शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१८

पायाभरणीचा घाट

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या शुभारंभ कार्यक्रमाला जात असलेल्या बोटींच्या ताफ्यातील एका स्पीड बोटीला बुधवारी अपघात झाला. या बोटीवर २५ जण होते. या दुर्घटनेत सिध्देश पवार हा शिवसंग्रामचा कार्यकर्ता मृत्युमुखी पडला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नियोजित पायाभरणीचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतु एकुणच हा कार्यक्रम, ही दुर्घटना ही अत्यंत संशयास्पद अशीच आहे. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला तो पाहता हा कार्यक्रम शासकीय होता की विनायक मेटे यांच्या घरचा होता असा प्रश्न पडल्याशिवाय राहवत नाही. हा कार्यक्रम निवडणुका समोर ठेवून आम्ही शिवस्मारकाची वचनपूर्ती करतो आहोत हे दाखवण्यासाठी केलेला अट्टाहास होता असेच एकुण घटनेवरून दिसून येते आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह कंत्राटदार, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी स्पीड बोटींमधून अरबी समुद्रामध्ये निघाले होते. मात्र, त्यांच्यातील एक स्पीड बोट दीपस्तंभाजवळील खडकावर आदळली आणि बोटीत अचानक पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. तीनपैकी एका स्पीड बोटीमध्ये शिवसंग्रामचे कार्यकर्ते होते. त्यामुळे शिवसंग्रामचे शक्तीप्रदर्शन करायला मेटे गेले होते की पायाभरणी करण्यासाठी गेले होते याचे मेटेंना उत्तर द्यावे लागेल. मुळात या शिवस्मारकाचे काम एल अ‍ॅड टी ही कंपनी करणार आहे. या कंपनीने शासनाला तीन महिन्यांपूर्वीच अहवाल दिला होता, की ज्या ठिकाणी स्मारक बांधले जाणार आहे त्या ठिकाणचा खडक मजबूत नाही. तिथे काम करणे अवघड आहे. असे असताना जोपर्यंत पूर्ण तयारी झालेली नसताना ही पायाभरणी करण्यासाठी मेटे तिथे का गेले असा प्रश्न पडतो. या बांधकामात अडचणी आहेत, याठिकाणी काम करता येणार नाही असे एल अ‍ॅड टी ने सांगितलेले असताना, बांधकाम विभागाची कोणतीही तयारी नसताना त्याठिकाणी पायाभरणीचा शुभारंभ करण्याचा घाट का घातला गेला? हा केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेला अट्टाहास होता का? केवळ विनायक मेटेंच्या समाधानासाठी आणि दिखाउपणासाठी हा देखावा निर्माण केला का? कोणत्याही कामात हेतु शुद्ध नसला की असेच होते. समुद्रात खडकाला बोट धडकल्याने हा अपघात झाला. ज्या बोटीला अपघात झाला आहे, त्यामध्ये सुमारे २५ जण होते. अनेक तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या बोटीची क्षमता नव्हती तरी त्यात जास्त माणसे कोंबली गेली. फायबरची बोट या भागात नेणे चुकीचे असताना ती नेली गेली. त्यामुळे कसलाही अभ्यास न करता, कसलीही तयारी नसताना या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले. हा कार्यक्रम पायाभरणी करण्यासाठी त्याठिकाणी प्लॅटफॉर्मची तयारी करणे आवश्यक होते. ती तयारी नसताना हा कार्यक्रम का केला गेला? हा कार्यक्रम शासकीय होता. सरकारच्यावतीने शिवस्मारकाची निर्मिती होणार आहे. सरकारी खर्चाने ही उभारणी होणार आहे. असे असताना त्याठिकाणी शासनाच्या वतीने जय्यत तयारी असणे आवश्यक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. ते का उपस्थित नव्हते याचेही उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे केवळ दिखाव्यासाठी आणि विनायक मेटेंची मर्जी राखण्यासाठी जनतेच्या डोळ्यात धूळफेक टाकण्यासाठी काही घाट घातला असेल तर त्याचा निषेध करावा लागेल. शिवस्मारकावरुन राजकारण केलेले कोणाही शिवप्रेमीला सहन होणारे नाही. पण विनायक मेटे यांनी मात्र शिवस्मारकाचा दिखावा केला त्यात एका तरुणाचा बळी गेला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मृताच्या नातेवाईकाला ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. पण हे काही समाधानकारक नाही. शिवस्मारकाला कायम वादात टाकण्याचे जे राजकारण चालले आहे ते थांबले पाहिजे. ही आमची अस्मिता आहे, त्याचे राजकारण नको. कधी त्याच्या उंचीचा वाद तर आता हा वाद. त्यामुळे या प्रकाराची नुसती चौकशी करून भागणार नाही तर याचा दिखावा करणारांनी माफी मागितली पाहिजे. शिवस्मारक उभारणीचे कंत्राट एल अ‍ॅण्ड टी म्हणजेच लार्सेन आणि टुब्रो कंपनीला दिले आहे. वास्तविक प्रत्यक्ष बांधकाम १२ मार्च २०१८ रोजी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव ते आतापर्यंत सुरू झाले नव्हते. अशा परिस्थितीत शिवस्मारकाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न ही लोकांची दिशाभूल आहे. याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. यातून विनायक मेटे यांना काय साध्य करायचे होते आणि हा एक बळी घेऊन त्यांनी काय साध्य केले असा प्रत्येकजण सवाल करत आहे. या स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नाही. कंत्राटदार केवळ काम सुरू केल्याचे दाखवून लोकांच्या नजरेत धूळफेक करत आहे. किंबहुना इथे काम करणे सोयीचे नसल्याचाही आणि खडक मजबूत नसल्याचा अहवाल त्यांनी दिला असताना हे का केले याचे उत्तर विनायक मेटे आणि सरकार दोघांनाही द्यावे लागेल. निवडणुका जवळ आल्यानंतर आपण काहीतरी करतोय असे दाखवण्यासाठी सरकारचा हा सगळा खटाटोप आहे की विनायक मेटेंना खूष करण्यासाठी ही स्टंटबाजी केली याबाबत महाराष्टÑ साशंक आहे. गेट वे आॅफ इंडिया आणि मरिन ड्राईव्ह समुद्रातील परिसरात खडक पसरलेला आहे. शिवस्मारकाची जागाच चुकीची असल्याचा दावा मच्छिमार मेते दामोदर तांडेल यांनीही केला आहे. हा सगळा निवडणुकीचा जुमला आहे आणि विनायक मेटेंनी स्टंट केला आहे असा आरोप त्यांनी केला. ज्या समुद्राची संपूर्ण माहिती आहे अशा तज्ज्ञांना विश्वासात न घेता असे कार्यक्रम कसे काय घेतले जातात असा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे. तांडेल यांनी तर या स्मारकाच्या संकल्पनेवरच आक्षेप घेतला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दाखला देताना सांगितले की मोदीही जलपूजनाच्यावेळी ज्या जागी प्रस्तावित शिवस्मारकाची जागा आहे तिथे गेलेच नव्हते व दुसरीकडेच जलपूजन केले होते. त्यामुळे ही नौटकी का केली गेली याचे उत्तर विनायक मेटे देतील का? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: