- याकूबच्या फाशीनंतर संपूर्ण गुन्हेगारी जगत सक्रीय झाले आहे. एबीपी या न्यूज चॅनेलवर शनिवारी छोटा शकील फोनवरून धमकी देत होता. दाउदला महान ठरवून हा छोटा शकील न्यूज चॅनेलच्या निवेदिकेशी बोलत होता. दोन दिवसांपूर्वी टाईम्स ऑफ इंडियाला त्याने फोन केला होता. हे प्रकार पाहिल्यावर अतिशय संताप आल्याशिवाय रहात नाही. हे गुन्हेगारी जगतातील डॉन जे पोलिस यंत्रणेपासून लांब आहेत ते सरळ सरळ या वाहिन्यांना वृत्त संस्थांना कसे काय भेटू शकतात? ज्या फोनवरून त्याने फोन केला होता त्यावरून तो कुठे आहे याचा पत्ता सहज लागू शकत असताना आमचे गृहखाते कसे काय गप्प बसते? यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. प्रसारमाध्यमांच्या किंवा टाईम्स सारख्या वर्तमानपत्रांच्या पत्रकारांच्या हे लोक संपर्कात रहात असताना ते पोलिसांना का सापडू शकत नाहीत? दहा वर्षांपूर्वीसुद्धा असेच होते. विरप्पन पत्रकारांच्या माध्यमातून आपल्या कॅसेट पाठवत होता. अभिनेता राजकुमार यांना पळवल्यावर त्यासाठी मध्यस्त म्हणून पत्रकाराचा वापर केला जात होता. त्यामुळे शकीलसारखे लोक धमकी देण्यासाठी जेव्हा टाईम्स, एबीपी या गृपच्या संपर्कात येतात तेव्हा सर्वात प्रथम त्याला ताब्यात घेण्यासाठी या पत्रकारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले पाहिजे.
- या वाहिन्यांनी याकूबच्या फाशीचे जे थेट प्रक्षेपण दाखवले होते ते अतिशय घृणास्पद असे होते. देशात दाखवण्यासारखे काही नव्हते की काय? यामुळे या गुन्हेगारी जगताला डिवचून देशात घातपात करण्यास प्रोत्साहन दिले जात होते. त्यामुळे अशा वाहिन्यांवर बंदी घालण्याची आवश्यकता आहे. काय साधले याकूबचे उदात्तीकरण करून या वाहिन्यांनी याची चौकशी होणे गरजेचे आहे. याकूबला झालेली फाशी आणि त्या निमित्तानं वृत्तवाहिन्यांनी केलेला नंगानाच आपण सगळ्यांनी पाहिला. यावर सोशल मीडियात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये तीव्र संताप आहे. तसाच संताप आता शकील व्यक्त करत आहे आणि धमकी देत आहे. खरंतर कसाबची फाशी सेलिब्रेट करण्याची संधी मिळाली नाही याचं वृत्तवाहिन्यांना बरंच शल्य होतं. म्हणून याकूबची संधी सोडायची नाही, असा जणू चंगच या चनेलवाल्यांनी बांधला होता.
- रात्रभर हिंदी आणि मराठी वृत्तवाहिन्यांच्या डोळ्याला डोळा नव्हता. फाशी देणार हे जाहीर होताच यांच्या नाकात जणू वारं भरलं आणि त्यानंतर यांनी सात- आठ तास जो काही ब्रेकिंगचा हैदोस घातला, तो पत्रकारितेला शरमेनं मान खाली घालायला लावणारा होता.
- भल्या पहाटेपासून ब्रेकिंग आदळायला लागल्या. फाशीची सगळी तयारी पूर्ण... थोड्याच वेळात याकूब फासावर लटकणार. याकूब दोन दिवसांपासून उपाशी
- याकूबने आज नाश्ता केला. याकूबने कुराण वाचलं, नमाज अदा केली. अखेर याकूबला फासावर लटकवलाच. याकूबला अर्धातास फासावर लटकतच ठेवणार. अखेर याकूब मृत घोषीत, आता पोस्टमॉर्टेम. याकूबच्या फाशीचं शुटिंग केलं.याकूबचा मृतदेह विनामतळाकडे रवाना, थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार वगैरे वगैरे वगैरे...
- काय पाहतो आहोत आपण? काय करतो आहोत आपण? गुन्हेगारी जगताचे उदात्तीकरण करून वर देशात दंगाधोपा निर्माण होईल असे वातावरण तयार करण्याचे काम या वाहिन्यांनी केले आहे. यामुळेच शकील संतापून बोलत होता. तेही चॅनेलवर दाखवले जात होत. शरम वाटली पाहिजे आमच्या गृहखात्याला. शरम वाटली पाहिजे आमच्या वाहिन्यांच्या संपादकांना. कव्हरेज करताना आपण ते कुणासाठी करतोय? कुणाची बातमी देतोय? कशी देतोय? कशासाठी देतोय? त्यातून समाजमनावर काय परिणाम होतोय? याचं कसलंही भान त्यांना नव्हतं? होती ती फक्त गलिच्छ स्पर्धा. सगळ्यात पुढे राहण्याची.
- याकूबच्या बातमीचं कव्हरेज करताना चेकाळलेल्या वृत्तवाहिन्यांनी काही दिवसातच समाजाचं प्रचंड मोठं नुकसान केलं आहे. त्याची शिक्षा या वाहिन्यांना मिळाली पाहिजे. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची गरज आहे. यातून अप्रत्यक्षपणे समाजात दूही पसरवण्याचं पाप केलं.
- याकूबनं फासावर जाण्याआधी कुराण वाचलं, नमाज अदा केली ही ब्रेकिंग देऊन यांना काय साधायचं होतं? ही बातमी दिल्यावर कुराणावर श्रद्धा व्यक्त करणार्यांच्या मनात याकूबबद्दल काय भावना निर्माण होईल, याचा एकदाही मनात विचार आला नसेल? आपण दाखवतोय त्याचे समाजाच किती गंभीर आणि खोलवर दूरगामी परिणाम होतात याची साधी जाणीवही नसावी हे अत्यंत दुर्दैव म्हणावे लागेल. याकूबला फाशी झाल्यानंतर त्याच्या भावांचा बाईट घेण्यासाठी जे पाठलाग करून छळलं जात होतं ते संतापजनक होतं. हे चक्क त्यांना सूड घेणार की नाही यासाठी चिथावणारे होते. ते दोघे हात जोडून विनंती करत होते. प्लिज आम्हाला एकटं सोडा, आम्हाला काहीही बोलायचं नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर, अल्लावर पूर्ण विश्वास आहे. पण काही तरी बोला! असा आग्रह सुरुच होता. फाशीनंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हॉटेलमधून बाहेर आलेल्या दोन भावांच्या चेहर्यावर काय भावना होत्या असा प्रश्न न्यूज अँकर रिपोर्टरला विचारत होता. वृत्तवाहिनीच्या बड्या पञकारांनी तर लाजच आणली. हे महाशय थेट विमानात घुसले. याकूबचे भाऊ विमानातून मुंबईला कसे येत आहेत, हे सांगत सुटले. काहीजणांनी याकूबच्या अंत्यविधीतले गर्दीचे फोटो दाखवण्याचा निर्लज्जपणा केलाच.
- चॅनेलवाल्यांनी ही फाशी एखादी रंजक मॅच असावी त्याप्रमाणे सेलिब्रेट केली. याकूबची महायोद्ध्यासारखी बित्तंबातमी दाखवून एकप्रकारे त्याला हिरो केला. त्यातून याकूबला विनाकारण सहानुभूती मिळाली. या गदारोळात मुस्लिम तरूण दुखावला गेला. दोन समाजात द्वेशाची बीजं पेरली गेली, हे नाकारता येणार नाही.
- खरंतर याकूबच्या फाशीची बातमी आलेल्या दिवसापासूनच चॅनेलवाले भानावर नव्हते. सत्तेच्या खुर्चीसाठी प्रेतांवर राजकारणाचे डाव मांडणारे, फुटकळ प्रसिद्धीसाठी मिरवणार्या बिनडोक माथेफिरूंचे बाईट घेऊन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुच होता. त्याचाच परिपाक म्हणजे आज एबीपी न्यूजला छोटा शकीलने फोन करून दिलेली मुलाखत. गुन्हेगारी जगताचे मनोबल वाढवण्याचे काम वाहिन्यांनी केले.
शनिवार, १ ऑगस्ट, २०१५
गुन्हेगारी जगताचे मनोबल वाहिन्यांनी वाढवले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा