लँडमार्क फिल्मस प्रेझेंटसने पिप्सी नावाचा एक अतिशय संवेदनशील भावनाप्रधान चित्रपट आणला आहे. बालकलाकारांच्या सहजसुंदर मजबूत परिपक्व अभिनयासह चांगले संवाद, कथाबांधणी यामुळे हा चित्रपट लक्षात राहतो. बालकांचे निरागस मन आणि आसपासच्या घटनांमुळे येणारी जबाबदारी या कचाटय़ात त्यांचा कसा कोंडमारा होत असतो, हे अत्यंत सोपे करून हा चित्रपट सांगतो.नापिकी, दुष्काळी गावातील पार्श्वभूमीवर कटाक्ष टाकतानाच, गरीब कुटुंबातील बालकांची काय अवस्था आहे, हे यातून ठळकपणे दाखवून दिले आहे. दारिद्रय़ आणि रोगराई ही भावंडच असतात. त्यांचे वास्तव्य एखाद्या घरात असले, तर बाकीच्यांची मानसिकता कशी असते याचे स्पष्ट चित्रीकरण यात दिसतेच. पण, आपली आई तीन महिनेच जगणे शक्य आहे, हे समजल्यामुळे अस्वस्थ झालेली ७ ते ८ वर्षाची चानी आपल्या वर्गमित्राबरोबर हे दु:ख शेअर करताना काय काय प्रयत्न करते, याचे सुरेख बांधेसूद कथानक म्हणजे हा चित्रपट. बालसुलभतेने असणारा खोडकरपणा, जबाबदारीचे ओझे आणि संकटांमुळे अंगात येणारे धैर्य याचे भाव प्रकट करताना, चानी या भूमिकेतून मैथिली पटवर्धनने जो अभिनय केला आहे, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे. तिच्या मित्राची भूमिका करणारा बाळू साहिल जोशी या बालकलाकाराने तेवढय़ाच ताकदीने उभा केला आहे.सौरभ भावे यांनी कथा, पटकथा आणि संवाद यावर मेहनत घेतल्याचे आणि ते वास्तवाशी भान राखतील याचा चांगला अभ्यास केल्याचे या चित्रपटातून दिसून येते. विधी केसलीवाल यांनी या अवघड विषयाची निर्मिती केली असून, रोहन देशपांडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन चांगल्याप्रकारे केले आहे. या चित्रपटाचे छायाचित्रणही चांगले आहे. त्यासाठी निवडलेली ठिकाणे, तेथील बारकावे छान चित्रित केली आहेत. शहरापासून लांब असणा-या गावात घडणारी ही कथा फार सुंदर आहे. कीर्तनात ऐकलेल्या कथेमुळे आपली आई वाचवण्यासाठी माशाचे पिल्लू पकडणे आणि त्याचे पिप्सी हे नाव ठेवून त्याचे जतन करण्यासाठी चाललेली धडपड म्हणजे हा चित्रपट.कधीकाळी अपघात होऊन रुळावरून घसरून पडलेला डबा उचलण्यात रेल्वेकडून होणारे दुर्लक्ष आणि त्या डब्याचा या मुलांनी खेळण्यासाठी वापर करणे, तिथेच त्यांचे नवे विश्व तयार होणे हे अप्रतिम. हा मोडका रेल्वेचा डबाच चित्रपटाचा महत्त्वाचा भाग बनून जातो. दुष्काळी गावातील बारकावे अत्यंत मार्मिकपणे या चित्रपटाने टिपलेले आहेत. खूप पंप मारूनही पाणी न येणे, टँकर, पिकांचे पंचनामे, त्यामागचा प्रशासकीय भ्रष्टाचार यावर प्रभावी कटाक्ष टाकताना, कथेला कुठेही धक्का लागत नाही, हे या चित्रपटाचे वैशिष्टय़. एकूणच उत्तम सांघिक प्रयत्न आणि बालकलाकारांची अभिनयाची जुगलबंदी यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहायला हरकत नाही.स्टार ****का पाहावा – बालकलाकारांचा परिपक्व अभिनय पाहण्यासाठीका पाहू नये – असे कोणतेच कारण नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा