शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

फक्त शाब्दिक बुडबुडे नकोत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारचा महाराष्टÑ दौरा झाला. यामध्ये मुंबई आणि पुण्यातील काही प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांनी केले. यामध्ये सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेचे अनावरण, मेट्रो ५ आणि मेट्रो ९ चे भूमिपूजन आणि पुणे मेट्रो ३ चेही भूमिपूजन त्यांनी केले. अत्यंत थाटामाटात असे हे समारंभ पार पडले. पण फक्त प्रश्न पडला आहे तो हा की हे  फक्त शाब्दिक बुडबुडे नकोत तर कृतीत यायला पाहिजे. केंद्र सरकारला विशेषत: भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे ही घाई चाललेली दिसते. आज पाच राज्यातील निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जोरात झटका बसल्यामुळे मोदी सरकार खडबडून जागे झालेले दिसते. त्याचा हा परिणाम असावा आणि विकासकामांचा डोगर उभा करून त्याचा बोलबाला करून निवडणुकांना सामोरे जावे असेच हे चित्र आहे. मोदी सरकारची साडेचार वर्ष झाली आणि आता येत्या चार दोन महिन्यात निवडणुकांना सामोरे जाताना या सरकारचे प्रगती पुस्तक ते काय मांडायचे  असा  प्रश्न त्यांना पडला असावा म्हणून हा आटापिटा चाललेला दिसतो. पण ही फक्त भूमीपुजने होणार की कामे प्रत्यक्षात होणार याबाबत कसलीही शाश्वती नाही. साडेचार वर्षात या सरकारने नेमके काय काम केले? नेमका कोणता विकास केला? इन्फ्रास्ट्रक्चरचे असे नेमके काय काम केले असे विचारले तर आज घडीला या सरकारपुढे, पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे दाखवायला काहीच नाही. गुजरातचे विकासाचे मॉडेल सांगून मागच्या पाच वर्षांपूर्वी जी विकासपुरूष अशी प्रतिमा निर्माण केली होती, गुजरातचा विकास केला तसा संपूर्ण देशाचा विकास मोदी करतील आणि अच्छे दिन येतील असे स्वप्न दाखवले होते. प्रत्यक्षात गुजरातमध्ये तरी विकास झाला आहे की नाही हे कोणीच पाहिले नव्हते. जंगल में मोर नाचे किसने देखा असाच तो प्रकार होता. पण मोर नाचला मोर नाचला म्हणून या मोराचा डौलदार पिसारा सगळ्या देशाला दिसावा यासाठी तो देशात आणला तर ती एक खुडुक कोंबडी निघावी तसाच काहीसा प्रकार झाला आहे. आज या सरकारचे  प्रगती पुस्तक पाहताना जनतेला काय दिसते आहे? साडेचार वर्षात या सरकारने नोटबंदी केली आणि आमची गोची झाली हेच आठवते आहे. या सरकारने जीएसटी आणला आणि आमचे दैनदिन जीवन महाग झाले हेच प्रत्येकाला दिसते आहे. या सरकारने तथाकथीत राफेलचा घोटाळा केला असा सूर विरोधकांनी जोरात आळवला आहे, त्याचा आवाज देशातल्या प्रत्येकाच्या कानात घुमतो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूतलावरचा एखादाही देश ठेवला नाही की तिथे ते दौºयासाठी गेले नाहीत, हेच दिसते आहे. याचा फायदा काय झाला? याचा देशासाठी उपयोग काय झाला हे सामान्य नागरिकांना काही समजलेच नाही. म्हणूनच जनता कान टवकारून आहे की नवीन कोणी येतोय का?  है कोई माईका लाल जो अच्छे दिन लायेगा, अशा शोधात जनता चाचपडते आहे. याचा परिणामच राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दिसून आला. काँग्रेसची सत्ता आली पण स्पष्ट बहुमत दिले नाही. भाजपला पूर्ण नाकारले नाही, त्यापेक्षा पूर्णपणे स्विकारलेही नाही. त्यामुुळे भाजपला जे मतदारांनी कुंपणावर आणून ठेवले आहे, त्यातून भाजपला आता बाहेर पडायचे आहे. म्हणजे आत शिरायचे आहे. काही करून आपण काही तरी केले आहे हे जनतेला दिसले पाहिजे या भावनेने भाजप सरकार बेभान झाले आहे. त्यामुळे हे फटाफट प्रकल्प आम्ही आणत आहोत. त्याचे भूमिपूूजनही केले आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न झाला. पण तरीही या नुसत्या भूमिपूजनावरून जनता या सरकारवर विश्वास ठेवेल का? हा आज जरी अनुत्तरीत प्रश्न असला तरी त्याचे उत्तर जनता येत्या सहा महिन्यात शोधेल. या भाजप सरकारने बुलेट ट्रेनचे भूमिपूजन केले. तो प्रकल्प होण्याची काहीही चिन्हे दिसत नाहीत. त्याला असलेला विरोध, जपानी कंपनीने दाखवलेली साशंकता, शेतकºयांची नाराजी हे पाहता हा प्रकल्प होईल असे चिन्ह दिसत नाही. त्याचप्रमाणे या बुलेट ट्रेनचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? त्याचे असणारे विमानापेक्षा महाग तिकीट आणि त्याच्या फेºयांचा फायदा कोणाला होणार आहे? त्या तुलनेत संपूर्ण भारतात सर्वाधिक उत्पन्न देणारी आमची मुंबईची जीवनवाहिनी लोकलचा दर्जा, त्याची संख्या वाढवण्याबाबत सरकारने काय केले? लाखो लोकांसाठी असणारी लोकलसेवा सुधारण्याकडे लक्ष न देता फक्त मुठभरांचा फायदा पाहणाºया प्रकल्पाचे भूमिपूजन केले गेले. हे जनता कसे विसरेल? ते भूमीपूजन होऊनही तो प्रकल्प पूर्ण होणार की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे हे सरकार फक्त भूमीपूजन करते प्रत्यक्षात त्यातले काहीच होत नाही हेच चित्र आजच्या प्रगतीपुस्तकात आहे. आमच्या छत्रपती शिवरायांच्या आंतरराष्टÑीय दर्जाच्या स्मारकाचे काय झाले? नुसतीच घोषणा झाली. भूमीपूजनाचे नाटक केले आणि त्यातही अपघात घडला. हे स्मारक कोण बांधणार, कधी बांधणार, कुठे बांधणार याबाबत काहीही स्पष्ट भूमिका नाही. फक्त घोषणा आणि भूमीपूजन. प्रत्यक्षात कामाला सुरूवातच नाही. तोच प्रकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे बाबतीत आहे. कधी होणार आहेत हे प्रकल्प? असेच सगळे प्रकल्प रेंगाळलेले आहेत. म्हणजे पूर्वी  काँग्रेसच्या काळात निवडणुकीच्या प्रचारात सांगितले जायचे, प्रत्येक गावात नळ येतील. प्रत्येक घरात नळ येतील. मग निवडणुका आल्या की दारात नळ पडायचे. नळाची जोडणी व्हायची. पण त्या नळाला कधी पाणी यायचे नाही. पुढच्या निवडणुकीत नळाला  पाणी येईल या घोषणेवर मते मिळवली जायची. तोच प्रकार भारतीय जनता पक्ष कार्पोरेट लेव्हलने करत आहे. फक्त शाब्दिक बुडबुडे सोडायचे. साडेचार वर्षात काय केले हे दाखवण्यासारखे काहीच नाही त्यामुळेच या शाब्दिक बुडबुड्यांचे प्रगतीपुस्तक घेऊन जाण्याची वेळ आज भाजपवर आलेली दिसते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: