बुधवार, २ मे, २०१८

राज ठाकरेंच्या तोंडून पुन्हा पवारच बोलले



    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी १ मेपासून महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. पक्षबांधणीसाठी त्यांनी आता जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याची सुरुवात वसईतील जाहीर सभेपासून झाली. पण या जाहीर सभेतील भाषणात राज ठाकरे यांनी जी टीका केली त्यातून असे जाणवले की राज यांच्या तोंडून पुन्हा शरद पवारच बोलले.गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि शरद पवार यांची जवळीक वाढलेली आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी एकमेकांना पाण्यात पाहतो आहोत असे दाखवणारे आता एकमेकांची स्तुती, विचारांची देवाणघेवाण करत जवळीक साधताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने हे एकत्र आणि समविचारी झालेले दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे दोघांचाही पहिला शत्रू शिवसेना आहे. त्यामुळे शत्रुत्वाच्या गोत्रातून हे दोघे मित्र झालेले दिसतात. अर्थात शिवसेनेचे सगळेच शत्रू आहेत. सत्तेत राहून शिवसेना भाजपशीही शत्रूप्रमाणे वागते त्यामुळे शिवसेनेला सध्या कोणीच जवळ करताना दिसत नाही. त्यामुळे शिवसेना विरोधक या भूमिकेतून राज-पवार यांचे मैत्रियोग जुळून आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज यांच्या तोंडून शरद पवारच बोलत आहेत, असे दिसते. याचे नेमके कारण म्हणजे दोनच दिवसांपूर्वी म्हणजे ३० एप्रिललाच शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना मोदी बोलायचे तेव्हा बोलतच नाहीत असे म्हटले होते.१ मेच्या वसईच्या भाषणात राज ठाकरे यांनंी जेव्हा बोलायचे तेव्हा मोदी बोलतच नाहीत असेच वक्तव्य केले. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पालघर दौरा केला होता त्यावेळी बुलेट ट्रेनला विरोध करण्याचा हल्लाबोल केला होता. आज राज ठाकरे यांनीही तेच केलेले दिसते. त्यामुळे राज ठाकरे यांचा मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अगोदरच छुपी युती झालेली आहे काय असा प्रश्न यातून निर्माण होतो. याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या मतविभागणी होणार नाही, अशा एका मित्राची गरज आहे. काँग्रेसबरोबर असलेले नात्याचे संबंध आता पुन्हा जुळवावेत असे कोणाला वाटत नाही. त्यामुळे साहजिकच नवा मित्र मिळवण्याचे बेरजेचे राजकारण शरद पवारांनी आपल्या आवडीनुसार केले असल्यास नवल नाही. २०१४ मध्ये भाजपला सत्तेवर येण्यासाठी न मागता पाठिंबा देऊन ही मैत्री जुळते का यासाठी त्यांनी खडा टाकून पाहिला होता; परंतु राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार आले तर आपले अस्तित्व राहणार नाही याची जाणीव शिवसेनेला झाल्याने शिवसेनेने लगेच शरणागती पत्करली. तुम्ही द्याल ती खाती घेतो पण आम्ही सरकारमध्ये येतो असे म्हणत युती केली. त्यामुळे आपल्यावाचून भाजपचे आता काही अडत नाही हे लक्षात घेतल्यावर राष्ट्रवादीला नव्या जोडीदाराची गरज भासू लागली. हा जोडीदार अर्थातच काँग्रेस नको आहे. कारण काँग्रेसला कडेवर घेतले तर कधी ते खांद्यावर चढतील आणि डोक्यावर बसायला जातील हे सांगता येणार नाही, याची खात्री पवारांना आहे. त्यामुळे उठता बसता आपल्या हातात राहील असा सोबती पवारांना हवा होता. तो मनसेच्या रूपाने त्यांना आता सापडलेला दिसतो आहे. म्हणजे ज्या जागी आपली ताकद ताही तिथे मनसेला लढायला सांगून अन्य ठिकाणी मनसेचा पाठिंबा मिळवून मतांची टक्केवारी वाढवण्याचा नवा फॉर्म्युला शरद पवारांनी काढलेला दिसून येतो. न मागता पाठिंबा देऊन देवेंद्र फडणवीस सरकारला मांडलिक करून घेण्याचा शरद पवारांचा २०१४ चा डाव यशस्वी न झाल्यामुळे शरद पवारांना काही तरी नवीन करायचे होते. त्यामुळे उशिरा उठणा-या राज ठाकरेंच्या डोक्याशी आपल्या घडय़ाळाचा गजर करण्याचे काम पवारांनी केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या तोंडातून होणारी गर्जना म्हणजे घडय़ाळाचा गजर वाजू लागला आहे. तो पुन्हा एकदा १ मेच्या जाहीर सभेत वसईत झाला, तेव्हा त्यांनी बोलायचे तेव्हा मोदी बोलत नाहीत इथपासून ते मोदींच्या परदेश दौ-यापर्यंत शरद पवारांच्या टीप्स किंवा केलेले फिडिंग बाहेर काढले.काँग्रेसला बरोबर घेतले तर मोठा कोण, छोटा कोण यावरून भांडणे होतात. कोणी मोठय़ा भावाची भूमिका करायची आणि कोणी छोटय़ा भावाची यावरून वाद होतात. १९९९ ते २०१४ पर्यंत दोघांची आघाडी होती. पण २००९ ते २०१४ हा काळ एकमेकांना पाण्यात पाहण्यात गेला. १९९९ ते २००४ हा काळ एकमेकांना धरून ठेवण्यात गेला तर २००४ ते २०००९ हा काळ दोघांमध्ये कोण मोठा, कोण छोटा यात गेला. त्यामुळे ही भाऊबंदकी इतकी टोकाला गेली की आता जवळ यायचे तरी एकमेकांना भीती वाटते की हा एकीकरणाचा फुटलेला पान्हा पुतनामावशीचा तर नसेल. त्यामुळे निवडणूकपूर्व चाचपणी करून राज ठाकरेंच्या तोंडातून शरद पवार बोलताना दिसतात. राज ठाकरे यांच्या भाषणात आता ३ महिने शरद पवारांचा उल्लेख असणार, पुण्यातील त्या ऐतिहासिक मुलाखतीचा उल्लेख असणार, ते आर्थिक आरक्षणाचे मुद्दे असणार. पण यातून फक्त पवारांची जाहिरात होणार, राज यांच्या वाटय़ाला फारसे काही येणार नाही. त्यामुळे या जाळय़ात राज ठाकरे अडकून पडले आहेत. आज राष्ट्रवादीकडे चांगले वक्ते नाहीत. ऑर्केस्ट्रा किंवा सेलीब्रेटी आणून गर्दी खेचायची आणि नेत्यांनी बोलायचे हे तंत्र आता लोकांना समजल्यामुळे गर्दी होत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचा वापर करून घेत शरद पवार आपली मते बोलून घेत आहेत, हेच खरे राजकारण. हीच ती पवार नीती.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: