‘पादसेवन भक्ती’
दासबोधातील चवथ्या दशकातील चवथा समास हा पादसेवन भक्तीची महती सांगणारा आहे. भक्तीमध्ये भगवतप्राप्ती हे ध्येय असले पाहिजे. म्हणजे निरपेक्ष भावनेनी केलेली भक्ती असली तरी भगवत प्राप्ती करणे हे त्या भक्तीचे ध्येय असले पाहिजे. त्यासाठी पादसेवन भक्तीचा मार्ग हा एक मार्ग आहे. पादसेवन तेंचि जाणावें । कायावाचामनोभावें ।सद्गुरुचे पाय सेवावे । सद्गतिकारणें ॥ 2 ॥ म्हणजे सद्गती मिळण्यासाठी म्हणजे भगवत्प्राप्तीसाठी कायेनें. वाचेनें, आणी मनानें सद्गुरुची चरणसेवा करणे याला पादसेवनभक्ति म्हणतात. या भक्तीचे खूप फायदे आहेत असे या समासात समर्थ रामदासांनी सांगितले आहेत. जन्मरणाची यातायात कायमची जावी म्हणून सद्गुरुचरणी अनन्य होणे याला पादसेवन भक्ती म्हणतात. माणसाचा जन्म म्हणजे मुक्तीचा जन्म आहे. जन्म मरणाच्या फेर्यातून, चौर्याऐशी लक्षाचा फेरा संपवून परमात्म्यात विलीन होण्याची संधी लाभलेला हा जन्म आहे. म्हणूनच परमेेश्वराजवळ घेवून जाणारा हा भक्तीमार्ग आहे. मुक्ती मिळवणे, सदगती लाभणे हे आपले ध्येय असले पाहिजे. त्या ध्येयासाठी आवश्यक असा हा भक्तीमार्ग म्हणजे पादसेवन. हा संसारसागर तरुन जाण्यास सद्गुरुकृपेशिवाय कांहीं उपाय नाही. यासाठी वेळ न दवडता सद्गुरुचे पाय सेवावे. म्हणजेच या संसारसागरातून तरून जाण्याचा फार मोठा फायदा या भक्तीचा आहे असे समर्थ सांगतात. त्याची अनुभूती घेण्यासाठी या भक्ती प्रकाराचा अवलंब करणे आवश्यक असते.सद्गुरु हाच सद्वस्तु म्हणजेच परमेश्व्र्ाचे दर्शन घडवून देतो. सद्गुरु चांगले-वाईट, काय घ्यावे काय सोडावे हे समजावून सांगतो. त्याच्याकडून श्रवण केल्याने परमेश्वराचे निश्चित ज्ञान मनांत ठसते. सदगुरू म्हणजे परमेश्वर आणि आपण यातील फार मोठा दुवा असतो. सदगुरुकृपेने आपण ते इप्सित साध्य करतो. त्यासाठी असा गुरू भेटावा लागतो. असा गुरू भेटणे आणि त्याचे पाय धरणे हा या भक्तीमार्गाचा फायदा आहे. परमात्मा ही गोष्ट एखाद्या वस्तुप्रमाणे डोळ्यांनी दिसत नाही. कारण मनाला ती भासत नाही. संगत्यागावाचून तिचा अनुभव येत नाही.अनुभव घेतां संगत्याग नसे । संगत्यागें अनुभव न दिसे । हें अनुभवियासीच भासे । येरां गयागोवी ॥ 7 ॥ म्हणजेच हा अनुभव घेण्याचा, अनुभूतीचा, साक्षात्काराचा मार्ग आहे. मी अनुभव घेतो ही वृत्ती किंवा जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत ज्ञाता व ज्ञेय यांच्या वेगळेपणामुळे संगत्याग नसतो. दृश नाहीसे झाले म्हणजेच ‘ मी ’ ही जाणीव नष्ट झाली की परमात्मवस्तुचा अनुभव येतो. हे बोलणे स्वानुभवी पुरुषाला बरोबर कळेल. इतरांना नाही. असे समर्थांनी स्पष्टपणे सांगितले आहे. एखाद्या वस्तुप्रमाणे, मूर्तीप्रमाणे साक्षात परमेश्वराचे अस्तित्व जाणवणे हे या भक्तीमार्गातील फार मोठे रहस्य आहे. यासाठी आपल्याला काही कृती करायला पाहिजे. ती म्हणजे संगत्याग करणे. संगत्याग, निवेदन म्हणजे मीपणा तो परमेश्वराला अर्पण करणे. आपण ज्याप्रमाणे फूल, फळ, नैवेद्य अर्पण करतो तसा आपला अहंकार परमेश्वराला अर्पण केला तर मी पण गळून पडेल. विदेहस्थिती, अलिप्तपणा, सहजस्थिती, उन्मनी आणि विज्ञान या सातही अवस्था एकच आहेत. त्याचा गाभा मी पण जाण्याशी आहे. त्यामुळे पादसेवन भक्तीतील सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या अहंकाराचा नाश होतो. आपला मी पणा गळून पडतो. कारण तो आपण परमेश्वराला अर्पण केलेला असतो. जे काही करणार ते मी नाही तर आता परमेश्वर करणार ही भावना याठिकाणी निर्माण झालेली असते.साक्षात्कार म्हणजे परमेश्वराशी संवाद होणे. त्या परब्रह्म अशा परमेश्वरानचे मार्गदर्शन होेणे. हे तेेव्हाच शक्य आहे. ब्रह्मसाक्षात्काराला आणखी कांहीं नांवे आहेत. पण साक्षात्काराने मिळणारे समाधान वर्णन करणारे ते भिन्न भिन्न शब्द समजावेत. पण हे सगळे सद्गुरुची चरणसेवा केल्यावर आपोआप कळूं लागते. हे फार मोठे फायदे याठिकाणी आहेत. वेदांचा अर्थ, वेदांचे रहस्य, वेदान्त तत्वज्ञान, शैव, सिद्धांचा मार्ग, सिद्धांच्या स्वानुभवाचे रहस्य, नाद बिंदु शुन्यता, अलक्षीं लक्ष, इत्यादि त्यांचे सिद्धांत, भगवंताच्या मार्गांतील विविध अनुभव, शब्दांच्या पलिकडे असणार्या गोष्टी, प्रत्यक्ष असले तरी भ्रम वाटणारे अनुभव या सगळ्याची अनुभूती यातून मिळते. अशी पारमार्थिक अनुभवाची अनेक अंगे आहेत. संतांची संगत लाभली तर ती सर्व कळतात. पादसेवन भक्तीच्यामुळे. अशा गुप्त व गूढ गोष्टी उघडपणे स्पष्ट होतात.हाही एक फायदा आहे. परमात्म वस्तु प्रगट असून नसल्यासारखी आहे. ती गुप्त असून मनाला भासते. परंतु ती वस्तु भास व अभास याहून निराळी आहे. तिला गुरुकडूनच शिकता येते. म्हणजे तीचे ज्ञान गुरुकडूनच होते. पूर्वपक्षामध्ये स्वस्वरुपाबद्दल शंका किंवा आक्षेप घेतला जातो. सिद्धांतामध्ये त्याचे निरसन करुन स्वरुपसिद्धि केलेली असते. म्हणुन समर्थ सांगतात की आंत पाहतांना जें जें ज्ञेयपणानें ज्ञात होईल तें तें अनात्म्याच्या राज्यांत जाते. आत्मवस्तु तशी पाहाता येत नाही. जी वस्तु लक्ष देऊन आंतमध्ये पहावी, ध्यानांमध्ये पहावी ती वस्तुच आपण होऊन जावे आणि शास्त्रप्रचिती,गुरुप्रचिती यांचा आत्मप्रचितीशी मेळ घालावा.आत्मवस्तु पाहातांना वेगळेपणाने उरतां कामा नये. तद्रूप होऊनच ती पाहावी लागते. स्वस्वरुपाचा अनुभव घेण्याचे हे असे मार्ग आहेत. सारासार विचार केला म्हणजे ते कळतात. वर ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या खरोखर सत्पुरुषाच्या संगतीस राहिल्यास अनुभवास येतील. तेव्हाच हे फायदे लक्षात येतील. सत्य असलेली परमात्म्य वस्तु तिच्याशी तद्रुप होऊन पाहिली, अनुभविली कीं असत्य असलेले दृश्य विश्व खरेपणाने उरत नाही आणि दृश्यच जोपर्यंत खरे वाटते तोपर्यंत परमात्म्याचा अनुभव येत नाही. पाहणारा कोणी परमात्मा पाहायला लागतो. परंतु तो त्याच्याशी तद्रूप झाला तरच परमात्मा पाहाता येतो. या तद्रूपेने अंगी समाधान बाणते. सद्गुरु व त्याच्या सेवेशिवाय भगवंताकडे नेणारा दुसरा मार्ग नाही. नाना प्रयोग करणे, नाना साधनांचा अभ्यास करणे, नाना सायास करणे, विद्या अभ्यास करणे यांनी परमात्म्याचे ज्ञान होत नाही.गुरुसेवेने जे मिळते ते या गोष्टींनी मिळत नाही. तो परमात्मा अभ्यास केल्याने अगर साधनांनी साध्य होत नाही. तो सद्गुरुसेवेनेच उमजु लागतो. सद्गुरुच्या चरणांची सेवा करणे याचे नांव पादसेवन, असे हे चौथ्या भक्तीचें लक्षण सांगितले. देव, ब्राह्मण, ब्रह्मज्ञानी संत, सात्विक सज्जन हे सेवा करण्यास योग्य आहेत. अशांबद्दल सद्भाव मनांत ठेवावा व त्यांच्या संगतींत राहावे. हें आहे व्यावहारिक बोलणे. परंतु खरे तर सद्गुरु चरणांची सेवा करणे हेच पादसेवन होय. ही चौथी भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी आहे. ती आचरणांत आणली असतां साधकास सायुज्यमुक्ती मिळते. म्हणून ही चौथी भक्ती श्रेष्ठांत श्रेष्ठ भक्ति आहे. या भक्तीनें पुष्कळ लोक संसारसागराच्या पैलतीरास पोहोचतात. हा फार मोठा फायदा या भक्तीचा आहे. ॥ जय जय रघुवीर समर्थ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा