मराठी राजभाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटले जाते. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे हे वैभव जगभर नेण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आम्ही भाषेवरून राजकारण न करता भाषेवर प्रेम करायला शिकू. ती भाषा आमच्या रक्तात भिनली पाहिजे, ती जगली पाहिजे.
कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कादंबºया, निबंध, लघुकथा, नाटक, कविता यांचे कुशल लेखन केले. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत.
कुसुमाग्रजांच्या कारकिर्दीत पाच दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटके आणि कादंबºया या रूपात सुंदर साहित्य तयार केले. १९४२मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारा कवितासंग्रह, विशाखा हा त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखणीपैकी एक आहे.
महान राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र. या राज्याची मातृभाषा मराठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वक्तृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमांद्वारे हा गौरव दिन साजरा केला जातो.
मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून, भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी १५वी भाषा आहे, तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी भाषेतील साहित्यसंपदा विपुल असून, या भाषेला थोर परंपरा लाभली आहे.
मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला आहे असे म्हणतात. पण त्याही पूर्वी दोन हजार वर्षांपासून ती बोलली जात होतीच. या भाषेची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. इसवी सन बाराशे अष्टोत्तरमध्ये म्हाइंभट यांनी लीळाचरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजा जिंके... अर्थात, आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. मराठी भाषा अनेक संतांच्या कीर्तनांनी, ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे. या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखणींची समृद्धी आणि संपन्नता लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले. महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला. म्हणून ही भाषा अत्यंत महान आहे. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. यावरून राजकारण करणाºयांना लांब केले तरच मराठीचा गौरव होईल.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागातसुद्धा मराठी भाषा बोलली जाते. भारताव्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते, कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी-व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा बोलली जाते. आताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा येणेसुद्धा गरजेचे असले तरी आपल्या मराठी भाषेचे महत्त्व टिकवून ठेवणेदेखील तेवढेच आवश्यक आहे. मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणाºया पिढीला मराठी साहित्याची ओळख करून दिली पाहिजे. संतांनी, लेखकांनी, इतिहासकरांनी आपल्या भाषेत दिलेले ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल. मराठीचे वैभव वाढवण्यासाठी ती राजकारणमुक्त झाली पाहिजे.
मराठी भाषेचा सन्मान तेव्हाच होईल, जेव्हा आम्ही मराठी संस्कृतीशी एकरूप होऊ. वेश, आहार, सण यांची मराठी संस्कृती जपली गेली पाहिजे. आज मराठी माणसाचा नेमका पोशाख काय आहे? आहार काय आहे? याचा विचार करून आमच्या मराठी पुरणपोळी, मोदक, कांदेपोहे यांचा सन्मान केला पाहिजे. दाक्षिणात्य, पंजाबी, चायनीज आणि अन्य पदार्थांचा त्याग नाही केला तरी चालेल, पण आमच्या पदार्थांना दूर होऊ देऊ नका. आमचे पदार्थ जगभर पोहोचवले पाहिजेत. हिंदी चित्रपटात सरसों का साग, गाजर का हलवा, बैंगन का भरता केल्याचे संवाद दशकानुदशके ऐकतो, पण कधीतरी बेटा मैने तेरे लिये भरलं वांगं बनाया हैं, तेरे लिये पुरण पोळी बनायी हैं असा संवाद येईल हे प्रयत्न झाले पाहिजेत.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाइन्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा