बुधवार, ८ जून, २०१६

टोलचालकांनी मुख्यमंत्र्यांना कोलले


देवेंद्र फडणवीस यांनी दीड वर्षांपूर्वी राज्याची मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली परंतु सरकारवर असलेल्या ठेकेदारी प्रशासनाला आळा घालण्यात त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या अंमलबजावणीतील ढिलेपणा आणि ठेकेदारांचा अंकूश यापुढे मुख्यमंत्री फडणवीस हतबल झाले आहेत काय असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही.याचे कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व टोलनाके ३१ मे २०१६ च्या रात्री बारा वाजलेपासून बंद होतील असे सांगितले होते. त्याचप्रमाणे जे टोलनाके सुरू आहेत आणि पुढेही सुरू राहणार आहेत त्या टोल नाक्यांवर छोट्या कार, परिवहनच्या बसेस, स्कूल बस यांना माफी दिली जाणार असल्याचे घोषित केले होते. मात्र यातील कशाचीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे वाहन चालकांमध्ये फार मोठी संतापाची लाट निर्माण झालेली आहे.टोल चालक आपली दंडेलशाही करत आहेत. वाहन चालकांना धाक दाखवून वसूली करत आहेत. १ जून पासून टोल बंद झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले असतानाही कसलाही विचार न करता टोल सुरूच ठेवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हुकूम चालत नसेल तर त्यांच्या पदाला काय अर्थ आहे असा सवाल निर्माण होतो. या राज्यात सरकार कोणाचे? सत्ता कोणाची? असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला जर टोल नाक्यावरचे यतकिंचीत कर्मचारी केराची टोपली दाखवत असतील तर अशा मुख्यमंत्र्यांचा उपयोग काय? टोल नाक्यावरचे गुंडगिरी करून वसूल करणारे वसूली कर्मचारी जर धाक दाखवून आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून वसुली करत असतील तर सत्ता ठेकेदारांची, टोलभैरवाची आहे की भाजप सेना युतीची असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही.टोल नाक्याचे आमिष दाखवून भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक आजी माजी आमदारांना आयात करून उमेदवारी देताना टोलमुक्ती हा त्यांचा शब्द होता. पण सत्तेवर आल्यावर याच टोलमाफीचा त्यांना विसर पडला. पनवेलचे तत्कालीन कॉंग्रेसचे आमदार खारघर टोल नाक्याला विरोध करण्यासाठी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना सोडून गेले. भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पक्षप्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गजांनी टोलनाके बंद करणार असे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या भाषणाच्या या क्लिप सतत वाहिन्यांवरून दाखवून टोल बंद करणार या आमिषाने मतदारांची दिशाभूल केली गेली. त्यावेळी अगदी शेरोशायरी करत नितीन गडकरी यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात टोलची प्रथा मीच सुरू केली आहे. त्यामुळे जो खेल हमने शुरू किया है, वो बंद करनाभी हमारा काम है, वो खेल सिर्फ हम ही बंद कर सकते है| या वाक्याला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे गडकरींचे स्वप्न जसे अपूर्ण राहिले तसेच टोलमुक्तीकडे त्यांनी दुर्लक्ष केले.त्यानंतर टोलवरून सतत मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातून टोकले जाउ लागल्यावर काही नाके त्यांनी बंद केले तर काही नाके ३१ मे पासून बंद होत आहेत असे सांगून १ जूनपासून टोल वसूली केली जाणार नाही असे जाहीर केले. पण मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला, थापेबाजीला कोणीही भिक घातली नाही. आज तीन जून आहे. गेल्या तीन दिवसात कोट्यवधी रूपयांचा टोल वसूल केला जात आहे. त्यामुळे या सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी ३१ मे च्या रात्री बारापासून संपूर्ण टोलवसुली बंद केली जाणार असल्याचे भाषण केल्याची क्लीप सोशल मिडीयावर फिरती आहे. तीन मिनिटांचे भाषण असलेल्या क्लिपचे भाजप कार्यकत्यार्र्ंनी सगळीकडे जोरदार प्रसारण केले. देवेंद्र फडणवीस यांचा खूप उदोउदो केला. व्हॉटसअप वरून ही क्लिप सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे मागच्या आठवड्यात सगळीकडे आनंदी आनंद होता. पण १ जूनपासून बंद होणारा टोल बंद झालाच नाही. वसुली तशीच सुरू राहिली. त्यामुळे सगळीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शंख केला जाऊ लागला. केवळ घोषणाबाजी करायची, भाषणबाजी करायची आणि प्रत्यक्षात कृती करायची नाही. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन तो निर्णय मंजूर करणे आवश्यक आहे. त्याचे परिपत्रक काढून तातडीने संबंधीत खात्याने आदेश काढणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींची मुख्यमंत्र्याना माहिती नसावी अशीच चर्चा सुरू झाली. त्यामुळे फडणवीसांच्या आदेशाला टोलचालकांनी केराची टोपली दाखवली की फडणवीस यांनी टोल बंद केला आहे असे खोटेच भाषण करून महाराष्ट्राची फसवणूक केली याचा तपास होणे गरजेचे आहे. पण यावरून भाजपचा खोटेपणा स्पष्ट होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: