शिक्षणात सुधारणा करण्याच्या चर्चा नेहमीच केल्या जातात. पण कोणतीही व्यक्ती, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने या मंत्रिपदाचा भार सांभाळल्यापासून काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नव्या शैक्षणिक सुधारणांमध्ये शिक्षकांच्या निवृत्तीची तारीख निश्चित केली पाहिजे. राज्य सरकारने तसा कायदा संमत करून त्याबाबत शिक्षक सेवा निवृत्तीबाबतचा एक नवा शैक्षणिक धोरणाचा महाराष्टÑ पॅटर्न तयार केला पाहिजे.शिक्षकांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना मोर्चे काढावे लागतात, आंदोलने करावी लागतात. परंतु त्याहीपलिकडे शिक्षकांच्या निवृत्तीमुळे होणाºया नुकसानीचे अनेक प्रश्न आहेत. त्याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्याकडे कर्मचाºयांच्या सेवानिवृत्तीचे जे नियम आहेत त्यामध्ये वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्यावर ज्या महिन्यात जन्म झाला त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याला निवृत्त केले जाते. परंतु हा नियम अन्य कोणत्याही खात्याबाबत योग्य असला तरी शिक्षण कर्मचाºयांबाबत विशेषत: शिक्षकांबाबत उचित नाही. दरवर्षी शाळा या १५ जूनच्या आसपास सुरू होतात. सगळे मार्गी लागेपर्यत १ जुलै उजाडतो. पण ज्यावेळी एखाद्या शिक्षकाची जन्मतारीख आॅगस्ट,सप्टेंबर महिन्यातील असते तेंव्हा तो शिक्षक दोन अडीच महिने शिकवण्याचे काम करतो आणि त्याला निवृत्त केले जाते. बहुसंख्य शाळांमधून त्या शिक्षकाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेचे नियोजन त्यानंतर केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. एक शिक्षक चार पाच वर्गांवर शिकवत असेल तर त्या शाळेतील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांचे नुकसान यामुळे होत असते. नवीन शिक्षक येउन त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांची भट्टी जमेपर्यंत अनेक विद्यार्थी मागे पडतात. हे टाळण्यासाठी शिक्षकांच्या निवृत्तीची ठराविक तारीख असली पाहिजे. त्याबाबत शिक्षण खात्यात सुधारणा करून सरकारने तसा कायदा करण्याची गरज आहे.या सुधारणेप्रमाणे आॅक्टोबर पर्यंत ज्यांच्या जन्मतारखा आहेत त्यांना अगोदरच्या ३१ मे पर्यंत निवृत्त करावे. नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान ज्यांच्या जन्मतारखा असतील त्यांना पुढील वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. त्याप्रमाणे फक्त ३१ मे या दिवशीच सर्व शिक्षकांना निवृत्त करावे. शिक्षकांच्या निवृत्तीच्या अन्य तारखा असता कामा नयेत.कित्येकवेळा शिक्षक मुख्याध्यापक म्हणून पदोन्नत्तीच्या रांगेत असतात. पण काही घटनांमध्ये ३० एप्रिलला एक मुख्याध्यापक निवृत्त झाले. त्यानंतर १ मे पासून कागदावर नव्या मुख्याध्यापकाची नेमणूक होते. तो ३० जूनला निवृत्त होतो. म्हणजे सुट्टीच्या काळापुरताच मुख्याध्यापक झाल्याचे प्रकारही अनेक ठिकाणी पहायला मिळतात. अशावेळी योग्य त्या मुदतीकरता कामाची संधी सर्वांना मिळाली पाहिजे. त्यांची ज्या कारणासाठी नेमणूक झाली आहे ती कागदोपत्री पदे असणे योग्य नाही. त्यासाठी निवृत्तीची तारीख शिक्षकांपुरती, निश्चित करण्याची सुधारणा सरकारने केली पाहिजे.
रविवार, ४ मार्च, २०१८
शिक्षकांच्या निवृत्तीची तारीख निश्चित करावी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा