शिक्षणात सुधारणा करण्याच्या चर्चा नेहमीच केल्या जातात. पण, कोणतीही व्यक्ती, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने या मंत्रिपदाचा भार सांभाळल्यापासून काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नव्या शैक्षणिक सुधारणांमध्ये शिक्षकांच्या निवृत्तीची तारीख निश्चित केली पाहिजे. राज्य सरकारने तसा कायदा संमत करून त्याबाबत शिक्षक सेवा निवृत्तीबाबतचा एक नवा शैक्षणिक धोरणाचा महाराष्ट्र पॅटर्न तयार केला पाहिजे. शिक्षकांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना मोर्चे काढावे लागतात, आंदोलने करावी लागतात. परंतु त्याहीपलीकडे शिक्षकांच्या निवृत्तीमुळे होणाºया नुकसानीचे अनेक प्रश्न आहेत. त्याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्याकडे कर्मचाºयांच्या सेवानिवृत्तीचे जे नियम आहेत, त्यामध्ये वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्यावर ज्या महिन्यात जन्म झाला त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याला निवृत्त केले जाते. परंतु हा नियम अन्य कोणत्याही खात्याबाबत योग्य असला तरी शिक्षण कर्मचाºयांबाबत विशेषत: शिक्षकांबाबत उचित नाही.
दरवर्षी शाळा या १५ जूनच्या आसपास सुरू होतात. सगळे मार्गी लागेपर्यंत १ जुलै उजाडतो. पण ज्यावेळी एखाद्या शिक्षकाची जन्मतारीख आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यातील असते, तेव्हा तो शिक्षक दोन अडीच महिने शिकवण्याचे काम करतो आणि त्याला निवृत्त केले जाते. बहुसंख्य शाळांमधून त्या शिक्षकाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेचे नियोजन त्यानंतर केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. एक शिक्षक चार-पाच वर्गांवर शिकवत असेल तर त्या शाळेतील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांचे नुकसान यामुळे होत असते. नवीन शिक्षक येऊन त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांची गट्टी जमेपर्यंत अनेक विद्यार्थी मागे पडतात. हे टाळण्यासाठी शिक्षकांच्या निवृत्तीची ठराविक तारीख असली पाहिजे. त्याबाबत शिक्षण खात्यात सुधारणा करून सरकारने तसा कायदा करण्याची गरज आहे.
या सुधारणेप्रमाणे आॅक्टोबरपर्यंत ज्यांच्या जन्मतारखा आहेत, त्यांना अगोदरच्या ३१ मेपर्यंत निवृत्त करावे. नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान ज्यांच्या जन्मतारखा असतील त्यांना पुढील वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. त्याप्रमाणे फक्त ३१ मे या दिवशीच सर्व शिक्षकांना निवृत्त करावे. शिक्षकांच्या निवृत्तीच्या अन्य तारखा असता कामा नयेत. कित्येकवेळा शिक्षक मुख्याध्यापक म्हणून पदोन्नत्तीच्या रांगेत असतात. पण काही घटनांमध्ये ३० एप्रिलला एक मुख्याध्यापक निवृत्त झाले. त्यानंतर १ मेपासून कागदावर नव्या मुख्याध्यापकाची नेमणूक होते. तो ३० जूनला निवृत्त होतो. म्हणजे सुट्टीच्या काळापुरताच मुख्याध्यापक झाल्याचे प्रकारही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अशावेळी योग्य त्या मुदतीकरता कामाची संधी सर्वांना मिळाली पाहिजे. त्यांची ज्या कारणासाठी नेमणूक झाली आहे, ती कागदोपत्री पदे असणे योग्य नाही. त्यासाठी निवृत्तीची तारीख शिक्षकांपुरती, निश्चित करण्याची सुधारणा सरकारने केली पाहिजे. शिक्षक संघटनांनीही याबाबत आग्रही भूमिका घेतली पाहिजे. फक्त जनगणना, निवडणूक काम नको यासाठी आंदोलने करतात, त्याप्रमाणे यासाठीही शिक्षकांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी कधीतरी पुढाकार घेतला पाहिजे.
अभ्यासेतर कामे शिक्षकांवर सोपवली तर आंदोलने होतात. पण कोणत्याही शिक्षक संघटनेने आजवर विद्यार्थी हितासाठी आंदोलन केले नाही हे फार मोठे दुर्दैव आहे या देशाचे. पंधरा वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काळात आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही असा कायदा केला. त्यामुळे दोन पिढ्या उद्ध्वस्त झाल्या, पण शिक्षकांनी कधीही या प्रकाराला विरोध केला नाही. प्रत्यक्षात पहिली ते आठवी कोणालाही नापास करायचे नाही याचा अर्थ विद्यार्थ्यांना इतके चांगले शिकवा की त्यांचा पाया मजबूत होईल. कोणीही नापास नाही झाला पाहिजे. पण याचा चुकीचा अर्थ काढून शिक्षकांनी शिकवण्यात अळम टळम केल्याचे दिसून आले. त्याचे दुष्परिणाम गेल्या पाच वर्षांत दिसत आहेत. परंतु शिक्षकवर्ग कधीही विद्यार्थी हिताचे काम करताना दिसत नाहीत. म्हणून किमान याबाबतीत तरी शिक्षक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षकांच्या निवृत्तीची तारीख निश्चित करण्याबाबत आग्रही असले पाहिजे.
आपल्याकडे शिक्षक कोण होतात? मी शिकून मोठेपणी डॉक्टर होईन, इंजिनीअर होईन, अमूक होईन, तमूक होईन असे छातीठोकपणे शालेय जीवनात अनेकजण सांगत असतात. पण कोणीही मी मोठेपणी शिक्षक होईन असे म्हणत नाही. म्हणजे शिक्षकी पेशा हा प्रतिष्ठीत नाही का? चांगले शिक्षक तयार न होण्याचे कारण इथेच आहे. त्यासाठी शैक्षणिक सुधारणांमध्ये काही मूलभूत सुधारणा केल्या पाहिजेत. काही जमले नाही, मार्क कमी पडले, कोणताही पर्याय नव्हता म्हणून डीएड, बीएड करून शिक्षक झालो असे म्हणणारे शिक्षक असतील तर ते कसे चांगले शिक्षण देतील? कमी गुण मिळालेला शिक्षक कधी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देईल का? त्यामुळे शिक्षकांची पत वाढेल असे धोरण आखण्याची गरज आहे. त्यांच्यावरची अशैक्षणिक कामे काढून घेतली पाहिजेतच. पण त्याचबरोबर कोणाही शिक्षकाला दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देताना, त्याच्या वर्तमानपत्रातून बातम्या किती आल्या यापेक्षा तो खरा शिक्षक आहे का याचा शोध घेतला पाहिजे. शिकवण्या व्यतिरिक्त शिकण्यात किती काळ घालवतो, ग्रंथालयात किती काळ बसतो? अवांतर वाचन करून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती श्रम घेतो याचा विचार केला पाहिजे. अशा सुधारणा केल्या तर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
- प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा