उन्हाळ्याने जशी पार्याची चाळीशी ओलाडली आहे तसे शीतपेये, सरबत पिण्याचे प्रमाण वाढले आहे. पण ही कृत्रिम शीतपेये शरिराला अतिशय घातक आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. कारण जेव्हा कृत्रिम शीतपेय आपण सेवन करतो तेव्हा अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो.
आपण टॉयलेट क्लीन करण्यासाठी हार्पिक सारखी द्रव्ये वापरतो. हार्पिकच्याऐवजी पेप्सी, थम्सअप आदी पेयांचा वापर करून पाहिला तर टॉयलेट तितकेच चकाचक होतात. हा प्रत्येकाने सहज करण्यासारखा प्रयोग आहे. यावरून तेच द्रव्य पोटात गेल्यावर काय अवस्था होत असेल हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे. याबाबत नुकतीच एक आकडेवारीही प्रसिध्द झाली होती.
उन्हाळा आला की साध्या पाण्याने तहान भागत नाही. मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो. कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन आपण समाधान मानतो. पण या कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपण पोटात ढकलत असतो.
या शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक ऍसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, ऍल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक ऍसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे. याचबरोबर दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतातच.
शीतपेयांवर वारंवार झालेल्या संशोधनानुसार, व्यक्ती जर सातत्याने शीतपेयाचे सेवन करीत असेल तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. ही शीतपेय माणसाच्या यकृताला आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचविते आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण देते. इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडनमधील प्रो. नीक वेअरहॅम यांच्या अभ्यासानुसार शीतपेयांच्या सततच्या सेवनाने वजन तर वाढतेच, पण शरीरातील इन्शुलिनचे कार्य कमी होते. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील प्रो. बेरी पॉपकीन यांनी तर आपल्या अन्नपदार्थातील साखर हा पदार्थ तंबाखूसारखा शरीरावर दुष्परिणाम करतो असे निष्कर्ष काढले आहेत.
या शीतपेयांच्या बाबतीत केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली त्यावेळी न्यायालयाने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतले आणि अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला असे आदेश दिले की शीतपेयांचे सेवन हे प्रत्यक्षपणे नागरिकांच्या जीवनाशी निगडित असल्यामुळे या कार्बोनेटेड शीतपेयांची वेळोवेळी योग्य ती तपासणी करण्यात यावी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे. मात्र बाजारात येणारी शीतपेये आणि त्यांचा वाढता खप पाहता न्यायालयाने दिलेल्या या आदेशांचे पालन केले जात नाही हेच दिसून येते. सेंटर फॉर सायन्स इन दी पब्लिक इंटरेस्ट (सीएसपीआय) या केंद्राने नुकताच प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक आहे. या अहवालानुसार
कोकाकोला आणि पेप्सीसारख्या शीतपेयांच्या उत्पादन कंपन्या मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांमध्ये प्रचंड गुंतवणूक करीत आहोत. कारण या देशांतील अफाट लोकसंख्येमुळे प्रचंड बाजारपेठ आहे. शीतपेयांच्या दुष्परिणामांची गंभीरताही या लोकांकडून दुर्लक्षित केली जाते. याचा फायदा उत्पादक उठवित आहेत. या केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतामध्ये १२.४ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड गुंतवणूक या कंपन्यांची आहे. याचाच अर्थ या कंपन्या मधुमेह, स्थूलत्व, दातांची हानी, हृदयरोग या आजारांना जणू खतपाणीच घालत आहेत.
भारतातील शीतपेयांची बाजारपेठ १० अब्ज डॉलर्स आहे. ती प्रतिवर्षी सहा ते सात टक्क्यांनी वाढते आहे. ‘कोक’ या कंपनीने विकत घेतलेले पेप्सी हे शीतपेय भारतात प्रथम क्रमांकाचे आवडते शीतपेय आहे. या कंपन्यांनी जरी असे जाहीर केले असले की लहान मुलांना लक्ष्य केले जाणार नाही तरीसुद्धा या शीतपेयांच्या जाहिराती प्रामुख्याने मुलांवरच चित्रित केलेल्या दिसतात. शासनाने शीतपेयातील साखरेच्या प्रमाणावर निर्बंध घातले पाहिजेत. त्याची कठोर अंमलबजावणी होते ना? याबाबतही वेळोवेळी तपासण्या केल्या पाहिजेत. साखरमिश्रित शीतपेयांवर धोक्याची जाणीव करून देणारे लेबल लावणे बंधनकारक असावे. तसेच शाळांमधून शीतपेयांच्या विक्रीस बंदी असणे अशी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. भारतासारख्या विकसनशील देशात जाहिरातींचे प्राबल्य तर खूप जास्त प्रमाणात आहे. आरोग्यास हानिकारक अशा शीतपेयांच्या जाहिराती तर लोकप्रिय कलाकारांच्या अवास्तव स्टंटबाजीने पुरेपूर असतात. लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी, कैरीचे सरबत, पन्हे आदी नैसर्गिक पेयांचे सेवन करणे अधिक फायद्याचे ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा