व्यवस्थापनात बदल करूनही हा प्रश्न सोडवता आला असता, पण ही सेवा खाजगीत आणण्याचा हा अट्टाहास आहे, असेच दिसते. सरकारी उद्योग जगवले पाहिजेत, असे पुन: पुन्हा वाटते.एअर इंडियाचा नावलौकिक हा सदैव उशिराने धावणारी विमाने, प्रवाशांची गैरसोय, सेवेचा घसरलेला दर्जा आदींमुळे तिची प्रतिमा बिघडलेली आहे. ती सुधारण्याचा आटोकाट प्रयत्न, अर्थात अलीकडे होत राहिला आहे. मध्यंतरी तिचे आकर्षक ब्रँडिंग करण्यात आले. हल्लीच एअर इंडियाने विमान प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पूर्ण खानपान सेवा पुरवायला प्रारंभ केला, सवलती देऊ केल्या, स्टार अलायन्सची भागीदार असल्याने तो लाभही नियमित प्रवाशांना मिळत असतो, परंतु एवढे असूनही इतर व्यावसायिक विमान सेवांच्या तुलनेत तिची घसरण काही थांबू शकलेली नाही. इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत एअर इंडियाच्या विमान आणि कर्मचाºयांचे गुणोत्तर सर्वाधिक आहे. त्यामुळे अगदी गल्लीतील रस्त्यावरून धावणारी एसटी बस आणि हवेतून उडणारी विमाने या दोन्ही ठिकाणी एक प्रकारचाच गैरव्यवहार असल्याचे दिसते. खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एसटी कर्मचारी गैरव्यवहार करतात, उशिरा गाडी चालवणे, बस न थांबवणे, प्रवाशांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार करतात. तोच प्रकार आमच्या महाराजाच्या एअर इंडियाबाबत झाला आहे. त्यामुळे हा व्यवस्थेतील दोष आहे. स्थानिक राज्य पातळीवर एसटीचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे, तसाच केंद्रीय पातळीवर एअर इंडियाचा लिलाव होत आहे. ही आमच्या राज्यकर्त्यांची चूक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.चौदा हजार कर्मचारी, त्यांच्या कामगार संघटना, वैमानिकांकडून वारंवार होणारा संप आदी कटकटींमुळे एअर इंडियासमोर सतत समस्या उभ्या राहात आल्या आहेत. एके काळी टाटांनी या भारताच्या पहिल्यावहिल्या स्वदेशी विमानसेवेचा पाया घातला. पुढे तिचे सरकारीकरण करण्यात आले. त्या भावनिक नात्यापोटी आता पुन्हा एकदा टाटा समूह तिच्या खरेदीसाठी इच्छुक आहे. सध्या टाटांची एअर विस्तारा अत्यंत दर्जेदार प्रवासी सेवेसाठी लोकप्रिय आहेच. एअर एशियामध्येही त्यांचा वाटा आहे. आता एअर इंडियाच्या खरेदीसाठी ते पुन्हा बोली लावण्याची शक्यता आहे. अर्थात, टाटांसारख्या भारतीय उद्योगपतींच्या हातात ही सेवा गेली, तर वाईट वाटणार नाही. भारतीय सेवा म्हणून त्याचा अभिमान वाटेल, पण बहुराष्ट्रीय आणि परकीय शक्तींच्या हातात ती गेली, तर चिंतेची बाब असेल. कारण तशा परिस्थितीत आमचा महाराजा गुलाम झालेला असेल. या महाराजाला गुलाम होण्यापासून वाचवले पाहिजे. आज इंडिगो, स्पाईसजेटसारख्या स्पर्धक कंपन्या, एकेकाळी जेटमध्ये गुंतवणूक करणारा हिंदुजा समूह या कंपन्या स्वतंत्रपणे अथवा एकत्र येऊन कंझोर्टियम स्थापून एअर इंडियासाठी बोली लावू शकतात. त्यासाठी बोलीदारांचा आर्थिक पात्रता निकष सरकारने पाच हजार कोटींवरून साडेतीन हजार कोटींपर्यंत खालीही आणलेला आहे. एवढे सगळे केल्यावर तरी एअर इंडियाचे तोट्यातले शुक्लकाष्ठ पाठ सोडेल, अशी अपेक्षा सरकार बाळगून आहे. खरे तर एअर इंडियाची अशा प्रकारे निर्गुंतवणूक करण्याची पाळी सरकारवर येणे हे लाजिरवाणे आहे. अर्थात, दोष विद्यमान सरकारचा नाही. सरकारी म्हटल्यावर येणाºया सुस्तीचा आणि वर्षानुवर्षांच्या गैरव्यवस्थापनाचा आहे. एखादा गाळात गळ्यापर्यंत बुडाल्यावर वर काढणे सोपे नसतेच. त्यामुळे निर्गुंतवणुकीविना आता पर्यायच नाही अशी सरकारची धारणा झालेली आहे. त्यामुळेच एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेसमधील संपूर्ण भागभांडवल आणि सिंगापूर एअरलाइन्सशी भागीदारीत असलेल्या एअर इंडिया एस.ए.टी.एस. या ग्राऊंड हँडलिंग कंपनीतील पन्नास टक्के वाटा निर्गुंतवणुकीसाठी काढण्यात आला आहे, पण त्यावर अजूनही विचार करून काही व्यवस्थापकीय बदल करून सुधारणा करता येते का? हे पाहावे लागेल. सरकारी पातळीवरील दौरे, मंत्री, आमदार, खासदार, शासकीय दौरे हे या विमानानेच केले पाहिजेत, खाजगी करता येणार नाहीत, असे काही नियम करून महाराजाला जीवदान देता आले तर पाहिले पाहिजे.काही राजकीय नेते, नेहमीच चर्चेत असणाºया सुब्रह्मण्यम स्वामींसारख्या टीकाकारांना अर्थात हे मान्य नाही. ते कोर्टात जाण्याची भाषा करीत आहेत. सगळी सोंगे आणता येतात, पैशाचे सोंग आणता येत नाही, हे एअर इंडियाच्या बाबतीतही खरे आहे, पण तरीही भारताच्या या प्रतिष्ठित विमान कंपनीचे अशा प्रकारे खासगीकरण करण्याची वेळ येणे हे शोभादायक नाही, लाजिरवाणे आहे, म्हणूनच महाराजाला गुलामगिरीत जाण्यापासून वाचवता आले, तर पाहिले पाहिजे.
सोमवार, २७ जानेवारी, २०२०
नवा राजमार्ग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी गोरेगाव येथे महाअधिवेशनात पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून, त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. विशेष म्हणजे यावेळी अमित ठाकरे यांचा राजकारणातील प्रवेश जाहीर करतानाच त्यांची मनसेच्या नेतेपदी निवडही करण्यात आली, म्हणजे आता राज ठाकरे अधिक परिपक्व झालेले आहेत आणि सर्वच पक्षांच्या नेत्यांप्रमाणे त्यांनीही आपल्या पुढच्या पिढीला आणले आहे. महाराष्ट्राच्या नव्या राजकारणात युवा पिढीचे झालेले आगमन लक्षात घेऊन अमित राज ठाकरे यांचे पदार्पण हा महत्त्वाचा टप्पा आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, धिरज देशमुख, ऋतुराज पाटील, अदिती तटकरे अशा दिग्गज नेतापुत्रांचा राजकारण प्रवेश झाल्यावर अमित ठाकरे यांचे पदार्पण हे महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे या नव्या पिढीकडे एक चांगला दृष्टिकोन, खेळीमेळीचे वातावरण असल्याचे दिसत आहे. रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांचे अभिनंदन करणे हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे भविष्यात राज्याचे राजकारण एका नव्या वळणावर असेल, त्या वळणावरच हा मनसेचा नवा राजमार्ग आहे.गुरुवारी गोरेगाव येथील नेस्को ग्राऊंडवर पार पडलेल्या पक्षाच्या महाअधिवेशनासाठी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि कन्या उर्वशी ठाकरे आदी सकाळी नऊ वाजताच दाखल झाले होते. त्यामुळे या अधिवेशनाला एक प्रकारे उत्सवाचेच स्वरूप प्राप्त झालेले होते. गेल्या काही दिवसांत विशेषत: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला आलेल्या अपयशानंतर आलेली मरगळ यामुळे झटकली गेली असेल, हे नक्की. लोकसभेला जरी त्यांनी उमेदवार उभे केलेले नसले, तरी विरोधकांचे ते स्टार प्रचारक होते. त्याचा काहीही परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे ते अपयशच होते. त्यामुळेच ही मरगळ झटकण्याच्या इराद्याने मनसेच्या महाअधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपºयातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले होते. सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसेने यानिमित्ताने तीन रंगांचा जुना झेंडा बदलून भगव्या रंगाचा ध्वज स्वीकारला. यापूर्वी पक्षाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो असायचे. गुरुवारी त्यांच्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फोटोलाही मनसेकडून व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. जे शिवसेनेने सोडले, नाकारले, दुर्लक्षिले ते उचलायचे हे यातून स्पष्ट होते आहे. कारण शिवसेना आता व्यासपीठावर सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असल्यामुळे सावरकरांना स्थान देणार नाही, हिंदुत्वाला जवळ करणार नाही, हे अधोरेखित करण्याचे काम या झेंडा आणि फोटोवरून दिसून आले.त्यानंतर अमित ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशही जाहीर करण्यात आला. मनसे विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाºयांनी अमित ठाकरे यांना यावेळी तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. मनसेचा नवा झेंडा फडकवत अमित ठाकरे यांनी पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी अमित यांनी शिक्षण आणि क्रीडा विषयक ठराव मांडले. मनसेच्या चौदा वर्षांच्या काळात प्रथमच असे अधिवेशन झाले आहे, हे विशेष.या अधिवेशनावरून एक लक्षात घेतले पाहिजे की, मनसेचा हा चौदा वर्षांचा वनवास आता संपला का? राज्यात मनसे आपली जागा आता निर्माण करणार का? तर एकूणच गुरुवारच्या उत्साहावरून ही पोकळी दूर करण्याचा प्रयत्न मनसे करणार, हे दिसत आहे.आज शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक थोडासा अस्वस्थ आहे. त्यांना त्यांच्या मनातले काही बोलता येत नाही. शिवसैनिकांमधील ही अस्वस्थता मनसेला लाभदायक होईल असे वाटते. आपल्या मूळ विचारांपासून शिवसेना दूर जात असेल, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक नवा मार्ग शोधतील आणि ते मनसेकडे वळतील, असा होरा यानिमित्ताने मनसेकडून मांडला जात आहे, पण हा बदललेला मनसेचा ट्रॅक त्यांना किती फायद्याचा होतो हे पाहण्यासाठी महापालिका निवडणुकांचीच वाट पाहावी लागेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर जाऊन जागा वाटप करून चांगले संख्याबळ कमवायचे आणि शिवसेनेकडून महापालिका काढून घेण्यासाठी मनसेने हे धोरण आखले असावे. नाशिक आणि मुंबई महापालिका ही दोन लक्ष्य आता मनसेने ठेवलेली आहेत हे लक्षात घेण्यास हरकत नाही.मनसेच्या महिला आघाडीने रक्षाबंधनसारख्या उपक्रमातून महिलांच्या सुरक्षेसाठी उघडलेले दालन फार महत्त्वाचे आहे. शिवसेनेची प्रत्येक भागातील शाखा, प्रत्येक शाखाप्रमुख हा नगरसेवकाप्रमाणे होता, तो जनतेची कामे करत असे, परंतु आता तशी कामे होत नाहीत. त्यामुळे शिवसेनेची ही पोकळी भरून काढून शहरातील नागरिकांच्या हृदयात प्रवेश करण्याचे धोरण मनसेने आखलेले दिसते आहे. त्याचप्रमाणे शिक्षण आणि क्रीडा या धोरणाला प्राधान्य देऊन अमित ठाकरे यांनी भावी पिढी, तरुणांना आपलेसे करण्याचे प्रयत्न असणार याची चुणूक दाखवून दिलेली आहे. शॅडो कॅबिनेटचा प्रयोग करून प्रत्येक मंत्र्यावर वॉच ठेवण्याच्या निमित्ताने सरकारवर वचक ठेवण्याचे काम मनसे करणार. त्यामुळे ही सगळी पावले पाहता शिवसेनाप्रमुखांनी प्रारंभीच्या काळात संघर्ष करून जनतेच्या मनात स्थान मिळवले होते, ते स्थान मिळवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेना गेल्याने आगामी निवडणुकीत शिवसेनेला मतदार नाकारतील असा अंदाज बांधून शिवसेनेला पर्याय देण्याची रणनिती या नव्या राजमार्गात आहे. त्यामुळे सेना-भाजप युतीप्रमाणे मनसे-भाजप युतीचे प्रयत्न केले जातील, असेही अंदाज आहेत. त्यामुळे हा गुरुवारचा उत्साह येत्या काही दिवसांत वाढवत मनसे कशी वाढते ते पाहणे आवश्यक आहे. एक नवा फॉर्म्युला, नवा राजमार्ग राज्याच्या राजकारणात तयार होताना दिसत आहे, हे नक्की.
भारतकुमार मनोजकुमार
हिंदी चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या भूमिका १९५७ ते १९९५ पर्यंत करत आपला वेगळा ठसा उमटवणारा नट म्हणजे मनोजकुमार. प्रेमकथा, रहस्यकथांवर असलेल्या चित्रपटतिंही काम केले असले, तरी मनोजकुमारची खरी ओळख दिसते, ती भारतकुमार म्हणून. देशभक्तीवर आधारित चित्रपट काढायचे काम त्यांनी केले आणि त्याच्या बाकीच्या चित्रपटांकडे दुर्लक्ष होत तो फक्त भारतकुमार म्हणून ओळखला जाऊ लागला, पण मनोजकुमारचा अभिनय, दिग्दर्शन आणि कल्पकता याची एक शैली होती. अभिनयात तसा ठोकळा असला, तर दिग्दर्शनात अत्यंत मोकळा आणि कल्पकता होती. त्यामुळेच त्याने निर्माण केलेले देशभक्तीपर चित्रपट गाजले. कोणतीही २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट हे मनोजकुमारच्या ‘मेरे देश की धरती...’ या गाण्याशिवाय अपूर्ण असल्याचे दिसते, म्हणजे १५ आॅगस्ट, २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांना आकाशवाणीवरून हमखास पहिले देशभक्तीपर गीत ‘जयोस्तुते जयोस्तुते...’ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मंगेशकर कुटुंबीयांचा सामूहिक आविष्काराचे असते आणि नंतर बाहेर कुठेही मनोजकुमारच्या उपकार चित्रपटातील ‘मेरे देश की धरती...’ या महेंद्र कपूर यांच्या काळी सात पट्टीत गायलेल्या गीताशिवाय पूर्ण होत नाही. गेल्या साठ वर्षांत देशभक्ती गीतात आणि देशभक्ती सामावण्यात सावरकरांची गीते आणि मनोजकुमारच्या चित्रपटातील उपकार या देशावर झाल्याचे दिसून येते.आराम हराम हैं अशी घोषणा देणाºया देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. त्यानंतर शास्त्रीजींच्या इच्छेनुसार मनोजकुमारने हा देशभक्तीपर चित्रपट निर्माण केला. फिल्मफेअरचे ६ पुरस्कार या चित्रपटाला मिळाले होते. मनोजकुमारला कथा, दिग्दर्शनाचा, प्राणला सहाय्यक अभिनेत्याचा, गुलशन बावरा यांना मेरे देश की धरती या गीतासाठी या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. शेतकरी आणि जवान हे देशासाठी कसा त्याग करत असतात आणि त्यांना आपला देश कसा प्रिय असतो, हे दाखवताना या चित्रपटात भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी दाखवली आहे. एकीकडे सीमेवरच्या शत्रूशी जवान लढत असताना सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना अंतर्गत शत्रूशी कसा सामना करावा लागतो आणि काळे धंदे कसे होत असतात हे या चित्रपटातून अत्यंत मार्मिकपणे दाखवून दिले होते. त्यामुळे देशभक्तीपर चित्रपट बनवणारा निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता ही ख्याती या चित्रपटापासून मनोजकुमारच्या बाबतीत पक्की झाली. ५३ वर्षांपूर्वी पडद्यावर आलेला म्हणजे १९६७ चा हा चित्रपट प्रेक्षक आजही तेवढ्याच आनंदाने पाहतात हे वैशिष्ट्य या सिनेमाचे आहे.त्यापूर्वी मनोजकुमारने १९६५ मध्ये शहीद हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या चरित्रावर चित्रपट काढला होता. यात भगत सिंग यांची भूमिका मनोजकुमारने केली होती. १९६५ चा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार शहीदला मिळाला होता. यातही देशभक्तीपर गीते होती. त्यामध्ये ‘ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम...’ या मोहम्मद रफीच्या आवाजातील गाण्याने चांगलेच वातावरण निर्माण केले होते. त्याशिवाय ‘मोरा रंग दे बसंती चोला...’ या मुकेश, लता, महेंद्र कपूर यांच्या गीतानेही चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा संघर्ष आणि फाशी या चित्रपटात दाखवली होती. त्यानंतर चाळीस वर्षांनी भगत सिंग यांच्या जीवनावर तीन चित्रपट आले, पण मनोजकुमारच्या शहीदची लोकप्रियता कुठेच दिसली नाही. कारण देशभक्त मनोजकुमार ही भावना त्याने रुजवली होती. आपल्याकडे स्वातंत्र्यसैनिक, समाज कार्यकर्ते अशी अनेकांची ओळख असते, तशी मनोजकुमारने देशभक्त मनोजकुमार, भारतकुमार अशी ओळख संपूर्ण चित्रपटसृष्टीत निर्माण केली होती.मनोजकुमारने १९७० साली काढलेल्या पूरब और पश्चिम या चित्रपटाने सर्वांनाच विचार करायला लावला. स्वातंत्र्यानंतर अनेक भारतीय इंग्लंडमध्ये गेले. आर्थिक कारणाने, पैसा कमावण्यासाठी तिथली संस्कृती त्यांनी स्वीकारली. भारतात वाढलेला भारतकुमार मनोजकुमार तिकडे जातो आणि आपली संस्कृती, संस्कार किती उच्च आहेत, हे त्याला दिसून येते. काय शिकायचे, काय आदर्श घ्यायचा या पाश्चिमात्यांकडून? परंतु तिथले बिघडलेले भारतीय पाहून त्याला वाईट वाटते. कमी कपड्यांतील भारतीय तरुणी, सिगारेट, मद्यपानाची संस्कृती आणि कुठे आपली संस्कृती? यावर अत्यंत परखडपणे भाष्य करणारा, चित्रण दाखवणाराच नाही, तर अंजन घालणारा हा चित्रपट होता. देशभक्ती फक्त सीमेवरच नाही, तर देशात राहूनही करता येते. भ्रष्ट वागणे, भ्रष्टाचार न करणे, शिस्त, स्वच्छतेतूनही आपण आपल्या देशाची भक्ती करू शकतो हा विचार मनोजकुमारनी मांडला. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीतील फरक दाखवून दिला. उच्च नीतिमूल्यांच्या आपल्या भारतीय संस्कृतीचा गोडवा या चित्रटातून त्याने जगभर पसरवला. या चित्रपटातील महेंद्र कपूरचे ‘भारत का रहने वाला हूं...’ हे गीतही तुफान गाजले होते. आजही ते राष्ट्रीय सणांना ऐकायला मिळते. विनोद खन्ना, प्राण, सायराबानू, अशोककुमार अशा दिग्गज नटांबरोबर हा एक मनोजकुमारचा उत्कृष्ट देशभक्तीचा आविष्कार होता. यातील फोटोग्राफी, कलर कॉम्बिनेशन यातून मनोजकुमारची कल्पकता दिसून येते. स्वप्ननगरी पाश्चिमात्य देशातील चित्रीकरणासाठी वापरलेली फिल्म आणि भारतातील दृश्यांसाठी वापरलेल्या फिल्ममधील फरकातून दोन संस्कृतींतील फरक स्पष्ट होतो.१९७४ साली भारत बनून मनोजकुमार पुन्हा एकदा पडदद्यावर आला, तो रोटी कपडा और मकान या चित्रपटातून. अत्यंत सुपरहिट अशा या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांच्या डोक्यात झिणझिण्या आणल्या होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळून पंचवीस वर्षे झाली होती. या पंचवीस वर्षांत आपल्याकडे काय मिळाले? महागाई, भ्रष्टाचार, काळे धंदे, भूकमारी, महिलांवर अत्याचार, बेरोजगारी अशा असंख्य प्रश्नांना हात घालताना सामान्य माणसांची काय अवस्था आहे हे यातून दाखवून दिले होते. मिळालेली डिग्री नोकरी देऊ शकत नाही. व्यापारी भ्रष्टाचार करत आहेत. दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटातून बेरोजगारीचा प्रश्न प्रखरपणे मांडला होता. स्वातंत्र्याच्या पंचवीस वर्षांनंतर आम्ही काय कमावले यावर प्रकाश टाकणारा अत्यंत जळजळीत असा हा चित्रपट. यातील ‘महंगाई मार गयी...’ हे गाणे अजरामर असे गाणे आहे. मुकेश, लता मंगेशकर, चंचल यांच्या आवाजांनी हे गाणे अत्यंत टिपेला पोहोचते. ८ मिनिटांचे असलेले हे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय असे आहे. दारिद्र्यावर मनोजकुमारने बोट ठेवलेले दिसते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्यानंतर सुराज्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश हा चित्रपट देतो. या चित्रपटासाठी मनोजकुमारल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अनेक नामांकने या चित्रपटाला मिळाली होती. ‘मैंना भुलूंगा...’ या गाण्यासाठी संतोष आनंद यांना उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता, तर महेंद्र कपूर यांना ‘और नहीं बस और नहीं, गम के प्याले और नही...’ या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटापर्यंत सलग देशभक्त म्हणून मनोजकुमारची उत्तम प्रतिमा निर्माण झाली होती.त्यानंतर अनेक चित्रपटांत कामे करत तब्बल सात वर्षांनी मनोजकुमारने स्वत:ची निर्मिती केली. तो चित्रपट म्हणजे सुपरहिट ठरलेला क्रांती. ब्रिटिशांच्या कालावधीतील एकोणिसाव्या शतकातील १८२५ ते १८७५ या कालखंडातील कथानक घेऊन ब्रिटिशांचे अत्याचार या चित्रपटात दाखवताना मनोजकुमार पुन्हा एकदा भारतकुमार झाला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे दिलीपकुमारचे चित्रपटसृष्टीत झालेले आगमन. १९७०चा काळ राजेश खन्ना, अमिताभ यांच्या अदाकारीचा होता. एकसुरी अभिनयाच्या कृष्णधवल चित्रपटातील नायकांचा हा ओहोटीचा काळ होता. त्यामुळे दिलीपकुमारला कामेही मिळणे बंद झाली होती, पण क्रांती या चित्रपटातून चरित्र अभिनेता आणि सहनायकाच्या भूमिकेतच मनोजकुमारने दिलीपकुमारचे पुनर्वसन केले. त्यानंतर उतारवयातील नायक म्हणून दिलीपकुमारला प्रेक्षकांनी छान स्वीकारले. आपल्याकडे कथेचा नायक, पडद्यावरचा नायक हा तरुण लागतो, पण या चित्रपटातून एक नवा नायक दिलीपकुमारच्या रूपाने मनोजकुमारने दाखवला आणि दिलीपकुमारवर ते मनोजकुमारचे उपकारच ठरले. त्यामुळेच १९८० चे दशक पुन्हा दिलीपकुमारला अशाच वयातील नायकातून गाजवता आले. नव्या पिढीलाही दिलीपकुमार आवडू लागला. यामध्ये विधाता, कर्मा, शक्ती, दुनिया, मशाल, सौदागर या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. क्रांती चित्रपट देशभक्तीपर होताच, बिग बजेट आणि मल्टीस्टारकास्ट असा होता. शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, परवीन बाबी, सारिका, मदन पुरी, प्रेम चोप्रा असे दिग्गज या चित्रपटात होते. यातील गाणी, चित्रीकरण आणि सर्वच तांत्रिक बाबींवर मनोजकुमारच्या दिग्दर्शनाची कल्पकता दिसून येत होती. यातही मनोजकुमार भारत म्हणूनच आला होता.मनोजकुमार शेवटचा भारत म्हणून पडद्यावर आला, तो त्याचीच निर्मिती असलेल्या क्लर्क या चित्रपटातून. सपाटून आपटलेला असा हा चित्रपट, म्हणजे मनोजकुमारचा चित्रपट म्हणजे सुपरहिट असणार हे गृहीत धरले जात असताना जोरदार आपटी खाल्लेला हा भारतकुमार पुन्हा भारत बनून आला नाही. मनोजकुमार, रेखा, शशी कपूर, अशोक कुमार, अनिता राज, झेबा अशी चांगली कास्ट असूनही चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याने आणि देशभक्तीचे डोस ऐकायची तरुणांची मन:स्थिती संपुष्टात आल्याने हा चित्रपट पडला. १९८१ पर्यंत या देशातील तरुणांमध्ये, प्रेक्षकांमध्ये चित्रपटातून देशभक्ती हा विषय आवडीचा होता, पण स्वातंत्र्यानंतर ४० वर्षांनंतरही बेरोजगारी, गरिबी, महागाई, सामान्यांचे प्रश्न इतके शिगेला पोहोचले होते की, पडद्यावर उपदेशाचे डोस घ्यायला कोणी जाईना. आधी आमच्या रोजगाराचे, पोटापाण्याचे काय? हा विचार तरुणाईत रुजत होता. त्यामुळे क्लर्क चालला नाही. सरकारी कार्यालयातीत एक कारकून भ्रष्ट मार्गाने वागत असताना त्याला उपरती होते आणि देशप्रेमाने हा देश बदलायला जातो, पण हा चित्रपट चालला नाही आणि त्यातला भारतकुमार कोणाला भावलाही नाही, पण भारतकुमार ही देशभक्त अभिनेता, निर्माता ही प्रतिमा मनोजकुमारने अखेरपर्यंत जपली, हे नक्की. त्यामुळेच त्याच्या उपकारमधील ‘मेरे देश की धरती...’ या गाण्याशिवाय २६ जानेवारी, १५ आॅगस्टचा आनंद पूर्ण होत नाही, हे त्याचे उपकारच मानायला हवेत.
शिर्डी के साईबाबादेशभक्ती करता करता मनोजकुमारने संपूर्ण देशात भक्तिभावही रुजवला. १९७५ पर्यंत शिर्डी हे फारसे फेमस नव्हते, पण मनोजकुमारने शिर्डी के साईबाबा हा चित्रपट बनवला आणि या देवस्थानची ख्याती जगभर पसरली. हा चित्रपट सुपरहिट ठरलाच, पण या चित्रपटामुळे शिर्डी देवस्थान हे कायमचे यशाच्या शिखरावर गेले. या चित्रपटातून सुधीर दळवी या मराठी अभिनेत्याला साईबाबा म्हणून त्यांनी समोर आणले आणि लोक सुधीर दळवींमध्येच बाबा पाहू लागले. राजेंद्रकुमार, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हाशिवाय मराठीतील उषा चव्हाण आणि सचिन यांनीही यात काम केले होते. सुपरहिट गाणी आणि बाबांचे चमत्कारपूर्ण कथानक याने हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात.
मनोजकुमारने ४० वर्षांत ५१ चित्रपट केले. यामध्ये स्वत:च्या निर्मितीबरोबरच अन्य निर्मात्यांकडेही त्यांनी कामे केली. राज कपूर, दिलीपकुमार, अशोककुमार, राजेंद्रकुमार यांच्याबरोबरच शशी कपूर, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबरही त्याने काम केले. आघाडीच्या अभिनेत्री त्याला नायिका म्हणून मिळाल्या. वहिदा रेहमान, माला सिन्हा, मुमताज, हेमा मालिनी, झीनत अमान, मौसमी चटर्जी या नायिकांबरोबरचे त्याचे चित्रपट गाजलेही. त्याच्या बहुतेक चित्रपटांत दोन नायिका आहेत, त्यातील एक मरते आणि दुसरीशी लग्न होते. देशभक्तीपर चित्रपटातही ही परंपरा त्याने राखली होती. रोटी कपडामध्ये झीनत आणि मौसमी चटर्जी, तर क्रांतीमध्ये परवीन बाबी आणि हेमा मालिनी या दोन नायिका त्याने दाखवल्या आहेत.
गुरुवार, २३ जानेवारी, २०२०
लोकल मीडिया!
लोकल मीडिया म्हणजे लोकलमधून नियमित प्रवास करणारे प्रवासी. घडणाºया घटनांवर ते जे रोज आपल्या डब्यात बसून चर्चा करत असतात, तो मीडियाही तसा प्रभावी आहे. आपल्याकडे प्रिंट मीडिया, डिजीटल मीडिया, सोशल मीडियाची नेहमीच चर्चा होते, पण या लोकल मीडियात होणाºया चर्चांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही, किंबहुना हा एक मीडिया आहे, याचीच जाणीव कोणाला नसते. टीव्ही वाहिन्यांवरील रटाळ आणि भांडखोर चर्चांपेक्षा लोकलमध्ये बिनधास्त मते मांडणारे प्रवासी खरोखरच खूप छान मतं मांडत असतात, म्हणून हा मीडिया खºया अर्थाने मुद्रित माध्यमाप्रमाणे विश्वासार्ह आहे, असे म्हणायला हरकत नाही.आपल्याकडे सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, टिकटॉक अशांची खूप चर्चा होते. तिथे कसलेच बंधन नसल्याने वाट्टेल ते बोलले जाते, पण लोकलमध्ये होणाºया चर्चा या मात्र सामान्यांना भावतील अशा असतात, म्हणून हा माहीत नसलेला नवा मीडिया फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याकडे अफवा पसरवायला व्हॉट्सअॅप ग्रूप, फेसबुक पुरेसा आहे, पण तेवढीच ताकद लोकलने नियमित प्रवास करणाºया प्रवाशांच्या गप्पांमध्ये आहे, याची जाणीव आमच्या राजकीय पक्षांना झाली, तर ते नक्कीच लोकलने प्रवास करायला लागतील आणि प्रवाशांशी संपर्क साधतील, म्हणजे किती सहजपणे आमच्या लोकलमधील प्रवासी खोटेपणाचा बुरखा उतरवतात पहा.
काही वर्षांपूर्वी राहुल गांधींचा मुंबई दौरा होता. त्यावेळी त्यांनी लोकलमधून प्रवास केला होता. घाटकोपरला आले. तिथे एटीएममधून पैसे काढले. रांगेत उभे राहून तिकीट काढले. लोकलमध्ये शिरले. सगळा मीडिया, पत्रकार कौतुक करत होते. किती साधे आहेत राहुल गांधी, वगैरे, वगैरे, पण आमच्या लोकलमधून प्रवास करणाºया प्रवाशांना यातील खोटेपणा लगेच लक्षात आला. राहुल गांधी उतरून बाहेर पडल्यावर लगेच चर्चा सुरू झाली.एक प्रवासी : किती साधे आहेत ना राहुल गांधी?
दुसरा प्रवासी : का? काय केले विशेष त्यांनी?तिसरा प्रवासी : तिकीट काढून प्रवास केला.
चौथा प्रवासी : तेही रांगेत उभे राहून.पाचवा प्रवासी : आणि स्वत:च्या पैशातून, एटीएममधून पैसे काढून तिकीट खरेदी केले.
सहावा प्रवासी : नौटंकी साला.सगळे अवाक् होतात आणि विचारतात, ‘का? काय झाले?’
सहावा प्रवासी : एक स्टेशन प्रवास केला, पाच रुपये खिशात नव्हते? त्यासाठी एटीएमवर जायची गरज काय होती?दुसरा प्रवासी : गाडीत पाकीट राहिले असेल, नसतील पैसे जवळ.
सहावा प्रवासी : मग एटीएम कार्ड कुठे ठेवले होते? पाकीट असणारच ना जवळ.चौथा प्रवासी : पण रांगेत उभे राहून तिकीट काढले, घुसला नाही मध्ये.
सहावा प्रवासी : मुंबईत घुसखोरी केली तर काय होईल हे माहिती आहे त्यांना.पाचवा प्रवासी : पण काही का होईना प्रवाशांशी संवाद साधला ना?
सहावा : नौटंकी साला.तिसरा प्रवासी : तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?
सहावा : ते खासदार आहेत, त्यांना रेल्वे लोकल फ्री असते. तिकीट काढायचे नाटक कशासाठी केले? थेट येऊ शकले असते लोकलमध्ये, पण त्यांच्याबरोबर पोलिसांची फरफट झाली. तिकीट एकच काढले, पण पाच-पंचवीस कार्यकर्ते तिकीट न काढता घुसले त्याचे काय? संवाद फक्त कार्यकर्त्यांशी साधला, प्रवाशांशी नाही.’बस्स, हा मेसेज लोकल मीडियातून वाºयासारखा पसरला आणि राहुल गांधींचा पप्पू झाला. ही ताकद या लोकल मीडियात आहे, याची जाणीवही कोणाला झालेली नाही. मुंबईची लोकल ही भारतीय रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणारीच नाही, तर सर्वाधिक विचार देणारीही आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
आजही लोकलमधून अनेक प्रवाशांच्या हातात विविध वर्तमानपत्रे असतात. पहिली दोन-तीन स्टेशन पेपरमध्ये नजर मारतात आणि नंतर यातील महत्त्वाच्या बातमीवर चर्चा सुरू होतात. या चर्चा इतक्या सुंदर असतात की, वृत्तवाहिन्यांवर सतत झळकणारे पोपट, बोलक्या बाहुल्या आणि पढत मूर्ख लोकांपेक्षा ही सामान्य माणसे कशी निर्णयापर्यंत येतात हे सीएसएमटी किंवा चर्चगेट येईपर्यंत समजते, म्हणजे लोकल मीडियाची सेंट्रल लाइन, वेस्टर्न लाइन आणि हार्बर लाइन ही मोठी चॅनेल आहेत. या प्रत्येक चॅनेलवर चांगल्या चर्चा होत असतात. त्यातून एक मतप्रवाह तयार होत असतो. तो इतका बळकट होतो की, कोणाच्याही ऐनवेळच्या सभेचा त्यावर परिणाम होत नाही. पुलवामा हल्ला झाल्यानंतर लोकलमध्येच प्रवाशांनी ठरवले होते की, पुन्हा एकदा मोदींना निवडून द्यायचे आहे. त्यामुळे कितीही राफेल विमाने उडवली, जीएसटी, नोटा बंदीवररून रान पिंजून काढले आणि वाहिन्यांनी निवडणूकपूर्व अंदाजात मोदींना यश मिळणार नाही, भाजपला २०० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे अंदाज व्यक्त केले, तरी या लोकल मीडियाने भाजपला ३०३ ची गोळी अगोदरच दिली होती. कारण देशातला प्रत्येक कानाकोपºयातला माणूस मुंबईत आला आहे. त्याचे कोणी ना कोणी तरी मुंबईत आहे. त्यामुळे कानोकानी संदेश या लोकल मीडियाने अगोदरच पोहोचवला होता.मुंबईची लोकल ही नुसती मुंबईकरांची लाइफलाइन नाही, तर देशाचा तो लोकल मीडिया आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अगदी बुधवारचीच गोष्ट. सगळ्या वर्तमानपत्रांत कुर्ला येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या बातमीची चर्चा होत होती. चर्चा चांगलीच रंगत गेली. हिंमतच कशी होते अशा गुन्हेगारांची? वगैरे, वगैरे. चौघांना तातडीने पोलिसांनी पकडले, वगैरे, पण त्यातील एक मत असे होते की, आधीच्या गुन्हेगारांना अजून शिक्षा होण्याचे नाव नाही. २२ ची शिक्षा पुढे पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, असा संदेश अशा गुन्हेगारी जगतात जात आहे. ती फाशी जाहीर असावी की, त्याचे थेट प्रक्षेपण करावे, याचा विचार करण्यापेक्षा ती लवकरात लवकर दिली, तर असले प्रकार घडणार नाहीत. म्हणजे शिक्षेची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे, यावर सर्वांचे एकमत या मीडियात झाले. आमच्या कोणत्याही वाहिन्यांवर कोणत्याही विषयावर एकमत होत नाही आणि चर्चेची नुसतीच एरंडाची रटाळ गुºहाळे चालतात, पण लोकल मीडियामध्ये मात्र निर्णयापर्यंत चर्चा चालतात.
लुप्त होत चाललेले खेळ
दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नांव... हे रामशास्त्रीमधले सागरगोटे खेळतानाचे गाणे पाहिले की वाटायचे, दोन घडीचा कसला दिवसदिवस या खेळात आपण रमत असतो, पण असे घडवणारे खेळच कालबाह्य झाले आहेत. कारण मोबाइल गेम, व्हिडीओ गेमपासून पबजी आणि काय असल्या खेळापर्यंत फक्त अंगठ्याने एका जागी बसून खेळायचे खेळ आले आहेत. त्यामुळे नव्या पिढीला हे जुने खेळ कसे माहिती असणार? बिल्डरांनी, राजकीय नेत्यांनी मैदाने बळकावली, शाळासुद्धा फक्त इमारतीत भरू लागल्या. या शाळांची मैदानेही गेली. त्यामुळे ८० टक्के शाळा या मैदानाशिवाय आहेत. त्यामुळे किती खेळ लोप पावत गेले हे सांगता येत नाही. अगदी मुलांचे आणि मुलींचेही. काही मुलींचे खेळही मुले आवडीने खेळत. वाड्यात हे खेळ चालायचे. अनेक मैदानी खेळ कार्पोरेट झाले, तर अनेक लुप्त पावले. मातीतली कुस्ती गादीवर गेली आणि कार्पोरेट झाली, तर कबड्डी मॅटवर आली प्रो झाली, पण कसल्याही साहित्याविना असलेल्या खेळांचे काय? खर्चिक नसलेले अनेक खेळ हे लुप्त झाले.आजकाल कोणी बिट्ट्या, गजगे किंवा सागरगोटे खेळताना दिसत नाहीत. खरं तर बरंच काही शिकवणारा हा खेळ, पख्खई, दुख्खई, तिख्खई एकेक टप्पा पार करत हंडी गाठायची. वरून येणारा खडा एका हातानं झेलायचा. त्यापूर्वी जमिनीवरच्यांना उचलायचे. सावरण्याचा, आवरण्याचा, तोलण्याचा हा खेळ. केव्हा काय झेलायचं, केव्हा काय उचलायचं हे सहजपणे जीवनाचे रहस्य शिकवणारा खेळ कालबाह्य झाला. सगळं काही मोबाइलमध्ये आले.कोरा कागद, निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, तुला दगड का माती? असं म्हणत हातावर टपल्या देत राज्य सुरू व्हायचं आणि दगड का माती या खेळाला सुरुवात व्हायची. हा खेळही कुठे खेळला जात नाही. माती फक्त धुरळा उडवण्यापुरती दिसते. चिखल फक्त चिखलफेकी पुरता दिसतो. बाकी घरातून बाहेर पडले की फरशा, टाइल्स, काँक्रीट, डांबरी रस्ते, नाहीतर पेव्हर ब्लॉक दिसतात. माती दिसणार कुठे? दगड झाले रस्त्यात खडी होऊन लुप्त. खेळणार कसा हा खेळ? नुसता कागद कोराच राहिला की.तसाच विष अमृत, जोडी साखळी, अखंड साखळी हा खेळही कुणाला माहिती नाही. आता अखंड साखळी नाही तर मोबाइलमधला स्नेक नावाचा गेम खेळून लांबलचक साप तयार करण्याचा खेळ खेळला जातो. विष आणि अमृत या दोन गटात विषाचा गट जिंकणार की अमृताचा विजय होणार? पण आज सगळीकडेच विषारी वातावरण झाल्यामुळे हा खेळही मरून गेला आहे. काठ्या पाणी हा संपूर्ण गावातून फिरवला जाणारा खेळ आजकाल पहायला मिळत नाही. वडाच्या पारंब्याच काय वडच नसल्यामुळे सूर पारंब्या हा खेळ फक्त ऐकण्यापुरता झाला आहे, पण हे सगळे खेळ व्यायाम, आनंद आणि कसलाच खर्च असणारे नव्हते. घरात प्रत्येकाच्या काठी ही असायचीच. त्यामुळे ओळीने सर्वांनी काठ्या फेकायच्या. ज्याची सगळ्यात कमी अंतरावर असते त्याच्यावर राज्य. बाकीच्यांनी दगडावर काठी टेकवायची आणि ज्याच्यावर राज्य आहे त्याची काठी उडवत न्यायची. दगडावर काठी नसताना शिवले की तो आऊट. काठी संपूर्ण गावभर फिरायची. ढकलत, उडवत नेत नुसता पाठलाग केला जायचा. हरल्यावर पायात काठी धरून लंगडत जिथून खेळ सुरू झाला तिथपर्यंत यायचं. त्यावेळी बाकीच्यांनी डाळ गूळ खाती घोडी... म्हणत ओरडायचे. तो खेळणारा रडलाच पाहिजे अगदी, पण हाच तर खरा संघर्ष होता. काठ्या उडवणारे हे समाजाचे प्रतीक होते. आपल्याला जगण्यासाठी जो संघर्ष करायचा आहे त्यात पाठशिवणी आली, काठीप्रमाणे हेळसांड आली, अवहेलना आली. हा संघर्ष करत आपले ध्येय गाठायचे. ते म्हणजे जिथून खेळ सुरू झाला ती जागा. दुसºयाला आऊट करून त्याच्यावर राज्य द्यायचे. आपणही कधी शोषक व्हायचे, शोषणकर्ते व्हायचे. हा सगळा नियतीचा खेळच आपण करायचा. हे शिक्षण हे सगळे खेळ देत होते, पण आज हे सारे खेळ लुप्त झाले आहेत. खाली मान घालून तासन्तास मोबाइलमध्ये गुंतून राहायचे. ल्युडोसारखा खेळही मोबाइलमध्ये खेळला जातो. फासे आपल्या हातात नाहीत, तर ते कॉम्प्युटरच्या हातात असणार. कसे खेळणार, कसे डोके चालणार आपले?उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे मंदिरात, कधी लग्नात घातलेल्या मांडवात असलेले खांब त्याचाही छान खांबखांबोळीचा खेळ असायचा, पण आजकाल लग्नही हॉलमध्ये होतात. त्यामुळे खेळायला आणि पकडायलाही खांब नाहीत. हा खेळही कोणी खेळत नाही, पण चपळता आणि लवचिकता, एकमेकांचे खांब बदलणे आणि त्या मधल्या वेळात ज्याच्यावर राज्य आहे त्याने तो पकडण्याचा प्रयत्न करणे यात खूप मजा यायची. तसाच आणखी एक खेळ म्हणजे जो पूर्वी शाळेतही खेळला जायचा. तो म्हणजे कांदा फोड किंवा वांगंटांगं. एकानं पाय पसरून बसायचं, मग त्यानं आधी पाय, मग पायावर दुसरा पाय. मग त्यावर एक वीत हात, मग दुसरा हात अशी उंची वाढवत न्यायची. सगळ्यांनी त्याला स्पर्श न करता त्यावरून उडी मारायची. त्याने हळूहळू उंच उंच होत उंची वाढत न्यायची. उंच उडीचाच हा एक प्रकार होता. या खेळांमुळे मुलांना कसल्याही व्यायामशाळेत किंवा जीममध्ये न जाता उंची वाढवता यायची. हे सगळं लुप्त झालं आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळले जाणारे खेळांपैकी एक अत्यावश्यक खेळ म्हणजे पत्ते. ग्रामीण भागात पत्ते हा खेळ खूप लोकप्रिय आहे, पण त्यातील आजकाल फक्त रमी हा खेळ सर्वत्र खेळला जातो. तो अगदी मोबाइल गेम, फेसबुकवरही खेळला जातो, पण कित्येक आनंद देणारे पत्त्यातील खेळ आजकाल कोणी खेळतानाही दिसत नाही. म्हणजे लहानपणी अगदी पत्ते ओळखायलाही येत नसताना भिकार सावकार सुरू व्हायचा. मग पाच तीन दोन, सात आठ, लॅडीज, बदाम सात, नॉटअॅट होम, झब्बू, चॅलेंज हे खेळ म्हणजे धमाल असायची. जितके खेळाडू असतील त्यावर खेळ अवलंबून असायचा. एकटाच असेल, तर स्मरणशक्ती, डाव लावणे सुरू असायचे. दोघेच असतील तर सात आठ, भिकार सावकार, तिघे असतील तर पाच तीन दोन, चौघे, सहा जण असतील लॅडीज, जास्त जण असतील तर चॅलेंज, झब्बू, गड्डे झब्बू, बेरीज झब्बू, बदाम सात, तर कधी दोन तीन कॅट एक करूनही खेळायचे. कधी पत्त्यांचा बंगला उभा करायचा. एकाग्रतेसाठी पत्त्यांचा बंगला तयार करणे हे फार महत्त्वाचे असायचे. आता नाहीत मुले असे बंगले बनवताना दिसत. घरात चोवीस तास पंखा आणि एसी सुरू ठेवायचा तर पत्त्याचा बंगला उभा करता येणारच नाही. नैसर्गिक येणारी वाºयाची झुळूक जेव्हा हा बंगला पाडायची तेव्हा येणारी मजाही वेगळी असायची. चिंचोके, सिगारेटची पाकिटे, बांगड्यांचे तुकडे यातूनही खूप प्रकारचे खेळ व्हायचे. हे सगळे आज कालबाह्य झाले आहेत. कारण आमचे मन आता फक्त एका मोबाइलमध्ये रमते. त्या मोबाइलमध्येच आमचे सारे विश्व बंदिस्त करून ठेवले आहे.
बुधवार, २२ जानेवारी, २०२०
गिरणी कामगारांचे प्रश्न कधी सुटणार?
मुंबईतील गिरणी, गिरणगाव आणि गिरणी कामगार ही एक समृद्ध संस्कृती होती. भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख उद्योगात आणि सर्वाधिक रोजगार देणाºया उद्योगात या गिरणी कामगार आणि गिरण्यांची नोंद होती. गेल्या काही वर्षांत ही संस्कृतीही संपुष्टात आणली जात आहे आणि गिरणी कामगारांनाही देशोधडीला लावले जात आहे. सुंदर मुंबई, मराठी मुंबई असे आपण म्हणायचो, पण त्या मुंबईचे मराठीपण या गिरणी कामगारांनी जिवंत ठेवले होते. आज त्यांनाच मुंबईबाहेर काढले गेल्याने मुंबई मराठी माणसांची आहे का? असा प्रश्न पडतो. न्यायप्रविष्ठ असलेल्या बेळगांव, कारवारसह सीमाभागासाठी आम्ही आग्रह धरतो आहोत, पण आमचा हक्क असलेल्या मुंबईतून मराठी, मराठी माणूस, मराठी संस्कृती जपणारा गिरणी कामगार मुंबईबाहेर काढला, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे का? आज अनेक राजकीय नेते किंवा प्रथितयश अभिनेते सांगतात की, मी एका गिरणी कामगाराचा मुलगा होतो. अगदी माजी मुख्यमंत्री नारायण राणेही बोलताना आपण गिरणी कामगारांचा मुलगा होतो, हे सांगतात. लक्ष्मीकांत बेर्डेपासून आजच्या सिद्धार्थ जाधवपर्यंतचे कलाकार हे गिरणी कामगारांशी संबंधित आहेत, पण गिरण्या बंद पडल्यानंतर या गिरणी कामगारांना मुंबईतून बाहेर जावे लागले. त्यांना देशोधडीला लावले गेले, याचा फारसा विचार झाला नाही. मराठी जपण्यासाठी या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यासाठी वर्षानुवर्षे लढा देणाºयांचे समाधान झाले पाहिजे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे १०५ हुतात्मे झाले, त्यात सर्वाधिक गिरणी कामगार होते. त्यामुळे त्यांचा या मुंबईवर हक्क आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे.
निवडणुका आल्या की, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवला जाईल, असे सगळेच राजकीय पक्ष सांगतात, पण ज्यांनी मुंबई घडविली अशा गिरणी कामगारांचा नंतर मात्र सर्वांनाच विसर पडतो. युतीप्रमाणेच दोन्ही काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीला गिरणी कामगारांच्या प्रश्नाचे सोयर-सूतक दिसत नाही. आता महाविकासआघाडीत युती आणि आघाडीतील पक्ष एकत्र आले आहेत, त्यांना तरी हे प्रश्न सोडवता येतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज गिरणगाव आणि गिरणी कामगारांच्या कुटुंबांत संतापाची भावना दिसत आहे, नाराजी दिसत आहे. वरळी, लालबाग, परळ, भायखळा, दादर अशा भागांत टॉवर संस्कृती रुजत असली, तरी अन्याय झालेल्या गिरणी कामगारांचे दु:ख कोणालाच दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. गिरण्या बंद पडून आता कैक वर्षे लोटली. त्यांच्या कुटुंबीयांना हक्काचे घर देण्यात येईल, अशी आश्वासने पूर्वीच्या सरकारांनी दिली, तरी अद्याप त्याची पूर्ण अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचेच चित्र आहे. मुख्य म्हणजे सध्याचा गिरणगाव हा आता उंचच उंच टॉवर्सनी वेढला गेला असून, जुन्या चाळीतील मराठी गिरणी कामगार व त्याचे कुटुंबीय या विभागातून हद्दपार होत चालल्यामुळे हा प्रश्नही निवडणुकीत कुठल्याही पक्षाच्या अजेंड्यावर नसल्याचे दु:ख लालबाग, परळ, वरळी, शिवडी या विभागांतील गिरणी कामगारांनी बोलून दाखवले आहे. गिरणगावातील तरुणांमध्येही ही खदखद स्पष्ट दिसते. गिरणगावातीलही अनेक तरुण आता उच्चविद्याविभूषित आहेत, मात्र नोकरीच्या बाबतीत भारतातील इतर तरुणांसारखेच त्यांच्यासमोरही प्रश्न आ वासून उभे आहेत. आपल्या वाडवडिलांच्या श्रमातून उभ्या राहिलेल्या मुंबईत चांगली नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाºया अनेक तरुणांनी ‘आमचे प्रश्न कोणी सोडवेल काय?’ अशी साद घातलेली दिसते.
डॉ. दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांचा पुकारलेला प्रदीर्घ संप हा मुंबईच्या इतिहासात प्रचंड गाजला. या भागातून डॉ. दत्ता सामंत हे लोकसभेवर एकदा निवडून गेले होते. कामगार आघाडीचे आमदारही गिरणगावातून निवडून यायचे, मात्र त्यानंतर कायमच या भागावर शिवसेनेच वर्चस्व राहिले आहे, मात्र आता बदलत्या टॉवर संस्कृतीमुळे भविष्यात गिरणगावातील मतदारसंघातून गुजराती-मारवाडी मतदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या भाजपचा वरचष्माही होऊ शकतो, असेही येथील मराठी माणसांना वाटत आहे. अद्यापपर्यंत मराठी संस्कृती टिकवून ठेवलेल्या या गिरणगावात मराठी माणूस टिकवायचा असेल, तर येथे गिरणी कामगारांच्या कुटुंबीयांना घरे मिळाली, तरच हे होऊ शकते.
एक काळ असा होता की, महाराष्ट्राच्या कानाकोपºयातूनच नाही, तर संपूर्ण देशातून मुंबईत गिरणीत नोकरी लागेल म्हणून आशेने माणूस येत होता. प्रत्येक गावात एक भाऊ शेतकरी आणि दुसरा मुंबईत गिरणीत काम करणारा असे चित्र असायचे, म्हणजे शेतकºयाला तीन मुले असतील, तर एक शेती करायचा, एक मिलिटरीत जायचा आणि तिसरा मुंबईत गिरणीत काम करायचा. कुठल्या मिलमध्ये आहे काय आहे, हे काहीही गावाकडे माहिती नसायचे, फक्त मुंबईत कंपनीत कामाला आहे म्हटला तरी गावाकडची मुलगी त्याला मिळायची आणि लग्न करून ती मुंबईत यायची. मुंबईत अशाप्रकारे मराठी माणसांचे वास्तव्य होते. आज गिरण्यांच्या जागा विकासासाठी घेतल्या. गिरण्या बंद पडल्या. पडल्या की पाडल्या देव जाणे, पण नाटक, चित्रपटासह मराठी संस्कृती मुंबईत जगवली तो गिरणी कामगार बेघर झाला. या गिरणी कामगारांचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न सोडवून त्यांना मुंबईतच स्थायिक करणे ही महत्त्वाची गरज आहे. आज शिकून त्यांची पुढची पिढी नवनवे रोजगार मिळवत आहे, पण त्यांना वास्तव्यासाठी इथे घरांचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. या टॉवरमधून परप्रांतीय वाढले, तर मराठीचे अस्तित्व राहील का? मुंबईतील मराठी संस्कृती टिकवण्यासाठी गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवला पाहिजे. मराठी पाटीसाठी खळ्ळ खट्याक करून काही होणार नाही, तर इथला मराठी माणूस टिकवला पाहिजे. त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली पाहिजेत.
गिरणी कामगार आणि चित्रपट
पूर्वी किती हिंदी चित्रपटांतून गिरण्या दाखवल्या आहेत. कापड मिल हा व्यवसाय चित्रपटंतून दिसायचा. चित्रपटातील संप असो, आनंद असो, तो चित्रपटातून दिसायचा. मजदूरसारख्या चित्रपटातून गिरणी कामगार आणि मालकांनी केलेले मार्केटिंग फार छान दाखवले होते. तुम्हारी कसम चित्रपटातही गिरणी कामगार दाखवले आहेत, गिरण्या दाखवल्या आहेत. सिंहासन चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे तर गिरणीच्या पुकपुक अशा मोटरच्या आवाजात होते. आजकाल चित्रपटात बिझनेसमन दाखवतात, पण फक्त कार्यालय असते, काय व्यवसाय आहे हे कळतच नाही. गिरणी गेली, दाखवणार काय?
उत्सवप्रिय गिरणी कामगार
महाराष्ट्राची संस्कृती चांगल्या उत्सवांनी गिरणी कामगारांनीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवली आहे. मुंबईतील गणेशोत्सव असेल, गोकुळ अष्टमीच्या दहीहंडीतील गोविंदा हा देखील गिरणी कामगारांचा होता. त्यामुळे अनेक हिंदी, मराठी चित्रपटांत दहीहंडी आणि गणेशोत्सवातील गाणी चित्रित केलेली दिसून येतात. मुंबईतील ही संस्कृती, हे वैभव टिकवले पाहिजे.
मंगळवार, २१ जानेवारी, २०२०
थोडं सकारात्मकतेनं पहा
२६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरू होणार हे जाहीर करताच तथाकथीत संस्कृतीरक्षकांनी त्याला लगेच विरोध करायला सुरुवात केली. वास्तविक पाहता हे सर्व प्रायोगिक तत्त्वावर होत असताना त्याकडे सकारात्मकतेने विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे मुंबईत नाईट लाईफ कधी नव्हते, हेही लक्षात घेतले पाहिजे. तथाकथीत विरोधकांना वाटते आहे की, सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात सुरक्षिततेची भावना उत्पन्न झाली, तर शहरातील नाईट लाईफला कुणाचाच आक्षेप असणार नाही, मात्र केवळ महसुलाच्या आशेने घाईघाईने याची अंमलबजावणी केल्यास ती धोक्याची नांदीही ठरेल.
नुसती बातमी आली की, जीवाची मुंबई करण्यासाठी मुंबईत येणाºया आणि मुंबईतच वास्तव्याला असणाºया रसिकांसाठी आता मुंबईचे दरवाजे २४ तास खुले राहणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये २६ जानेवारीपासून मॉल, पब, मल्टिप्लेक्स, दुकाने आणि हॉटेल-रेस्टॉरंट २४ तास सुरू राहणार असल्याचे सूतोवाच पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. वास्तविक हे प्रायोगिक तत्त्वावर होणार आहे. त्याबाबतचा निर्णय २२ जानेवारीच्या कॅबिनेटमध्ये होणार आहे. तत्पूर्वी सह्याद्री अतिथी गृहात मॉल मालक, हॉटेल मालक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस आयुक्त संजय बर्वे, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी व सरकारी अधिकाºयांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत नाईट लाईफची ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार असून, मॉल्स, मल्टिप्लेक्स, दुकाने आणि हॉटेल्स दिवस-रात्र सुरू राहिल्याने राज्याला अधिक महसूल प्राप्त होईल. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी प्रतिक्रिया पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. याचे स्वागत करायला काय हरकत आहे? रात्रीचे हॉटेल, टपºया, वडापावचे स्टॉल, दुकाने उघडी राहिली तर रात्री अपरात्री बाहेरून येणाºयांना, उशिरा घरी परत जाणारांचीही खाण्यापिण्याची सोय होईल. त्यात गैर काय आहे? रात्रीची मुंबई आणि नाईट लाईफ म्हणजे फक्त पब, बार आणि दारू याचाच विचार कशाला करायचा? असेही दारू पिणारे काय वेळ काळ पाहून किंवा नाईट लाईफ आहे म्हणून पितात का? ते तसेही पित राहणारच असतात. तेच थोडे अधिकृत झाले तर रोजगार आणि महसूल वाढेल. एक नवी शिफ्ट होईल. दिवसा काम करणारे रात्रीच्यावेळी काही बिझनेस करू शकतील. फक्त भांडवलदारांनाच ही संधी मिळेल असे नाही, तर छोटे व्यापारी, व्यावसायिकही तयार होतील या आशेने पहायला काय हरकत आहे?या बैठकीत उपस्थित असणारे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केले आहे की, २४ तास दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भात प्रशासनाकडून कोणताही दबाव आणला जाणार नाही. नव्या नियमानुसार, आठवड्याभरात आस्थापन कोणत्या दिवशी बंद ठेवायचे, याचा निर्णय व्यावसायिकांचा असणार आहे. मद्यविक्री करणारी दुकाने व आस्थापने रात्री १.३० वाजेपर्यंतच खुली असतील. इतके सगळे स्पष्ट असताना उगाच गळा काढण्यात काय अर्थ आहे?
मुंबईला जागतिक दर्जा देण्यासाठी कराव्या लागणाºया प्रत्येक विकासकामांना आणि त्यासाठी आवश्यक असणाºया तरतुदींना कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. अशा निर्णयांच्या अंमलबजावणीपूर्वी हे निर्णय राबवण्यासाठी आपल्याकडील यंत्रणा पुरेशी सक्षम आहे का, याचाही सारासार विचार होण्याची गरज आहे. असा विरोधकांचा प्रश्न आहे, पण ती यंत्रणा सक्षम केल्याशिवाय अतिरिक्त भरती करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. पोलिसांवर ताण पडेल ही भीती असेल, तर पोलिसांची भरती करावी. अतिरिक्त कुमक निर्माण करावी. त्यानिमित्ताने पोलीस दलातील पदे वाढतील. त्यांची कर्मचारी संख्या वाढल्याने रोजगारही वाढेल. फक्त चार तास मुंबई जादा सुरू ठेवल्याने जर फायदा होणार असेल, उलाढाल होणार असेल तर त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.आज मुंबईच नाही तर महाराष्ट्र पोलिसांतील एकूण कर्मचारी संख्या आणि दर दिवशी वाढणारी लोकसंख्या, पर्यटकांची संख्या यांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर लक्षात येते की, पोलिसांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे यानिमित्ताने नवी नोकरभरती होऊन नवा रोजगार वाढेल असे म्हणायला काहीच हरकत नाही. मुंबईतील शहरातील रात्रीचे विश्व हे गुन्हेगारांपासून असुरक्षित विश्व असल्याचे बोलले जाते आहे. पण तसेही दिवसाही गुन्हे घडतातच की. रात्रीचे गुन्हे हे चोºया दरोड्याचे असतील पण असंख्य गुन्हे हे दिवसाढवळ्याही होत असतात. मुंबईची लोकल, मेट्रो चोवीस तास सुरू केली तर रेल्वेतही अनेक कर्मचारी वाढवावे लागतील. सर्व यंत्रणांमधील उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील आणि रोजगार वाढू शकेल याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
नव्या संस्कृतीत खरेदीदार बनलेल्यांच्या रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहण्याबाबत गरजा वाढल्या. आयटी, कॉर्पोरेट कंपन्या, बँका यांच्या कामाच्या पद्धतीमुळे यात नोकरी करणाºयांना रात्रीचे काम अनिवार्य बनले. मॉल, मल्टिप्लेक्स आणि हॉटेलिंगच्या या नव्या अपरिहार्य दुनियेत सेलिब्रेशन हेच जगण्याचे सूत्र झालेल्या नव्या जीवनशैलीला दिवस अजून थोडा मोठा असावा असे वाटत होते. दुबई, सिंगापूर, न्यूयॉर्कसारख्या शहरांत नागरिकांना, पर्यटकांना संपूर्ण रात्र बाहेर मौजमजा करता येते. तशी सोय मुंबईत नव्हती. त्यामुळे मुंबईला जागतिक दर्जा मिळण्यासाठी नाईट लाईफ सुरू करणे ही काळाची गरज होती. त्यामुळे ते होत असेल तर चांगले आहे. त्याचे स्वागत करायला हरकत नाही.मुंबई, नवी मुंबईतून अनेक नोकरदार रात्री उशिरापर्यंत काम करून जातात. त्यांची शेवटची गाडी चुकली तर त्यांना रेल्वेस्थानकावर बसून वेळ घालवावा लागतो. अशावेळी रात्री त्यांना चहा, नाष्टा असे काहीही मिळत नाही. त्यामुळे अशाप्रकारे खाद्यपदार्थांचे स्टॉलही रात्रभर उघडे राहिले तर खूप लोकांची सोय होईल. रात्री बारानंतर भेळही मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे अनेकांची पैसे खिशात असूनही उपासमार होते. त्यामुळे फक्त सकाळच्या वेळी इडली चटणी, कांदापोहे, वडापाव विक्री करणारे जर रात्रभर वडापाव देत राहिले तर त्यांच्याही उत्पन्नात वाढ होईल. जास्तीचे विक्रेते तयार होतील. त्यामुळे रात्रीच्या मुंबईत फक्त दारूवाल्यांचाच फायदा होईल, असे समजण्याचे कारण नाही. मुंबई ही चोवीस तास सुरू राहिली, तर चांगलेच होईल. अनेकवेळा दिवसा फिरायला जाणे शक्य नसते. असे लोक रात्रीच्या शांत थंड वातावरणात मुंबईचा आनंद घेऊ शकतात. दिवसाढवळ्या नोकरदारांच्या गर्दीत लोकल आणि अन्य वाहनांची ट्रॅफिक जाम करण्यापेक्षा फिरायला जाणारे रात्री उशिरा जाऊ शकतील. खरेदीलाही रात्रीचे बाहेर पडू शकतील. शॉपिंगला वेळ रात्रीचा मिळाला तर दुकानेही रात्रभर सुरू ठेवता येतील. त्यामुळे दुकानदारही अतिरिक्त नोकर कामावर ठेवतील. त्यामुळेच या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहून हा बदल स्वीकारायला हरकत नाही.
जन्माचा वाद कशासाठी?
संपूर्ण देशभरात श्रद्धेचे स्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा जन्मस्थळाच्या वादातून रविवारपासून बेमुदत शिर्डी बंद पुकारण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. बंद काळात साईबाबांचे मंदिर सुरू राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी, पर्यटकांना शिर्डी संस्थानच्या सुविधांवर अवलंबून राहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी परभणीतील पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला, असा दावा स्थानिकांनी केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौºयावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केल्यानंतर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून, त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाईल, अशी घोषणा केली. त्यानंतर शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले. यावर भरपूर चर्चा झाल्या, वाहिन्यांवर काथ्याकुट झाला, पण यामध्ये प्रतिक्रिया देणाºया ग्रामस्थांची वक्तव्ये पाहिली तर हा वाद जन्मस्थानाचा नसून सेना आणि भाजपचा वाद आहे काय, असा प्रश्न पडतो.साईबाबांचा जन्म, धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहिलेले असतानाही अनेक ठिकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाचे दावे केले जात असून, त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा प्रयत्न केला असून, तो निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली. आता इथे धर्माचा संबंध काय आला? पण ग्रामस्थ अशा तºहेच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय प्रभावाने कोणीतरी भडकवले असेल, चुकीची माहिती दिली असेल असेच दिसते. केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौºयावर असताना परभणीत अशी घोषणा केल्यामुळे शिर्डीकर आक्रमक झाले आहेत. परभणीत शिवसेनेची ताकद आहे, तर नगर जिल्ह्यात विखे-पाटील, सुजय पाटील यांच्यामुळे भाजपची ताकद आहे. त्यामुळे साईबाबा शिर्डीत जन्माला आले की पाथरीत हा वाद रंगवला जात असावा, असेच दिसते. या वादाला जन्मस्थानाचा वाद न म्हणता राजकीय वादच म्हणावे लागेल. पाथरी ग्रामस्थांच्या दाव्याचा निषेध करण्यासाठी संतप्त शिर्डीकरांनी रविवारीपासून शिर्डी बंदची हाक दिली आणि हा बंद सुरू झाला. आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी ग्रामस्थांनी शनिवारी तातडीची ग्रामसभा बोलावली होती. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिर्डी ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी याबाबत एका बैठकीचे आयोजन केले आहे. हा बंद करू नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. परंतु तरीही हा केलेला बंद चुकीचा आहे. देव मानणाºयांनी देवाला आणि भक्ताला वेठीस धरले आहे असेच म्हणावे लागेल.
अर्थात हा बंद असला तरीही साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन, मंदिरातील सर्व आरती व सर्व धार्मिक विधी, संस्थानचे साईप्रसादालय, सर्व भक्त निवासस्थाने, रुग्णालये या सुविधाही नियमितप्रमाणेच सुरू राहणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. त्यामुळे भक्तांची कुचंबणा होणार नाही हे जरी निश्चित असले, तरी दुकाने आणि अन्य सेवा बंद असल्यामुळे पर्यटक, भक्त तिकडे जाण्याचे टाळत आहेत हे नक्की.वास्तविक पाहता जन्म कुठे झाला हे फारसे महत्त्वाचे नाहीच. जन्म पाथरीत झाला असला, तरी शिर्डीचे महत्त्व कमी होईल, अशी भीती का वाटते हा खरा प्रश्न आहे. ही भीती शिर्डीचे महत्त्व कमी होईल ही आहे, की राजकीय महत्त्व कमी होईल याची आहे हे समजले पाहिजे. प्रत्येकाचे जन्मस्थळ वेगळे आणि कर्मस्थळ वेगळे असते. त्यामुळे कोणाचे महत्त्व कमी होण्याचे काहीच कारण नाही. संत रामदास स्वामी यांचा जन्म मराठवाड्यातील जांब या गावी झाला होता, तर त्यांची कर्मभूमी सातारा जिल्ह्यातील सज्जनगड, चाफळ, रायगडमधील शिवथरघळ ही राहिली आहेत. जांब गावी जन्म झाल्याचे बोलल्याने सज्जनगडचे महत्त्व कमी झाले नाही की शिवथरघळीचे. देव, संत हे आपली स्थाने बदलत असतात. दत्ताची अनेक स्थाने आहेत, गांडगापूर, करंज, नृसिंहवाडी, औदुंबर अशी स्थाने आहेत, पण नृसिंह सरस्वती, श्रीपाद सरस्वती यांची जन्मस्थाने वेगळी होती. त्याचा काही परिणाम देवस्थानावर झालेला नाही. अगदी द्वापारयुगात श्रीकृष्णाचे जन्मस्थान कालकोठडी असले, तरी त्याचे महत्त्व गोकुळात, त्यानंतर मथुरेत आणि मग द्वारकेत पसरत गेले. ती स्थाने मोठी झाली. त्यामुळेच शिर्डीच्या साईबाबांचा जन्म हा पाथरीला झाल्याचे सिद्ध झाल्याने काही कोणाच्या झोळीत धोंडा पडेल असे नाही. शिर्डीचे साईबाबाऐवजी पाथरीचे साईबाबा असा उल्लेख कुठेही केला जाणार नाही. मनोजकुमारने १९७५ साली काढलेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटाचा सिक्वल मनोजकुमार ‘पाथरी के साईबाबा’ म्हणून काढणार नाही. मनमोहन देसाई अमर अकबर अँथनीमध्ये असलेल्या ऋषी कपूरच्या गाण्याचे ‘शिर्डीवाले साईबाबा...’ या गाण्यात बदल करून ‘पाथरीवाले साईबाबा..’ असे गाणे बदलले जाणार नाही. त्यामुळे जन्मस्थानाचा वाद हा अकारण आहे. ते केवळ आणि केवळ राजकारण आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
शिर्डीचे नागरिक ही फार मोठी चूक करत आहेत. आपली व्यापारी बाजारपेठ बंद ठेवून ते आपले नुकसान करत आहेत. ज्या बाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिलेला आहे तो सबुरीचा सल्ला मानत नाहीत असेच दिसते आहे, कारण त्यांना भडकावणारे कोणी राजकीय असावेत. त्यामध्ये सेना आणि भाजप असाच संघर्ष दिसतो आहे. सेनेची पाथरी आणि भाजपची शिर्डी असे त्याला स्वरूप आलेले आहे, म्हणून हा बनाव असल्याचे दिसते आहे. देव आणि श्रद्धास्थानाचे राजकारण करणे आता थांबवावे हे नक्की. पाथरीत जन्म झाला असला, तर साई हे स्वरूप आओ साई या संबोधनाने शिर्डीतच झालेले आहे. त्यामुळे जन्माचा वाद न घालता हे राजकारण थांबवावे हेच योग्य.कधी कोणाची जन्मभूमी म्हणून कधी कोणाच्या जन्मतारखेवरून, तर कधी जन्मस्थानावरून वाद निर्माण करण्याची आणि राजकारण करण्याची सवय सर्वच राजकीय पक्षांनी बंद केली पाहिजे. अयोध्येतील जन्मभूमीचा वाद दशकानुदशके आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्मतारखेचा वादही असाच घालून तीन तीन वेळा शिवजयंती साजरी केली जाते. आता हा नवा साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद घातला जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी असे वाद थांबवले पाहिजेत. यावरून कोणी राजकारण करत असेल आणि त्याला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते तातडीने थांबवले पाहिजे.
जरा महागाईकडेही लक्ष द्या!
रोम जळतंय आणि राजा फिडल वाजवत होता, अशी इतिहासात एक नोंद आहे. तशीच नोंद या देशाची व्हावी, अशी परिस्थिती सध्या देशात आहे, म्हणजे देशात महागाईने कळस गाठलेला असतानाही सत्ताधारी आणि विरोधक फालतू गोष्टींवरून वाद घालत आहेत. सत्तरच्या दशकात महागाई दरवाढीसाठी रस्त्यावर उतरणाºया मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकरांसारख्या रणरागिणी आज नाहीत याची खंत वाटत आहे. महागाईचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असताना या विषयावर महिला, विरोधक कोणीच रस्त्यावर उतरत नाहीत, याचे आश्चर्य वाटते.देशात महागाईचा डोंब उसळला असून, डिसेंबर २०१९ मध्ये महागाई दर ७.३५ टक्क्यांवर गेला. मागील सहा वर्षांतील हा सर्वाधिक दर आहे. महागाईने सर्वसामान्यांचे आधीच कंबरडे मोडले असताना नव्याने जाहीर झालेला दर पाहता आता जगायचे कसे? असाच सर्वसामान्यांसमोर प्रश्न निर्माण होणार आहे. जगात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था अशी आपली प्रतिमा भारताने निर्माण केली होती, परंतु आता मात्र भारताच्या विकास दरालाही मोठा झटका बसला आहे आणि ही घसरण पुढेही सुरू राहू शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष रनील साल्गाडो यांनी डिसेंबरच्या मध्यावधीमध्ये व्यक्त केली होती. सुरुवातीला ही मंदी तात्पुरत्या स्वरूपाची असेल, व्यापारातील तत्कालिक चढ-उतारांमुळे अर्थव्यवस्था डळमळीत झालेली असू शकते. थकीत कर्जाचे प्रमाण आणि त्यात गुंतलेली रक्कम हे एक कारण त्यामागे असले, तरी इतर अनेक कारणांमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसलेली आहे, हे लक्षात घेतलेच पाहिजे. त्यामुळे जेएनयू, नागरिकत्व सुधारणा, जन्मस्थान अशा विषयांतून बाहेर पडून सरकारने आता महागाई नियंत्रणाकडे लक्ष देऊन सर्वसामान्यांचे हित पाहिले पाहिजे.सरकारचे आर्थिक धोरणदेखील त्यासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. एकाच वेळी वस्तूंचा खप कमी होणे, गुंतवणूक रोडावणे आणि करवसुलीत घट होणे अशा विविध समस्या समोर उभ्या ठाकल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. ‘जीएसटी’बाबत सरकारने आधीपासूनच धरसोडीचे धोरण अवलंबिले. जीएसटीद्वारे प्राप्त होणारा अपेक्षित महसूल केंद्राला मिळू शकला नाही. त्यामुळे राज्यांना त्यांच्या हिश्श्याचा पैसा देण्यात केंद्राला अडचण येत आहे. अनेक राज्यांचा उत्पन्नाचा स्रोतच जीएसटीने संपवून टाकल्याने ही राज्ये पूर्णपणे केंद्राच्या मदतीवर अवलंबून आहेत आणि केंद्राकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने राज्यांना कर्ज काढून कसा तरी आपला गाडा हाकावा लागत आहे. नाणेनिधीने डिसेंबरमध्येच ग्रामीण भागातून होणाºया मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. ग्रामीण क्षेत्रातून मागणीत होत असलेली घट आणि उद्योग क्षेत्रात असलेले निराशाजनक वातावरण हेदेखील भारताच्या आर्थिक घसरणीचे एक मुख्य कारण मानले जात आहे.ग्रामीण भागातील शेतकºयांची क्रयशक्तीच हळूहळू संपुष्टात येत असल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील औद्योगिक उत्पादनाच्या मागणीवर झाला आहे. आता अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी लोकांची क्रयशक्ती आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांची म्हणजेच शेतकºयांची क्रयशक्ती वाढविणे गरजेचे आहे. प्रत्येक सरकारने शेतमालाचे भाव नियंत्रणात ठेवण्याचाच प्रयत्न केला. त्यासाठी आयात-निर्यात धोरण आपल्या सोईने राबविले. त्याचा परिणाम म्हणून उत्पादन कमी झाले किंवा जास्त झाले, तरी सामान्य शेतकºयांची आर्थिक दूरवस्था दूर झाली नाही. सरकारने ही संभाव्य आर्थिक मंदी दीर्घकाळ सुरू राहू नये म्हणून तातडीने काही उपाय योजण्याची आवश्यता आहे. बाजारपेठेत वस्तू व सेवांची ग्राहकांकडून घसरलेली मागणी अद्यापही रुळावर येण्याची शक्यता नसून, खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघही रोडावतच राहण्याचे भाकीत केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तविले आहे, ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तविलेल्या पहिल्या अंदाजानुसार, देशाच्या आर्थिक विकासाचा आलेख यंदा २००८-०९ सालच्या किमान स्तरावर असेल. गेल्या आर्थिक वर्षात २०१८-१९ मध्ये विकास दर ६.८ टक्के नोंदला गेला होता. यंदाचा अंदाज हा ५ टक्क्यांवर रेंगाळण्याचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँक गव्हर्नरांसह अनेक अर्थतज्ज्ञांनी ५ टक्केच विकास दराचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता. २०१९-२० आर्थिक वर्षाच्या पहिल्या व दुसºया तिमाहीत देशाच्या आर्थिक विकासाचा दर अनुक्रमे ५ व ४.५ टक्के असा गेल्या सहा वर्षांच्या तळात राहिला आहे. घसरते महसुली संकलन, तसेच वाढती वित्तीय व्यापारी तूट याबाबतचे चित्र उर्वरित अर्ध वित्त वर्षातही फारसे बदलण्याची चिन्हे नाहीत. आरबीआयने डिसेंबर महिन्यात जीडीपी ६.१ टक्क्यांऐवजी ५ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला होता. उत्पादन क्षेत्रात प्रगतीचा वेग मोठ्या प्रमाणावर मंदावला आहे. २०१९-२० मध्ये उत्पादन क्षेत्राच्या विकासाचा वेग २ टक्के राहील. वर्षभरापूर्वी याच क्षेत्राचा विकासाचा वेग ६.९ टक्के होता. जाहीर झालेले आकडे सरकारची चिंता वाढवणारे आहेत. कारण सर्वच क्षेत्रांतून समोर येणारे आकडे समाधानकारक नसून, देशात मंदीसदृश स्थिती आहे. एकूण देशांतर्गत उत्पादन वृद्धीदराने सहा वर्षांतील नीचांक नोंदवल्याने रोजगार क्षेत्रासदेखील मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यात या महागाईचा भस्मासूर एवढा वाढत चालला आहे की, त्यामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या देशात आदिवासी, वनवासी, डोंगराळ भागातील बालके कुपोषणाने मरत आहेत, तर सामान्य माणूस महागाईने हतबल झाला आहे. वाढ फक्त महागाईची होत आहे. जगभर आणि विशेषत: पश्चिम आशियातील तणावाच्या झळा बसू लागल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती आणखी भडकल्या, तर परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाईल, अशी दाट शक्यता आहे. सध्या वाहन उद्योग क्षेत्रामध्ये मंदीचे वातावरण आहे. रोजगारनिर्मिती, उद्योगांना बळ आणि सकल उत्पादनातील योग्य वाढ, बुडीत कर्जातून बँकांना बाहेर काढणे, सुरू असणाºया आणि जाहीर केलेल्या सरकारी योजना, विकासकामे यांना वेळेत पूर्ण करणे आदी अनेक बाबतीतली आव्हाने सरकारसमोर आहेत. यावर मात करण्यासाठी सरकारला आपला कारभार अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे बाकीच्या बाबींकडे दुर्लक्ष करून आता फक्त महागाई नियंत्रणासाठी जोरदार प्रयत्न झाले पाहिजेत.
रविवार, १९ जानेवारी, २०२०
पडद्यावरील फाशी
निर्भया बलात्काराच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली. ती देण्यातही अनेक वेळा विरोध, दावे, विलंब केला जात आहे, पण त्यानिमित्ताने वास्तव जीवन आणि चित्रपट याचा संबंध जोडून चित्रपटात दिली गेलेली फाशी यावर नजर मारल्याशिवाय राहवत नाही. तसे अनेक ऐतिहासिक चित्रपट किंवा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहेत, त्यात फाशी झालेली आहे. त्यामध्ये मनोजकुमारचा शहीद, त्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यावर बॉबी देओल, अजय देवगण यांनी केलेल्या चित्रपटातही फाशी दाखवली गेली आहे, पण ते ऐतिहासिक आणि सत्य घटनेवर आधारित होते, पण कथानकात फाशीची शिक्षा ठोठावण्याची वेळ येते, तेव्हा नेमके काय घडले आहे, हे पाहूया.तशा आमच्या मराठी, हिंदी चित्रपटात गुन्हेगारांना फारशी कुणी फाशी दिलेली नाही. अगदी खून, दरोडे, बलात्कार असे अनेक दे मार गुन्हे केलेले महाभाग पडद्यावर धुमाकूळ घालत असले, तरी पोलिसांनी त्यांना पकडले की, दी एंडची पाटी येते. मग आपणच समजायचे असते की, आता त्यांना पोलिसांनी पकडले म्हणजे शिक्षा होईल, पण काही कथानके ही फाशी दाखवल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. त्यात मात्र फाशीची शिक्षा दाखवली आहे, पण ज्यांना ज्यांना फाशी दिलेली दाखवली आहे, त्यात अनेक जण विनाकारण फासावर गेल्याचेही दाखवले गेले आहे.मराठीतील व्ही. शांताराम यांचा प्रचंड गाजलेला चित्रपट म्हणजे पिंजरा. या चित्रपटात गुरुजी असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांनाच अखेर फाशीची शिक्षा होते. विशेष म्हणजे स्वत:च्याच खुनाच्या आरोपात दोषी ठरून त्याला फाशी होते, हे विचित्र रम्य असे कथानक होते. प्रत्यक्षात बाजीरावाचा खून कृष्णकांत दळवीने केलेला असतो, पण संध्याच्या नादाला लागून मास्तरचा पाय घसरतो आणि स्वत:चा मुखवटा बदलण्यासाठी गुरुजींचे कपडे, चष्मा त्या प्रेताला घालून गुरुजींचा खून केला आहे असे भासवले जाते. गुरुजींचा तमाशातील मास्तर होतो. पोलीस तपासात हातावरचे ठसे आणि पुरावे श्रीराम लागूंच्या विरोधात जातात, पण आपला खून झालेला नाही, आपण जिवंत आहोत हे तो सांगत नाही, तर आपल्या हातून एका आदर्शाचा खून झालेला आहे, अशी कबुली देऊन फाशीची शिक्षा स्वीकारतो. कथानकाची रंजकता आणि इथली फाशी म्हणजे निर्दोष व्यक्तीला दिलेली फाशी आहे, असेच दिसते. न्यायदेवता कशी आंधळी असते आणि पुराव्यांच्या वजनावर न्यायाचे तागडे तोलले जाते, हाच संदेश चित्रपट देताना दिसतात.मराठी चित्रपटात मेगा फाशीची शिक्षा झालेली आहे, ती म्हणजे माफीचा साक्षीदार या चित्रपटात. पुण्यात १९७६-७७ मध्ये घडलेल्या जोशी अभ्यंकर खून खटल्यातील सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट १९८६ मध्ये आला होता. यात माफीचा साक्षीदार होतो, तो अविनाश खर्शीकर. कसे दहा खून केले याची तो साक्ष देतो आणि जक्कल, सुतार, जगताप, मुनवर शाह यांची भूमिका करणाºया नाना पाटेकर, किशोर जाधव, बिपिन वर्टी अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली जाते, पण मधुसुधन कालेलकरांनी या चित्रपटाला आपल्या मेलो ड्रॅमेटीकपणे टच देऊन चित्रपटाचा शेवट थोडा वेगळाच केला आहे. प्रत्यक्षात या चौघांबाबत असे काही घडले नव्हते. जक्कलच्या जाळ्यात सापडून आपण खून केले याची जाणीव झाल्यावर आणि त्यामुळे आपल्याला फाशीची शिक्षा होणार आहे, हे समजल्याने पोलिसांच्या गाडीतून नेत असताना हे उर्वरित गुन्हेगार नाना पाटेकरला बेदम मारहाण करतात. तो रक्तबंबाळ होतो. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात. नाकात नळ्या, सलाईन, आॅक्सिजन अशा अवस्थेत त्याच्यावर उपचार होत असतात. तो बरा झाल्याशिवाय फाशी होणे शक्य नाही. त्यामुळे ती फाशी लांबते. त्यावेळी नाना पाटेकरची आई हॉस्पिटलमध्ये येते आणि अशा नालायक पोराला जगण्याचा हक्क नाही, म्हणून तो आॅक्सिजन, त्या नळ्या काढून टाकते आणि त्याला मरायला सोडते असे दाखवले आहे. बाकीच्या तिघांना रीतसर फाशी होते. हा मेलोड्रामा चित्रपटाचे स्वातंत्र्य म्हणून प्रेक्षकांना खूश करण्यासाठी घेतल्या आहेतच, पण त्याहीपेक्षा गुन्हेगार गुन्हेगार असतो, संपूर्ण कुटुंब गुन्हेगार नसते हे त्यातून दाखवले आहे. कोणतीही आई आपला मुलगा खुनी व्हावा असे स्वप्न पाहात नाही, त्यामुळे अशा मुलांमुळे कुटुंबांना वाळीत टाकण्याचे प्रकार होऊ नयेत, हा संदेश या चित्रपटातून दिला गेला आहे.हिंदी चित्रपटातील फाशीची शिक्षा झालेल्या काही चित्रपटांचा उल्लेख या ठिकाणी करायचा झाला, तर कर्मयोगी या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. कारण या चित्रपटात राजकुमार या अभिनेत्याला दोन वेळा फाशी झालेली आहे. राजकुमारचा यात डबल रोल आहे. बाप आणि मुलगा. त्यातला बाप फासावर जातो, तो चित्रपटाच्या मध्यंतराला आणि मुलगा राजकुमार फासावर जातो, तो चित्रपट संपताना. देवीसमान सज्जन असलेल्या मालासिन्हाचा राजकुमार पती असतो, पण चोºया करणे, गुन्हे करणे यात त्याला रस असतो. त्यामुळे आपल्या मुलाला तो तसाच बिघडवतो. दोघे वेगळे होतात. मुलाला घेऊन राजकुमार जातो. गुन्हेगारी जगतात मोठा होतो. इकडे मालासिन्हाला सोडताना ती गरोदर असते, ती एका सज्जन मुलाला म्हणजे जितेंद्रला जन्म देते. त्याच्यावर चांगले गीतेचे, कर्मयोगाचे संस्कार करते आणि वकील बनवते, पण गुन्हेगारी जगतात डॉन झालेला राजकुमार पकडला जातो आणि अनेक खून, गुन्हे सिद्ध झाल्याने तो फासावर जातो. मध्यंतरानंतर तो मुलगा पुन्हा राजकुमारच असतो. तोही डॉन बनतो आणि बदले की भावना घेऊन वावरतो. कोर्टात गोळ्या घालून तो पुरावेच देतो आणि फाशीची शिक्षा होते. यातही एक भावनिक प्रसंग आहे की, थोडे दिवस का होईना आईपाशी राहिलेल्या राजकुमारला फासावर जाताना आई भेटायला येते. तेव्हा तो गीतेतील श्लोक म्हणून त्याचा अर्थ सांगतो. केलेल्या कर्माचा सिद्धांत सांगतो. फासावर जातो. धमाल मसालापट, राजकुमारची डायलॉगबाजी याने प्रचंड गाजलेला चित्रपट, पण यातील डबल रोल केलेल्या बाप-मुलाची भूमिका केलेल्या राजकुमारला दोन वेळा फाशी होते हा कथानकाचा भाग आश्चर्यकारक असाच होता. गुन्हेगार बापाबरोबर गेलेल्या आणि गुन्हेगार बनलेल्या राजकुमारला आईच्या संस्कारात वाढून वकील झालेल्या जितेंद्रलाच फाशीच्या शिक्षेची मागणी करण्याची वेळ येते, हा कथानकाचा चमत्कारही रंजक होता. आपला भाऊ आहे, हे समजल्यावर ही केस लढवावी की नाही, या द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या जितेंद्रला आई त्याच्या कर्माची आठवण करून देते आणि केस लढायला सांगते. यात सुधीर दळवी हा न्यायाधीश दाखवला आहे. रेखा, रिना रॉय या दुय्यम भूमिकांतच आहेत. कारण सगळे कथानक गुन्हेगारी जगत आणि राजकुमारभोवती फिरत होते.याशिवाय १९८५ मध्ये सुभाष घई यांचा आलेला एक चित्रपट म्हणजे मेरी जंग. अनिल कपूरला हीरो म्हणून चांगली संधी मिळालेला हा चित्रपट. यात लहान असताना अनिल कपूरचे वडील गिरीश कर्नाड याला ठकराल हा वकील म्हणजे अमरिष पुरी एका खोट्या खुनाच्या घटनेत अडकवून फासावर लटकवतो. ती फाशीची शिक्षा पाहून गिरीश कर्नाडची पत्नी वेडी होते. हा बदला घेण्यासाठी अनिल कपूर शिकून वकील होतो. ठकराल अमरिष पुरीला अद्दल घडवतो. ही वकिली डावपेचाची जंग इथे दाखवली आहे, पण यात निरपराध्यालाच फासावर चढवल्याचे दाखवले आहे. त्यामुळेच कोणाही निरपराध्याला शिक्षा होऊ नये यासाठीच अनिल कपूरची जंग इथे लढताना दिसते.बॉलिवूड पटांनी निरपराध्यांना फाशी होते, असेच अनेक वेळा दाखवायचा प्रयत्न केला आहे. सत्य घटनेवरील २६/११ मध्ये कसाबला फाशी दाखवली आहे, पण वीस वर्षांपूर्वी आलेल्या फिर भी दिल हैं हिंदुस्थानी या चित्रपटात एका निरपराध्याला फाशी देताना वाहिन्या कशा खोटेपणाने वागतात आणि बाजार मांडतात, याचे बिभत्स दर्शन या चित्रपटात शाहरूख खान, जुही चावला यांच्या ड्रिम्स अनलिमिटेडने दाखवले आहे. यात परेश रावलला होणारी फाशी आणि स्पॉन्सरर यावर अत्यंत ब्लॅक कॉमेडी दाखवली आहे.बॉलिवूडने जरी निरपराध्यांना फाशी होते, असे दाखवले असले, तरी असली गुन्हेगारांना भरपूर संधी दिली गेलेली आहे. त्यामुळे ते सुटता कामा नयेत, हे नक्की.
शनिवार, १८ जानेवारी, २०२०
नेमके किती विरोधक जन्माला घातले?
गेल्या चार दिवसांपासून चर्चेत आलेले एक नाव म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत. तसे ते गेली तीन महिने माध्यमांसमोर येत आहेत, पण या तीन दिवसांत त्यांनी किती विरोधक जन्माला घातले, याचा विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे अपुºया माहितीवर आणि चुकीचे संदर्भ देऊन आपले अज्ञानही अनेक ठिकाणी त्यांनी प्रकट केले आहे. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे काहीच बोलत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेना नेत्यांना मुख्यमंत्रीपद मिळवून देण्यात राऊत यांचा मोठा वाटा असल्याने ते गप्प बसत आहेत का? राऊत यांच्या भावाला मंत्रीपद न मिळाल्याने ते शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना डिवचत आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा जन्मही संजय राऊत यांच्या मुलाखतीमुळे आणि त्यानंतरच्या वक्तव्यांमुळे होताना दिसत आहे.संजय राऊत यांना महाविकासआघाडीचे शिल्पकार असल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत या सरकारला धोका निर्माण होईल अशी कृत्ये करणे त्यांनी थांबवले पाहिजे. आघाडीतील तिसºया क्रमांकावरचा असला, तरी त्यांनी पाठिंबा काढला, तर हे सरकार कोसळू शकते. त्यामुळे काँग्रेसला दुखावतील अशी वक्तव्ये करू नयेत याचेही भान त्यांनी ठेवले नाही, याचे आश्चर्य वाटते. ते स्वत: मी संपादक, पत्रकार आहे, मी बोलणारच, असे म्हणत असले, तरी त्यांच्या तोंडून येणारी भाषा ही शिवसेनेची आहे, असे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे राऊत बोलले म्हणजे ते संजय उवाच नाही, तर ठाकरे यांच्या प्रेरणेने आहे, असाच अर्थ निघतो, म्हणून त्यांना आवर घातला पाहिजे. इंदिरा गांधी करीम लाला यांच्या संबंधाचा उल्लेख करून काँग्रेसला विरोध केला. काँग्रेसकडून त्यांचा निषेध झाला आणि आपले वाक्य परत घ्यावे लागले. दिलगिरी व्यक्त करावी लागली. त्यामुळे पुन्हा अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा शांत, संयमी अशा बाळासाहेब थोरात यांनीही दिला, म्हणजे महाशिवआघाडीतील एक घटक पक्षाला विरोधक म्हणून जन्म देण्याचे काम संजय राऊत यांनी केले. भाजपचे नेते हे विरोधक आहेतच, पण असे स्वकीय विरोधक निर्माण करणे हे सरकारच्या दृष्टीने धोक्याचे आहे, याचे भान संजय राऊत यांनी ठेवले पाहिजे. विशेष म्हणजे करीम लाला आणि इंदिरा गांधी भेट, त्या पायधुणीला येत होत्या हे राऊत यांचे म्हणणे अनेकांनी खोडून काढले आहे. अगदी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांनीही हे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चुकीचे संदर्भ देऊन केवळ रंजन करण्याचा प्रयत्न केला होता का?
या मुलाखतीत केवळ काँग्रेसलाच नाही, तर अजित पवारांना स्टेफनी म्हणून संजय राऊत यांनी गौरविले (?) होते. त्यामुळे कधीही आपली मते व्यक्त न करणारे पवार कुटुंबीयांतील श्रीनिवास पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीलाही दुखावले. असे संजय राऊत किती विरोधक जन्माला घालत आहेत?सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संजय राऊत यांनी या मुलाखतीत आमचं आधीच ठरलं होतं, असं सांगत भाजपबरोबर निवडणूक लढवायची आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करायचे असे ठरल्याचे सांगितले. भाजप शब्द पाळणार नाही म्हणून निवडणुकीपर्यंत भाजपचा वापर करायचा आणि नंतर राष्ट्रवादीबरोबर जायचे शिवसेनेचे ठरले असल्याचा गौप्यस्फोट केला. हा तर फारच भयानक दावा होता, म्हणजे अप्रत्यक्षपणे शिवसेनेने भाजपला फसवले, गंडवले, पाठीत खंजीर खुपसला, यूज अँड थ्रो केले, असेच राऊत यांनी दाखवून दिले. यामुळे शिवसेनेला बदनाम करण्याचे काम संजय राऊत यांनी केले. शिवसेनेचा तो राजकीय डावपेच असला, तरी तो अशाप्रकारे जाहीर करणे म्हणजे पक्षाची गुप्तता भंग करण्याचे कामच संजय राऊत यांनी केले का? आपल्याच शिवसेनेच्या विरोधातली ही कृती नाही का? त्यामुळे शिवसेना अशी स्वार्थी निर्णय घेते, असा संदेश संजय राऊत यांनी पोहोचवला आहे. लबाडी केल्याचे संजय राऊत यांनी सांगून सेनेच्या निष्ठावंतांना विरोधात ढकलले आहे.
हे कमी की, काय त्यांनी या मुलाखतीचे पडसाद उमटल्यावर काँग्रेसच्या दबावाने इंदिरा गांधींविरोधात केलेले वक्तव्य मागे घेतले, पण महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या छत्रपतींच्या वंशजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर मात्र विधान मागे घेतले नाही, याचे आश्चर्य वाटते. यातून छत्रपती उदयनराजे यांचा नाही, तर साक्षात शिवछत्रपतींचा अवमान झाला होता, हे त्यांच्या का लक्षात आले नाही. त्यामुळे राज्यभर त्याचे पडसाद उमटलेच, पण त्यावर त्यांनी जी वक्तव्ये केली, पुन: पुन्हा मुलाखती देऊन त्यांनी चुकीचे संदर्भ दिले. गुरुवारी त्यांनी वंशज या विषयावर स्पष्टीकरण देताना राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले या शिवसेनेत होत्या, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, असे वक्तव्य केले. छत्रपती कल्पनाराजे भोसले या शिवसेनेत १९९१ ला होत्या, पण त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही, तर श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. माध्यमांसमोर जाताना अचूक माहिती दिली पाहिजे, याचे भान संजय राऊत यांनी ठेवले नाही. तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना नवखे असल्यामुळे ही गोष्ट माहिती नव्हती, पण एखादा जाणकार पत्रकार त्या ठिकाणी असता तर त्याच ठिकाणी ही चूक विचारली असती, पण संजय राऊत यांचे नशीब चांगले म्हणून त्यांचे त्यावेळी माध्यमांपुढे पितळ उघडे पडले नाही.संजय राऊत यांनी आणखी एका अपुºया माहितीवर वक्तव्य केले. ते म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले पंतप्रधान मोदींना पेढेवाले मोदी म्हणाले होते, पण बातमी न वाचता, अपुºया माहितीवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले होते. उदयनराजे भोसले नेमके काय म्हटले होते, हे त्यांना सांगावे लागेल. छत्रपती उदयनराजे म्हणाले होते, मी कोणा मोदींना ओळखत नाही, मी फक्त पेढेवाल्या मोदींना ओळखतो. सातारचे मोदी पेढे हे खूप प्रसिद्ध आहेत. बाळप्रसाद मोदी, तुळजाराम मोदी, अशोक मोदी ही त्यातील नावे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी बाकी कोणाला ओळखत नाही, मला मोदी म्हणजे फक्त पेढेवाले मोदी माहिती आहेत, असे ते म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते पेढेवाले म्हणालेच नव्हते. त्यामुळे संजय राऊत यांनी भ्रम निर्माण करून जनतेला भडकवण्याचे काम करणे चुकीचे आहे. चुकीची माहिती आणि चुकीचे संदर्भ देऊन वादळ निर्माण करून त्यांनी अनेक विरोधक जन्माला घातले आहेत. हे त्यांनी थांबवले पाहिजे. उदयनराजे हे राष्ट्रवादीत असताना भाजपच्या विरोधात असताना त्यांनी ते वक्तव्य केले होते, त्याचा आत्ता काय संबंध? संजय राऊत यांनी, शिवसेनाप्रमुखांनी, उद्धव ठाकरे यांनीही विरोधात असताना काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विरोधात वक्तव्ये केली होतीच की. शरद पवारांवर टीका केली जात होतीच ना? मग आता ते एकत्र आहेत तर ते जुने उकरून काढणार का? संदर्भहीन बोलणे राऊत यांना शोभत नाही, हे सांगावेसे वाटते.
संजय राऊत बोलतात की, मी संपादक आहे, पत्रकार आहे. मग त्यांनी समाजाच्या, जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. महाविकासआघाडीत बिघाडी निर्माण करून चालत्या गाडीला खिळ घालण्याचे प्रयत्न करू नयेत, हीच अपेक्षा आहे.हे पण चुकीचे वक्तव्यसंजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यात जे काही म्हटले, त्यात त्यांनी उदयनराजे हे भाजप नेते आहेत, भाजपचे माजी खासदार आहेत, असे म्हटले होते. भाजप नेते आहेत इतपत ठीक आहे, पण भाजपचे माजी खासदार आहेत, हे अगदी चुकीचे आहे. छत्रपती उदयनराजे तीन वेळा खासदार झाले. तीनही वेळा ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरच निवडून आले आहेत. पहिल्यांदा २००९ ला, मग २०१४ आणि २०१९ ला, मात्र तीन महिन्यांत त्यांनी राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आणि भाजपमधून खासदारकीची निवडणूक लढवताना मात्र ते पराभूत झाले. त्यामुळे ते भाजपचे माजी खासदार नाहीत.
शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०
गुन्हेगारांचे मनोबल वाढवू नका
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी होणार नाही, अशी बातमी आल्याने सर्वसामान्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी उमटली. तारीख पे तारीख या प्रकाराला सामान्य जनता वैतागली आहे. या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश याने कनिष्ठ न्यायालयाकडून सुनावण्यात आलेल्या डेथ वॉरंटला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावेळी आरोपीच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला आहे की, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतरदेखील त्याला १४ दिवसांचा वेळ मिळतो. यामुळे डेथ वॉरंट रद्द करावे. त्याचप्रमाणे दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी दिल्ली सरकारकडून सांगण्यात आले की, २२ जानेवारी रोजी फाशी देता येणार नाही. कारण, दयेचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. तुरुंग प्रशासनाच्या नियमांनुसार डेथ वॉरंटसाठी आरोपीच्या दयेच्या अर्जावर निर्णय येण्याची वाट पाहावी लागते. त्यामुळे जर दयेचा अर्ज प्रलंबित असेल, तर तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार फाशी देता येत नाही. सरकार यासंदर्भात २१ जानेवारी रोजी कनिष्ठ न्यायालयात बाजू मांडणार आहे. जर दयेचा अर्ज फेटाळला जात असेल तरदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १४ दिवसांचा कालावधी नव्या डेथ वॉरंटसाठी द्यावा लागेल. हा सगळा प्रकार फाशी पुढे ढकलण्यासाठी चाललेला आहे, पण या गुन्हेगारांची फाशी पुढे ढकलण्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी इतके का लोक आतुर होत आहेत. गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होण्याऐवजी त्यांना वाचवण्याचे, शिक्षा पुढे ढकलण्यासाठी होत असलेले प्रयत्न वेदनादायक आहेत.याअगोदर निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. विनय शर्मा आणि मुकेश या दोघांनी ही याचिका दाखल केली होती. न्या. आर. भानुमती आणि अशोक भूषण यांच्या ५ न्यायाधीशांच्या पिठाने ही याचिका फेटाळली होती.दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणी चारही दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी दिल्ली न्यायालयाने हा निर्णय देत डेथ वॉरंट जारी केलं होतं. या डेथ वॉरंटमध्ये ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता या चारही दोषींना फाशी देण्यात येणार असल्याची बाब नमूद करण्यात आली होती. तरीही आता जीवाचं रान करून ही फाशी पुढे ढकलण्यासाठी जे वकिली डावपेच लढवले जात आहेत हे फार वाईट आहे.क्युरेटिव्ह याचिकेद्वारे दोषी न्यायालयाने दिलेल्या निर्णयातील तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकून त्यात कुठे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हे सुचवून प्रश्न उपस्थित करू शकतो, मात्र त्यासाठी ज्येष्ठ वकिलाच्या शिफारशीची आवश्यकता असते. ज्येष्ठ वकिलाच्या शिफारशीशिवाय क्युरेटिव्ह याचिका दाखल होत नाही. क्युरेटिव्ह याचिकेवर चेंबरमध्ये सुनावणी घेण्यात येते. सुप्रीम कोर्टाने जरी क्युरेटिव्ह याचिका दाखल केली, तरीदेखील दोषी दयेचा अर्ज करू शकतो. हा सगळा कायद्याचा किस काढून गुन्हेगारीचेच समर्थन होत आहे असे दिसते.वास्तविक पाहता क्युरेटिव्ह ही संकल्पना २००२ मध्ये रूपा अशोक हुरा प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आली. सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविलेल्या किंवा दिलेल्या निर्णयानंतर आरोपीचे सर्व मार्ग बंद होतात काय? की त्या विशिष्ट प्रकरणातून त्याची सुटका होऊ शकते काय? हा प्रश्न जेव्हा चर्चेला आला तेव्हा नियमानुसार दोषी व्यक्ती रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकतो. जर रिव्ह्यू पिटिशन फेटाळण्यात आली, तर सर्वोच्च न्यायालय दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करू शकते. सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देताना काही दोष राहून गेला असेल, तर सर्वोच्च न्यायालय आपण दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करून परत निर्णय देऊ शकते. यातूनच क्युरेटिव्ह याचिका समोर आली. ज्या याचिकेवर तीन वरिष्ठ न्यायाधीशांनी निर्णय दिला त्याच तीन वरिष्ठ न्यायाधीशांकडे क्युरेटिव्ह पिटिशन वर्ग करता येते.निर्भया प्रकरणात चार आरोपींपैकी विनय शर्मा व मुकेश कुमार या दोघांनी ही याचिका दाखल केली होती. निर्भया प्रकरणात आपल्याला देण्यात आलेली शिक्षा रद्द करावी, अशी मागणी शर्मा या आरोपीने केली आहे. मंगळवारी ७ जानेवारीला दिल्ली हायकोर्टाला या प्रकरणातील चार दोषींविरोधात फाशीची शिक्षा सुनावली. या चार दोषींना २२ जानेवारी या दिवशी फाशी देण्याचे आदेश निर्भया सामूहिक बलात्कार कोर्टाने दिले आहेत. निर्भया प्रकरणातील सर्व ४ दोषींना २२ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता एकत्रितपणे तिहार तुरुंगात तुरुंग क्रमांक ३ मध्ये फाशी देण्यात येणार आहे. यासाठी यूपीतील कारागृह विभागाने तिहारमध्ये फाशी देणाºया व्यक्ती पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेशातील फाशी देणाºया जल्लादांना बोलावले आहे. कानपूर येथे राहणारे जल्लाद आता वयस्क झाले आहेत. यामुळे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना मेरठ येथे राहणारा जल्लाद फाशी देईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. ही सगळी तयारी सुरू असतानाच तीच फाशी पुढे ढकलण्यासाठी चाललेले प्रयत्न सामान्यांना हादरवणारे आहेत. तितकेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे मनोबल वाढवणारे आहेत.निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक दोषी अक्षय ठाकूर याने केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अक्षय ठाकूर याच्या वकिलाला पूर्ण संधी देण्यात आली, मात्र दोषीच्या वकिलाने काहीही म्हणणे मांडले नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.कोणत्याही व्यक्तीला शिक्षेपासून वाचविण्यासाठी क्युरेटिव्ह हा शेवटचा पर्याय असतो. निर्भयाच्याच चारही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करत त्यांच्या पुनर्विचार याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. त्यांच्या कोणत्याही याचिका प्रलंबित नसल्याने पटियाला हाऊस कोर्टाने या चौघांचे डेथ वॉरंट काढले. त्यानुसार २२ जाने. रोजी सकाळी ७ वा. फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे, पण ही फाशी टाळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणारे कायदेपंडित हे अत्यंत धोकादायक आहेत असेच म्हणावे लागेल.या दोषींकडे सुप्रीम कोर्टातील क्युरेटिव्ह याचिका आणि राष्ट्रपतींकडील दया याचिका हा पर्याय शिल्लक आहे, हे सुचवून वकिलांनी गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा लांबवण्याचा चालवलेला प्रयत्नच हिडीस आहे. हा अप्रत्यक्ष पुन्हा पुन्हा केला जाणारा प्रेतावरचा बलात्कार म्हणावा लागेल. विनय आणि मुकेशने क्युरेटिव्ह दाखल केली असली, तरी अद्याप अक्षय व पवनने याचिका दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे २२ तारखेपूर्वी त्यांची एखादी याचिका प्रलंबित राहिली, तर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लांबवावी लागेल. क्युरेटिव्ह याचिकेमुळे न्याय मिळण्यास विलंब होत असतो. या किती दिवसांत या याचिकेवर निर्णय दिला गेला पाहिजे याला कुठलीच कालमर्यादा नाही. ही न्यायव्यवस्थेची विटंबना म्हणावी लागेल.यामुळे विशिष्ट कालावधीतच निर्णय लागेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. याचा फायदा आरोपीला मिळत असतो. निर्भया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. राष्ट्रपतींनी दयेचा अर्जदेखील खारीज केला, मात्र क्युरेटिव्ह याचिकेमुळे परत एकदा तीच न्यायालयीन प्रक्रिया घडत असल्यामुळे न्यायालयाचा वेळ अकारण खर्ची होत असतो, मात्र याचा नेमका फायदा आरोपींना मिळतो. या पार्श्वभूमीवर क्युरेटिव्ह याचिकेवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. आता सगळं संपलं आहे हे जाहीर करून फाशीची प्रक्रियाच पूर्ण करण्याची गरज आहे, नाहीतर गुन्हेगारी जगताचे मनोबल वाढेल आणि सामान्यांत भीतीचे वातावरण तयार होईल.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)