शनिवार, ३० एप्रिल, २०१६

महाराष्ट्राच्या विभाजनाची दुर्बुध्दी नको


  • आज महाराष्ट्र दिन. या वर्षात महाराष्ट्राचे तुकडे करून विदर्भ मराठवाडा स्वतंत्र करणारी भाषा जोरात झाली. त्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा एक मे महाराष्ट्र दिन हा फार महत्वाचा आहे. कारण महाराष्ट्राची ही आणेवारी नक्की कोणाची कल्पना आहे हे श्रीहरीच जाणे. पण एकुणच संयुक्त महाराष्ट्राचे विभक्त महाराष्ट्र करण्यासाठी विदर्भातील नेते आतुर झालेले आहेत हे नक्की. त्यामुळे या संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करण्याची यानिमित्ताने आपणच क्षमा मागावी असे वाटते. तुझे तुकडे करणार्‍यांना माफ करा असे म्हणावेसे वाटते. म्हणूनच या संयुक्त महाराष्ट्रासाठी झटणार्‍यांचा आणि संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास जरा आठवला पाहिजे.
  •   २१ नोव्हेंबर १९५६ ची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. तेव्हा महाराष्ट्रासाठी एक आलेले नेते होते. ना शिवसेना होती ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना. फक्त प्रामाणिक नेते तेव्हा होते. म्हणूनच महाराष्ट्राला मुंबई नाकारण्याच्या निर्णयाचा सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य अर्थात कॉंग्रेसच सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. 
  •   मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसर्‍या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचार्‍यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणार्‍या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या.
  •  संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. 
  • १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेला हा संयुक्त महाराष्ट्र आहे. अगदी पहिला मुख्यमंत्रीपदाचा मान यशवंतराव चव्हाणांना मिळाला होता तरीही त्यांचे दिल्लीश्‍वरांपुढे काही चालत नव्हते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने त्यांनी काहीच भूमिका घेतली नव्हती. नेहरु आणि मोराराजीभाई देसाई यांच्यापुढे नांगी टाकण्याचेच काम त्यांनी केले होते. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत असणार्‍या आचार्य अत्र्यांची थट्टा करण्यातही यशवंतराव मागे नव्हते. तर अशा या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे या महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. तो हा आजचा दिवस आहे. महाराष्ट्रातून मुंबई काढून ती गुजरातला देण्याचा मोरारजी देसाई यांचा डाव होता. सगळे कॉंग्रेसजन आणि महाराष्ट्र विरोधी नेते मोरारजीभाई देसाईंच्या बाजूनेच होते. त्यामुळे महाराष्ट्रासाठी गिरणी कामगारांनी हा लढा दिला होता. त्यांनी हौतात्म्य पुकारले होते. या हौतात्म्याला तिलांजली देउन, त्याचा अनादर करून आता याच महाराष्ट्राचे तुकडे करायला काहीजण निघाले आहेत. दुष्टांच्या इच्छा लवकर पूर्ण होत असतात. त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांची सत्ता आहे तोपर्यंत हे लोक केव्हाही महाराष्ट्राचे तुकडे करू शकतात. कॉंग्रेसने ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशचे विभाजन केले तसे महाराष्ट्राचे विभाजन येत्या काही दिवसात अटळ आहे. पण हा विभाजनाचा अट्टाहास करणारे म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे स्वार्थी आहेत हे त्यातून स्पष्ट होणार आहे. समतोल विकासासाठी महाराष्ट्राचे विभाजन करायला चालले आहेत. संघवाले तर त्रिभाजन करायला चालले आहेत. पण जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात विदर्भातील मुख्यमंत्री होते. मराठवाड्यातील मुख्यमंत्री होते. त्या लातूरमध्ये गेल्या साठ वर्षात तिथल्या नेत्यांना पाणी नेता आले नाही ते स्वतंत्र राज्य झाल्यावर काय विकास करणार आहेत? आज महाराष्ट्रात मुंबई आहे म्हणून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरातील रोजगार आणि विकास, अर्थव्यवस्थेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राचे चालते. विदर्भ स्वतंत्र झाल्यावर विकास नसताना हे काय करणार आहेत ते आता भविष्यात पहावे लागेल. पण या १ मे रोजी निदान फडणवीस सरकारला त्यांच्या कारकीर्दीत ही दुर्बुध्दी सुचणार नाही अशी प्रार्थना करूया.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: