- सगळं मिळालं तरी समाधान झालं नाही अशी माणसाची अवस्था असते. अजून काही तरी पाहिजेच. या हव्यासातून माणसाला वैफल्यग्रस्त अवस्था येते. अशा अवस्थेत माणसं कधीकधी आत्महत्याही करतात. नेमका तसाच प्रकार कॉंग्रेसचे गुरूदास कामत यांचेबाबत झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपली राजकीय आत्महत्या करण्याचे काम दोन दिवसांपूर्वी केले. काल त्यावरून मुंबईत आंदोलने वगैरे झाली. त्यांच्या घराभोवती त्यांचे कार्यकर्ते ठिय्या मांडून बसली होती. पण असल्या या नाटकांना काही अर्थ नसतो.
- आजपर्यंत कॉंग्रेसने त्यांच्यासाठी काय केले नाही? कॉंग्रेस पक्षाने त्यांना मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष केले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासोबत ते भरपूर मिरवले. ४४ वर्षे कॉंग्रेसची सेवा केली, असे ते म्हणतात. या ४४ वर्षात युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, मुंबई शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष, ईशान्य मुंबईतून चार वेळा खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि गुजरात राज्याचे कॉंग्रेसचे प्रभारी, तसेच राष्ट्रीय कॉंग्रेसचे दिल्लीत सरचिटणीस, अशा पदांवर या गुरुदास कामत यांनी काम केले. त्यांच्याकडे सातत्याने कोणते ना कोणते पद होते. आता गुरुदास कामत यांना असे जाणवू लागले आहे की, पक्ष संघटनेत त्यांना दुय्यम स्थान दिले जात आहे. म्हणून रूसून त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.
- खरं तर पक्षाने सर्व काही दिल्यानंतर अशा मंडळींना संन्यास का आठवतो?
- वर्षानुवर्षाची खासदारकी, केंद्रातील मंत्रीपद, अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीसपद इतके सगळे मिळाल्यानंतर जेव्हा कॉंग्रेस पक्ष अडचणीत आहे, तेव्हा हे निष्ठावंत म्हणवणारे नेते संन्यास घेण्याची भाषा करतात.
- अशी माणसे पक्ष कसा मोठा करू शकणार? स्वत:ला विचाराने ते कॉंग्रेसचे समजतात. अशा परिस्थितीत जेव्हा पक्ष अडचणीत असतो, तेव्हा पदांसाठी आणि सन्मानासाठी भांडणारे पक्षाला कसे मोठे करू शकतील?
- या नाराजी आणि संन्यासाचे मूळ कारण आहे ते संजय निरूपम यांना दिली जात असलेली संधी. गुरुदास कामत यांना संजय निरुपम मान्य नाहीत. पण हे मतभेद जाहीरपणे व्यक्त करायचे नसतात. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना सामान्य कार्यकर्ता थेट भेटू शकतो, तर गुरुदास कामत सहज भेटू शकतात. या उपरही पक्षश्रेष्ठींनी निर्णय दिला, तर तो निर्णय स्वीकारायची तयारी ठेऊन पक्षात काम करायचे असते.
- मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून गुरुदास कामत यांची निवड जेव्हा झाली, तेव्हा मुंबईतील प्रत्येक कार्यकर्त्यांला गुरुदास कामत यांची निवड मान्य होती, असे होते का? प्रत्येकवेळी एखादी निवड होते तेव्हा कोणीतरी नाराज हे होणारच असते. त्यात चलाउ नाणे असते त्याला संधी मिळते. हे काही कॉंग्रेसमध्येच घडते असे नाही. सगळ्या पक्षांत घडत असते. याबाबत भाजपचे माधव भंडारी यांच्यावर कितीतरी अन्याय झाला असे वाटते. पण त्यांनी आपली नाराजी कधीही प्रकट केली नाही. विनय सहस्त्रबुद्धेंनाही दीर्घ प्रतिक्षेनंतर संधी मिळाली. पण जेव्हा जेव्हा डावलले गेले तेव्हा त्यांनी अशी संन्यास घेण्याची भाषा केली नाही. असा प्रत्येकजण संन्यास घेऊ लागला तर पक्ष चालणार कसा?
- प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी जगात कुठेही, कधीही होत नाही. त्यामुळे ‘संजय निरुपम यांना अध्यक्ष केले’, या निर्णयामुळे मी पक्ष संन्यास घेतो ही भूमिकाच चुकीची ठरते. वास्तविक जेव्हा संजय निरुपम यांना अध्यक्ष केले तेव्हाच कामतांनी हा संन्यास घ्यायला हवा होता. पण तसे झाले नाही. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे दिवस आले आहेत त्या पार्श्वभूमीवर ते हा निर्णय घेत आहेत. यावरून त्यांना कोणी फोडले आहे काय? याचीही चौकशी करावी लागेल.
- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्या निवडणुका लक्षात घेऊन कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींना मराठी अध्यक्ष द्यायला कोणती अडचण होती? पण ही गोष्ट ज्यांना खटकत असेल त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे जाऊन बोलले पाहिजे. मराठीच्या मुद्यावर शिवसेना, मनसे माणसे जमा करत असताना आता भाजपही या स्पर्धेत उतरणार. अशा परिस्थितीत मराठीपण जपण्यासाठी अध्यक्ष मराठी असला पाहिजे हे निश्चितच. पण पक्षातील मतभेदाची धुणी सार्वजनिक नळावर धुवायची नसतात आणि उणी दुणी काढून संन्यास घेणेही बरोबर नाही. संजय निरूपम हे केवळ निमित्त आहेत, कारण दुसरेच असावे.
- प्रत्येक पक्षाला असे अडचणीचे दिवस येत असतात. त्यावेळी जे बरोबर राहतात, लढतात आणि पक्षाला विजयी करतात, ते खरे निष्ठेचे असतात. वाजपेयींचे सरकार गेल्यानंतर १५ वर्षे विरोधी पक्षात झगडत राहून त्या पक्षाने, सरकार आणले, लोकांना आपल्यासोबत घेतले. सत्तेच्या बाहेर राहिल्याबरोबर कॉंग्रेसवाल्यांना ही जी अस्वस्थता येते ती समजू शकत नाही का? एकेकाळी संघटक असलेल्या गुरुदास कामत यांना आता असे जाणवत आहे की, आपल्याला पक्ष संघटनेत दुय्यम स्थान आहे. कोणी विचारत नाही, अशांनी शांतपणे घरी बसावे. कॉंग्रेसने त्यांच्या या नौटंकीला फार महत्व देऊ नये. म्हणजे अगदी पप्पूपासून सगळे नौटंकीबाज असले तरी अशा नौटंकीला महत्व नको.
बुधवार, ८ जून, २०१६
नौटंकीला महत्व नको
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा