रविवार, २५ मे, २०२५

शब्दभ्रम कला अर्थात बोलक्या बाहुल्या


१९९०च्या दशकात महेश कोठारे यांचा झपाटलेला हा चित्रपट आला होता. २० वर्षांनी त्याचा पुढचा भागही आला होता. या चित्रपटातील मुख्य भाग आहे, तो बोलका बाहुला. आपल्याकडे रामदास पाध्ये आणि त्यांचे कुटुंबिय अनेक दशके हा बोलक्या बाहुल्यांचा खेळ जगभर करत आहेत. झपाटलेला या चित्रपटातही त्यांचे योगदान फार मोठे आहे. पण बोलक्या बाहुल्या म्हणजे नेमके काय, त्याची माहिती फार महत्त्वाची आहे.


बोलक्या बाहुल्यांच्या खेळाला शब्दभ्रम कला असेही म्हणतात. ध्वनी वा शब्द प्रत्यक्ष बोलणाºया व्यक्तीच्या तोंडून न येता दुरून वा वेगळ्या ठिकाणाहून आल्याचा आभास निर्माण करणारी ही एक रंगमंचीय कला आहे. बहुधा ही बाहुल्यांच्या साहाय्याने सादर केली जात असल्याने ती बोलक्या बाहुल्या या नावानेही ओळखली जाते. पोटातून बोलणे या अर्थाच्या मूळ लॅटिन शब्दावरून व्हेंट्रिलॉक्किझम हा रूढ इंग्रजी शब्द बनलेला आहे. त्यास गारूडवाणी असाही एक मराठी पर्याय आहे.

माणसाचे कर्णेंद्रिय आवाजाच्या नेमक्या दिशेचा अचूक वेध घेऊ शकत नसल्याने शब्दभ्रमाचा आभास काही प्रमाणात शक्य होतो. रंगमंचावर प्रयोग करताना शब्दभ्रमकार एक किंवा अनेक बाहुल्या वापरतो आणि त्या बाहुल्यांची हाताळणी अशा खुबीने करतो की, त्याने स्व:च ओठ न हलविता काढलेला आवाज बाहुलीच्या तोंडात आला आहे, असे प्रेक्षकांना वाटते. तसेच हा आवाज विकीर्ण (डिफ्यूज्ड) स्वरूपाचा असल्याने तो दुसरीकडून आल्यासारखे प्रेक्षकांना वाटते.


शब्दभ्रमाच्या कलेसंबंधीचे प्राचीन उल्लेख खाल्डियन बुक आॅफ प्रॉफिसिज या ग्रंथात आढळतात. हा ग्रंथ अ‍ॅसिरियाचा राजा दुसरा सारगॉन याने (इ. स. पू. सु. ७२२ - ७०५) या काळात लिहिला. हिब्रू व ईजिप्शियन या पुरातन संस्कृतींमध्ये पुरातत्त्वीय संशोधनानुसार शब्दभ्रमाविषयीचे काही निर्देश आढळतात. युरीक्लीझ हा प्राचीन ग्रीसमधील अथेन्सचा एक नावाजलेला शब्दभ्रमकार होता. काही सायबीरियन जमातींमध्ये आणि परंपरागत जपानी गायकांमध्ये शब्दभ्रमात्मक गायनाच्या पद्धतीही आढळतात. काही समाजात कला किंवा मनोरंजनाचे माध्यम म्हणून नव्हे तर जादूटोणा, जारण-मारण या प्रकारांमध्ये काही जादू म्हणून बाहुल्या वापरल्या जातात. भारत आणि चीन हे देश शब्दभ्रम कलेची आद्य केंद्रस्थाने म्हणून ओळखली जातात.

पाश्चात्य देशांमध्ये अठराव्या शतकात लोकरंजनाचा एक प्रकार म्हणून ही कला हळूहळू विकसित झाली. शब्दभ्रमतंत्राच्या जनकत्वाचा मान फ्रेडरिक मॅकबे या शब्दभ्रमकाराकडे जातो. त्याने १८७०च्या आसपास हाताचे पंजे रंगवून किंवा रंगीत हातमोजे वापरून त्यांच्या साहाय्याने शब्दभ्रमाचे प्रयोग सुरू केले. फ्रेड नीमन, सेनॉर वेन्सेस हेही त्या काळातले महत्त्वाचे शब्दभ्रमकार होते. ग्रेट ब्रिटनमधील फ्रेड रसेल याने या कलेच्या तांत्रिक बाजूकडे विशेष लक्ष दिले होते, म्हणून त्याला आधुनिक शब्दभ्रम कलेचा प्रवर्तक मानले जाते. परंतु ही कला खºया अर्थाने लोकप्रिय केली, ती सुप्रसिद्ध अमेरिकन शब्दभ्रमकार एडगर बर्गन याने. त्याचा चार्ली मॅकार्थी हा बाहुला अमेरिकेच्या सांस्कृतिक जीवनात एक बोलकी दंतकथाच बनला. फ्रान्समधील रोबेअर लामूरे हादेखील उल्लेखनीय शब्दभ्रमकार आहे.


भारतातील सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा प्रसिद्ध असा शब्दभ्रमकार म्हणजे प्रो. नाग. तो आपल्या कापडी बाहुल्यांच्या साहाय्याने लोकांचे मनोरंजन करीत असे, तसेच बाहुली न घेताही शब्दभ्रमाचा प्रभावी आविष्कार करीत असे. नंतरच्या काळात प्रो. भरतकुमार डार्क ऊर्फ गो. ग. भोसेकर यांनी कीर्तनात मुखवट्यांचा वापर करून ही कला अधिक लोकप्रिय केली. त्यानंतर यशवंतराव पाध्ये यांनी पूर्णाकृती बाहुल्या प्रथमच भारतात आणून भारतातील शब्दभ्रम कलेचे जनक असा लौकिक मिळवला. क्लॉड केनी, एस. रॉय व आर्थर कुक हेही व्यावसायिक शब्दभ्रमकार भारतात होऊन गेले. विद्यमान काळात शब्दभ्रम कलेचा प्रभावी व यशस्वी वापर व प्रसार हा रामदास पाध्ये हे करीत आहेत. त्यांच्या संग्रहात आठशेहून अधिक बाहुल्या आहेत. या कलेचा वापर अनेक देशांत मनोरंजनासाठी व शैक्षणिक कार्यासाठी होत असतो. रामदास पाध्येयांचा अर्थवटराव हा अतिशय लोकप्रिय झालेला बाहुला आहे. त्याने केवळ बोलक्या बाहुल्यांचेच काम केले नाही तर अफाट लोक्रप्रियतेमुळे त्याला मॉडेलिंगचीही संधी मिळाली. लिज्जत पापडसारख्या जाहिरातीसाठी त्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे एखाद्या सुपरस्टार नायकाप्रमाणे रंगमंच, चित्रपट, जाहिरात अशा क्षेत्रात रामदास पाध्येयांचे बाहुले लिलया दशकानुदशके वावरत आहेत. झपाटलेला हा रहस्यमय चित्रपट असला तरी रामदास पाध्येयांच्या या कलेने सगळ्या जगाला झपाटले आहे हे नक्की.

रामदास पाध्येंप्रमाणेच अनेक जादुगारांनी आपल्या जादुच्या प्रयोगात करमणुकीसाठी या बोलक्या बाहुल्यांचा वापर केलेला आहे. कार्लेकर नावाचे प्रसिद्ध सर्कसवाले आपल्या सर्कशीतही या बोलक्या बाहुल्यांचा खेळ करायचे. एखादा बाहुला जेव्हा नुसते तोंड हलवतो आणि बोलत असल्याचा भ्रम निर्माण करतो, तेव्हा फार मजा येते. प्रत्यक्षात बोलणारा दुसराच असतो. त्यामुळेच राजकारणात दुसºयाची स्क्रीफ्ट वाचून बोलणारे नेते असतात, तेव्हा त्यांना बोलका बाहुला म्हटले जाते. बाहुला हा निर्बुद्ध असतो. त्यामुळे पप्पू, भोंगा, पेग्विन अशा नावाने राजकारणात स्वत:ची मते नसलेल्या बाहुल्यांच्या खेळ आपण सातत्याने पाहत असतो.


प्रफुल्ल फडके/संस्कृती

९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: