शनिवार, २५ जून, २०१६

तिसराच कोणीतरी येईल


  • राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. या तत्वावर गलिच्छ आणि अतार्कीक राजकारण देशात चाललेले दिसते. अगदी तत्व, विचार अशी भाषा करणार्‍या भाजपनेही अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते २०१४ च्या निवडणुकीत आपलेसे केले होते. त्यामुळे भाजपत सध्या नवहिंदुत्ववादी आणि ओरीजनल भगवे भाजपेयी असे चित्र आहे. हे सगळे सत्ता मिळवण्यासाठी चालले आहे. सेना भाजप यांच्यातील सध्याचा संघर्षही त्यासाठीच आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल.
  •    राजकारणात प्रसंगही युती करणे अपरिहार्य असते. असे असले तरी स्वपक्षाची ताकद वाढवण्यासाठी घाणेरड्या राजकारणाचा मार्ग स्वीकारून एकमेकांची फरफट करणे निरोगी राजकारणाचे लक्षण नव्हे. यापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने आघाडी करीत सत्ता गाजवली. आघाडीतही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत होते. पण दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एक शिस्त आघाडीचा धर्म म्हणून पाळली होती. ती शिस्त सध्याच्या युतीकडे नाही. आम्हाला तुमची गरज नाही या तत्वावर दोघे चिटकून आहेत. म्हणजे घटस्फोटासाठी न्यायालयात गेल्यावरही अजून घटस्फोट झाला नाही म्हणून मैथून करत बसणे असला प्रकार सेना भाजपत आहे.
  •    शिवसेना-भाजपा युती कोणत्याच तत्त्वावर उभी नाही. राजकीय सत्ता आणि त्यामुळे हाती लागणारे घबाड ओरबडण्यासाठी प्रसंगी एक असल्याची ही नाटकबाजी आहे. म्हणून लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जास्त मते मिळणार्‍या भाजपाला शिवसेना चिल्लर वाटू लागली आहे. तर भाजपाची सत्ता जणू काही आपल्यामुळेच शाबूत आहे, असा समज करून दररोज कोणत्या ना कोणत्या विषयावर भाजपाला कमी लेखणार्‍या शिवसेनेचा खरा धर्म कोणता? अशा संभ्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जवळून पाहणार्‍या प्रत्येकास पडला आहे.
  •    पालिका निवडणूक जवळ येताच शिवसेनेला मराठी माणसांचे उमाळे यायला लागतात. काही दिवसांपूर्वी श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उकरून काढला, तेव्हा शिवसेनेची बोटचेपी भूमिका अवघ्या मराठी माणसांनी पाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भासाठी मतदान केले होते, ते वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत, अशी चर्चा सुरू होती. तेव्हा विधानसभेचे कामकाज थांबवून प्रथम मुख्यमंत्र्यांना तुम्ही अखंड महाराष्ट्रवादी की वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते आहात? असा जाब विचारायचे सोडून शिवसेना आमदार गप्प बसले. म्हणजे नेमक्या कोणत्या प्रश्‍नावर बोलावे आणि कुठे बोलू नये याचे भानही शिवसेनेच्या नेत्यांना राहिलेले नाही. त्या काळात शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना याबाबत जाहीर विचारणा केली नव्हती. तेव्हा कोठे होता शिवसेनेचा अखंड महाराष्ट्रातील मराठी माणसांचा धर्म?
  • परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महत्त्वाकांशी मेट्रो-३ प्रकल्पाला विरोध करण्यामागे शिवसेनेचे राजकारण आहे. गिरगावसारख्या मराठमोळ्या विभागात शिवसेना शाखांना लागणारी घरघर हेच शिवसेनेच्या विरोधाचे मुख्य कारण असल्याचे भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांचे म्हणणे शिवसेनेच्या मुळावर घाव घालणारे आहे. हा घाव शिवसेनेला एवढा जिव्हारी लागला की भाजपाला ‘निजामाचा बाप’ म्हटले. एकटे आशिष शेलार हे मुंबईत शिवसेनेला पुरून उरत आहेत. म्हणजे भाजपने आशिष शेलारांना मुंबईची जबाबदारी दिली आहे ती केवळ शिवसेनेला डिवचण्यासाठी आणि शिवसेनेच्या हातून जास्तीत जास्त चुका होण्यासाठी. त्या प्रत्येक जाळ्यात शिवसेना गळाला लागत आहे हे विशेष. किंबहुना मंत्रिपदापासून आशिष शेलारांना यासाठीच दूर ठेवले आहे. स्वकीय विरोधकांचा बंदोबस्त करण्याचे खातेच जणू शेलारांकडे दिले आहे.
  • चांगल्या कामाचे सहकारी म्हणून कौतुक न करता घाबरून जाऊन आणि आपले महत्व आता कमी होईल या भितीने सेनेचे नेते वागत आहेत. काही दिवसांपूर्वी जलयुक्त शिवाराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करताच जळफळाट झालेल्या शिवसेनेने उस्मानाबाद परांडा तालुक्यातील ‘शिवजलक्रांतीचे’ भांडवल करीत जलयुक्त शिवार योजनेचे यश झाकोळण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या ‘शिवसेना’ या संघटनेची सत्ताधारी भाजपासमोर सुरू असलेली केवीलवाणी धडपड बाळासाहेबांच्या  खर्‍या शिवसैनिकाला अस्वस्थ करणारी आहे. आता शिवसेनेला मराठी माणसाचा मुखवटा घेऊन जास्त काळ वावरता येणारे नाही.पालिकेची सत्ता हाती घेण्यासाठी सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप निवडणुकीचा निकाल हाती येताच बदलेले जातात, हे समजण्याइतपत मराठमोळा मतदार दुधखुळा राहिलेला नाही. सोबत विकासाची नाटकबाजी करण्यार्‍या भाजपालाही तो आपली लाडकी मुंबई सहजतेने सोपवणार नाही. भाजपाने मुंबईकरांशी केव्हाच आपलेपणा जपलेला नाही. व्यापारी आणि धनदांडग्यांचा पक्ष अशी झालेली भाजपाची चौकट बदललेली नाही. त्यामुळे या आरोप प्रत्यारोपांच्या युद्धात दोन बोक्यांच्या भांडणात लोण्याचा गोळा घेऊन जाणार्‍या माकडाप्रमाणे कोण तिसरा केव्हा येईल हे सांगता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: