गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

राम नावाची उर्जा


  • आज श्रीरामनवमीचा दिवस. श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन् लाडकं दैवत आहे. जगाच्या कल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी, भगवान महाविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार आहे. चांगले वागावे कसे, कोणत्या वेळी कोणता निर्णय घेणे उचित आहे हे रामाने जगून दाखवले. रामाने उपदेश केला नाही तर अनुकरणीय वर्तन केले.
  •   श्रीरामाचा अवतार झाला तो त्रेता युगांत. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या, कौसल्या, सुमित्रा अन् कैकयी ह्यांना एकच दुःख होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. तो हा दिवस म्हणजे चैत्र शुध्द नवमीचा आजचा दिवस. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली गेली.
  •     श्रीराम हे श्रीरामायण ह्या महर्षी वाल्मिकींच्या ग्रंथाचे नायक आहेत. एक आदर्श पुत्र-पति-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजा पालक म्हणून रामाचे नाव घेतले जाते. श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होते.
  •    श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरुंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्येचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं. राजा जनकाच्या मिथिलानगरीत जाऊन शिव धनुष्याचा भंग केला. भुमीकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे अयोध्येचे राजपद भुषवणार म्हणून सारी प्रजा आनंदांत असतानाच मातृ-पितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्त्याने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना ह्यांचा वध केला.
  •      मर्यादा पुरूषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य. श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारं सारंच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय आहे.
  •  ह्या आदर्श अवताराची आपल्याला सदैव आठवण रहावी आणि तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्त असते. रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी देशभरातील मठ-मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम करून हा जन्मोत्सव 
  • सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन आदी कार्यक्रम ही केले जातात. या कालाला राम नवरात्र असेही म्हणतात. मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव केला जातो. सुंठवडा वाटला जातो.
  •     श्रीराम ही सर्व अबाल वृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात. श्रीराम कथा ही जशी पावन तसेच प्रभू श्रीरामाचे नाव हे सुद्धा पापनाशक, संकट निवारक, भक्त रक्षक असे आहे. जर श्रीराम ह्या नाम लेखनाने पाण्यावर पाषाण तरले, तर श्रद्धा, भक्ती व निष्ठापूर्वक श्रीरामाचे नाम घेणारा नामधारक हा ह्या भवसागरी कां तरणार नाही? नक्कीच तरणार. मात्र त्यासाठी त्या श्रीरामाची मनःपूर्वक उपासना करायला हवी हे विसरून चालणार नाही.
  • आपल्या समर्थ रामदासांनी श्रीराम जयराम जययज राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे. समर्थ रामदासांच्या या मंत्राचा पुनरूच्चार ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी केला. श्रीराम नामाच्या नौकेतून या भवसागरातील सर्व दु:खे, संकटे कशी तरून जातात याचा उपदेश या दोन्ही संतांनी केला. उत्तर भारतातही श्रीरामाच्या नामाचे स्मरण, जप करण्याचे तुलसीदासादी संतांनी सांगितले आहे.
  • रामाचे जीवन हे त्यागमय जीवन होते. दुसर्‍यासाठी जगणारे ते जीवन होते. त्यामुळेच श्रीराम हे आदर्श ठरतात. ऐन सुखाच्या वयात, आपल्या सावत्र आईच्या सांगण्यावरून, वडिलांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी राजवस्त्र उतरवून वनवासी वल्कले धारण करण्याचे धारिष्ट्य प्रभू रामांनी दाखवले. आजच्या भोगवादी राज्यकर्त्यांनी एवढे जरी लक्षात ठेवले तरी देशातील कितीतरी भ्रष्टाचार कमी होईल. यासाठीच या देशात रामराज्य यावे ही अपेक्षा नेहमी केली जाते. रामाचे जीवन, वागणे, आचरण ही सर्वांना मार्गदर्शक अशी शिकवण होती. यासाठीच रामाचे नामस्मरण सतत करावे असे सांगितले जाते. कारण जीथे राम आहे तिथे गैर काही होणार नाही. वाईटांचे उच्चाटन होते. नामस्मरणातून सर्व काही साध्य होते. चैत्रातील कडाक्याच्या उन्हातही राम नवमीचा उत्सव हा आपल्याला उत्साह देणारा ठरतो. याचे कारणच राम नावात एक प्रकारची उर्जा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: