देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे दोनच मोठे पक्ष आहेत. बाकीचे सर्व पक्ष हे त्यांच्या आघाडीचे घटक पक्ष आहेत. त्यांना या दोन विचारांबरोबर किमान समान कार्यक्रम घेऊन जावे लागते. त्यामध्ये धार्मिकता, श्रद्धा, रूढी, परंपरा आणि उत्सव याला फार महत्त्व द्यावे लागते. हे सर्व सांभाळताना भारतीय लोकशाहीचे चक्र एका विचित्र दिशेने फिरताना दिसते आहे, ते म्हणजे काँग्रेसचे भगवीकरण आणि भाजपचे काँग्रेसीकरण होताना दिसते आहे.गेली अनेक वर्षे म्हणजे अगदी स्वातंत्र्यापासून काँग्रेस आपला पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे भासवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते २०१४ च्या निवडणुकीपर्यंत सोनिया गांधी-राहुल गांधी-मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने आपण धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थात काँग्रेसच्या काळात जेवढा जातीयवाद आणि धर्मवाद झाला तेवढा अन्य कधी झालेला नाही, हा भाग वेगळा असला तरी आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत हे सांगताना काँग्रेसला अभिमान वाटत होता. आता तोच अभिमान काँग्रेसने कुठेतरी बासनात गुंडाळून ठेवलेला दिसतो. त्याचा परिणाम काँग्रेसचे भगवीकरण होताना दिसत आहे. किंबहुना काँग्रेसची जी व्होट बँक होती त्यामध्ये मुस्लीम व्होट बँक फार महत्त्वाची होती. काही झाले तरी ही व्होट बँक जपलीच पाहिजे यासाठी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केला होता; परंतु आता तीच काँग्रेस मुस्लीम मतांचा विचार न करता धार्मिकतेला महत्त्व देत मंदिर, पूजा या प्रकारांना जवळ करत आहे. यावरून काँग्रेसने भगवी वस्त्रे अंगावर चढविल्याचे दिसते आहे.भारतातले सर्वात मोठे धरण म्हणजे भाकरा नांगल हे धरण. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि १९६३ ला ते धरण पूर्ण झाले. सतलज नदीवर बांधलेले हे धरण भारताला वरदान होते. त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, आता हेच आपले तीर्थस्थान आहे. विकासकामे होण्यासाठी, विकासाची गंगा घेऊन येणारे प्रकल्प ही आपली तीर्थस्थाने असली पाहिजेत. हा त्यांचा विचार अत्यंत मोलाचा होता. समाजाचा विचार करणारा होता. पण त्यामुळे आमची तीर्थस्थाने दुय्यम लेखली जात आहेत, भावना दुखावल्या जात आहेत, असा कांगावा तत्कालीन हिंदू विचारसरणीच्या जनसंघ परिवारातील संघटना आणि पक्षांनी केली होती. पंडित नेहरूंना त्यावरून टीकेला सामोरे जावे लागले होते; परंतु धरणे बांधून, पाणी अडवून विकास केला पाहिजे, या कृषीप्रधान देशाला त्यातून मोठे व्हायला हवे हा विचार नेहरूंनी त्यावेळी मांडला होता. तो अशाप्रकारे आक्रस्ताळेपणाने जनसंघ आणि परिवाराने मोडून काढला.हा खरा काँग़्रेसचा विचार होता. ती ख-या अर्थाने धर्मनिरपेक्ष काँग्रेस होती. त्यामुळेच भारतातील मुस्लीम मतदारांना मुस्लीम लीगपेक्षाही काँग्रेस जवळची वाटत होती; परंतु काळाचा महिमा असा की, आता काँग्रेसला भगवी वस्त्रे धारण करावी लागत आहेत. धर्मनिरपेक्ष आणि देव देव न करणारी काँग्रेस हिंदुत्ववादाला जवळ करत आहे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी चक्क मंदिर, मठ आणि तीर्थयात्रा करत हिंडत आहेत. भाकरा नांगलसारखे कोणतेही नेहरूंच्या काळात निर्माण झालेले अन्य तीर्थक्षेत्र आता दाखवायला आणि दर्शन घ्यायला काँग्रेसकडे नसल्याने त्यांना धार्मिक स्थळांना भेटी देऊन पुण्यसंचय करावा लागत आहे. त्यामुळे एकेकाळची अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आता भगवे रूप धारण करताना दिसत आहे.त्यामुळेच काँग़्रेसचे हे भगवे रूप काँग्रेसच्या मुस्लीम नेत्यांना जाचक ठरत असावे. त्याचा फायदा अन्य मुस्लीम पोषक पक्ष घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असे दिसते आहे. त्यामुळेच एकेकाळी वजनदार असलेले काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद हे कुठेतरी दुखावलेले दिसतात. त्यांनी तशी खंतही बोलून दाखवली आहे. ‘हिंदू नेते मला प्रचाराला बोलवत नाहीत’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे, ही काँग्रेसच्या दृष्टीने चांगली नाहीच, पण काँग्रेसचे भगवीकरण होत आहे या विचाराला पुष्ठी देणारे हे मत आहे. ‘गेल्या चार वर्षापासून काँग्रेसमधील हिंदू नेते मला प्रचारासाठी बोलवत नाहीत,’ असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. अलीगड मुस्लीम विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांच्या एका संमेलनात ते बोलत होते. हे अत्यंत खेदजनक आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या राजकारणाचा फटका आपल्याला बसला असल्याची खंत गुलाम नवी आझाद यांनी यावेळी व्यक्त केली आहे. काँग्रेस आता धर्मनिरपेक्ष राहिलेली नसून तिचे भगवीकरण झाले आहे, या गोष्टीला याशिवाय वेगळय़ा पुराव्याची काय गरज आहे.आझाद म्हणाले, ‘मी युवक काँग्रेसचा नेता असल्यापासून काँग्रेसच्या विविध निवडणुकांसाठी प्रचार करतो आहे. त्या काळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक नेते मला प्रचार करायला बोलवायचे. बोलवणा-यांमध्ये हिंदूंचे प्रमाण ९५ टक्के, तर मुसलमानांचे प्रमाण ५ टक्के होते. आता फारच तुरळक हिंदू नेते प्रचारासाठी बोलावतात.’ याचा अर्थ हिंदू नेते, काँग्रेसमधील हिंदुत्ववादी नेते हे मुस्लिमांपासून फारकत घेऊ पाहत आहेत, लांब राहात आहेत. कुठे गेली धर्मनिरपेक्षता? खरे तर मुस्लीम व्होट बँक निर्माण करणे हे काँग्रेसचे राजकारण होते. १९७७ च्या आणीबाणीनंतरच्या काँग्रेसच्या पतनानंतर काँग्रेसचे जे इंदिरा काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, रेड्डी काँग्रेस असे तुकडे पडले, १९९० नंतर जे राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस असे पुन्हा विघटन होत गेले त्यातच धर्मनिरपेक्षता फेकली गेली होती. त्यानंतर ती फक्त भाषणापुरतीच शिल्लक राहिली होती. पण हिंदुत्ववादी पक्षांना यश मिळते आहे म्हटल्यावर २०१४ नंतर काँग्रेसने उघडपणे त्या भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. त्याचे पुढचे पाऊल गुजरात निवडणुकीत राहुल गांधींनी सुरू केलेले देवदर्शन. त्यानंतर कर्नाटकात मठदर्शन आणि आता हिमालयात भगवी वस्त्रे धारण करून कैलास मानसरोवर यात्राही करून आले. हिंदुत्वाची कास धरूनच सत्तेचा सोपान मिळेल, असा साक्षात्कार झाल्याने काँग्रेसचे भगवीकरण झालेले दिसते. गुलाम नबी आझाद म्हणतात, १८५७च्या उठावानंतर ज्या प्रकारे हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण इंग्रजांनी केले, तेच प्रकार आता सुरू आहेत. काँग्रेसचा एक नेता म्हणून नव्हे तर भारताच्या प्रगतीची आस असलेला एक नागरिक म्हणून मी हे बोलतो आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यातून काँग्रेसच्या भगवीकरणाचा वेगळा पुरावा काय हवा? काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी हिंदू नेते प्रचाराला बोलवत नाहीत, अशी खंत व्यक्त केल्यावर आता एमआयएम नेते असदुद्दिन ओवेसींनी त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुसलमानांनी काँग्रेसला अजिबात मतदान करू नये, असे आवाहन त्यांनी केले.एकीकडे गुलाम नबी आझादांना अशी वागणूक मिळत असताना दुसरीकडे राहुल गांधी मध्य प्रदेशात प्रचारादरम्यान सर्व महत्त्वाच्या मंदिरांचे दर्शन घेत आहेत. जास्तीत जास्त हिंदूंची मतं मिळण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. अशा परिस्थितीत येत्या २०१९ लोकसभा निवडणुकीत मुस्लीम जनता कोणाला मतदान करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत काँग्रेसने मंदिर हमही बनायेंगे अशी घोषणा भविष्यात दिली, तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे १९८६ साली राजीव गांधींच्या काळात बंदीवान असलेले अयोध्येतील राम हे मुक्त झाले. आता त्या मुक्त झालेल्या रामाचे मंदिर आम्ही बांधू असे आश्वासन देण्यासही काँग्रेस पुढे-मागे पाहणार नाही.दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा भगवा रंग थोडा फिका पडत असल्याचे दिसत आहे. राम मंदिराच्या मुद्दय़ाचा पूर्णपणे विसर पडल्याची टीका तर भाजपवर सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. पण बेरजेच्या राजकारणाप्रमाणे निवडून येण्याच्या निकषाखाली अन्य पक्षांतून नेते आयात करण्याचे धोरण भारतीय जनता पक्षाकडून राबवलेले दिसत आहे. जे पूर्वी काँग्रेस करत होती, तेच काम आता भाजप करताना दिसत आहे. कामे कमी, बोलबाला जास्त. काँग्रेसच्या काळात शेतीसाठी प्रत्येक शेतक-याला विहिरीसाठी कर्ज दिली होती. त्या विहिरीचा बोलबाला खूप झाला होता. पण विकासकामातील त्या विहिरी नंतर चोरीला गेल्या होत्या. आजही भाजपने महाराष्ट्रापासून अनेक राज्य शौचालयमुक्त केली आहेत. लाखो शौचालये बांधल्याची घोषणा केली आहे. पण तरीही आम्हाला सकाळी बाहेर पडतो तेव्हा ‘रांगोळय़ानी सडे चहुकडे रस्त्यारस्त्यातूनी’ असे चित्र पाहावे लागते आहे. रेल्वेलाईनच्या कडेला मिश्री मळत दट्टय़ा येईपर्यंत बसणारे दिसतात. मग ही शौचालये गेली कुठे? चोरीला तर गेली नाहीत ना? म्हणजेच पूर्वी जे काँग्रेस करत होती तसे काम आता भाजप करताना दिसत आहे. थोडक्यात काय तर २०१४ च्या मोदी वादळानंतर झालेली उलथापालथ म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी आपण कोणत्या थराला आणि स्तराला जाऊ शकतो हे राजकीय पक्ष दाखवून देत आहेत. त्यात काँग्रेसचे भगवीकरण तर भाजपचे काँग्रेसीकरण झालेले दिसून येत आहे.