नाशिकमध्ये पुढीलवर्षी होणाºया कुंभमेळ्याच्या तयारीची बैठक उद्या, रविवारी नाशिकमध्ये होणार आहे. चार महिन्यांपूर्वी प्रयागराज येथेही फार मोठा कुंभमेळा झाला आणि जगभरातून पर्यटक या पर्वणीसाठी आले होते. त्यामुळे या कुंभमेळ्याबाबत सर्वांना आकर्षण असणे स्वाभाविक आहे. कुंभमेळ्याचा कालावधी हा निश्चितच प्रसन्नता देणारा, आनंद देणारा असतो. त्यातून काहीतरी चांगले निर्माण होणार असते. म्हणूनच सरकार त्याच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देत आहे.
कुंभपर्व नावाच्या पुण्यकारक ग्रहयोगाच्या निमित्ताने दर बारा वर्षांनी चार तीर्थक्षेत्रांच्या स्थानी हिंदू भाविकांचा जो मेळावा जमतो, त्याला कुंभमेळा असे म्हणतात. हा मेळावा प्रयाग (अलाहाबाद), हरिद्वार, नाशिक आणि उज्जयिनी (उज्जैन) या चार ठिकाणी भरतो. प्रत्येक ठिकाणचा कुंभयोग निरनिराळा असून, त्याचा कालावधी वेगळा असतो. प्रयागराज येथे मकर राशीत चंद्र-सूर्य, वृषभ राशीत गुरू आणि अमावास्या तिथी असताना हा कुंभमेळा असतो. हरिद्वारमध्ये गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असताना कुंभमेळा असतो. तर नाशिकमध्ये गुरू सिंह राशीत आणि चंद्र-सूर्य कर्क राशीत असताना असतो. त्यामुळे याला सिंहस्त कुंभमेळा असेही म्हणतात. त्याचप्रमाणे उज्जयिनीला सूर्य आणि गुरू अनुक्रमे तुळ आणि वृश्चिक राशीत असताना हा कुंभमेळा असतो. आपण पाहिले आहे की, प्रयागमधील कुंभपर्वात मकर संक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे आहेत. त्यापैकी अमावास्या हे प्रमुख पर्व असून, त्याला पूर्णकुंभ हे नाव आहे, गुरूला राशीचक्र भोगण्यास बारा वर्षे लागत असल्यामुळे, दर बारा वर्षांनी कुंभयोग येतो. कुंभपर्वाच्या वेळी प्रयागादी क्षेत्रांत स्नान केले असता, अनंत पुण्यलाभ होतो, या भावनेने लाखो भाविक लोक तसेच शेकडो मठाधिपती व साधुसंत, आपापल्या घोडे, उंट, हत्ती अशा सरंजामासह त्या त्या ठिकाणी जमतात.
कुंभपर्वाबाबत पौराणिक आख्यायिका अशी आहे की, समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकुंभ हातात घेऊन धन्वंतरी वर आला, तेव्हा दैत्यांना अमृत मिळू नये म्हणून, देवांनी इंद्रपुत्र जयंताकरवी अमृतकुंभ पळविला. त्यावेळी देवदैत्यांचे युद्ध झाले. त्यात बारा ठिकाणी अमृतकुंभ खाली पडला. त्यांपैकी वरील चार स्थाने भूलोकात व अन्य स्थाने इतर लोकांत आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधूसंत, वेदशास्त्राचा अभ्यास करणारे एकत्र जमतात आणि काही नियम करतात. एक प्रकारे हे कायदेच तयार होत असतात. धर्ममान्यता देऊन तो रिवाज तयार होतो. त्यामुळे या पर्वाला फार महत्त्व असते.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो लोक येत असतात. त्यामुळे पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही हातभार लागतो. उत्तर प्रदेश सरकारने जानेवारी, फेब्रुवारीत ते यशस्वी करून दाखवले. आता सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमित्ताने नाशिकमध्ये ही पर्वणी महाराष्ट्राला मिळाली आहे. हा कुंभमेळा यशस्वी करणे हे फार मोठे आव्हान महाराष्ट्राला पेलायचे आहे. या कुंभमेळ्याचे निमित्ताने आपण शिस्तीचे आदर्श उदाहरण घालून देण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. यानिमित्ताने राजकीय हेवेदावे, अहंकार यांना तिलांजली देणे महत्त्वाचे आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्याचे वेळी रेल्वेत घुसण्याच्या नादात झालेली चेंगराचेंगरी ही चुकीची गोष्ट आहे. याला सर्वस्वी बेशिस्तपणाने वागणारे जबाबदार आहेत. पण त्याचे खापर सरकारच्या माथी फुटते. म्हणूनच हा कुंभमेळा यशस्वी करणे हे फार मोठे काम आहे. १३ आखाड्यांचे महंत, मंत्रिगण आणि शासकीय अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या समवेत उद्या याबाबत नियोजनासाठी सज्ज झाले आहेत. यशस्वी नियोजन करणे हे यासाठी फार महत्त्वाचे आहे.
प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा