शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन


एखादा परिसंवाद किंवा चर्चासत्र असेल तर त्यात नेमका विषय काय आहे हे समजून न घेता भलतेच बरळणारे वक्ते दिसतात तेव्हा त्याला वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन असेच म्हणावे लागेल. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी लिहिलेल्या ‘जयोस्तुते’ या पुस्तकाचे प्रकाशन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या कारकिर्दीचा मागोवा घेण्याच्या हेतूने या पुस्तकाचे लेखन केले होते. पुस्तक प्रकाशनानंतर अवधूत वाघ यांनी एका परिसंवादाचे आयोजन केले होते. पण यातील वक्त्यांची वैचारिक दिवाळखोरी आणि अभ्यास न करता बोलण्याचे केलेले प्रकार पाहून हे खरोखरच पत्रकार आहेत का, असा प्रश्न पडला.


मुळात या परिसंवादाचा विषय होता संघाची पुढची दिशा व आव्हाने. यात वक्ते कोण होते? तर गांधीवादी पत्रकार जतीन देसाई, रवींद्र आंबेकर, किरण शेलार, प्रसाद काथे आणि मृणालिनी नानिवडेकर. यातील किरण शेलार आणि प्रसाद काथे वगळता कोणीही संघ जवळून काय दुरूनही पाहिलेला नाही. ते संघाची दिशा आणि आव्हाने काय सांगणार होते? मुळात इतका चांगला विषय असताना त्यावर जतीन देसाई, रवींद्र आंबेकर यांना काहीही बोलता आले नाही. त्यामुळे भलत्याच विषयावर ते बोलत होते. आंबेकर म्हणाले, मी कधीही संघात गेलो नाही, संघाच्या मैदानावर गेलो नाही. तरीही ते अगदी अधिकारवाणीने संघावर टीका करत होते. ज्या पदार्थाची कधी चवच पाहिली नाही त्याचा रंग कसा, वास कसा, चव कशी हे माहिती नसताना त्या पदार्थावर टीका करत नावे ठेवण्याचा प्रकार म्हणजे आंबेकरांचे वक्तृत्व होते. उद्या त्यांना एखाद्या चित्रपटावर किंवा पुस्तकावर समीक्षा लिहा सांगितले तर ते चित्रपट न पाहता किंवा पुस्तक न वाचताच त्यावर समीक्षा लिहितील. हिंदू धर्माबद्दल एवढा द्वेष करून ते बोलत होते आणि भेदभाव करू नये असे सांगत होते, हा फार मोठा विनोद होता. संघावर बोलण्याऐवजी अन्य संघटनांवरच बोलत होते. हेच आजचे राजकारण आहे. ही सगळी अभ्यास न करता बोलणारी पिल्लावळ आहे. म्हणजे राहुल गांधी राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलण्याऐवजी नरवणेंच्या पुस्तकावर बोलतात तोच प्रकार इथेही पाहायला मिळाला. त्यामुळे संघाची दिशा आणि आव्हाने काय असतील हे सांगायला अधिकारवाणीने बोलणाºया वक्त्यांना का बोलावले नाही आणि ज्यांचा अभ्यास आहे त्यांना कमी वेळ किंवा बोलू का दिले नाही, हा प्रश्न इथे पडल्याशिवाय राहिला नाही.

सगळ्यात विनोदाचा भाग म्हणजे जतीन देसाई स्वत:ला गांधीवादी विद्वान म्हणवतात. ते प्रश्न उपस्थित करतात की, सगळीकडे ३३ टक्के आरक्षण आहे, महिलांचा सहभाग आहे तर संघात महिला का नसतात? पण संघाचीच राष्ट्रसेविका समिती ही महिलांची संघटना आहे हे जतीन देसार्इंना माहिती नसेल का? पण केवळ संघाला नावे ठेवायला काही सापडत नाही म्हणून अशा प्रकारे बोलायचे याला वैचारिक दारिद्र्यच म्हणावे लागेल. अरे विषय काय, तुम्ही बोलताय काय? विषय सोडून बोलायला तुम्हाला इथे बोलावले होते काय? संघात कोणाला मज्जाव नसतो. एकदा जाऊन बघा आणि मग बोला.


अवधूत वाघ यांनी किमान आठ दिवस अगोदर निमंत्रण केले असेल, मग यांना विषय माहिती असूनही अभ्यास करून येता येत नाही? संघ द्वेष पसरवतो असे जतीन देसाई म्हणतात आणि स्वत:च्याच तोंडातून किती द्वेषाची भावना व्यक्त करत होते हे काल सर्वांनी पाहिले.

तिथे आणखी एक विद्वान वक्ते होते. ‘लोकसत्ता’चे शोध पत्रकार म्हणून स्वत:ला सांगत होते. त्यांचे नाव संदीप आचार्य. त्यांच्या घरातील सगळी माणसे वडील, काका आणि बरीच माणसे संघाचे स्वयंसेवक आहेत. तरीही त्यांना संघ आणि भाजप यातील फरक समजू नये? आपल्या भाषणात हे विद्वान म्हणाले, तुमच्याकडे चांगली आंब्याची पेटी असताना तुम्ही बाहेरचे नासके आंबे, खराब भ्रष्टाचारी लोक, काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेले लोक का घेता? अरे हा काय प्रश्न आहे? संघात काही पक्षप्रवेश नसतो. बाहेरून आले असतील तर ते भाजपमध्ये, संघामध्ये नाहीत हे पण या वक्त्याला समजू नये? चीन आणि अमेरिकेवरून जे प्रश्न सरकारला विचारायचे ते संघाला विचारले जात होते. सत्तेत संघ आहे का? पण एकूणच अकलेले दिवाळे आणि अभ्यास नसल्याने जखम मांडीला मलम शेंडीला लावण्याचा प्रकार ते करत होते. यातून या वक्त्यांची नक्की जागा काय आहे हे उपस्थितांनी ओळखली.


यामध्ये भाऊ तोरसेकर यांनी मात्र समयसूचकता दाखवली आणि संघ योग्य काम करतो आणि आज फुले, शाहू, आंबेडकर असते तरी त्यांनी संघालाच पाठिंबा दिला असता हे ठामपणे सांगितले. कारण ते एकमेव अभ्यासूपणे बोलणारे वक्ते होते. बाकी उथळ वक्त्यांचे वैचारिक दारिद्र्य दिसून आले. कारण दिशा आणि आव्हान काय हे अभ्यासण्याच्या पात्रतेचे ते नव्हते, हे पुन्हा एकदा अधोरेखीत करावेसे वाटते.

यातून एक स्पष्ट झाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी मजबूत मातृसंस्था कोणत्याही पक्षाच्या पाठीशी नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला हरवणे विरोधी पक्षांना सोपे नाही. संघ हेच या सर्वांपुढचे आव्हान आहे. म्हणून संघावर टीका करण्यासाठी, फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा उथळ वैचारिक दारिद्र्य असलेल्या वक्त्यांची निर्मिती केली जाते. संघापुढे आव्हाने नाहीतच, तो आपल्या कार्यात योग्य दिशेने जात आहेच, पण त्याकडे पाहण्याची विरोधकांची दृष्टी चुकली आहे. पत्रकार हा निस्पृह असला पाहिजे अशी अपेक्षा असताना, त्याची भूमिका कॅमेºयासारखी असली पाहिजे असे वाटत असले तरी फक्त विरोधासाठी विरोध या भूमिकेतून वागायचे आणि संघावर टीका केली की आपण मोठे, पुरोगामी होतो असा विचार करून वावरणारे भोंदू चेहरे समोर येतात, असे दिसते.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: