बुधवार, ८ जून, २०१६

चांगल्या कामाला बट्टा लागला


  • खडसे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थक १४ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. भावनेच्या आहारी जाऊन हे केलेेले असले तरी त्याला तसा काही अर्थ नाही. कारण खडसे यांच्या कारवाईने अनेकजण सुखावले आहेत. किमान खडसेंनी तरी काही काळ सुटकेचा श्‍वास सोडला असेल. पण अतिउत्साही कार्यकर्ते राजीनामे देत आहेत, दंगे करत आहेत. पण ही कृती त्यांची हकालपट्टी झाल्यावर मान्य करता आली असती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर खडसेंनी त्यांना थांबवून आपले काम चोख करण्याचे आदेश देणेच खडसेंच्या हिताचे आहे.
  •     तब्बल चार दशके सार्वजनिक जीवनात घालविणार्‍या, भारतीय जनता पक्षाला उत्तर महाराष्ट्रात ओळख मिळवून देऊन त्याचा विस्तार करणार्‍या खडसेंना ज्या पद्धतीने मंत्रीपदावरुन पायउतार त्यामुळे खान्देशात संमिस्त्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तम वक्ता, चाणाक्ष राजकारणी, प्रशासनावर कमालीची पकड असणार्‍या खडसेंची सारी प्रतिष्ठा केवळ एका पंधरवड्यात धुळीस मिळाली आहे. हे का झाले, कशामुळे झाले, कोणामुळे झाले याची खरी उत्तरे यथावकाश बाहेर येतीलच पण स्वतः खडसेंनीही आता मिळालेल्या विश्रांतीत आत्मपरिक्षण केले पाहिजे. 
  • भविष्याचा वेध घेतांना वर्तमानाचा अभ्यास केला पाहिजे व भूतकाळातही डोकावले पाहिजे. म्हणजे त्यांना आत्मपरिक्षण करणे सुसह्य होईल. खडसेंचे नेतृत्व एका दिवसात घडलेले नाही. त्यासाठी चाळीस वर्षे खर्ची गेली आहेत. त्यामुळे खडसेंच्या म्हणण्यानुसार या घटनाक्रमाला पक्षीय राजकारणाची किनार असेल तर अशांचे चेहेरेही जनतेसमोर नागवे झाले पाहिजेत. पण याचा अर्थ सुडाने पेटून खडसेंनी सर्वांच्या कुंडल्या काढाव्यात असाही नाही. शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आपल्या समर्थकांना राजीनामे देण्यास भाग पाडणेही योग्य नाही.
  •      संयमीपणाने आता खडसेंनी विषय हाताळला पाहिजे. त्याच साठी आत्मपरिक्षण केले पाहिजे कारण आता निवांत वेळ आहे. खान्देशातील वजनदार नेते, मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्री, राजकारणात प्रचंड दबदबा, भल्याभल्यांची खासगीतही विरोधात बोलण्याची ताकद नाही असे सारे असतांना खडसेंबाबत केवळ महिनाभरात असे काय झाले की चहुबाजूने ते घेरले जावेत? विरोधकांच्या रडारवर यावेत? राज्यस्तरीय जाऊ द्या शहरातील नगरसेवकही नसलेल्यांनी खडे बोल सुनवावेत? हे चित्र काही महिनाभरात निर्माण झालेले नाही. खडसे ज्या पद्धतीने राजकारणात वावरले, आपल्या शत्रूंचा काटा काढण्यासाठी खुनशी पद्धतीने सर्व यंत्रणांचा वापर केला त्यात आहे. विरोधी पक्षात असतांना खडसेंनी कुणालाच सोडले नाही, अनेकांना अंगावर घेतले आज त्यातील काही मंडळी खडसेंच्या अंगावर आली आहेत. 
  •   मुख्यमंत्री होण्याची सर्वार्थाने क्षमता असतांही त्यांना दूर ठेवले गेले. मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा गैर नाही पण राजकारणात वेळ महत्वाची असते. खडसेंनी वेळ येऊ द्यायला हवी होती. सरकार येताच पंढरपुरच्या विठूरायाच्या चरणी बसून बहुजन कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्या अंगलट आला. तेव्हापासूनच खडसेंचे पंख छाटण्यास सुरुवात झाली होती. गिरीश महाजनांना पक्षातून मिळणार्‍या बळाचा अर्थ त्यांना लावता आला नाही. तो लावता आला असता तर कदाचित त्यांच्या आचरणात फरक पडला असता. मुख्यमंत्र्यांना त्यांनी थेट आव्हान दिले नसले तरी खडसेंमुळे फडणवीसांनी स्वतःला असुरक्षित समजणे स्वाभाविक होते.
  •   राज्यात भाजपाचे सरकार येण्यासाठी खडसेंनी केलेले प्रयत्न वादातीत आहेत. ज्या पद्धतीने भाजपाला गल्ली ते दिल्ली भरमसाठ यश मिळाले त्यामुळे अनेकांच्या होक्यात हवा शिरली. खडसे त्याला अपवाद नव्हते. पण तुलनेने दुय्यम पद मिळूनही आपले कोणीच काही करु शकत नाही असा अहम त्यांच्यात वाढला. त्यातूनच दुसर्‍याला कमी लेखण्याची वृत्ती वाढीस लागली. उर्मटपणा आणि आरेरावी वाढली होती. यश त्यांना पचवता आले नव्हते. विरोधक दुखावलेले होतेच पण स्वकीयही सोबत राहिले नाहीत. त्यामुळे निर्णायक टप्प्यावर नाथाभाऊ एकाकी पडले. 
  • मुख्यमंत्रीपदावर डोळा असल्याने ते प्राप्त करण्यासाठी जे जे करावे लागणार आहे त्याची तजविज त्यांनी सुरु केली. पक्षांतर्गत राजकारणाच्या मुद्दा वेगळा ठेवला तरी नाथाभाऊंवर झालेल्या आरोपांचे गांभीर्य कमी होत नाही. ३० कोटींची लाच, दाऊदशी कथित संबध, पुण्याच्या जमिनीचे प्रकरण गंभीर होतेच. लाचखोरी आणि दाऊदचे प्रकरण सिध्द व्हायचे आहे पण पुण्याच्या जमिन प्रकरणी खुलासे करतांना त्यांना किती नाकीनऊ आले? स्वतःच्या मंत्रीपदाचा लाभ कुटूंबियांना मिळवून देण्यात भाऊंनी आततायीपणा केला असे मानायला जागा आहे. जमिन खासगी व्यक्तीची असली तरी ती एमआयडीसीला हवी होती मग स्वतः खरेदी करण्यापेक्षा एमआयडीसीकडे वर्ग करुन त्या उकानींना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. त्यांच्या चांगल्या कामाला यामुळे बट्टा लागला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: