पालघर, भंडारा या लोकसभा पोटनिवडणुकीच्यावेळी मतदान यंत्रात काहीतरी बिघाड झाला. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी गदारोळ केला. नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून आणि एकेक राज्य ते जिंकू लागल्यापासून भाजपच्या यशाला स्विकारण्यापेक्षा त्या मतदान यंत्रांना इव्हीएम मशिनना दोषी ठरवण्याचा प्रकार रुढ झालेला आहे. कोणतीही निवडणूक भाजपने जिंकली की लगेच मतदान यंत्रात काहीतरी दोष होता, ती अगोदरच अॅडजेस्ट केली होती अशा टीका सुरू होतात. यामध्ये शिवसेना, मनसे या पक्षांचा अगदी पुढाकार असतो. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी केली होती. तर त्याच्यापुढे जात कर्नाटकातला विजय हा भाजपचा विजय नसून ईव्हीएम मशिन जिंदाबाद असे वक्तव्य करून राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रीया तातडीने नोंदवली होती. ईव्हीएम मशिनवर खापर फोडण्याची यांना इतकी घाई झालेली असते की सुरवातीला कर्नाटकात भाजपच्या बाजून कल येऊ लागताच त्याचे स्वागत न करता ईव्हीएम मशिनचा विजय झाल्याचे मतप्रदर्शन केले गेले. पण नंतर मात्र त्यांनी पळपुटेपणा केला. त्यावर काही वाच्यता केली नाही. भाजपला कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळाले नाही, सत्तेपासून दूर राहावे लागले याबाबत कोणी नंतर बोलले नाहीत. मग तिथे ना उद्धव ठाकरेंनी बॅलेटपेपरचा पुनरुच्चार केला ना राज ठाकरे यांनी मशिनचा विषय पुन्हा काढला. भाजपच्या विरोधात निकाल लागला की मतदानयंत्रे बरोबर आहेत आणि भाजपच्या बाजूने निकाल लागला की ती चुकीची आहेत असा दुटप्पीपणा फक्त ठाकरेच करू शकतात. साधी गोष्ट आहे की ज्यांना ईव्हीएम मशिन घोटाळा करून निवडणुका जिंकायच्या आहेत ते अस्पष्ट कौल कशाला देतील. चांगले भरघोस यश तरी मिळवतील की. पण आपली चुकीची मते प्रदर्शित करायची घाई करायची हेच शिवसेनेचे धोरण राहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गेले आणि विचारपूर्वक बोलणारे सेनेत कोणी उरले नाही. फक्त बरळायचे. काहीही, अगदी मनाला येईल तसे सोयीस्करपणे टीका करायची. त्याला कसलाही शास्त्रीय आधार नसतो. मग मोदी लाटेत २०१४ ला राज्यात शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. तेसुद्धा ईव्हीएम घोटाळा करूनच आले असे शिवसेनेचे मत आहे का? शिवसेना हा पक्ष अत्यंत प्रतिगामी असल्यामुळेच तंत्रज्ञानापासून लांब पळत आता जुन्या मतपत्रिकांची मागणी करत आहे. आज शिवसेनेचा बोलविता धनी म्हणजे काँग्रेस आहे. काँग्रेसमध्ये दिग्विजयसिंग, कपिल सिब्बल, मणिशंकर अय्यर यांच्या पोपटपंचीला लोक कंटाळल्याचे लक्षात आल्यावर काँग्रेसने उद्धव ठाकरेंना आपला पोपट केला आहे. बोलक्या बाहुल्याप्रमाणे काँग्रेसच्या बोटांवर तो बोलत असतो. काँग्रेसने ईव्हीएम वर टीका केली की लगेच शिवसेना नेते तीच री ओढतात. पण नंतर त्यांचेच बोलणे चुकीचे आहे हे लक्षात आल्यावर तो विषय बेमालूपणे विसरून जातात. कर्नाटकातील निवडणुकीत अगोदर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही म्हटल्यावर लगेच मूग गिळून ठाकरे गप्प बसले. असा हा दुटप्पीपणा आहे. ईव्हीएम मशिनची सुरक्षितता, त्यात काहीही अडचणी नाहीत हे निवडणूक आयोगाने न्यायालयातही सिद्ध करून दाखवले आहे. तरीही विरोधकांचे ईव्हीएमवर खापर फोडण्याचे पालुपद सुरु आहेच. पण यामध्ये दुटप्पीपणा का केला जातो हे अनाकलनीय आहे. ज्यांना ईव्हीएम मशिन अॅडजस्ट करून जिंकण्याचे तंत्र लाभले आहे ते अर्धवट कौल, त्रिशंकू कौल कसा काय देतील? बॅलेट पेपर किंवा मतदानपत्रिकेपेक्षा कितीतरी पटीने मतदान यंत्रे ही सुरक्षित आहेत. मतपत्रिका असताना कधी काँग्रेसच्या राज्यात गैरप्रकार झाले नव्हते का? पूर्वी बूथकॅपचरींग व्हायचे. मतदान केंद्रांवर हल्ले करून पटापट शिक्के मारून मतपत्रिका पेटीत टाकण्याचे प्रकार व्हायचे. आता मतदान यंत्र आल्यापासून बुथकॅपचरींग करता येत नाही. जसे पटापट शिक्के मारून मतपत्रिका पळवून त्या पेटीत टाकण्याचे प्रकार होत होते तसे प्रकार मतदान यंत्राबाबत शक्य होत नाही. कारण एकदा बटण दाबले की पुन्हा त्या व्यक्तिला बटण दाबता येत नाही. आपले गैरप्रकार करता येत नसल्यामुळे ईव्हीएम मशिनवर संशय घेण्याचा आचरटपणा केला जातो. सहा महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये भाजपचे संख्याबळ कमी झाले. त्यावेळी मतदानयंत्रावर कोणी कसा संशय व्यक्त केला नाही? उद्धव ठाकरे यांनी लगेच राहुल गांधी सुधारले, त्यांनी गुजरातमध्ये आपली कर्तबगारी सिद्ध केली वगैरे सांगून मोकळे झाले. गुजरातमध्ये दोन दशके भाजपची सत्ता आहे, केंद्रात भाजपची सत्ता आहे. तरीही असा कौल मिळाला आहे. भाजपला करायचेच असते तर त्यांना गुजरातमध्ये ते करता येणे सहज शक्य होते. पण कोणताही गैरप्रकार मतदानयंत्रात करता येत नाही, हेच यावरून सिद्ध होते आहे. विरोधकांनी फक्त आपली मानसिकता बदलली पाहिजे. पराभवाचे खापर मतदानयंत्रावर फोडून आपला नाकर्तेपणा लपणार नाही हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. २०१४ ला मोदी सत्तेवर आल्यानंतर दिल्लीच्या फेरनिवडणुका झाल्या. त्यावेळी सर्वात मोठा असलेला भाजप मागे पडून आमआदमी पार्टीला पाशवी बहुमत मिळाले. तेंव्हा कोणी मतदान यंत्रावर संशय घेतला नाही. बिहारमध्ये सगळ्या विरोधकांनी एक होत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला अगदी लालूप्रसाद यादव यांच्या राष्टÑीय जनता दलानेही साथ दिली. त्यावेळी मतदान यंत्रात बिघाड झाल्याची चर्चा कोणी केली नाही. गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला त्यावेळी कोणाला ईव्हीएम मशिनवर संशय घ्यावासा वाटले नाही. फक्त भारतीय जनता पक्षाला यश मिळते असा संकेत मिळाला की लगेच ईव्हीएम मशिनवर संशय घेण्याचा दुटप्पीपणा केला जातो. ही विरोधकांची मानसिकता त्यांच्या कमकुवत बुद्धीचे दर्शन घडवते. ईव्हीएम मशिनवर मतदान हे काही मोदींच्या काळात सुरु झालेले नाही. काँग्रेसचे सरकार असतानाच त्याला सुरूवात झालेली आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. पण कोल्'ाला द्राक्षे आंबट म्हणतात त्यातला हा प्रकार आहे, बाकी काही नाही.
मंगळवार, २९ मे, २०१८
इव्हीइमवर किती दिवस खापर फोडणार?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा